summer Greenery sakal
सप्तरंग

उन्हाळ्यातील हिरवळ!

रखरखत्या मे महिन्यात मेळघाटमध्ये ठिकठिकाणी नदी-ओढ्यांमध्ये पाणी साचले. ठिकठिकाणी हिरवे गवत उगवले. पेंचच्या जंगलात तर सगळीकडे हिरवे गालिचे दिसले.

अवतरण टीम

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

रखरखत्या मे महिन्यात मेळघाटमध्ये ठिकठिकाणी नदी-ओढ्यांमध्ये पाणी साचले. ठिकठिकाणी हिरवे गवत उगवले. पेंचच्या जंगलात तर सगळीकडे हिरवे गालिचे दिसले. पावसाळ्यात ‘पेरते व्हा’ असे सुस्वर गाणारा ब्रेन फिवर जंगल दणाणून सोडत होता. ठिकठिकाणी मोराचे लांडोराला आकर्षित करणारे नाच सुरू होते. पर्यटनाला जाणाऱ्या निसर्गप्रेमींमध्ये वाघापेक्षा जास्त चर्चा या बदललेल्या हवामानाची होती.

यंदाचा उन्हाळा वन्यप्राण्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंद साजरा करणारा ठरला. डिसेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत सतत आलेल्या पावसामुळे जंगलात ‘जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे’ आहे.

एकीकडे पृथ्वीला असणारे धोके, पर्यावरण, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध दृष्टीने भारतातील बऱ्याच शहरांमध्ये जी-२० संमेलने होत आहेत. यंदाच्या या संमेलनांची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच ‘एक पृथ्वी - एक परिवार व एक भविष्य’ अशी आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेस हादरवून सोडणाऱ्या हवामान बदलाच्या विषयावर सामूहिक तोडगा काढण्याचे आव्हान या संमेलनांना पेलायचे आहे.

सध्या संपूर्ण जगावर हवामान बदलाचे वादळ घोंघावत आहे. मुळात वातावरणातील हरितवायूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातही एकट्या कार्बनच्या (३९० पार्ट पर मिलियन (पी.पी.एम.)च्या वर) प्रमाणात वाढ झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढले आहे. बर्फाच्छादित प्रदेशांमधील बर्फ वितळणे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणे, फयान, त्सुनामीसारखी अनेक नवनवीन वादळे येणे, ‘हिट वेव्हज’ येणे, ढगफुटी होणे यांसारख्या गोष्टी आता प्रत्यक्ष घडताना दिसून येत आहेत. बर्फाच्छादित प्रदेशांमधील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने समुद्रकिनारी असलेली अनेक शहरे, देश व बेटे अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. समुद्राची पातळी वाढल्याने किनाऱ्यावर अनेक बदल घडवून आणले आहेत.

तीच परिस्थिती बर्फाच्छादित प्रदेश म्हणून मिरविणाऱ्या गावांची, शहरांची आणि देशांची. हवामान बदलामुळे तापमान वाढ होऊन या देशांचे अस्तित्व व जगणेच एक आव्हान झाले आहे. येथील अर्थव्यवस्था पुरती कोसळली आहे. समुद्रकिनारे आणि बर्फाच्छादित प्रदेश यांच्यापासून दूर राहणाऱ्या देशांनाही हवामान बदलाने सोडले नाही. भारतातील अनेक राज्यांमधील कृषी व्यवस्था व विकास यांना हवामान बदलाचे दुष्परिणाम सध्या भोगावे लागत आहेत. एकूण काय तर हवामान बदलांचा तडाखा सगळ्यांना बसत असल्याचे जाणवत आहे.

यंदा सर्वसामान्य लोकांनाही हवामान बदल झाले, याची प्रचीती आली. पावसाळ्यानंतर हिवाळा आला; पण तो जाणवला नाही. कारण पावसाळ्याचे महिने संपले, तरी पाऊस मात्र ठराविक अंतराने नियमितपणे येतच राहिला. एरवी जानेवारी महिन्यात हिवाळा संपून, फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा बसायला लागतात; पण यंदा तसे काही झाले नाही. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातही पाऊस कोसळत राहिला. अगदी मे महिन्यात कोसळलेल्या पावसाने अनेकांना शेकोट्या पेटवायला भाग पाडले.

महाराष्ट्रातील मेळघाटच्या जंगलात फेब्रुवारी महिन्यात वणवे लागायला सुरुवात होते. वन्यप्राण्यांसाठी असणाऱ्या चाऱ्यावर गावातील पाळीव गुरे ताव मारायला लागतात आणि मग पाहता पाहता वन्यप्राण्यांसाठी राखून ठेवलेले गवत दिसेनासे होते. उरलेसुरले गवत वणव्यांमध्ये जळून राख होते. पाणी आता फक्त काही बारमाही पाणवठ्यांमध्ये दिसू लागते. येथील नद्या कोरड्या ठाक पडलेल्या दिसतात. व्याघ्र प्रकल्पात काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ असतो. नुकतेच मेळघाटचा फेरफटका मारून आलो. ठिकठिकाणी नदी-ओढ्यांमध्ये पाणी साचलेले दिसले. वणव्याचे काळे पट्टे तर अजिबात दिसले नाहीत. उलट ठिकठिकाणी हिरवे गवताचे पुंजके उगवलेले दिसले. मेळघाटचे सांबर अगदी उन्हाळ्यातही धष्ट-पुष्ट दिसले.

नागपूर व सिवनी जिल्ह्यात पसरलेल्या पेंचच्या जंगलात तर सगळीकडे हिरवे गालिचे अंथरलेले दिसले. येथेही वणव्याचा लवलेश नव्हता. पावसाळ्यासारखे वातावरण होते. पावसाळ्यात ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ असे सुस्वर गाणारा ब्रेन फिवर म्हणजेच कॉमन हॉक कुक्कु (पावशा) पक्षी सारखा जंगल दणाणून सोडत होता. आता याची ओरड ऐकून जर कुण्या शेतकऱ्याने पेरणी केली, तर पुढे काय होणार हे कुणीही सांगू शकणार नाही. पावसाळ्यात पाहुणा पक्षी म्हणून येणारा नवरंग दिसून आला. ठिकठिकाणी मोराचे लांडोराला आकर्षित करणारे नाच सुरू होते. अगदी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कान्हा व्याघ्र प्रकल्पातही असेच हिरवेगार वातावरण आहे. हीच परिस्थिती विदर्भातील बोर, नवेगाव-नागझिरा, उमरेड-करांडला आदी जंगलांमध्येही आहे, असे पर्यटनाला सर्वत्र जाणारे पर्यटक निसर्गभक्त सांगत होते. येथे वाघापेक्षा सर्वत्र चर्चा हवामानाची होती.

हवामान बदलाचे हे पडसाद पाहून प्रत्येक जण पावसाळ्याबद्दल चिंतित दिसला. उन्हाळ्यात ऊन पडले नाही, तर पावसाळ्यात खरेच पाऊस येईल काय आणि आला तरी त्यात सातत्य राहील काय, असा सर्व पर्यटकांचा प्रश्न होता. एकूण काय, हवामानात बदल झालेत आणि त्याचे परिणाम निसर्गात पडलेत, असा सर्वांचा सूर होता.

हवामान बदलाचे हे भूत येण्यास जबाबदार गोष्टींना आता सोडवावे लागेल. वातावरणातील वाढलेले कार्बनचे प्रमाण ३५० पी.पी.एम.वर आणण्यासाठी वातावरणामध्ये कार्बनचे (हरित वायूंचे) उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण आणणे व वातावरणात असलेल्या कार्बनला शोषून घेणारे वृक्षाच्छादन वाढविणे या दोन्ही गोष्टी साध्य करणे आवश्यक आहे. भारतामध्ये ऊर्जाक्षेत्र हे प्रामुख्याने ७१ टक्के कार्बन उत्सर्जन करते. त्याखालोखाल कृषिक्षेत्र १८ टक्के, उद्योग क्षेत्र आठ टक्के आणि टाकावू कचऱ्यामधून तीन टक्के कार्बनचे उत्सर्जन होते. पेट्रोल, डिझेलसारख्या तेलांच्या वापरातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित केला जातो.

त्यात भारत देश ७८ टक्के क्रूड तेल आयात करतो. कोळसा जाळून वीजनिर्मिती केल्यामुळेसुद्धा सर्वाधिक कार्बन उत्सर्जन होते. त्यासाठी अक्षय्य ऊर्जा हा पर्याय अवलंबिला जातोय; परंतु त्यासाठी विकसित देशांकडून भारताला खूप मोठ्या प्रमाणावर मदतीची अपेक्षा आहे. भारताचे सध्याचे कार्बनउत्सर्जन हे उदरनिर्वाहासाठी होणारे कार्बनउत्सर्जन आहे. तेथे पाश्चिमात्य देशांमधील कार्बनउत्सर्जन हे ‘आरामदायी जीवन’ जगण्यासाठीचे आहे. पाश्चिमात्य देशांनी या दोन्ही उत्सर्जनामध्ये असणारा फरक समजून घेतला पाहिजे. मग त्यासाठी भारताला आर्थिक मदत देऊन हे उत्सर्जन कमी करण्याची अपेक्षा ठेवली पाहिजे.

वनांच्या कटाईमुळे १७ टक्के प्रत्यक्ष कार्बनउत्सर्जन होते. सोबतच वातावरणातील कार्बन शोषून घेणारा हा महत्त्वपूर्ण स्रोतच नष्ट होतो. त्यामुळे वनांचा ऱ्हास व वनक्षेत्रामध्ये होणारी घट तातडीने थांबविणे आवश्यक आहे; परंतु त्यासाठी अशा उपक्रमांना भरघोस आर्थिक सहाय्याची गरज आहे. ते मिळविण्यातील अडथळे जी २० सारख्या परिषदांमध्ये सुटले नाही, तर मात्र आम्ही काही भरीव मिळविले, असे होणार नाही. त्यामुळे अशी संमेलने भारतातील शाश्वत विकास, कार्बनउत्सर्जन रोखणे, त्यासंबंधीच्या उपाययोजना करणे या सर्व विषयाला गती देणारे असले, तरच काही फायदा होऊ शकतो.

​(लेखक गेल्या तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT