Tiger sakal
सप्तरंग

खुर्सापारची आधारवेल ‘दुर्गा’

मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील काही मजुरांनी पाण्यात विष कालवून चितळांना मारण्याचा प्रयत्न केला. त्या विषप्रयोगात ‘बाघींनाला’ वाघीण व तिची पिल्ले सापडली. त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

अवतरण टीम

- संजय करकरे

मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील काही मजुरांनी पाण्यात विष कालवून चितळांना मारण्याचा प्रयत्न केला. त्या विषप्रयोगात ‘बाघींनाला’ वाघीण व तिची पिल्ले सापडली. त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. तत्पूर्वीच ‘दुर्गा’ महाराष्ट्राच्या जंगलात दाखल झाली होती. खुर्सापारमध्ये आलेल्या ‘दुर्गा’ने अल्पावधीत या क्षेत्रात आपला जम बसवला. २०१६ नंतर नियमितपणे तिचे अगदी सहजतेने दर्शन होऊ लागले. सुरुवातीच्या काळात दात विचकून पर्यटकांना घाबरवणारी ‘दुर्गा’ नंतर कालांतराने तिथे रुळली. नर वाघासारखाच असणारा तिचा रुबाबदारपणा आणि दणकट शरीरामुळे तिचे सौंदर्य खुलत गेले.

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या खुर्सापारच्या जंगलात ‘दुर्गा’ नावाच्या वाघिणीचा कुटुंबकबिला आज विस्तारला आहे. आज या जंगलात ही वाघीण, तिची पिल्ले आणि त्या पिल्लांची पिल्ले स्थिरावली आहेत. एखाद्या भल्यामोठ्या वटवृक्षाप्रमाणेच ती आणि तिचे उत्तराधिकारी येथे रमले आहेत.

मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात दिसणाऱ्या  जगप्रसिद्ध ‘कॉलरवाली’ची बहीण ‘बाघींनाला’ होती. या दोन्ही बहिणी ‘बडीमादा’ या वाघिणीच्या पोटी जन्माला आल्या होत्या (२००६). ‘कॉलरवाली’ने आपल्या आईच्याच क्षेत्रात हक्क प्रस्थापित केला, तर या व्याघ्र प्रकल्पातील एका नाल्याच्या जवळ तिच्या दुसऱ्या बहिणीने क्षेत्र बळकावले. ही वाघीण या नाल्याच्या जवळपास राहत असल्याने तिला ‘बाघींनाला’ असे नाव मिळाले.

‘बाघींनाला’ हा परिसर महाराष्ट्रातील जंगलाजवळ असल्याने साहजिकच ‘बाघींनाला’ वाघिणीला जी पिल्ले झाली ती महाराष्ट्राच्या जंगलाकडे आली. आपल्या कथेची नायिका ‘दुर्गा’ या वाघिणीचाही त्यात समावेश आहे. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कामानिमित्त जंगलात मजुरांचा मुक्काम होता.

त्या वेळी त्यातील काही मजुरांनी पाण्यात विष कालवून चितळांना मारण्याचा प्रयत्न केला. या विषप्रयोगात ‘बाघींनाला’ ही वाघीण व तिची पिल्ले सापडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तत्पूर्वीच ‘दुर्गा’ महाराष्ट्राच्या जंगलात दाखल झाली होती.

मध्य प्रदेशातील ‘कॉलरवाली’ आणि अन्य वाघिणी या पांढऱ्या रंगाच्या अधिक आहेत. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याजवळील तसेच गळ्याजवळील भाग पांढरा असल्याचे स्पष्टपणे जाणवते. साहजिकच ‘दुर्गा’ वाघिणीच्याही चेहऱ्यात मध्य प्रदेशातील या वाघिणींच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब उमटल्याचे मला वाटते. खुर्सापारमध्ये आलेल्या ‘दुर्गा’ने या क्षेत्रात आपला जम बसवला. साधारणपणे २०१६ नंतर नियमितपणे या वाघिणीचे येथे सहजतेने दर्शन होऊ लागले.

त्यावेळेस येथे वर्चस्व असलेल्या ‘हॅण्डसम’ नावाच्या नर वाघासोबत ती दिसत असे. या वाघापासूनच तिला पिल्ले होत गेली. या जंगलातील अनेक पाणवठ्यांवर ही वाघीण पर्यटकांना सहजतेने दर्शन देत असे. सुरुवातीच्या काळात दात विचकून पर्यटकांना घाबरवणारी ‘दुर्गा’ नंतर कालांतराने येथे रुळली. या वाघिणीचा नर वाघासारखाच असणारा रुबाबदारपणा व दणकट शरीर तिचे सौंदर्य वाढवणारे आहे.

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात सिल्लारी हे मुख्य प्रवेशद्वार आहे. याच व्याघ्र प्रकल्पात खुर्सापार हे पण महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. २०१४ च्या हिवाळ्यात खुर्सापार हे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मानसिंगदेव अभयारण्यातील देवलापर वन परिक्षेत्रात हे प्रवेशद्वार आहे. हा सर्व जंगल भूभाग, मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे.

या परिसरातील खुर्सापार, गर्रा, बांद्रा या गावांतील काही ग्रामस्थ पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोहच्या जलाशयात अवैधरीत्या मासेमारी करत असल्याने या परिसरातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने खुर्सापारचे हे प्रवेशद्वार सुरू करण्यात आले. तत्कालीन क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांनी या प्रवेशद्वाराला प्राधान्य दिले होते. खुर्सापारचे जंगल उंच-सखल आहे. पाणवठ्यांची संख्याही तेथे मोजकीच होती.

तसेच वन्यप्राण्यांपेक्षा मानवाचा वावर जंगलात अधिक असल्याने वन्यप्राण्यांचे तसेच वाघाचे दर्शन क्वचितच होत असे, मात्र त्यात सुधारणा होत गेली. पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. वर्तुळाकार रस्ते तयार झाले. संरक्षण आणि संवर्धनाचे फलित येथे बघायला मिळाले. हे सर्व जंगल मध्य प्रदेशाच्या व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने साहजिकच तेथील अनेक वाघ या जंगलात आले आणि स्थिरावलेही. आज खुर्सापारचे प्रवेशद्वार अत्यंत प्रसिद्ध झाले आहे.

या प्रवेशद्वारातून महाराष्ट्राऐवजी मध्य प्रदेशातील टुरिया परिसरातील पर्यटकांचा ओघ अधिक आहे. सुरुवातीच्या काळात एक पर्यायी प्रवेशद्वार म्हणून खुर्सापारकडे बघितले जात होते. मध्य प्रदेशातील टुरिया परिसरात अनेक रिसॉर्ट असल्याने तेथे पर्यटकांची गर्दी सतत असते.

टुरिया प्रवेशद्वारातून बुकिंग मिळत नसल्याने एक पर्याय म्हणून पर्यटक खुर्सापारकडे वळत होते, मात्र जसे खुर्सापारमध्ये व्याघ्र दर्शन सहजतेने होऊ लागले, तसे टुरिया परिसरातील पर्यटक नियमितपणे या जंगलाकडे वळल्याचे लक्षात येते. या वर्षाच्या सुरुवातीला खुर्सापार प्रवेशद्वारावर अतिशय सुरेख असे संकुल उभे झाले आहे.

या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी बैठकीची व्यवस्था, सोविनियर शॉप, प्रसाधनगृहे व उपाहारगृह झाले आहे. या उन्हाळ्यातही नेहमीप्रमाणे हे प्रवेशद्वार जवळपास फुल असल्याचे चित्र होते. या प्रवेशद्वारामुळे खुर्सापार गावासह बांद्रा आणि गर्रा या दोन्ही गावांचा जंगलांवरील अवलंब काही प्रमाणात कमी झाल्याचे बघायला मिळते.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारीच्या जंगलाची नजाकत काही औरच आहे. हे जंगल पेंच राष्ट्रीय उद्यानामुळे १९७५ पासूनच राखले असल्याने तसेच तोतलाडोह धरणाच्या परिसरात पसरले असल्याने त्याचे सौंदर्य वेगळेच आहे. अंबाखोरी, सॅडल डॅम, बोट कॅम्प,  कुटुंब नाला परिसरातील जंगल आणि लॅण्डस्केप अतिशय मनोहारी आहे. या जंगलाचाच सलग भाग असलेले खुर्सापारचे जंगल मात्र काहीसे रुक्ष वाटते. पाण्यापासून हा भाग दूर आहे. तो उंच-सखल आहे. पूर्वी या परिसरात एफडीसीएम यांनी वृक्षतोड केल्याने डेरेदार वृक्ष येथे सिल्लारीच्या तुलनेने कमीच बघायला मिळतात.

देवलापार वन परिक्षेत्राचे तत्कालीन अधिकारी प्रवीण साठवणे २०१५ ते २०१९ पर्यंत येथे कार्यरत होते. त्यांच्या काळात खुर्सापार प्रवेशद्वारातील पर्यटनाला चांगली चालना मिळाली.  ते सांगतात, २०१६ मध्ये ‘दुर्गा’ वाघीण मी येथे बघितली. ती खाली बसल्यावर तिच्या पोटाजवळ स्पष्टपणे  ‘D’ पट्टा दिसत होता. त्यामुळे त्यावरून मी तिचे ‘दुर्गा’ असे नामकरण केले. या सुमारास तिला तीन पिल्ले होती.

त्यात ‘बारस’, ‘बिंदू’ आणि नर ‘संभाजी’ यांचा समावेश होता. यावेळेस ही वाघीण ‘हॅण्डसम’ नावाच्या एका नरासोबत सतत बघितली जात होती. हा नर वाघ वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्याची तोडफोड करत असे. तो दिसायला अतिशय देखणा असल्याने साहजिकच त्याचे ‘हॅण्डसम’ असे नामकरण केले. त्यावेळेस ‘दुर्गा’ वाघीण साधारण पाच ते सहा वर्षांची असावी.

ती मध्य प्रदेशातून येथे आल्याने तिला त्यापूर्वी किती पिल्ले झाली, याची कल्पना नाही. ही वाघीण चीप गोटा, बखारी, चायपत्तीसह विविध परिसरांतील पाण्यावर हमखास आपल्या पिल्लांना घेऊन दिसत असे. तो काळ नुकतेच पर्यटन बाळसे धरू लागलेला होता. यापूर्वी येथे फारसे वाघ दिसत नसल्याने येथे दिसणाऱ्या वाघांची मी माहिती मिळवत होतो. ‘दुर्गा’च्या तीन पिल्लांपैकी ‘बारस’ नावाची वाघीण अतिशय बेधडक आणि बोल्ड होती.

ती पर्यटकांच्या जवळ यायचा प्रयत्न करी. बऱ्याच वेळा ‘दुर्गा’चे कुटुंब आणि ‘हॅण्डसम’ वाघ एकत्रित बघितले गेले आहे. पिल्लांना मोठे करण्यात ‘दुर्गा’ अतिशय मेहनत घेत होती. उत्तम आई असल्याचे तिच्या शिकारीच्या आणि संरक्षण पद्धतीवरून लक्षात आले होते. या तिन्ही पिलांना तिने व्यवस्थित मोठे केले.

२०१८ च्या सुमारास ‘दुर्गा’ पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात गेली. त्यानंतर तिला तीन पिल्ले झाली, मात्र त्यातील काही दुर्दैवाने नर वाघाकडून मारली गेली. याच काळात या परिसरात अनेक नर वाघ येऊन-जाऊन असल्याने ‘दुर्गा’ला हा काळ अतिशय कठीण गेला. सध्या या जंगलात असणाऱ्या एका लंगड्या नर वाघापासून ‘दुर्गा’ला दोन पिल्ले आहेत. या दोन्ही पिल्लांना घेऊन ही वाघीण खुर्सापारच्या तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात अधूनमधून जाऊन-येऊन असते.

तिची दोन्ही पिल्ले साधारण पाच-सहा महिन्यांची असावीत, मात्र पूर्वीच्या तिच्या मूळ क्षेत्रावर तिच्याच मुलींनी दावा केल्याने ती आता वेगळ्या क्षेत्रात स्थिरावली आहे. आता ही वाघीण उतारवयाकडे झुकली आहे, मात्र आज खुर्सापारचे जंगल विविध वाघांनी समृद्ध आहे, त्यात ‘दुर्गा’ वाघिणीचा सर्वाधिक वाटा आहे. तिच्या कुटुंबाचा मोठा वटवृक्ष तयार झाला आहे.   दुर्गा वाघिणीच्या मुली ‘बारस’ आणि ‘बिंदू’ यांनी परिसरातच सर्वाधिक दर्शन दिल्याने हा परिसर पर्यटकांनी सतत गजबजलेला आहे.  

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT