Bird Sakal
सप्तरंग

सारंगागारांवर संक्रांत

सारंगागार म्हणजे पक्ष्यांनी गजबजलेले आगार. वृक्षांच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांच्या घरट्यांची डोलती वसाहत. रस्ते विकासाच्या नावावर आता या पक्ष्यांचे बहरू पाहणारे संसार उमलण्याआधीच उद्ध्वस्त होतात.

अवतरण टीम

सारंगागार म्हणजे पक्ष्यांनी गजबजलेले आगार. वृक्षांच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांच्या घरट्यांची डोलती वसाहत. रस्ते विकासाच्या नावावर आता या पक्ष्यांचे बहरू पाहणारे संसार उमलण्याआधीच उद्ध्वस्त होतात.

- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com

सारंगागार म्हणजे पक्ष्यांनी गजबजलेले आगार. वृक्षांच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांच्या घरट्यांची डोलती वसाहत. रस्ते विकासाच्या नावावर आता या पक्ष्यांचे बहरू पाहणारे संसार उमलण्याआधीच उद्ध्वस्त होतात. पर्यावरणीयदृष्ट्या अमूल्य असणारी महत्त्वपूर्ण परिसंस्था झपाट्याने नष्ट होत आहे.

गोष्ट हृदय हेलावून टाकणारी आहे. मागील महिन्यात केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील रांडाठाणी येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरणाच्या कामात एका जेसीबी यंत्राने सारंगागार (हेरॉनरी) असणाऱ्या एका भव्य वृक्षाला नेस्तनाभूत केले. क्षणात या वृक्षावरील असणारी गायबगळा, लेसर व्हिसलिंग बदके आणि पाणकावळ्यांची शेकडो घरटी जमिनीवर पत्त्याचा बंगला कोसळावा तशी कोसळली. त्यातील आठ-दहा दिवसांची पिल्ले पंखात बळ येण्याआधीच जमिनीवर घरंगळायला, विव्हळायला लागली. त्यांचा जगण्यासाठीचा आकांत व त्यांच्या आई-वडिलांचा विरह कुण्याही माणसाचे हृदय पिळवटून टाकणारे होते. या सारंगागार असणाऱ्या वृक्षाला पाडताना पुढे काय होणार याची जाणीव रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला आली होती. त्याने त्या जेसीबी चालकाला थांबविण्यापेक्षा या कोसळत्या संसारांचे चित्रीकरण केले आणि हा प्रसंग सर्व जगभर पोहोचला. साहजिकच या प्रसंगावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. समाज माध्यमांवरील या तीव्र प्रतिक्रियांची केरळच्या मंत्र्यांना गंभीर दखल घेणे भाग पडले. त्यांनी स्थानिक वनाधिकाऱ्यांना यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. वनाधिकाऱ्यांनी जेसीबी चालकाला अटक केली. त्याचा जेसीबी जप्त केला. ज्या रस्ते विभागाच्या कामावर हा जेसीबी होता तेथील जबाबदार अभियंता किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्यावर काही कार्यवाही झाल्याचे मात्र ऐकण्यात नाही. पक्ष्यांच्या अशा सारंगागारांसाठी केरळ राज्य प्रसिद्ध आहे. अनेक पाणथळ जागा, धानाची शेती, वृक्षांचे आच्छादन आणि खाद्याची रेलचेल यामुळे पाणपक्ष्यांचे हे राज्य आवडीचे ठिकाण बनले आहे.

हा काही पहिला प्रकार नव्हता. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नाशिकनजीक अशीच एक घटना घडली. त्याची तर फारशी चर्चाही झाली नाही. तीन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूर रस्त्यावर सारंगागार असणाऱ्या पिंपळ, वड, आंबा अशा अनेक झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यात मोठा बगळा, पाणकावळा अशा हजारो पक्ष्यांचा त्यांच्या पिल्लांसह मृत्यू झाला. या प्रकरणात भारतीय दूरसंचार निगमने वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी जबलपूर महापालिकेकडे परवानगी मागितली होती. कुण्या बल्लू खान नावाच्या ठेकेदाराला हे काम सोपविले गेले. ही परवानगी मिळताच त्याने कुठलेही सर्वेक्षण न करता ही झाडे तोडणे सुरू केले. शेकडो मजूर लावून या वृक्षावरील घरट्यांचा विचार न करता त्यांनी कत्तल सुरू केली आणि मग हा पक्षीसंहार घडला. हे काम तब्बल सहा दिवस सुरू होते. पक्ष्यांची हजारो घरटी जमिनीवर कोसळली. रस्त्याच्या दुतर्फा कोसळलेल्या १५०० ते २००० घरट्यांमधील पक्ष्यांचा निव्वळ आक्रोश पाहायला मिळाला. अखेर याची दखल स्थानिक लोकांनी घेतली. काही पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यातील काही पिल्लांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी १७७ जखमी पिल्ले सुरक्षित ठिकाणी हलविली. त्यातील सुमारे १५२ पिल्ले वाचविण्यात त्यांना यश आले. या प्रकाराची त्यांनी वन विभागाकडे तक्रार केली आणि अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे यात संबंधितांवर कारवाई झाली.

गायबगळे, बगळे, पाणकावळे, करकोचे व काही स्थानिक बदके या पाणपक्ष्यांच्या प्रजाती सुरक्षित ठिकाणचे वृक्ष शोधून समूहाने घरटी करतात. त्यालाच सारंगागार (heronry) असे म्हणतात. पक्ष्यांच्या सारंगागार असणारी अशी प्राचीन झाडे मुळात एखाद्या अभयारण्यासारखी असतात. पक्ष्यांच्या पुढच्या अनेक पिढ्या या वृक्षांच्या अंगाखांद्यावर मोठ्या होतात आणि आपले नवीन आयुष्य सुरू करतात. अगदी वर्दळीच्या शहरी तसेच ग्रामीण भागात असे पक्षी वसाहतींचे सारंगागार आढळून येतात. गावातील अडगळीत असणारी चिंच, आंबा, वड व पिंपळाची झाडे पावसाळ्याअखेर खाद्याची रेलचेल असल्याने हे पक्षी हेरतात. त्यावर घरटी बांधतात आणि आपल्या भावी पिढीची स्वप्ने बघतात. पावसाळ्यातील तीन ते चार महिने त्यांना भरविल्यानंतर या पिल्लांच्या पंखात उडण्याचे बळ येते. एकदा ही पिल्ले मोठी झाली की मग त्यांचे पालक त्यांना नजीकच्या पाणथळ जागांवर सुरक्षित हलवितात.

आज शहरी आणि ग्रामीण भागातील अशा पाणथळ जागाच धोक्यात आल्या आहेत. सोबतच अशा सारंगागारसुद्धा दुर्मिळ होत आहेत. हे चित्र देशातील सर्वच राज्यांमध्ये आहे. वन विभाग, जैवविविधता समित्या यांच्यापासून अजूनपर्यंत हा विषय कोसो मैल दूर आहे. त्यामुळे या सारंगागारांची देशभर विविध प्रकल्पांसाठी कत्तल सुरू आहे. पण गोरगरिबांचे आयुष्य सहज उघड्यावर आणणारे, संवेदनशीलता लोप पावलेले काही लोक समाजात वावरत असतात. ते चक्क माणसाच्या आयुष्यात रंग, संगीत, आनंद आणि सुदृढता पेरणाऱ्या या पक्ष्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त करतात. भारत सरकार, राज्य सरकारे, रस्ते महामार्ग विभाग यांनी पक्ष्यांची घरटी असलेली अशी झाडे अजिबात तोडू नयेत, असे स्पष्ट निर्देश देणे आवश्यक आहे. तसेच कायद्यात अशा पक्षीवसाहती नष्ट केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करणेही आवश्यक आहे. तसे होत नसल्याने हे सारंगागार आणि ही पर्यावरणीयदृष्ट्या अमूल्य असणारी महत्त्वपूर्ण परिसंस्था झपाट्याने नष्ट होत आहे. ही आपल्या सुदृढ कृषिव्यवस्थेसाठी आणि मानवी विकासासाठी धोक्याची घंटा आहे.

(लेखक मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT