Lotus Flower sakal
सप्तरंग

कठीण कोवळेपण!

कमळ इतर फुलांसारखं सहजासहजी मिळत नाही. मनात आलं, झाडापाशी गेलं आणि तोडलं, असं कमळाच्या बाबतीत होत नाही. कमळ तुम्हाला पाण्यात शिरूनच काढावं लागतं.

अरविंद जगतापjarvindas30@gmail.com

कमळ इतर फुलांसारखं सहजासहजी मिळत नाही. मनात आलं, झाडापाशी गेलं आणि तोडलं, असं कमळाच्या बाबतीत होत नाही. कमळ तुम्हाला पाण्यात शिरूनच काढावं लागतं. कमळाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अनेक रंग असतात. कमळाच्या बाबतीत आजकाल खूप फसवणूकही होते. कमळ समजून भलतीच फुलं बाजारात विकली जातात. कमळाचं फूल मोहमायेपासून मुक्त मानलं जातं.

कमळ राष्ट्रीय फूल आहे. खरं तर कमळ काँग्रेसच्या काळात राष्ट्रीय फूल झालं. राजीव नावाचा एक अर्थ कमळ आहे. कमळ सुंदर असलं, नाजूक असलं तरी ते कायम पूजेत किंवा त्याचं आध्यात्मिक महत्त्व टिकवून राहिलं. प्रेमात सहसा कुणी कुणाला कमळ देत नाही. कमळ १८५७ च्या उठावात क्रांतीचं प्रतीक होतं. त्या उठावात दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. भाकरी आणि कमळ.

१८५७ च्या उठावाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात हिंदू-मुस्लिम एकत्र होते आणि कमळ हे त्यांचं प्रतीक होतं. अर्थात कमळ कायम कुतूहलाची गोष्ट आहे. कमळ इतर फुलांसारखं सहजासहजी मिळत नाही. मनात आलं, झाडापाशी गेलं आणि तोडलं, असं कमळाच्या बाबतीत होत नाही. कमळ तुम्हाला पाण्यात शिरून काढावं लागतं. खूपदा चिखलात अडकायची भीती असते. त्यामुळे कमळ हे फुकट न मिळणारं फूल आहे.

त्यासाठी पैसे मोजावे लागतात किंवा कष्ट करावे लागतात. तशी देशाच्या काही भागांत कमळाची शेतीच होते. कमळाच्या देठाची भाजी होते. कमळाचे बरेच फायदे आहेत; पण दुर्दैवाने देशाच्या काही भागांतल्या लोकांनाच ते माहीत आहेत. कमळाचा वापर कसा करायचा हेच देशात बऱ्याच लोकांना कळत नाही किंवा देशातले बरेच भाग असे आहेत जिथे कमळाचा काही फायदा होत नाही. कमळ तसं सहज उपलब्ध होत नाही.

त्यामुळे फार धार्मिक असलेली माणसं सोडली तर देशातल्या खूप लोकांना कमळाचा स्पर्शही झालेला नसतो किंवा कमळ त्यांच्या हाती लागलेलं नसतं. दुष्काळी भागात किंवा कमी पाण्याच्या भागात तर कमळ नजरेसही पडत नाही लोकांच्या. ज्यांच्याकडे समृद्धी आहे तिथे कमळ हमखास दिसतं. अर्थात यात कमळाचा दोष आहे, असं म्हणता येत नाही.

समृद्धी आल्यावर लोकांना दुर्मिळ गोष्टींचं आकर्षण वाटू लागतं. मग ते छोटे हौद किंवा तळी निर्माण करतात. त्यात कमळाच्या वेगवेगळ्या जाती उगवू लागतात. कमळाचे वेगवेगळे रंग दिसू लागतात. कमळाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अनेक रंग असतात. कमळाच्या बाबतीत आजकाल खूप फसवणूकही होते. कमळ समजून भलतीच फुलं बाजारात विकली जातात. हा प्रकार आजकाल खूप वाढलेला आहे. फक्त दिसण्यात साधर्म्य असलेली ही फुलं आज कमळ म्हणून सर्रास खपवली जातात.

संत ज्ञानेश्वर म्हणतात आणि पाणी हो कां भलते तुकें. परि ते जिणौनि पद्म फांके.

कमळ उगवतंच. मग ते पाणी कितीही खोल असो. कमळात ती जिद्द आहे. ते पाणी किती गढूळ आहे बघत नाही. चिखल किती आहे बघत नाही. ते येतच. ते वर वर नाजूक वाटलं तरी देठ चिवट असतो. जुन्या लोकांची श्रद्धा होती, की दारात कमळ असलं की घरात खूप पैसा येतो. त्यांचा अनुभव माहीत नाही; पण हल्ली कमळ जवळ असलं की लक्ष्मी येते, असा अनेकांचा अनुभव आहे.

ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलंय... पाहें पां दूध गोड आणि पवित्र । पासि त्वचेचिया पदराआड । ते अव्हेरूनी गोचिड । अशुद्ध काय न घेती ॥का कमलकंदा आणि दर्दुरी । नांदणूक ऐकची घरी । परी परागू सेविजे भ्रमरीं । जवळिवां चिखलुचि उरे ॥

गोचीड गाईच्या दुधाऐवजी रक्त पितो आणि बेडूक कमळातला मध सोडून चिखलात जास्त रमतो. ज्ञानेश्वर केवढे दूरदर्शी होते. भ्रमरसुद्धा कमळातला मध शोधतो; पण कमळ असूनही चिखलातच रमणारे पण कमी नसतात. त्याला पर्याय नाही. कमळाच्या संतसाहित्यात आणि अध्यात्मात अनेक कथा आहेत.

एक कथा विष्णूची. विष्णूला सगळ्यात जास्त आवडणारं फूल कमळाचं. विष्णू दररोज शंकराची कमळाच्या फुलाने पूजा करायचा. दररोज एक हजार कमळाची फुलं पाताळातून आणायची आणि शंकराची पूजा करायची, असा विष्णूचा कितीतरी वर्षे दिनक्रम होता. एकदा शंकराला विष्णूच्या भक्तीची परीक्षा पाहण्याची लहर आली. शंकराने विष्णूच्या पूजेच्या तबकातील एक कमळ लपवून ठेवलं.

कमळाची फुलं वाहता वाहता एक कमळ कमी असल्याचं विष्णूच्या लक्षात आलं. पूजा अर्धवट टाकून परत पाताळात जावं तर पूजेत खंड पडेल, असं विष्णूला वाटलं. त्यात पूजा करताना मधेच उठून जाणं शस्त्रसंमत पण नाही, हे विष्णू जाणून होता. शेवटी विष्णूने आपले नयनकमळ शंकराला वाहायचे ठरवले. धारदार तलवारीने डोळा काढला आणि शंकराला वाहिला. विष्णूची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाला.

तो म्हणाला, ‘विष्णू तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझी दृष्टी तुला परत तर मिळेलच; पण आणखी काही वर पाहिजे असल्यास माग.’ हे ऐकून विष्णू म्हणाला, ‘प्रभू, आपण प्रसन्न झाल्यावर भक्ताला आणखी काय पाहिजे? तुम्ही आग्रहच करता आहात तर आपल्याजवळील सुदर्शन चक्र मला द्या.’ हे ऐकून शंकराने मोठ्या आनंदाने आपल्याजवळील सुदर्शन चक्र विष्णूला दिलं.

आता ही गोष्ट श्रेष्ठ भक्तीचं प्रतीक आहे. दुर्दैवाने कलियुगातल्या भक्तांना दृष्टी परत देणारा शंकर अस्तित्वात नाही. चक्र तर लांबची गोष्ट आहे. भक्ताची काळजी असणारा आणि त्यांच्या दृष्टीचं महत्त्व असणारा शंकरासारखा देव त्या त्या काळी महत्त्वाचा असतो. नाहीतर भक्तीला काही अर्थ उरत नाही. ती अंधभक्ती ठरते.

आपल्या परंपरेत कमळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं ते त्याचं आसक्तीरहित असणं. चिखलात असूनही कमळावर चिखलाचे डाग नसतात. पाण्यात राहूनही कमळ वेगळं ठेवतं स्वतःला. रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा वगैरे. कमळाची ही विरक्ती महत्त्वाची असते. कमळाचं फूल मोहमायेपासून मुक्त मानलं जातं.

ज्ञानेश्वरांचीच एक रचना आहे... जैसें भ्रमरू तरि भेदी कोडें । भलतैसे काष्ट कोरडें । परि कलिकेमाझि सांपडे ॥ कोवलिये ॥ तेथ उत्तीर्ण होये प्राणें । परि तें कमलदल चीरूं नेणे । ऐसें कठिन कोवलेपणें । स्नेह देखां ।।

भुंगे नेहमी कमळाकडे आकर्षित होतात. रंगामुळे. वर वर नाजूकपणामुळे. रसपान करायला ते कमळाच्या पाकळ्यांमध्ये शिरतात. जवळीक वाढत जाते. भुंगे मोहापोटी कमळात खोल शिरत जातात. या कमळ प्रेमापोटी भुंग्यांना वेळकाळ लक्षात राहत नाही. संध्याकाळ होते. कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेतं. भुंगे कमळात अडकून जातात. आता-बाहेर पडायचं तर पाकळ्या फाडून; पण कमळाच्या नाजूकपणावर भाळलेले भुंगे बाहेर पडत नाहीत. रात्रभर तसेच राहतात. श्वास घेणं कठीण होत जातं, पण मोठमोठ्या खोडांना पोखरून काढणारे भुंगे तोंडातून आवाज काढत नाहीत. कमळाच्या नाजूक मिठीत त्यांचा शेवट होतो. या प्रकाराला ज्ञानेश्वर ‘कठीण कोवळेपण’ म्हणतात.

(लेखक चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT