इंग्लंडच्या पंतप्रधानांना टिळक मैत्रीचा वारसा... sakal
सप्तरंग

इंग्लंडच्या पंतप्रधानांना टिळक मैत्रीचा वारसा...

ब्रिटनचे नवे पंतप्रधान, मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांच्या मातु:श्री परिचारिका होत्या. स्टार्मर यांचा जन्म झाला त्या वेळी मजूर पक्षाचे संस्थापक कीर हार्डी यांच्या नावावरूनच त्यांचं नाव ‘कीर’ असे ठेवण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

-वैभव पुरंदरे

ब्रिटनचे नवे पंतप्रधान, मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांच्या मातु:श्री परिचारिका होत्या. स्टार्मर यांचा जन्म झाला त्या वेळी मजूर पक्षाचे संस्थापक कीर हार्डी यांच्या नावावरूनच त्यांचं नाव ‘कीर’ असे ठेवण्यात आले. कीर हार्डी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. मजूर पक्षाचा संस्थापक आणि भारतातील स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा? एकविसाव्या शतकातील भारतीयांना कदाचित ही आश्‍चर्याची बाब वाटत असेल. कारण, मागील काही काळात मजूर पक्षाचे अनेक नेते काश्‍मीर आणि इतर काही मुद्द्यांवरून भारताच्या विरोधात बोलत असल्याचं आपल्या नागरिकांनी पाहिलं आहे. विरोधात असताना दुर्लक्ष केले असलं, तरी आता सत्तेत आल्यामुळे कदाचित त्यांना ‘उदयोन्मुख भारता’ची अधिक व्यावहारिक दखल घ्यावी लागेल. मूळ ‘कीर’ मात्र भारताच्या वसाहतवादी सत्तेविरोधातील संघर्षाचे पाठीराखेच नव्हते, तर ब्रिटिश सत्तेने १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांना दोषी जाहीर करत मंडाले येथे सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तेव्हा कीर यांनी या निर्णयाचा जोरदार निषेधही केला होता.

राजकारणात येण्यापूर्वी कीर हार्डी हे कोळसा खाणीतले कामगार होते. राजकारणात आल्यावर त्यांनी समाजवादी, शांततावादी आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी सुरू असलेल्या चळवळीचे समर्थक अशी स्वत:ची भूमिका निश्‍चित केली होती. ते ब्रिटिश संसदेत असतानाचा काळ, म्हणजे विसाव्या शतकाचे पहिले दशक, हा भारतातील प्रचंड अस्वस्थतेचा होता. ब्रिटिशांची भारतावर घट्ट पकड बसलेली होती. याच अस्वस्थतेच्या कालावधीत लोकमान्य टिळकांचं समर्थ नेतृत्व बहराला आलं होते. आधीचं शतक संपण्याच्या अखेरच्या काळापासूनच टिळक भारताच्या राजकीय क्षितिजावर चमकत होते. नंतरच्या दशकात त्यांनी संपूर्ण भारताला खडबडून जागं केलं आणि त्यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यांत ब्रिटिशविरोधी भावनेची लाट उसळली आणि ती बळकट झाली. टिळकांची केवळ उपस्थिती, त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि ‘स्वराज्या’च्या मागणीबाबतची ठाम भूमिका या जोरावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाने अनेक भारतीयांना राजकीय प्रवाहात आणले.

त्याचवेळी ब्रिटनमध्येही हार्डी हे भारतातील ब्रिटिश सत्तेवर जोरदार टीका करत होते आणि ब्रिटिश संसदेतही त्यांनी भारतीयांच्या स्वराज्याच्या मागणीचं समर्थन केलं होतं. लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केल्यामुळे देशभरात ब्रिटिश साम्राज्याविरोधात निर्माण झालेल्या संतापाला टिळकांकडून वाचा फोडली जात असताना त्याच कालावधीत, म्हणजे २० जुलै १९०६ रोजी कीर हार्डी यांनी त्यांच्या संसदेत भारतातील चिंताजनक परिस्थितीबाबत काळजी व्यक्त करणारे प्रभावी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी भारतात वाढलेला मृत्युदर, अत्यंत तुटपुंजे वेतन आणि स्थानिक सरकारमधून भारतीयांना वगळले जाणे, हे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. आपल्याच सरकारवर हार्डी यांनी केलेल्या टीकेचे त्यांच्या मजूर पक्षातील अनेक खासदारांनी समर्थन केलं होतं. भारतीयांच्या अपेक्षांबाबत मजूर पक्षाला त्या वेळी सहानुभूती वाटत होती.

हार्डी हे सप्टेंबर आणि ऑक्टोबर १९०७ मध्ये भारतातही आले होते. याचकाळात भारतीय काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ गटांमधील तणाव टोकाला गेला होता. टिळकांचं जहाल गटावर निर्विवाद वर्चस्व होते. भारतभेटीदरम्यान हार्डी यांनी पुण्यात येत टिळकांची भेट घेतली होती. त्या वेळी भारतीय जनतेचा आवाज बनलेल्या ‘केसरी’ या टिळकांच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली होती. मजूर चळवळीच्या या संस्थापकावर टिळकांच्या विचारांचा चांगलाच प्रभाव पडला होता. टिळकांना १९०८ मध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरविलं गेलं, तेव्हा हार्डी यांनी ‘लेबर लीडर’ या मजूर चळवळीच्या मुखपत्रामध्ये अत्यंत तिखट आणि निषेधार्ह भाषेत लेख लिहितानाच टिळकांवर मात्र कौतुकाचा वर्षाव केला होता. हार्डी लिहितात, ‘‘भारतातील कामगार वर्गावर टिळकांची जेवढी पकड आहे, तेवढी इतर कोणाचीही नाही. त्यामुळं त्यांना झालेल्या शिक्षेचा प्रचंड दूरगामी परिणाम होणार आहे. आतापर्यंत कोणाच्याही अटकेनं असं वातावरण निर्माण झालं नव्हतं. मी पुण्यात त्यांच्याबरोबर तीन दिवस व्यतीत केल्याला अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. देशातील बहुतांश लोकांना प्रचंड अभिमान वाटावा, असाच त्यांचा जीवनेतिहास आहे.’’ हार्डी यांनी टिळकांच्या बुद्धिमत्तेचे आणि त्यांच्या साहित्यसंपदेचेही कौतुक केलं होतं.

‘‘साहित्य क्षेत्रात टिळकांची तुलना, कोणत्याही सुनावणीशिवाय रशियातील तुरुंगात खितपत पडलेल्या तिचायकोव्हस्की या रशियन लेखकाशी किंवा विज्ञान क्षेत्रात लिखाण करणारे अल्फ्रेड रसेल यांच्याशीच होऊ शकते. या गोष्टी मी मुद्दामहून सांगण्याचे कारण म्हणजे, बी. जी. टिळक म्हणजे कोण आणि काय प्रकारचे व्यक्तिमत्त्व आहे, हे ब्रिटिश जनतेला समजावे.’’ टिळकांची अशा पद्धतीनं बाजू मांडताना हार्डी केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत. टिळकांना मंडालेला पाठविले, त्या वेळी त्यांची सुटका करण्याची मागणी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे करण्यासाठी टिळकांचे जवळचे मित्र आणि सहकारी दादासाहेब खापर्डे हे इंग्लंडला गेले होते. खापर्डे यांनी लेबर पक्षाचे नेते हार्डी यांची भेट घेत त्यांना टिळक प्रकरणाची सर्व माहिती पुरविली. खटल्याच्या सुनावणीची कागदपत्रेही दिली. हार्डी यांनीही तत्परतेने एक शिष्टमंडळ तयार करून टिळक प्रकरणावर चर्चा करण्यासाठी तत्कालीन भारतमंत्री जॉन मोर्ले यांची भेट मागितली. अर्थात, मोर्ले यांनी या मुद्द्यावर शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास नकार दिला. पण, एकट्या हार्डी यांच्याबरोबर बोलण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यानंतर हार्डी आणि मोर्ले यांच्यात लोकमान्यांच्या मंडाले प्रकरणाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली होती.

खापर्डे यांच्या म्हणण्यानुसार, हार्डी यांनी त्यांना सांगितले, की टिळकांना झालेली शिक्षा हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर जॉर्ज क्लार्क (म्हणजेच लॉर्ड सिडेनहॅम) यांचे कारस्थान असून त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्यास ते राजीनामा देण्याची शक्यता आहे, असे मोर्ले यांचे म्हणणे आहे. ‘हार्डी यांनी मला हे खासगीत सांगितले आणि हे संभाषण गुप्तच ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली,’ असे खापर्डे यांनी नमूद करून ठेवले आहे. हार्डी यांना याबाबतीत असहाय वाटत होतं. तरीही, भारत दौरा केलेल्या कीर हार्डी यांनी ब्रिटनच्या लोकप्रतिनिधीगृहात भारतीयांच्या स्वराज्य मागणीबाबत बोलणं सुरूच ठेवलं आणि लोकमान्य टिळकांच्या सुटकेसाठी ते प्रचार करतच राहिले. यात त्यांना यश मात्र आले नाही. त्यांनी लिहिलेल्या आणि १९०९ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इंडिया : इम्प्रेशन्स अँड सजेशन्स’ पुस्तकानं त्यानंतरची किमान पन्नास वर्षे मजूर पक्षाचं भारताबाबतचे धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

(लेखक हे वरिष्ठ पत्रकार, लेखक आणि इतिहासकार आहेत. त्यांनी लिहिलेलं

‘टिळक : द एम्पायर्स बिगेस्ट एनिमी’ हे पुस्तक पेंग्विन इंडिया प्रकाशन संस्थेकडून लवकरच प्रकाशित होणार आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी घडवलं सुसंस्कृतपणाचं दर्शन; चुलते श्रीनिवास पवार यांचे घेतले आशिर्वाद

Traffic Update: मतदारांची गावी जाऊन मतदान करण्यासाठी धडपड; मात्र वाहतूक कोंडीचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा

Chhatrapati Sambhajinagar Assembly Election : मतदार संख्येत भर; शाई वाढली, मतदान केंद्रांना तब्बल ७ हजार २०० बाटल्यांचा पुरवठा

Nashik Vidhan Sabha Election : बालेकिल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबीयांसमवेत प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

प्राजक्ता माळी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT