Chandrakumar Nalage sakal
सप्तरंग

सुख-दुःखांचा समंजस आविष्कार घडवणारा साहित्यिक

स्वतःच्या ग्रंथांची शतकपूर्ती’ हा योग खूपच कमी साहित्यिकांच्या आयुष्यात येतो. प्रा. चंद्रकुमार नलगे हे अशा काही अपवादात्मक साहित्यिकांपैकी एक होत.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. रणधीर शिंदे, saptrang@esakal.com

स्वतःच्या ग्रंथांची शतकपूर्ती’ हा योग खूपच कमी साहित्यिकांच्या आयुष्यात येतो. प्रा. चंद्रकुमार नलगे हे अशा काही अपवादात्मक साहित्यिकांपैकी एक होत. कथा, कादंबरी, कविता, ललितगद्य, प्रवासवर्णन, बालवाङ्मय, संशोधननपर लेख, चरित्रात्मक लेखन अशी चौफेर वाङ्मयनिर्मिती प्रा. नलगे यांच्या नावावर आहे. सात दशकांहून अधिक काळ ‘लिहिता हात’ असलेले प्रा. नलगे यांचं शंभरावं पुस्तक येत्या २६ मे रोजी कोल्हापूर इथं प्रकाशित होत आहे.

मातृहृदयी, तळमळीचे शिक्षक, नवोदित लेखकांचे संघटक, वाङ्मयाचे अभ्यासक अशा विविध रूपांनी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. वाङ्मयाची आवड आणि साहित्यिकांवर निष्ठा त्यांच्या ठायी लहानपणापासूनच होती. या ध्यासापोटीच नववीत असताना तीस मैलांची पायपीट करत ते साहित्यिक म. भा. भोसले यांना भेटायला गेले होते. वारणा खोऱ्याचे आणि महाराष्ट्राचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा सहवास त्यांना लाभला.

अण्णा भाऊ यांचा दिलदारपणा आणि महाराष्ट्र परिवर्तनपर्वाचे झुंजार जननायक म्हणून अण्णा भाऊ यांच्यापुढं नलगे नतमस्तक झाले. प्रा. नलगे यांनी नववीत असताना ‘गळफास’ नावाची एकांकिका लिहिली. विद्यार्थिदशेतल्या या हस्तलिखित एकांकिकेला राज्य शासनाच्या वाङ्मयपुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आजवरच्या वाङ्मयीन कामगिरीचा गौरव म्हणून गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं त्यांचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारा’नं सन्मान केला.

शाहूवाडी तालुक्यातलं भेडसगाव हे नलगे यांचं गाव. पुढं बिळाशी, शिराळा, कोल्हापूर, उजळाईवाडी ते केर्ली असा त्यांचा जीवनप्रवास झाला. शेतकरी-शेतमजूर कुटुंबात जन्मलेले नलगे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं.

नलगे यांच्या वाङ्मयसंवेदनशीलतेची दोन मुख्य केंद्रं आहेत. पहिलं केंद्र म्हणजे, त्यांनी पाहिलेला-अनुभवलेला भूतकाळ. हा त्यांच्या बालपणाशी आणि तरुणपणाशी निगडित होता.

वारणा खोरं आणि तिथला समृद्ध निसर्ग...या परिसराची, गावगाड्याची, माणसांची, त्यांच्या श्रद्धांची भावचित्रं नलगे यांनी मनःपूर्वक रेखाटली. वारणापरिसरावर त्यांचं निरतिशय प्रेम आहे, त्यामुळे या परिसराला त्यांनी पुनःपुन्हा साद घातली. त्यांच्या ललित वाङ्मयात या परिसराची स्मरणरमणीयता आहे.

गावाकडच्या यात्रा, जत्रा, सण-समारंभ, गजबज यांचं त्यांना आकर्षण आहे. या ‘चंद्रबनातल्या सावल्यां’ची असोशी आणि मंतरलेल्या बनाचं संवेदनकेंद्र त्यांच्या बालपणात आणि भूतकाळात विसावलेलं आहे. याबरोबरच खेड्यांतल्या माणसांची सुख-दुःखं, दारिद्र्य, तिथलं राजकारण, तिथलं शोषण हे सगळं त्यांनी शब्दबद्ध केलं. नलगे यांच्या या प्रदेशकथनात गाव, गावालगतचे समूह आणि भटक्या समूहांची शब्दचित्रं आहेत.

त्यांच्या समाजचित्रणाचा पैस व्यापक आहे. वारणापरिसरातली हिरवी रानं, माळ, बांधाबांधावर फुललेली काऱ्हळ्याची इवली इवली हळदुली नटुरी फुलं, नीलकंठेश्वराचं मंदिर, धूपारतीच्या वेळचा ढोलांचा नाद, निळंशार आभाळ, काळ्याभोर कपारी, वारणामाईच्या पाझरांमधली चांदीच्या रसासारखी पांढरीशुभ्र धार, उभ्या-आडव्या डोंगरांच्या मनोहारी सृष्टीचं आकर्षण त्यांच्या लेखनसृष्टीला आहे. या सगळ्याबद्दलचा अपार कृतज्ञताभाव नलगे यांच्या लेखनातून वारंवार प्रकटला आहे. त्यामुळं या लेखनबंधाला ‘भूमी-नदीचे लेकरू’ असा ‘मायलेकरा’चा लोकआदिबंध प्राप्त झाला आहे.

कधीकाळच्या या स्वप्नप्रदेशांना पुढं तडे जातात. मानवी स्वप्नं दुभंगतात. हिरव्या समृद्धीचं बरडपणात रूपांतर होतं. नलगे यांच्या वाङ्मयसंवेदनशीलतेचं दुसरं केंद्र हे अशा सामाजिक आणि भौतिक बदलांविषयीचं आहे. या प्रदेशबदलाची समाजचित्रं त्यांच्या पुढच्या टप्प्यातल्या लेखनात आहेत. यात व्यक्तींची दुःखं, समूहांची दुःखं यांच्या कहाण्या आहेत. स्वार्थ, फसवणूक, शोषण यांची चित्रं आहेत. जिवलगांच्या गर्दीतही परकेपण वाट्याला येतं किंवा ते आणलं जातं याविषयीची अस्वस्थचित्रं त्यांच्या साहित्यात प्रकटतात. ती करुण आणि केविलवाणी आहेत.

मराठी साहित्यात धरणग्रस्तांचा आकांत मांडणारे आणि तिथलं समूहभावविश्व रेखाटणारे नलगे हे आधीच्या काळातले महत्त्वाचे साहित्यिक ठरतात. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून धरणग्रस्तांचा आणि विस्थापितांचा जीवघेणा प्रश्न येतो. धरणग्रस्तांचं समूहसंवेदन व्यक्त करणारी बळकट कादंबरीपरंपरा कोल्हापूरच्या वाङ्मयीन परंपरेतून निर्माण झाली.

‘देवाची साक्ष’ (१९७९, चंद्रकुमार नलगे), ‘झाडाझडती’ (१९९१, विश्वास पाटील) व ‘रिंगण’ (२०१७, कृष्णात खोत ) अशी ही धरणग्रस्तांच्या जीवनावरची कादंबरीधारा होय. धरण निर्माण होताना बुडणाऱ्या गावपांढरीची, विस्थापितांची वेदना, कळ नलगे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडली. मूळ समूहाचं हरवलेपण, विकासाचं एकरंगी, अतिरंजित स्वप्न आणि आपलाच मुलूख आपल्याला वैरी झाल्याचं अस्वस्थ चित्र त्यांनी रेखाटलं.

नलगे यांच्या व्यक्तिमत्त्वात वाङ्मयसंघटक व कार्यकर्तापण सामावलेलं आहे. कृ. गो. सूर्यवंशी, शंकर खंडू पाटील, देवदत्त पाटील यांच्या समवेत त्यांनी ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्यसभे’ची स्थापना १९८२ मध्ये केली.

पश्चिम महाराष्ट्रातल्या नवोदित साहित्यिकांना या साहित्यसभेमुळं विचारपीठ मिळालं. या संस्थेच्या ‘दक्षिण महाराष्ट्र पत्रिका’ या नियतकालिकाचं नलगे यांनी दीर्घ काळ संपादन केलं. याबरोबरच आणखी एका बाबतीत त्यांना आरंभीचं ऐतिहासिक श्रेय जातं व ते म्हणजे, महाराष्ट्रातलं पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन भरवण्याचा मान नलगे यांच्याकडं जातो.

नलगे यांनी ता. २२ फेब्रुवारी १९६३ रोजी भेडसगावला पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन भरवलं. ‘ग्रामीण साहित्याची चळवळ’ असं काही अस्तित्वात नसतानाचा तो काळ होता हे लक्षात घ्यायला हवं. या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांनी म. भा. भोसले यांना आमंत्रित केलं होतं.

आपण समाजासाठी काही तरी करावं या तळमळीतून नलगे यांनी डोंगराळ भागातल्या मुलांसाठी शाळा, महाविद्यालय, इंग्लिश माध्यमाची शाळा व वसतिगृह सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ‘कानसा खोरा’ ही शिक्षणसंस्था स्थापन केली; परंतु त्यात अडचणी आणल्या. उजळाईवाडी इथं त्यांनी गृहनिर्माण संस्था व वाचनालय सुरू केलं. चित्रपटांसारख्या चंदेरी दुनियेतही ते रमले.

मात्र, तिथंही त्यांच्या वाट्याला आर्थिक अपयश आणि उपेक्षा आली. या उपेक्षेची जाणीव त्यांच्या उत्तरकालीन साहित्यात वारंवार येते. विद्यापीठीय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दलित आत्मकथनं व ‘लोकरंग’सारखी संपादनं त्यांनी केली. नलगे यांनी पठ्ठे बापूरावांचं चरित्रही लिहिलं.

‘रातवा’ आणि ‘आणखी एक जन्म’ हे नलगे यांच्या आत्मचरित्राचे खंड. हे खंड महत्त्वाचे आहेत. त्यांत त्यांच्या कुटुंबाची आणि परिसराची कहाणी आहे. आत्मकहाणीबरोबरच कुटुंब आणि बाहेरचं जग अशा तिहेरी पातळीवरचा तो दीर्घ काळाचा समांतर कथनपट आहे. ती त्यांच्या जिद्दीची, संघर्षाची आणि घडवणुकीची कहाणी आहे.

गावकहाणीबरोबरच १९३० ते १९४७ या काळातल्या भारतीय स्वातंत्र्यचळवळीतल्या एका प्रादेशिक उठावाचं व लढ्याचं वेधक चित्र त्यांत आहेत. संशोधनात्मक आवडीचा भाग म्हणून नलगे यांनी त्यांचे पूर्वज रायाजी नलगे यांचा शोध घेतला आहे. रायाजी नलगे हे शिवकाळात जिंजी या किल्ल्याचे किल्लेदार होते.

नलगे यांना उत्तरायुष्यात अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. कौटुंबिक अडचणी आल्या. अपत्यांचे मृत्यू पाहावे लागले. आजघडीला त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. वाघबीळ इथल्या त्यांच्या पेट्रोलपंपावरच्या दहा बाय दहाच्या खोलीत ते विसावलेले असतात. नव्वदी पार केलेले नलगे सर आजही ताजेतवाने असतात. काळाचं लख्ख स्मरण हे त्यांचं वैशिष्ट्य.

प्रकाशक अनिल मेहता व डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याबरोबर त्यांना मी अलीकडेच भेटलो. या आनंदगप्पांमध्ये जुना काळ, पुस्तकं, कोल्हापूरची माणसं व परिसर यांविषयीची अपार कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.

‘आम्ही वारणाईची लेकरं. सगळं वारणाखोरं तिच्यावर विसंबून जगत असतं. ती आमच्या जीवनात रेखलेलं, न पुसता येणारं गोंदण होती,’ असं ते म्हणतात. वारणापरिसराची अशी शब्दरूपी कृतज्ञ परतभेट त्यांच्या वाङ्मयात आढळते. त्यांच्या जीवनात सुखाच्या सावलीबरोबरच अनेक अडथळे आणि संकटंही आली. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे : ‘किती झेलावे हिंगोळ, रानोरानी पेटलेले’?

मात्र, असं असलं तरीही, एकूणच मानवी सुख-दुःखांविषयीचा समंजस आविष्कार त्यांच्या वाङ्मयात दिसून येतो.

(लेखक हे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषासाहित्याचे प्राध्यापक, तसेच समीक्षक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT