lok sabha election 2024 priyanka gandhi amethi raebareli contest Sakal
सप्तरंग

प्रियांका नव्या भूमिकेत

आपला भाऊ राहुल आणि आई सोनिया यांच्या अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांकडं लक्ष देण्याची त्यांची जबाबदारी होती.

नीरजा चौधरी

देशाच्या या वेळच्या अर्थातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाच्या ताऱ्याचा उदय झाला, तो तारा म्हणजे अर्थातच प्रियंका गांधी. २००४ पासून प्रियांका गांधी राजकारणात आहेत. मात्र त्यावेळी अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांची काळजी घेणे यापुरतीच मर्यादित त्यांची भूमिका होती.

आपला भाऊ राहुल आणि आई सोनिया यांच्या अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांकडं लक्ष देण्याची त्यांची जबाबदारी होती. कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली, तरी सार्वजनिक जीवनात त्यांचा वावर कमी होता, किंबहुना सार्वजनिक मंचावर आणि राजकीय निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग फारसा नव्हता.

प्रियांका यांनी २०१९ मध्ये मात्र उघडपणे राजकारणात सहभाग घेऊन सक्रिय भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत त्यांनी व्यक्त केलेली मते थोडक्यात असली, तरी राजकीय अवकाश व्यापण्यासाठी पुरेशी होती. १९९९ मध्ये त्यांनी रायबरेलीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.

या निवडणुकीत राजीव गांधी यांचे जवळचे नातेवाईक अरुण नेहरू निवडणूक लढवत होते. प्रियांका यांनी प्रचारात भाग घेऊन एका जाहीर सभेमध्ये जनतेला थेट सवाल केला, ‘माझ्या वडिलांचा ज्यांनी विश्वासघात केला त्याला तुम्ही मतदान करणार आहात का?’ प्रियांका यांच्या या थेट टीकेमुळे त्या मतदारसंघातील प्रचाराचा रोखच बदलून गेला.

या निवडणुकीत प्रियांका यांच्या आक्रमक प्रचारामुळं काँग्रेसची कामगिरी दणदणीत झाली. नेहरू यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आणि प्रियांका गांधी यांचा प्रभाव या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या वर्तुळात वाढला. २००४ मध्ये राहुल गांधी यांनी अमेठीमधून निवडणूक लढविली व सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

त्यानंतर प्रियंका यांनी राहुल गांधी यांना पूरक ठरेल, तसेच आणि सोनिया यांना मागे राहून मदत करता येईल, अशी भूमिका घेतली. मुले मोठी होईपर्यंत राजकारणापासून थोडं मागं राहण्याची त्यांची भूमिका होती. कुटुंबाचा त्याला पाठिंबा होता.

त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये आपल्या राजकीय वाटचालीबद्दल व भविष्यातील धोरणांबद्दल प्रियांका यांनी रहस्य कायम ठेवले. विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये प्रियांका यांनी राजकीय मतप्रदर्शन करून आपले अस्तित्व कायम ठेवलं, पण भविष्यातील आपली वाटचाल काय असेल, याची स्पष्टता येऊ दिली नाही.

२०१९ च्या सुरुवातीला प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करून पक्षाचं काम सुरू केलं. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या ५२ जागा मिळाल्या. पुलवामाची घटना आणि बालाकोट येथे केेलेला सर्जिकल स्ट्राइक यामुळं देशभर राष्ट्रवादाची लाट होती. त्या लाटेत भारतीय जनता पक्ष ३०३ जागांसह दुसर्‍यांदा सत्तेवर आला.

त्यामुळे प्रियंका गांधी त्या निवडणुकीत फार काही करू शकल्या नाहीत. पण त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०२२ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रियंका हिला मोठी जबाबदारी देण्यात आली आणि तिला राज्याचं सरचिटणीस बनवण्यात आलं, मात्र पक्षाचं स्थान निर्माण करण्यात त्यांना यश आलं नाही. पक्षाची ताकद वाढलीच नाही. गेल्या अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशात पक्ष सत्तेबाहेर आहे, त्यात काही बदल झाला नाही.

आता देशातील सर्वांत मोठ्या राज्यात जी नेहरू-गांधी घराण्याची कर्मभूमी होती तिथं काँग्रेसचं पुनरुज्जीवन कसं करायचं, या विषयावर काँग्रेसचे नेते हतबल होते. या चिंतेला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. उत्तर प्रदेशातील संघटनेची घसरण रोखण्यात पक्षाला यश आलेलं नाही.

२०२२ मध्ये प्रियंका यांच्याकडं आशेचा किरण म्हणून पाहिलं जात होतं. ‘‘लडकी हूं मैं शक्ती हूं’’ या आकर्षक संकल्पनेनुसार त्या निवडणुकीत ४० टक्के जागा महिलांना देण्याची कल्पना त्यांनी मांडली. पण त्यांच्यापैकी ९० टक्के जागावर अमानत जप्त झाली. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी त्या राज्यातलं लक्ष कमी केलं.

एक काळ असा होता, की ज्या प्रियांका आपल्या आजी - इंदिरा गांधींची आठवण करून देणारी म्हणून पक्षाला निवडणूक जिंकून देऊ शकतील असं अनेकांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. त्या वेळी तरी लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. या वेळच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचा ‘परिवारवाद’ आणि नेहरू-गांधी कुटुंबावर घणाघती टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

या वेळच्या निवडणुकीत प्रियंका वेगळ्या पद्धतीनं लक्षात आल्या. त्यांनी मोदी यांच्यावर थेट टीका केली. अनेकांना मुलाखती दिल्या. आपली आणि पक्षाची भूमिका अत्यंत आक्रमकपणानं त्यांनी मांडली. निवडणुकीच्या या फेरीत राहुल दोन जागा लढवणार आणि त्या एकाही जागेवरून लढणार नाहीत, असं ठरलं.

त्या रायबरेलीतून आणि राहुल पुन्हा अमेठीतून (त्याची दुसरी जागा म्हणून) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र तसं काहीही घडलं नाही. राहुल गांधी यांनी दुसरी जागा (वायनाडमधून ते लढत आहेतच) म्हणून रायबरेलीची निवड केली.

देशभर प्रचारासाठी गरज असल्यानं निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण प्रियांका यांनी दिलं. राहुल आणि मी आपापल्या मतदारसंघात अडकून पडलो तर पक्षाचा प्रचार कोण करणार? असा युक्तिवाद प्रियांका यांच्याकडून करण्यात आला. रायबरेलीला तळ ठोकून त्यांनी भावासाठी प्रचार केला.

वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवल्यास राहुल यांना ते ज्या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत, त्यापैकी एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागेल. राहुल यांनी सोडलेल्या मतदारसंघातून प्रियंका उभ्या राहू शकतात आणि त्या परिस्थितीत प्रियांका अर्थातच रायबरेलीमधून पोटनिवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. आगामी कालखंडात लोकप्रियता वाढल्यामुळे प्रियांका काँग्रेस पक्षात कोणत्या प्रकारची भूमिका बजावतील, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.

पक्षाला किती संख्याबळ मिळतं यावर बरंच काही अवलंबून असेल. या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती सुधारली तर म्हणजे, जर खासदारांच्या संख्येत वाढ झाली, तर राहुल आणि प्रियांका यांच्या भूमिकेमध्ये बदल होऊ शकतो. जर काँग्रेसच्या खासदारांची संख्या वाढली म्हणजे हा आकडा ८० च्या आसपास गेला तर राहुल यांची भूमिका बदलेल.

ते पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारू शकतात आणि मग त्या वेळी प्रियांका यांची राहुल यांना पुरक भूमिका असेल. कारण सोनिया गांधींना राहुलनं मुख्य भूमिकेत असावं असंच वाटतं. काँग्रेस पक्ष रायबरेली जिंकण्याची शक्यता आहे, कॉग्रेस अमेठीसह उत्तरप्रदेशात १७ जागावर लढत आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाबरोबरच्या आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांच्या प्रतिमेचा उपयोग नक्की करून घेणार आहे. या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून उदयास आलेल्या प्रियांका गांधी यांच्याकडं वेगळ्या नजरेनं खूप साऱ्या अपेक्षेनं पाहिलं जात आहे. या निवडणुकीनं सर्वांत मोठा मुद्दा उपस्थित केलाय. तो म्हणजे प्रियांका गांधी यांची लोकप्रियता आणि त्याचं स्टार प्रचारकपद. त्यांच्याकडून पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, हे नक्की.

(लेखिका ह्या दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार तसंच राजकीय विश्‍लेषक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT