- केतन पुरी
मध्य प्रदेशमधील खजुराहो हे ठिकाण जागतिक आकर्षणाचा विषय आहे. असं सांगितलं जातं, की या ठिकाणी आधी तब्बल ८५ मंदिरे होती. पण सद्यःस्थितीत केवळ २५ मंदिरे दिसून येतात. यामध्ये हिंदू आणि जैन धर्मीयांच्या मंदिरांचं बांधकाम आढळतं. मध्ययुगीन काळात चंदेल नामक एक राजवंश मध्य भारतात राज्य करत होता. या चंदेल घराण्यातल्या राजांनी खजुराहो इथल्या अनेक मंदिरांची उभारणी केली.
खजुराहो ज्या गोष्टीसाठी ओळखले जातं, ती ‘कामशिल्प’ खजुराहोमधील एकूण शिल्प संख्येच्या केवळ दहा टक्के म्हणजे फार कमी संख्येत आहेत. शिव, विष्णू, शक्ती, गणपती यांसोबत विद्याधर, सुरसुंदरी, गंधर्व, व्याल, दिक्पाल यांची शिल्पं प्रचंड प्रमाणात इथं कोरून ठेवलेली दिसतात.
त्यातही, या कामशिल्पांविषयी अनेक गैरसमज आहेत. ''कामसूत्र'' नामक ग्रंथ खजुराहोमधील मंदिर समूह निर्मितीच्या जवळ जवळ ६०० वर्षांआधी लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे, खजुराहो म्हटले, की जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते, ते अतिशय ढोबळ आणि मंदिरांना न्याय देणारे नाही, हे मात्र नक्की.
महाराष्ट्रात जेव्हा अंबरनाथच्या शिवमंदिराचं बांधकाम सुरू होतं, तेव्हा खजुराहोमध्ये या भव्य मंदिरांची उभारणी झाली. या एकाच गोष्टीवरून दोन्ही भागांमधील राजकीय - सामाजिक, आर्थिक स्थैर्य आणि धार्मिक प्रभावाची सहज कल्पना येते.
चंदेल राजा यशोवर्मन याच्या काळात लक्ष्मण मंदिराची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. देवांगणा देसाई यांच्या मतानुसार, या मंदिराची तीन नावे असावीत. पहिले नाव रामचंद्र, दुसरे नाव लालाजी आणि तिसरे लच्चमन किंवा लक्ष्मण. यशोवर्मन राजाची एक उपाधी होती, लक्ष्मण राज, त्यामुळे मंदिर लक्ष्मण नावाने ओळखले जाते.
अभ्यासकांच्या मते, हे कदाचित भारतातील पहिले मंदिर असावे, ज्याच्या गर्भगृहात वैकुंठ विष्णू प्रतिमा आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस आणि आतील बाजूस असणाऱ्या शिल्पांवर लक्ष्मीतंत्राचा तर कृष्ण शिल्प पटांवर हरिवंश पुराणाचा प्रभाव जाणवतो. याच मंदिराच्या समोर छोटेखानी वराह मंदिर आहे. भारतातील सर्वांत सुंदर यज्ञ वराहची प्रतिमा या मंदिरात आहे.
खजुराहो येथील मंदिराच्या नावांमध्ये सुद्धा गंमत आहे. ''कंदरिया महादेव मंदिर'' म्हणून ओळखले जाणाऱ्या मंदिराचे खरे नाव ''माणकेश्वर मंदिर''. कंदरिया म्हणजे मोठा पर्वत, मंदिर सुद्धा अतिशय भव्य आहे. एखाद्या पहाडाप्रमाणे भासणारे हे मंदिर कंदरिया महादेव नावाने ओळखले गेले. कंदरिया महादेव मंदिर हे भारतातील सर्वोत्तम मंदिरांपैकी एक आहे.
हे मंदिर भारतातील सर्वांत परफेक्ट मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिर स्थापत्याचे एकूण एक नियम या ठिकाणी अगदी काटेकोरपणे पाळल्याचे दिसून येते. भारतातील सर्वांत आकर्षक ''सुरसुंदरी'' याच मंदिरात आहेत. या मंदिराची उंची जवळ-जवळ १०० फुटांपेक्षा जास्त आहे. अतिशय सुंदर, महत्त्वाची आणि दुर्मीळ अशी ''चतुष्पाद शिव'' मूर्ती याच ठिकाणी आढळते. गर्भगृहात स्थापन केलेली ही प्रतिमा विशेष आहे. आठ डोकी, चार हात आणि चार पाय असणाऱ्या या मूर्तीच्या पायांमध्ये ब्रह्माचे अंकन आहे. वरील दोन पाय पद्मासनात तर खालील दोन पाय भद्रासनात आहेत.
अभ्यासकांच्या मते, चार पाय ज्ञान, चर्या, योग आणि क्रिया यांचे प्रतिनिधित्व करतात. पण विशेष गोष्ट अशी आहे, की अशा प्रतिमेविषयी कोणत्याही धार्मिक अथवा शिल्प ग्रंथात कसलाही उल्लेख नाही किंवा कोणत्याही शिलालेखात या प्रतिमेविषयी कसलीही माहिती मिळत नाही. ही शिवाची अशा विचित्र प्रकारातील एकमेव मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे.
काही अभ्यासक असेही सांगतात, की कदाचित पाशुपत संप्रदायाची सुरुवात असावी, त्याचे प्रतिनिधित्व हे शिल्प करत असावे. अभ्यासकांच्या मते, बिडा नामक चंदेल राजाने हे मंदिर बांधले असावे. त्याचे तसे नाव मंदिरातील एका शिलालेखात विद्याधर या नावाने कोरून ठेवले आहे. अंबरनाथ येथील शिव मंदिराचा आणि कंदरिया महादेव मंदिराचा निर्मिती काळ एकच आहे. वास्तुशास्त्र ग्रंथात नमूद केलेल्या नियमांचे अगदी तंतोतंत पालन केले आहे. प्रबोध चंद्रोदय नामक ग्रंथाचा प्रभावही या मंदिराच्या शिल्पांवर किंवा मंदिराच्या एकूणच धार्मिक परिस्थितीवर दिसून येतो.
खजुराहो येथील मंदिरांबाबत प्रचंड गैरसमज आहेत. तिथल्या कामशिल्पांची जेवढी प्रसिद्धी झाली, तेवढी इतर शिल्पांची किंवा मंदिराच्या स्थापत्याची प्रसिद्धी झाली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. खजुराहो येथील मंदिरांची जितकी माहिती आज उपलब्ध आहे, त्याच्या तुलनेत आज आपण १० टक्के सुद्धा माहिती या लेखांतून वाचलेली नाहीये. हजार वर्षांपूर्वीच्या या मंदिरांचे महत्त्व, तत्कालीन राजकीय प्रभाव, आर्थिक स्थैर्य, बदलत गेलेली धार्मिक समीकरणे, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे हे सगळं काही कामशिल्पांच्या कुतूहलामुळे दुर्लक्षित राहून जाते.
पार्श्वनाथ मंदिर, विश्वनाथ मंदिर, दुलादेव मंदिर, जराई का मठ अशी अनेक मंदिरे, त्यांचे स्थापत्य, त्यावरील शिल्पकला ही अजूनही काहीशी लोकांकडून दुर्लक्षिले जाते. तिथल्या कामशिल्पांविषयी सुद्धा अनेक गैरसमज आहेत. आपल्याला वाटते, आपल्या मनातील व्यभिचाराच्या भावना बाहेर ठेवून आपण मंदिरात प्रवेश करावा, पण हे चुकीचे आहे.
तंत्रमार्गी संप्रदायाच्या खाणाखुणा या कामशिल्पांच्या माध्यमातून अजून जपल्या गेल्या आहेत. तत्कालीन समाजाचे दर्शन या शिल्पांमधून घडते, असे बरेच जण सांगतात. पण तेही चुकीचे आहे. कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचे घोडा, गाढव यांसारख्या प्रण्यांसोबत अनैसर्गिक संबंध असणे हे जगातील कोणत्याही समूहात स्वीकारले गेलेले नाही.
त्यामुळे खजुराहो विषयी असणारे आकर्षण हे गैरसमज वाढवण्यासाठी सुद्धा कारणीभूत आहे. ''वैकुंठ विष्णू आणि काश्मिरागम पंचरात्न'' किंवा ''चतुष्पाद शिव आणि शैव सिद्धांत मत'' यांचे तत्त्वज्ञान वाचून मंदिर आणि शिल्पांच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यात वेगळी मजा आहे. सप्तमातृका, नृसिंह, वराह, वैकुंठ विष्णू, सदाशिव, ५४ हातांचा नृसिंह अशा विविध शिल्पांनी इथला मंदिर समूह सजला आहे.
चौसष्ट योगिनींसाठी ''आयताकृती'' आकारात बांधलेले एकमेव मंदिर खजुराहोमध्ये आहे. मंदिरांचे बांधकाम कशा प्रकारे झाले असावे, लोकांचे दैनंदिन राहणीमान कसे असावे याविषयीचे शिल्प सुद्धा मंदिरांवर कोरलेली आढळतात. भारताच्या मंदिर स्थापत्याचा कळस म्हणजे ''खजुराहो मंदिर समूह''.
(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.