Movie sakal
सप्तरंग

ये इश्क हाए...

जीवनाचा आनंद मनमुराद लुटावा...हसत-बागडत जगावं असं अचानक का वाटू लागलंय...भोवतालच्या हवेत काही जादू भरलीय की काय...असं ती स्वत:लाच विचारू लागली आहे.

डॉ. कैलास कमोद kailaskamod1@gmail.com

ये इश्क हाए...बैठे बिठाए

जन्नत दिखाए हाय, ओ रा ऽ ऽ ऽ मा

तारुण्यात पदार्पण होत असताना कधी कधी नकळत प्रेमाची लागण होऊ लागली की -

मी मनात हसता प्रीत हसे

हे गुपित कुणाला सांगू कसे

चाहुल येता ओळखीची ती

बावरल्यापरी मी एकांती

धुंद जिवाला डोळ्यांपुढती

नव्या नवतिचे स्वप्न दिसे

अशी कविवर्य रमेश अणावकर यांच्या या गीतासारखी मनःस्थिती होऊ लागते.

मनात प्रेमाची ज्योत तेवली की मनातल्या मनात हसून ‘दिल का दिया जला के गया, ये कौन मेरी तनहाई में’ असं स्वत:शीच पुटपुटत, बावरून जात आनंद व्यक्त करणारी पन्नास वर्षांपूर्वीची भारतीय तरुणी आता तशी राहिलेली नाही. व्यक्त व्हावंसं वाटलं तर ती आपली अभिव्यक्ती दडपून ठेवत नाही. ती बोलते, सांगते.

जीवनाचा आनंद मनमुराद लुटावा...हसत-बागडत जगावं असं अचानक का वाटू लागलंय...भोवतालच्या हवेत काही जादू भरलीय की काय...असं ती स्वत:लाच विचारू लागली आहे. बसल्या बसल्या स्वर्गात तरंगत असल्याचा भास तिला होऊ लागला याचा अर्थ हे प्रेमच आहे, म्हणूनच ‘ते’ स्वस्थ बसू देत नाहीये. आताची तरुणी प्रसंगी आपला हा आनंद रस्त्यावर येऊन नाचत-बागडत व्यक्त करू लागली आहे. जीवनाचा आनंद लुटणाऱ्या अशा आधुनिक तरुणींचं प्रतीक म्हणजे ‘गीत’ नावाची ही नायिका...

हाँ, है कोई तो वजह, जो जीने का मजा

यूँ आने लगा

ये हवाओं में है क्या थोडासा यूँ नशा

जो छाने लगा

पूछो ना पूछो, मुझे क्या मिलेगा

तेरी राहो में आकर

पूछो ना पूछो, मुझे क्या मिलेगा

तेरी बाहों मे आकर

ये इश्क हाए... बैठे-बिठाए जन्नत दिखाए हाए

ओ रा ऽ ऽ ऽ मा

तुझ्या बाहुपाशात विसावून मला काय मिळणार आहे हे इतरांना कसं कळणार? दुनियादारी झुगारून दिली मी तुझ्या प्राप्तीसाठी. माझं वचन मी मोडणार नाही. अर्धांगी होऊ पाहत्येय मी तुझी. माझं जीवनच तू व्यापून टाकलं आहेस. बघ ना जरा...तुझ्या स्वप्नांमध्ये रमून माझी काय अवस्था झालीय ती.

स्वत:शीच बोलत असताना नायिका प्रियकराला सुनावते आहे. अशीच असते आधुनिक तरुणी.

तोडे मैं ने सारे ही बंधन जमाने तेरे

तोडूँगी ना मैं वादा

आधा हिस्सा मेरे तो दिल की कहानी का तू

पिया मैं बाकी आधा

देखो ना देखो, मुझे क्या हुआ है

तेरी यादों में खो कर

माझ्यासारखे तुला लाखो लोक भेटले असतील; पण माझ्यासाठी तू एकमेव आहेस, असं ती त्याला स्पष्टपणे सांगते आहे. हे असं मोकळेपणानं, मोकळ्या मनानं वागणं आजच्या तरुणीला मनोमन पटलं आहे आणि ती स्वत:ला झोकून देत आहे.

मेरे जैसे लाखों, मिले होंगे तुझ को पिया

मुझे तो मिला तू ही

तू ही मेरे होटों की, खिलती हुई सी हँसी

गिला भी पिया तू ही

देखो ना देखो, मुझे क्या हुआ है, तुझे सपनों में लाकर

समाज अशा मुक्त वागण्याला कदाचित स्वैराचार समजेल. त्याची तमा न बाळगता मुक्तता हा अधिकार आहे असं ती समजते. अतिशय मनस्वीपणे आणि मुक्तपणे जगणारी ‘गीत’ ही तरुणी प्रत्येक तरुणीला स्वत:मध्ये सापडायला हवी.. किंबहुना आपण आपल्यात लपलेली ती शोधायला हवी.

सुपिरिऑरिटीचा कोणताही गंड न बाळगता ‘मैं खुद की फेवरिट हूँ’ असं म्हणता यायला हवं तिच्यासारखं...जगण्याचा तरल, निरागस आणि मनापासून अनुभव घेत तिचं जगणं आपल्यालाही जमायला हवं..

गीतकार ईर्शाद कामिल यांना दाद द्यावी लागेल. आजच्या जमान्यातल्या मनस्वी, मुक्त तरुणीचं मनोगत फार छान वर्णन केलं आहे त्यांनी.

गायिका श्रेया घोषाल हिनं शब्दांना विशिष्ट तऱ्हेनं हेलकावे देत गायिल्यानं गाण्यात रंगत आली आहे. गाणं ऐकताना मजा येते. ‘ओ राऽ ऽ मा’ या शब्दांचा उच्चार इतका मस्त केलाय की, तो ऐकण्यासाठी गाणं पुनःपुन्हा ऐकावंंसं वाटतं. संगीतकारानं चाल देताना एक विशिष्ट ठेका धरला आहे.

‘तोडे मैं ने...सारेही बंधन’ अशी दोन दोन शब्दांनंतर ओळ तोडून मध्येच थबकून पुढं नेण्याच्या त्याच्या स्टाईलमुळे गाण्याला गेयता आली आहे. हे संगीत लोकसंगीताच्या अंगानं जाणारं आहे. त्यातली वाद्यंसुद्धा आदिवासींच्या वाद्यांशी मिळती-जुळती आहेत. फार मस्त संगीत दिलं आहे संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांनी. इंटरल्यूडला हिमालयीन प्रदेशातल्या लोकसंगीतातल्या वाद्यांचा आस्वाद घेता येतो आपल्याला.

करीना कपूरनं ‘गीत’च्या भूमिकेत धमाल केली आहे. हिमालयात आल्यावर मोकळेपणाने नाचत-गात आनंद व्यक्त करतानाची तिची देहबोली आणि चेहऱ्यावरचं हास्य खूप काही सांगून जातं. नृत्य जणू तिच्या अंगाअंगात ठासून भरलंय. निखळ आनंदानं नाचताना, बांधलेल्या केसांची पोनी उडवण्याची तिची लकब फारच आकर्षक आहे. दोन्ही हात पसरून पायाच्या स्टेप्स टाकत छान नाच तिनं केला आहे.

तिच्या प्रत्येक हालचालीतून नृत्याचा आविष्कार दिसून येतो. पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या बॅकग्राऊंडवर पिवळ्या, काळ्या, गडद लाल अशा रंगांची वेशभूषा उठून दिसते. मॅानेस्ट्रीतल्या महिलांबरोबर त्यांच्यासारखी वेशभूषा करून त्या पद्धतीचा तिचा नाच आहे. करीनाच्या करिअरमधली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणायला हरकत नाही.

तिच्या ओसंडून जाणाऱ्या आनंदाकडं कुतूहलानं, सस्मित चेहऱ्यानं पाहत; पण संयमितपणे दुरूनच त्याचा आस्वाद घेणारा शाहीद कपूर ग्रेसफुली वागतो. तो तिचा प्रियकर नाहीये. प्रवासात ओळख झालेला एक दोस्त आहे. त्याला डोळ्यांसमोर ठेवून ती दूर कुठं तरी असलेल्या आपल्या प्रियकराशी मुक्त संवाद साधते आहे.

हिमालयाच्या अतिविशाल पार्श्वभूमीवर तिचं हे मुक्त होणंसुद्धा किती विशाल आहे हे दिग्दर्शक दाखवू इच्छितो. बौद्ध मॅानेस्ट्रीतल्या लोकसंगीतासह तिचं नाचणं, शेवटी अपेक्षित गन्तव्यस्थळ येताच त्याच्याकडं मागं वळूनसुद्धा न बघता आपल्याच आनंदाच्या धुंदीत निघून जाणं हे दाखवण्यात दिग्दर्शकाचं कसब दिसून येतं. समूहनृत्यसुद्धा पहाडी प्रदेशातल्या लोकनृत्याशी मिळतं-जुळतं आहे.

कृत्रिम सिंह, अस्वल यांसारखे प्राणी आपल्याकडच्या आदिवासी नृत्यांमध्येसुद्धा असतात. दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे गाण्याचं टेकिंग केलं आहे. मनाली ते लेह या हायवेवरच्या रोहतांग पासजवळची हिमालयाची दृश्यं खरोखर नयनमनोहर आहेत. जवळच कुलू खोऱ्यातल्या नग्गार या गावात मॉनेस्ट्रीचे सीन सेट लावून चित्रित झाले आहेत; पण बौद्ध मॅानेस्ट्रीचा माहोल चांगला उभा केला आहे.

‘जब वी मेट’ हा सिनेमा आणि त्यातली गाणी हा सगळाच एक अनुभव आहे. एक निराशाग्रस्त तरुण ट्रेनमधे बसला आहे. त्याच्या शेजारच्या सीटवर अखंड बडबड करणारी मनमोकळी तरुणी येऊन बसते. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते; पण तो प्रतिसाद देत नाही. तरीही हिची बडबड आणि खोडकरपणा सुरूच असतो.

हळूहळू तो प्रतिसाद देता देता तिचा मित्र होतो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमलतं. ‘भटिंडामधल्या (पंजाब) माझ्या घरी मी पोहोचले की मी हिमाचलमध्ये माझ्या प्रियकराकडे घरातून पळून जाणार आहे,’ असं ती त्याला सांगते. घरातून पळायला तो तिला मदत करतो. ते निघाले आहेत तिच्या प्रियकराकडं...अशा प्रसंगावर येणार हे गाणं.

कधी एखाद्या गोष्टीची केमिस्ट्री कशी एकदम परिपूर्ण जमून येते...तसा हा सिनेमा आणि त्यातली नायिका गीत! जगण्यावर आणि मुख्यतः प्रेम या संकल्पनेवरच प्रेम करणारी गीत आपल्या नकळतच आपल्याला भावते. ‘तुमचं आणि आमचं सेम नसतं’ असं जरी आपण म्हणत असलो तरी ते मनात कुठं तरी गीतसारखं असावं असं वाटत राहतं.

आपण कुणाच्या तरी प्रेमात आहोत यातच प्रचंड खूश असणारी गीत जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा निखळ आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करत राहते. आयुष्यात प्रेम खरंच महत्त्वाचं असतं का...? गीतला तुम्ही भेटलात तर तुम्हालाही तिच्यावर आणि तिच्यासारखंच प्रेम करावंसं वाटेल. तिला नाचताना पाहिलं की वाटेल, खरंच प्रेमात इतकी जादू असते का? खऱ्या अर्थानं प्रेम समजून घ्यायचं तर गीतला भेटायला हवं; नव्हे तिच्याबरोबर नाचायलाही हवं.

‘जब वी मेट’ हा २००७ मध्ये प्रदर्शित सिनेमा आणि पर्यायानं नायिका गीत बरंच काही सांगून जाते. एकदा ऐकल्यावर पुनःपुन्हा ऐकावंसं आणि पहावंसं वाटेल असं मस्त गाणं...

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT