Learning to detect fraud sakal
सप्तरंग

शिक्षण फसवणूक शोधण्याचं

इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना आहे, जी जगातील १९२ देशांसोबत केवळ आर्थिक गुन्हेगारीचं नव्हे तर सर्वच प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा देण्याचं काम करते.

सकाळ वृत्तसेवा

- अपूर्वा जोशी, apurvapj@gmail.com / मयूर जोशी, joshimayur@gmail.com

इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना आहे, जी जगातील १९२ देशांसोबत केवळ आर्थिक गुन्हेगारीचं नव्हे तर सर्वच प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा देण्याचं काम करते. ‘रेड कॉर्नर नोटिस’ ही एखाद्या व्यक्तीला अटक करून त्याला न्यायलयात हजर करण्यासाठी सदस्य देशांना केलेली विनंती असते.

‘इंटरपोल’ संस्थेनं मागच्याच आठवड्यात एक अहवाल प्रसिद्ध केला, त्या अहवालाप्रमाणं मागच्या दोन वर्षांत म्हणजे २०२२ आणि २०२३ मध्ये त्यांनी जारी केलेल्या रेड कॅार्नर नोटिसेसपैकी ८५ टक्के नोटिस या केवळ आर्थिक घोटाळ्याशी संबंधित होत्या. यावरूनच या प्रश्नाची दाहकता लक्षात यावी. आर्थिक गुन्हेगारी हा अवघ्या जगासमोर आ वासून बसलेला यक्षप्रश्न होत चालला आहे.

इंटरपोलच्या याच अहवालात पुढं असंही म्हटलंय, की २०२३ मध्ये इंटरपोलनं सदस्य देशांना केलेल्या मदतीच्या सातशे प्रकरणांत जवळपास १.२ अब्ज डॉलर्स इतक्या महाप्रचंड रकमेच्या घोटाळ्यांवर इंटरपोलनं काम केलंय. या वरून एक गोष्ट निश्चित होते, ती म्हणजे केवळ घोटाळ्याची रक्कमच नाही तर त्याची संख्या देखील वाढतं आहे,

झटपट श्रीमंत होण्याचा सोस असेल किंवा बेरोजगारीसारखी नाइलाजाची वेळ कुणावर असेल पण अधिकाधिक लोकं आता घोटाळे करण्यास धजावू लागले आहेत. त्यातच आता घोटाळे करणाऱ्यांना साथ द्यायला विविध प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध झालंय. त्यामुळं आता घोटाळ्यांचं स्वरूप देखील झपाट्यानं बदलत चाललं आहे. इंटरपोलनं एकूण सहा प्रकारच्या घोटाळ्यांची चर्चा या अहवालात केली आहे.

भारतात पूर्वी गुंतवणुकांचे घोटाळे मोठ्या प्रमाणात घडत असत. इंटरपोलच्या मते आता याचं पेव जगभरात पसरत चाललं आहे. दोन वर्षांत पैसे डबल किंवा चैळास टक्के व्याजाचे प्रकार सर्रास घडत असायचे. जगातल्या इतर देशांमध्ये अजूनही याच घोटाळ्यांनी धुमाकूळ घातला आहे, पण भारतात आता या पारंपरिक गुंतवणुकीच्या घोटाळ्यांचं स्वरूप बदलत चाललं आहे आणि त्याची जागा आता तंत्रज्ञानाधारित घोटाळ्यांनी घेतली आहे.

आता क्रिप्टोकरन्सी, युपीआय अशा अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून घोटाळे करायचं प्रमाण जरी वाढत असलं, तरी इंटरपोलनं ‘रोमान्स फ्रॉड’ या एका नवीनच प्रकारच्या घोटाळ्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

‘सोशल मीडिया’ वर एखादा हँडसम मुलगा, अमेरिकेत आयटीमध्ये काम करणारा एखाद्या मुलीशी बोलायला लागतो, त्यांच्यात मैत्री वाढतं आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात होतं, मग एक दिवस अचानक तो तिला भेटायला येतो पण कस्टम्स अधिकारी त्याला विमानतळावरच अडवतात आणि लाखभर रुपयांची मागणी करतात, पण मुलगा अमेरिकन असल्यानं त्याच्याकडं डॉलर्स असतात, तो मग मुलीकडं रुपयांची मागणी करतो.

मुलीनं पैसे भरल्यास, मग बॅगेचं वजन जास्त भरलं आहे म्हणून अजून काही पैशाची मागणी होते, तीही पूर्ण केल्यावर मग तो मुलगा अचानक फोन बंद करतो, सोशल मीडियावरचं त्याचं प्रोफाइल गायब होतं आणि मग मुलीला कळतं, की अरे देवा, हा सगळा बनवाबनवीचा प्रकार होता. पण तोवर पैसे गेलेले असतात आणि अब्रू अजून चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे पैसे अक्कल खात्यावर जमा केले जातात.

अशाच एका प्रकारच्या घोटाळ्याबद्दल इंटरपोलनं भीती व्यक्त केली आहे, तो म्हणजे ‘बिझनेस ई-मेल कॉम्प्रोमाइझ’. या घोटाळ्यात व्यावसायिकाला त्याच्या परदेशी भागीदाराकडून/पुरवठादाराकडून ई-मेल येते की रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या बँकिंग व्यवहारांवर बरीच नियंत्रणं आलेली आहेत, जहाजं उशिरा पोचताहेत, तेलाचे भाव भडकले आहेत तरीही आम्ही तुमचा माल वेळेत पोचवला आहे तर या वेळेस आम्हाला दुसऱ्या बँकेत पैसे पाठवा कारण आमच्या बँकेवर अमेरिकेनं बंधनं घातली आहेत, व्यावसायिक ई-मेल आल्यावर ई-मेल पत्ता चेक करतो, त्यात कसलाच फरक नसतो, भागीदाराची नावं देखील खरी असतात.

इतक्या वर्षांचे व्यावसायिक संबंध असतात आणि माल आलेला आहे त्याचे पैसे कधी ना कधी तरी द्यायचे असतातच मग देऊन टाकू आत्ता असा विचार करून बरेचदा पैसे दिले जातात, नंतर जेव्हा खऱ्या खुऱ्या भागीदारांचा ई-मेल किंवा फोन येतो तेव्हा मात्र ज्यानं पैसे दिले त्या व्यावसायिकाची पुरती गाळण उडते. याच घोटाळ्याची सुधारित आवृत्ती म्हणजे ‘डीपफेक’.

म्हणजे आता व्यावसायिकांना ई-मेल न येता थेट भागीदाराचा व्हिडियो कॉल येतो आणि तो सांगतो, की लौकर पैसे पाठवा, फक्त बँक खाते वेगळं आहे. या अशा घोटाळ्यांबद्दल व्यापक जनजागृती करणं हाच एक उपाय असतो.

आर्थिक घोटाळ्यांचं हे प्रमाणं व्यापक बनत चाललं आहे. ज्या प्रमाणात घोटाळे करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यासमोर घोटाळे शोधणाऱ्या मंडळींची संख्या अगदीच नगण्य आहे. भारतात दरवर्षी साधारण तीन लाख कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे घडत असले, तरी त्याच्याशी लढणाऱ्या वीरांची संख्या दहा हजारांच्या आसपास देखील नाही, अर्थात ही केवळ भारतातली आकडेवारी आहे.

अशा परिस्थितीत आर्थिक घोटाळे शोधण्याच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त होतं. अमेरिकेनं या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून त्यांच्या देशात विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले पण भारतात या अभ्यासक्रमांनी अजून वेग पकडला नाहीय. खरं तर नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालू करण्याची स्वायत्तता आता शैक्षणिक संस्थांकडे आहे.

पुण्यात नव्यानंच स्थापन झालेल्या ‘डीइएस-पुणे’ विद्यापीठानं या वर्षाच्या अभ्यासक्रमात आर्थिक घोटाळ्यांवर एक विषय समाविष्ट केला आहे, यात पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक गुन्हेगारीबद्दल माहिती दिली जाते. याखेरीज ‘एसपीपीयु एड्युटेक’नं देखील एका नवीन अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे.

सध्याच्या शैक्षणिक कार्यक्रमात आपण विद्यार्थ्यांना आर्थिक घोटाळ्याशी लढायला कोणत्याही कवचकुंडल यांशिवाय पाठवत आहोत, त्यामुळं हे नवयुवक नकळत घोटाळ्यांना बळी तरी पडतात नाही तर त्याचा भाग तरी होऊन जातात. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक गुन्हेगारी या विषयावरचं शिक्षणच त्यांना तारून नेऊ शकतं.

(लेखिका ह्या सर्टिफाइड अँटीमनी लॉंडरिंगविषयक तज्ज्ञ आणि सर्टिफाइड बॅंक फॉरेन्सिक अकाउन्टंन्ट आहेत, तर लेखक हे चार्टर्ड अकाउन्टंट आणि सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT