नागपूर असो वा पुणे नंदा खरे यांना मित्र सहवास अखंड लागत असे. काही आवडलं व खटकले की त्यांचा फोन चालू. मित्रांना ज्ञानसंपन्न करणारे ते जगन्मित्र होते. त्यांच्या आवडत्या मिर्झा गालिब यांच्या शब्दात सांगायचं तर ‘चलो दौलत की बात करते हैं बताओ तुम्हारे दोस्त कितने हैं’
नंदा खरे म्हणजे खऱ्याखुऱ्या संवादासाठी आटोकाट प्रयत्न ! त्यांचा, वय वर्षे ३० ते ९० अशा सर्व वयोगटातील आणि आपल्या राज्याच्या सर्व विभागात गोतावळा होता. नागपूर, गडचिरोली, औरंगाबाद, लोणावळा, अलिबाग असो वा उदगीर कुठेही ते सहजगत्या पाणी, शेती, बाजार, साहित्य असा कोणताही विषय घेऊन किंवा सध्या मनात काय चाललंय त्यावर बोलण्यासाठी मित्रांना जमवू शकत होते. कधीही एकत्र न येणारे, त्यांच्यामुळे संवादास तयार होत.
१९६० च्या दशकात खरे मुंबईच्या ‘आयआयटी’मध्ये दाखल झाले. ‘जुनं गाडून नवीन जग घडवण्याची उर्मी’ हा त्या दशकाचा भाव होता. भाषा, प्रदेश, जात, वर्ग, या पलिकडे जाण्यासाठी कुमार शिराळकर यांची `उठ वेड्या, तोड बेड्या’अशी हाक होती.`हे जग कसं चालतं, याचं प्रचंड कुतूहल नसेल तर तुम्ही मेंदूचा वापर करीत नाही. आणि ते जग बदलून नव्याने सुंदर जग घडवण्याची आकांक्षा नसेल तर माणूस म्हणवून घेण्याची लायकी नाही.’ अशा आशयाचे विचार जगभर ऐकायला मिळत. जगाचा इतिहास असो वा अर्थकारण , समाजमन असो वा आधुनिक तंत्रज्ञान ,प्रत्येक क्षेत्रातील बदल समजले नाहीत तर वैयक्तिक अपमान समजला जात असे.
वैयक्तिक आणि सामूहिक जीवन सुधारणे हीच विषयपत्रिका होती. त्यामुळे आधुनिक वा प्रागतिक विचाराकडे तरुण आकर्षित होत होते. जातीचा कळप ओलांडत होते. वर्गाची बंधनं झुगारत होते. बुद्धी व भावना दोन्हीला एकाच वेळी भावत असल्यामुळे वैचारिक बदल घडून येत होते. अशा वातावरणात खरे काव्यशास्त्रविनोद यांच्या प्रेमात पडले. कुमार शिराळकर, सुधीर बेडेकर, कुमार केतकर, प्रफुल्ल बिडवाई अशा मित्रवर्तुळामुळे कुठलाही विषय वर्ज्य नव्हता. त्यांच्या पुढील निर्मितीप्रक्रियेची बीजं इथेच पडली. २०१५ साली आलेल्या ‘उद्या’ मधील भूगर्भशास्राचा अभ्यासक व टाकून दिलेला पत्रकार सानिकाला सांगतो. सच्ची अमिरी तीन चिजों से आती. मिनरल्स,लँड अँड गव्हर्नमेंट काँट्रक्टस ! टाटाज, अंबानीज, मित्तलस ऑल आर हंग्री फॉर सबसॉइल. ताजमहालच्या खाली तेल सापडलं तर ‘..द बेगर्स विल डिस्ट्रॉय द ताज‘ याच कादंबरीत ते ‘भरोसा‘ व ‘विकास’ या कंपन्यांचंच देशावर राज्य असल्याचं वर्णन करतात.’’
आपण २८ वर्षानी २०५० सालात पोहोचू. खरे यांनी १९९३ साली लिहिलेल्या `२०५०’ ह्या विज्ञान कादंबरीमध्ये `भिंत हाच संगणक आणि दूरचित्रवाणीचा पडदा झाला आहे. संगणक हे एकमेकांशी संवाद साधत आहेत अशी वैज्ञानिक प्रगती आहे. अशा काळातच आलेल्या जागतिक महासाथीमध्ये १३६ कोटी लोकांचा बळी गेलेला आहे. त्यामध्ये त्यांनी विलगीकरण, तपासण्या, युद्धातील हत्यार म्हणून विषाणूंचा वापर’, असे अनेक तपशील लिहून ठेवलेले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाचे गाढे अभ्यासक खरे हे त्याकडे साधन म्हणून पाहत होते. विषमता दूर करण्याचं ते एक हत्यार आहे, असं त्याचं मत होतं. वास्तवात कष्टकऱ्यांच्या वाढत्या दैना पाहून ते कळवळत व संतापत. हा त्यांचा क्रोध विविध लेखनातून व्यक्त होत असे. त्यांची ‘उद्या’ व ‘२०५०’ मधील अनेक भाकीत तंतोतंत खरी ठरली, याचा तर आनंद न होता खरे यांना विलक्षण वेदना होत असत.
सहसा ज्येष्ठ लेखकांच्या वर्तनाची एक पठडी असते. ते सारे संकेत बाजूला सारून खरे स्वतः:हून नवीन पिढीशी संपर्क साधत. त्यांना बोलीभाषा ग्रामीण भाषेविषयी विशेष आस्था होती. आसाराम लोमटे, किरण गुरव, कृष्णात खोत आदींच्या लेखनाचा प्रसार करणं हे त्यांना अगत्यच वाटत असे. उदगीरच्या प्रसाद कुमठेकरनी त्याची कादंबरी (`बगळा’) खरे यांना पाठवली आणि त्यांच्यातील संवाद वाढत गेला.
आद्य स्त्रीवादी लेखिका विदुषी बाळूताई खरे ऊर्फ मालतीबाई बेडेकर (विश्राम बेडेकर हे यांचे पती ) तसेच समाजशास्त्रज्ञ कृष्णाबाई मोटे (प्रकाशक ह.वि. मोटे हे यांचे पती ) ह्या खरे यांच्या आत्या होत्या. ‘खरे मास्तर’ ह्या प्रसिद्ध कादंबरीतून बाळूताई खरे यांनी त्यांच्या वडिलांच्या जीवन दाखवलं होतं. तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल त्यांचे भाचे हेदेखील महाराष्ट्राचे ‘वेगळे मास्तर’ ठरतील.
खरे यांनी दाखविलेला ‘उद्या’ काल होऊन गेला
व्यक्ती व नाती दोन्हींचे वस्तुकरण झाल्यामुळे आपल्याला कुणाशीही जोडून घेण्यासाठी उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. बाजारपेठेत आपल्या `मूल्यात’ वृद्धी कशी होईल, या काळजीनं सगळे ग्रासून गेले आहेत. घरापासून दारापर्यंत, संस्थेपासून यंत्रणेपर्यंत उदारतेची हेटाळणी, सहिष्णुतेची नालस्ती व करुणेची अवहेलना वृद्धिंगत होत आहे. जिव्हाळा आटत जाऊन वरचेवर परिपूर्ण शुष्क होत चाललेल्या वातावरणात संवेदनशीलतेची ससेहोलपट होत आहे. अशा परिस्थितीत सभोवतालच्या असंख्य घटनांचा अन्वय लावणं हे अतिशय यातनादायक असतं. कारण त्यातून आगामी काळाची चाहूल लागते आणि ती जीवघेणी असते. खरे यांनी दाखविलेला ‘उद्या’ हा केव्हाच आज व काल होऊन गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.