legislative session women Speaker political dominance fight party politics Sakal
सप्तरंग

लोकप्रतिनिधींना षड् रिपूची लागण!

वर्चस्ववादाची लढाई केवळ राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक विद्वानांच्या भाषणांची साक्ष असलेल्या लोकशाहीच्या पवित्र वास्तूत आता अश्लाघ्य आणि किळसवाणे शब्द घुमतात.

- राहुल गडपाले

वर्चस्ववादाची लढाई केवळ राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक विद्वानांच्या भाषणांची साक्ष असलेल्या लोकशाहीच्या पवित्र वास्तूत आता अश्लाघ्य आणि किळसवाणे शब्द घुमतात. एक महिला सभापतींच्या आसनावर बसलेली असताना कुठल्या स्वरूपाची भाषा वापरावी, याचे साधे ताळतंत्र काही मंडळींना राहिलेले नाही.

विधिमंडळ अधिवेशनात जे झाले ते महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकवणारे आहे. आपल्याला न पटणारे काही शब्द वापरले तर संताप होणारच. मात्र, जागा पाहून तो व्यक्त करण्याचे तारतम्य राजकारण्यांनी बाळगायला हवे.

राजकारण म्हटले की जुळवाजुळव ही आलीच. सत्तेच्या चाव्या सहजतेने हाती येत नसतील, तर त्यासाठी थोडी हातचलाखी करावी लागते. कधी तरी पटत नसलेल्या माणसाशी जुळवून घ्यावे लागते; तर कधी स्वत:ची चूक नसतानाही कुणासमोर तरी नमते घ्यावे लागते.

सत्ता नावाचे बिरुद आपल्या माथी मिरवण्यासाठी या अशा तडजोडी कराव्याच लागतात. बऱ्याचदा या तडजोडी सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक स्वरूपाच्याही असतात. प्रेमात आणि युद्धात सबकुछ जायज है... असे म्हणतात.

आता यात राजकारणाचाही समावेश झालाय. उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये अशा तडजोडींमधूनच राजकारणात गुंडांचा चंचुप्रवेश झाला. त्यातूनच राजकारणी आणि धनाढ्यांचे आर्थिक हितसंबंध वाढले. परिणामी तिथल्या राजकारणाला गुन्हेगारीकरणाचा वास यायला लागला. महाराष्ट्र त्यामानाने तसे पुढारकी राज्य होते.

(पुरोगामी शब्दाला आता पूर्वीइतके वैभव नसल्यामुळे आणि या शब्दाशी काही विशिष्ट गट चिकटल्यामुळे महाराष्ट्राला पुढारकी म्हणणेच इथे योग्य वाटते.) एव्हाना कोथळे काढण्याची भाषा करणारे राजकारण आपल्याकडे फारसे कधी होताना दिसले नव्हते. मात्र, ती गोष्ट आता भूतकाळात जमा झाली आहे. आता आपल्याकडेही तसल्याच काही मिथ्यकथांचे सारखेपण जाणवायला लागले आहे.

देशातील सर्वात प्रगत राज्य समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मनात धडकी भरेल, मराठी भावसंवेदनशीलतेला हादरे बसतील, असे प्रकार हल्ली आपल्या राज्यातही सहज होतात. पूर्वी एकमेकांशी जीवैक्य संबंध असलेले नेते सर्रासपणे एकमेकांची लायकी काढून मोकळे होत आहेत. राजकारणातील चिखलफेक हा काही आता दारबंद विषय राहिलेला नाही.

आपण ज्या लोकप्रतिनिधींच्या गळ्यात आपल्या प्रतिनिधित्वाची माळ घातलेली आहे, तिच्या वजनाने त्यांची मान झुकलेली दिसते. दिवसेंदिवस त्यांची पातळी अधिकच खाली उतरते आहे. त्या मानाच्या वजनाने महाराष्ट्राची मान मोडायच्या आत या महाभागांच्या स्मृतिपटलावर महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे कोंदण लावण्याची गरज आहे;

अन्यथा आपण स्वतःच स्वतःच्या दुःखाचे शिल्पकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मुळात हे का होते आहे, याचा विचार करायला हवा. लहानसहान कारणांवरून एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्यांना त्यावर विचार करण्याची सुबुद्धी येईल, अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. त्यापेक्षा आपणच त्यावर सांगोपांग चर्चा करायला काही हरकत नाही.

सत्ता हे साध्य आहे. ते मिळवण्यासाठी राजकारण नावाचा खेळ खेळावा लागतो. लोकशाही प्रणालीत राजकारण करताना त्याचे नियमही पाळावे लागतात. ज्याची बॅट त्याची बॅटिंग, असा खेळ येथे चालत नाही; मात्र गेल्या काही वर्षांतील राजकारणाने हाच आपला मूलमंत्र ठरवलेला दिसतो.

विशेषतः देशातील सत्तेच्या चाव्या हाती घेतलेल्या पक्षाने सत्ताकारण साध्य करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद, असे असतील नसतील ते सर्व मार्ग वापरायला सुरुवात केली. कुठल्याही परिस्थितीत पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या नादात त्यांनी आपल्या सोबत असलेल्या आणि नसलेल्या अशा सर्वांनाच छळायला सुरुवात केली.

स्वपक्षातील डोईजड वाटणाऱ्यांनाच त्यांनी सोडले नाही, तर समविचारी असलेल्या छोट्या पक्षांनाही त्यांनी लक्ष्य करायला सुरुवात केली. त्यामुळे स्वपक्षातील लोकांपेक्षा उपऱ्यांची इकडे जास्त भरती झाली. आधीच चार ठिकाणी तोंड मारून आलेल्यांसाठीची ती हक्काची जागा झाली. त्यातच अनेक धनवान, चार बेगमांचे बादशहा तिकडे सामील झाले.

जे नमले नाहीत, त्यांना नमवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अवलंबायला सुरुवात झाली. त्यामुळे सत्तेच्या लढाईत वैयक्तिक स्वार्थाचे प्रदूषण व्हायला लागले आणि त्याच्या दुर्गंधीने आता विधिमंडळाच्याही नाकातले केस जळायला लागले आहेत.

हे प्रदूषण इतक्यात कमी होईल, असे वाटत नाही. उलट येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या प्रदूषणात वाढ होण्याची शक्यताच अधिक आहे. शिवाय स्वार्थाने बरबटलेल्या या नेत्यांच्या स्वच्छंदतावादाच्या नादात महाराष्ट्राच्या थोर परंपरेचे मात्र धिंडवडे निघतील.

एक महिला सभापतींच्या आसनावर बसलेली असताना कुठल्या स्वरूपाची भाषा वापरावी, याचे साधे ताळतंत्र या मंडळींना राहिलेले नाही. आतापर्यंत केवळ समाजमाध्यमांवर गरळ ओकणारे हे बोलके बाहुले आता विधिमंडळातही त्याच आवेशात बोलत राहिले, तर त्या वास्तूचे पावित्र्य फार काळ अबाधित राहील, असे वाटत नाही.

अलीकडच्या काळात सर्वांचाच तोल सुटल्यासारखा, नियंत्रण गेल्यासारखा वाटतोय. जो येतो तो अश्लाघ्य बडबड करतो. वाट्टेल ते बोलतो. वाट्टेल तशा धमक्या देतो. या अशा प्रकारच्या वातावरणामुळे महाराष्ट्राच्या मेंदूला अर्धांगवायू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे असे लोक फक्त सत्ताधारी गटातच आहेत, असे मुळीच नाही.

विरोधी पक्षांमध्येसुद्धा अशा लोकांची कमी नाही. असंबद्ध बडबडगीत गाणारे त्यांच्याकडेही बहुत आहेतच. त्यावर प्रत्येकाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे; मात्र राजकारणातली पातळी जमिनीत गाडण्याची बहुधा या लोकांनी शपथच घेतलेली दिसते. त्यामुळे रोज नवे आयाम प्रस्थापित करण्यासाठीच ते एकमेकांवर चिखलफेक करतात की काय, अशी शंका येते.

वर्चस्ववादाची ही लढाई केवळ राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही. तत्त्वज्ञानपरंपरेचा वारसा असलेल्या अनेक विद्वानांच्या भाषणांची साक्ष असलेल्या लोकशाहीच्या या पवित्र वास्तूत आता अश्लाघ्य आणि किळसवाणे शब्द घुमतात.

विरोधी भाषणेही तन्मयतेने ऐकणाऱ्या या सभागृहाची श्रवणसंस्कृती आता लयाला जायला लागली आहे. आपण त्या वास्तूत आपल्या प्रतिनिधित्वासाठी पाठवलेले प्रतिनिधी मुळात लोकप्रतिनिधी आहेत की गुंड, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय. विधिमंडळाच्या परिसरात उठणाऱ्या या अश्लील आरोळ्यांनी आता सर्वसामान्य मराठी माणूस भयचकित झाला आहे. त्याला त्याच्या अस्तित्वाचीच चिंता वाटायला लागली आहे.

मानवी चिंतनक्षेत्राला हादरे बसवणाऱ्या या घटना गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच वाढल्या आहेत. त्याला केवळ आपल्याकडे असलेल्या राजकीय परिस्थितीला जबाबदार धरून चालणार नाही; तर अशा विचारांना आणि व्यक्तिविशेष महाभागांची समाजमाध्यमांवर पाठराखण करणारा सर्वसामान्य माणूसही त्याला तेवढाच कारणीभूत आहे.

तिकडे मलेशिया वगैरेंसारख्या देशांमध्ये मंत्र्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे रिपोर्टकार्ड तयार करण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे असलेल्या वेळेतला किती वेळ तुम्ही लोकांची कामे करण्यासाठी घालवला आणि किती वेळ तुम्ही केवळ राजकारणाच्या नावाखाली एकमेकांची उणीदुणी काढत होतात,

याचा हिशेब ठेवण्यासाठी आपल्याकडेही असे नवे नियम लावायला काहीच हरकत नाही. कारण निवडणूक हा जर आता वर्षाच्या ३६५ दिवसांचा कार्यक्रम झाला असेल आणि वायफळ बडबडीव्यतिरिक्त सर्वसामान्यांना त्यातून काहीच मिळणार नसेल, तर अशा लोकांचा पुरता हिशेब घेण्याची हीच ती वेळ...

एखाद्या व्यक्तीने आपल्याविरोधी काही बोलण्याचा प्रयत्न केला, आपल्याला न पटणारे असे काही शब्द वापरले तर संताप हा होणारच. मात्र, जागा पाहून संताप व्यक्त करण्याचे तारतम्य राजकारण्यांना जमायला हवे. समोरच्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केवळ शब्दाघात करायचा की विचारशीलता दाखवायची हे त्या-त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते.

कल्पित पातळीवर याविषयी आपण कितीही इमले बांधले तरीदेखील प्रत्यक्षातली परिस्थिती दिसतेय त्यापेक्षा निराळीच आहे. विधिमंडळ अधिवेशनात जे झाले ते महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकवणारे आहे; पण हे केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही. सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर सोडलेले काही नेते रोज समाजमाध्यमांवरून आपले राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, याची खात्री पटवून देतात.

अगदी नाव घेतले नाही तरी महाराष्ट्राली ही तीन-चार डोकी सर्वांनाच निश्चितपणे माहिती आहेत. त्यातील काहींच्या आवाजाला तर टीव्हीची ध्वनियंत्रणाही नाक मुरडत असेल; परंतु त्यांच्यात काही बदल होताना दिसत नाही. पण, टाळी ही एका हाताने वाजत नसते. प्रत्येकानेच आपल्या जबाबदारीचे भान हे ठेवायलाच हवे; अन्यथा लोकांच्या मनात महाराष्ट्रातील राजकारणाविषयी निराळी गृहितके तयार व्हायला वेळ लागणार नाही.

आपल्या विलक्षण गुणांचे दर्शनच घडवायचे असेल, तर महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यात राजकारण्यांनी आपला वेळ खर्ची करावा. एकंदरीत या घटनेतील व्यक्तिमत्त्वे पाहता दोन्ही नेत्यांना आत्मक्लेष वगैरे करण्याची गरज पडेल, असे वाटत नाही. तसे झाल्यास त्यांनी महाराष्ट्रावर थोर उपकार केल्याचीच भावना आपल्या मनात उचंबळून येईल.

पापबुद्धीच्या शिल्पकारांना कदाचित याविषयीचा प्रपंच हा अतिरेक वाटण्याची शक्यताच अधिक आहे. तसे झाल्यास त्यांनी समाजमाध्यमांच्या भिंतींवर तुफानी चिखलफेक करावी. त्यातून मिळणाऱ्या विकाराभिनयातून त्यांना हवे असलेले समाधान मिळू शकेल; परंतु राज्याला काहीही मिळणार नाही.

अलीकडे राज्यात जागोजागी तत्त्ववेत्त्यांचा ज्ञानव्यापार फोफावलेला दिसतो. दिसेल त्याला चकटफू सल्ले देणारे हे जगज्जेते स्वतःची अब्रू वाचवण्यात मात्र असफल होतात. अशा वंचित तत्त्ववेत्त्यांना हल्ली राजकारणाच्या गारुडातही चांगले स्थान मिळताना दिसते.

तिकडे जाऊन ते काहीतरी चमत्कृतीप्रधान कार्य करतील, असे अपेक्षित असते; पण तसे होण्याऐवजी गुण नाही; तर वाण लागून त्यांनाच राजकीय मत्सराची लागण होताना दिसते. तेही तीच बेगडी भाषा वापरताना दिसतात. मुळात व्यावसायिक आयुष्यात द्वेष, क्रोध, मत्सर या गोष्टी सर्वसाधारण मानल्या गेलेल्या असल्या, तरी त्या एक प्रकारच्या मनोविकारात मोडतात,

हे नाकारून चालणार नाही. अलीकडे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्यांना या षडरिपूंची लागण झालीय. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या सहा विकारांना षड््रिपू असे म्हणतात. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला असे अनेक ग्रस्त रोगी दिसतील. त्याहीपेक्षा ते विधिमंडळ परिसरात अधिक आहेत. त्यांना वेळीच आवरायला हवे.

rahulgadpale@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT