- केतन पुरी
आज १४ जानेवारी. सन १७६१ मध्ये आजच्याच दिवशी पानिपतच्या रणांगणावर मराठे आणि अफगाण यांच्या सैन्यात पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं. भारताच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी असंख्य मराठा वीरांनी सर्वस्व अर्पण केलं.
पानिपत हे महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाचं महत्त्वाचं पान आहे. याच पानिपतयुद्धातलं महत्त्वाचं सरदारघराणं, ज्या घराण्यानं शंभर-सव्वाशे वर्षं उत्तर हिंदुस्थानचा कारभार चालवला आणि भारतभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ते म्हणजे ‘सरदार होळकर घराणं’. अठराव्या शतकात शिंदे-होळकर-भोसले या घराण्यांनी उत्तरेचं राजकारण समर्थपणे सांभाळलं.
होळकरांचं मुख्य ठाणं इंदूर शहरात. याच इंदूरमध्ये होळकरांचा भव्य राजवाडा आहे. महाराष्ट्रातून जाणारे कित्येक पर्यटक या राजवाड्याला भेट देतात; पण ‘लालबागमहाला’विषयी पर्यटकांना फारशी कल्पना नसते.
होळकर घराण्याचं कित्येक वर्षं निवासस्थान असलेल्या या महालाचं वैभव डोळे दिपवून टाकणारं आहे. भारतातल्या अतिश्रीमंत महालांमध्ये या ‘लालबाग महाला’चा समावेश होतो. तुकोजीराव होळकर (द्वितीय) यांच्या काळात सन १८८६ मध्ये या महालाच्या बांधकामाला सुरुवात झाली, तर त्यांचे नातू तुकोजीराव होळकर (तृतीय) यांच्या काळात बांधकाम पूर्ण झालं.
तब्बल ७२ एकर परिसरात पसरलेल्या जागेवर भलामोठा महाल आणि उद्यान तयार करण्यात आलं. आधी या उद्यानात फक्त गुलाबाची फुलं लावण्यात आली होती. फुलांमुळे संपूर्ण परिसर लाल रंगानं सजून जाई, म्हणून या महालाला ‘लाल बाग’ असं नाव देण्यात आलं.
या महालाचं प्रवेशद्वार म्हणजे ‘बकिंगहॅम पॅलेस’ची प्रतिकृती असून ते लंडन इथंच तयार करण्यात आलं आणि समुद्रमार्गे मुंबईला आणि तिथून इंदूरला आणण्यात आलं. महाल तीनमजली असून, एकूण पंचेचाळीसच्या आसपास खोल्या आहेत.
त्यांमध्ये अनेक शयनकक्ष आहेत, दिवाणखाने आहेत, ग्रंथालय-नृत्यकक्ष आहेत. दिवाणखान्यात आणि महत्त्वाच्या खोल्यांमध्ये पर्शियन गालिचे आहेत. सर्व महालात आतल्या बाजूनं इटालियन मार्बलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
भिंतींवर सोन्याची कारागिरी आहे. दिवाणखान्याचं छत अतिशय मोठं, आकर्षक आणि श्रीमंती थाटाचं आहे. छतावर ‘ग्रीको-रोमन’ संस्कृतीच्या अनेक देवतांचं अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे. संपूर्ण महालात अनेक ठिकाणी छतांवर किंवा भिंतींवर आकर्षक चित्रं चितारलेली आहेत.
याचे चित्रकारसुद्धा ग्रीसवरून आल्याची माहिती उपलब्ध आहे. ही चित्रं खास या महालासाठीच तयार करण्यात आली आहेत. यांच्या प्रतिकृती जगात कुठंही उपलब्ध नाहीत. सर्वच खोल्यांमध्ये असणाऱ्या खुर्च्या, लाकडी मेज यांची निर्मिती युरोपातच केली गेली असून तिथून हे सर्व लाकडी साहित्य इंदूरमध्ये आणण्यात आलं.
महालामध्ये सर्वच ठिकाणी केलेलं बेल्जियम काचांचं काम पर्यटकांना आकर्षित करत राहतं. या संपूर्ण महालात असणाऱ्या लोकांची जेवणाची व्यवस्था मात्र नदीच्या पलीकडील बाजूला करण्यात आली होती. लालबाग महालाच्या मागच्या बाजूनं एक नदी वाहते. नदीच्या दुसऱ्या बाजूला शाही स्वयंपाकघर होतं. चुलीच्या धुरानं महालाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये हा उद्देश.
महाल आणि स्वयंपाकघर एका मोठ्या भुयारानं जोडलेलं होतं आणि तळघरातून जेवण पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर आणण्यासाठी ‘विद्युत लिफ्ट’ची व्यवस्था करण्यात आली होती. एकोणिसाव्या शतकाच्या मानानं हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल आणि होळकरांच्या राजेशाही थाटाचं प्रतीक म्हणूनही याकडे पाहावं लागेल.
लालबाग महाल हा अतिशय श्रीमंती थाटाचा आहे. या महालाचे स्थापत्यविशारद होते बर्नार्ड ट्रिग्स. फ्रान्सिसी, आंग्ल आणि इंडो-इस्लामिक स्थापत्यशैलीचं अतिसुंदर मिश्रण या महालात झालेलं आहे.
या महालाची आणि आतल्या मौल्यवान वस्तूंची निर्मिती करण्याची जबाबदारी दोन कंपन्यांकडं देण्यात आली होती. आतल्या शिल्पांचं पॅनेल, ब्राँझपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, आतली चित्रं, दगडी वस्तू आणि लाकडी फर्निचरचं काम ‘मार्टिन अँड कंपनी, चेल्टनहम’ यांच्याकडे देण्यात आलं होतं, तर उर्वरित काम करण्याची जबाबदारी ‘वॉरिंग अँड गिलॉस’ या कंपनीकडे होती.
सन १९७८ पर्यंत या महालात होळकर राजघराणं वास्तव्याला होतं. तुकोजीराव महाराज (तृतीय) यांच्या मृत्यूनंतर मात्र तुकोजीरावांची नात उषाराजे यांनी आपल्या अमलात एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्टच्या अखत्यारीत संपूर्ण महालाचा कारभार तब्बल दहा वर्षं सांभाळला.
त्यानंतर, मध्य प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी महालाची योग्य देखभाल करण्याच्या उद्देशानं तो महाल सरकारच्या अमलाखाली आणला आणि सन १९८८ पासून लालबाग महाल सरकारच्या नियंत्रणात आहे.
इथल्या उद्यानाला जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलेलं आहे. स्थानिकांच्या मते, सरकारनं या महालाची अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली असून, महालातल्या मौल्यवान वस्तूंची उत्तम देखभाल केली जात आहे. सरकारनं या ठिकाणी अतिशय सुंदर संग्रहालय उभारलं आहे.
इंदूरच्या ‘राजवाडा चौका’पासून अवघ्या तीन किलोमीटरवर हे वैभव आहे. अठराव्या शतकात महाराष्ट्रानं साऱ्या भारताचा राज्य कारभार हाकला. इंदूर, उज्जैन, बडोदा यांसारख्या ठिकाणी अतिशय भव्य आणि अतिशय सौंदर्यशाली वास्तू मराठा सरदारांनी उभारल्या. एकदा तरी हे सर्व काही प्रत्यक्ष भेट देऊन अनुभवायलाच हवं.
(लेखक हे सध्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व या विषयावर पीएच.डी. करत असून, पुरातत्त्वीय पर्यटनाच्या माध्यमातून मंदिर, शिल्प, लोकसंस्कृती, तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.