कोरोनाने साऱ्या जगाला त्रस्त करून सोडले आहे. दैनंदिन जीवनाची, रोजगाराची चाके थांबली आहेत. शाळा जवळपास 15 मार्चपासून बंद कराव्या लागल्या. मात्र, शिक्षण थांबलेले नाही ते थांबू शकत नाही. औपचारिक, अनौपचारिक शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने ते चालूच राहतं. शाळा बंद पण शिक्षण आहे असे म्हणायला वाव आहे कारण... लर्न फ्रॉम होम !!
शालेय शिक्षण विभागाने सर्व यंत्रणेला लर्न फ्रॉम होमबाबत सूचना दिल्या असून त्यानुसार सुरुवात झालेली आहे. काही शिक्षकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून शासनाच्या सूचना वा निर्देशांची वाट न पाहता स्वत:हून लर्न फ्रॉम होमची संकल्पना राबविण्यास सुरुवात केलेली आहे. यात तंत्रस्नेही शिक्षक आघाडीवर आहेत. कारण पूर्वीपासून ते त्यांच्या अध्यापनाने विविध ऍप, शैक्षणिक व्हिडिओ यांचा वापर करीत असल्याने लॉकडाउनच्या काळात काय करावे याबाबत त्यांना नव्याने सांगायची गरजच भासली नाही. तर काही शिक्षक बांधव अजूनही वर्गखोली आणि खडू फळ्याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही या भूमिकेवर अडून बसले आहे.
शिक्षण विभाग "दीक्षा' या ऍपचा वापर करण्यास सांगत आहे. जेणेकरून संपूर्ण राज्यभर शिक्षण प्रक्रियेत एकवाक्यता आणि सुसूत्रता राहावी. असे असले तरी शिक्षकांना इतर काही तंत्र साधने वापरू नये असे कुठलेही बंधन नाही. "दीक्षा' ऍपवर इयत्ता पहिली ते अकरावीपर्यंतचे शिक्षकांनीच तयार केलेले ऑनलाइन शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. सद्यस्थितीत इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता दहावीसाठी अभ्यासक्रम आणि इतर वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी सहशालेय उपक्रम यावर भर आहे. सहशालेय उपक्रमांतर्गत अवांतर वाचन, कला आणि हस्तकला, स्पोकन इंग्लिश, नाट्य आणि संगीत, संगणक, विज्ञान खेळातून विज्ञान आणि कचऱ्याचे व्यवस्थापन व त्यातून स्वच्छतेचे धडे यांचा समावेश आहे.
सर्व जिल्हास्तर शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी या कामी पुढाकार घेतला असून एकट्या वर्धा जिल्ह्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखांहून अधिक आहे. लर्न फ्रॉम होम प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी शिक्षकांना इतरही डिजिटल प्लॅटफार्मचा वापर करता येईल.
भारत सरकारने सुरू केलेले "स्वयं' नावाच्या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर वर्ग नववी ते पदव्युत्तर, पदवीपर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांची सोय आहे. यात व्हिडिओ लेक्चर्स आणि डाउनलोड तसेच प्रिंटिंगची सुविधा आहे. भारत सरकारच्या "ई-पीजी पाठशाला' या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विकसित केलेल्या प्लॅटफॉर्मवर कला, वाणिज्य, मानवशास्त्र, गणित, समाजशास्त्रे, ललितकला अशा पदव्युत्तर, पदवी अभ्यासक्रमांची विविध पुस्तके उपलब्ध आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे विविध विषयांतील शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी "स्वयंप्रभा' नावाने 32 डीटीएच वाहिन्या सुरू केल्या आहेत. याचे प्रक्षेपण दिवसातून पाचवेळा केले जाते. "नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया' या संस्थेचे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याची 80 हजारांहून अधिक ई-पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय शिक्षण बोर्डाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल रिपॉझिटरी ऑफ ओपन एज्युकेशन रिसोर्सेस (NROER) या प्लॅटफार्मवर वेगवेगळ्या विषयाची ई-पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. NCERT ने विविध भाषेतील इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयातील ई-साहित्य, ई-पाठशाला या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली आहेत.
ग्लोबल डिजिटल लायब्ररी या प्लॅटफार्मवर वेगवेगळ्या देशात तयार झालेले ई-शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तपणे शिक्षा ई-लर्निंग प्लॅटफार्म विकसित केले असून इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू या भाषेमध्ये पहिली ते दहावीपर्यंतची पुस्तके यावर उपलब्ध आहेत. तसेच दीक्षा वेब पोर्टलवर पहिली ते दहावीमधील सर्व विषयांचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाने विकसित केलेल्या दीक्षा ऍपवर क्यूआर कोड स्कॅन करून शैक्षणिक साहित्य पाहण्याची सुविधा आहे. हे शैक्षणिक साहित्य ऑफलाइनही बघण्याची सुविधा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (दृष्टी कमजोर असलेल्या) मराठी व इंग्रजी भाषेतील आठवी ते दहावीचे शैक्षणिक साहित्य बोलक्या बालभारती पुस्तकाद्वारे ई-बालभारती प्लॅटफार्मवर ही टॉकिंग बुक्स अर्थात बोलकी पुस्तके उपलब्ध आहेत. शालेय पातळीवर विविध प्रकरणे, गृहपाठ, ई-साहित्य पुरविण्यासाठी आणि शैक्षणिक साहित्याची देवाण-घेवाण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे ऍप आहे. याशिवाय ऑनलाइन क्लासेससाठी झुम, स्काईप, नेबेक्स असे विविध ऍप उपलब्ध आहेत.
एकंदरीत लर्न फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यासाठी साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, प्रत्यक्षात लर्न फ्रॉम होम याचा किती विद्यार्थ्यांना फायदा होतोय, किती शिक्षक सर्व ऑनलाइन आणि डिजिटल प्लॅटफार्मचा वापर करतात. लर्न फ्रॉर्म होम या संकल्पनेच्या मर्यादा, या संकल्पनेचे फलित, आवश्यकता आणि भविष्यात काय याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन आवश्यक आहे. त्याशिवाय ही संकल्पना यशस्वी होणे शक्य झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.