Antivirus Book sakal
सप्तरंग

विचारवाही वैविध्य

समाजात जे काही घडत असते, त्याचे ओरखडे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संवेदनशील कलावंतांच्या कलाकृतीतही उमटत असतात.

महेंद्र सुके mahendra.suke@esakal.com

समाजात जे काही घडत असते, त्याचे ओरखडे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संवेदनशील कलावंतांच्या कलाकृतीतही उमटत असतात.

समाजात जे काही घडत असते, त्याचे ओरखडे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संवेदनशील कलावंतांच्या कलाकृतीतही उमटत असतात. कलावंतांचे जगण्याचे अनुभव जसजसे संपन्न होतात, तशीच त्यांची कलाकृतीही समृद्ध होत जाते. समाजजीवनाचे असेच निरीक्षण करून सुनील ओवाळ यांनी त्यांचे अनुभव ‘ॲन्टीव्हायरस’ या कवितासंग्रहात गुंफले आहेत. समाजात असलेल्या विकृतींचा आपल्या सुव्यवस्थित जगण्याला बाधा होऊ नये, यासाठी ‘ॲन्टीव्हायरस’मधील कविता सजग करणाऱ्या आहेत.

समाजात निसर्गाला बाधा निर्माण करणाऱ्या घटना घडत असतात, तेव्हा जनजीवन प्रभावित होते. त्याचा प्रत्यय अलीकडेच कोरोना विषाणूने आपल्याला करून दिला आहे. अलीकडच्या काळात पर्यावरणाला हानी पोहचवून विकासाला महत्त्व देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विकास हवाच आहे; पण तो समाजजीवनच विस्कळित करणारा असेल, तर तो विकास कुणाचे आयुष्य समृद्ध करणार आहे, याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे विकासासोबतच आपल्याला निसर्गाशी असलेले नाते तोडता येत नाही, याची जाणीव कोरोना महामारीने करून दिली आहे.

प्रदूषण सजीवसृष्टीच्या नाशाचे कारण ठरतो आहे, याचाच प्रत्यय कोरोना महामारीने करून दिला आहे. असेच विषाणू काही विकृत माणसाच्या प्रवृत्तीतही असतात. तेही कधीकधी समाजजीवन प्रभावित करत असतात. आपले आयुष्य ‘करप्ट’ करत असतात. त्या व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी आपले आचार-विचार कसे असावेत, त्यासाठी कुठल्या विचारांचे आचरण आपल्यासाठी ‘ॲन्टीव्हायरस’ ठरू शकतात, याची जाणीव करून देणारा सुनील ओवाळ यांचा ‘ॲन्टीव्हायरस’ महत्त्वाचा आहे.

सुनील ओवाळ मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत आले. बृहन्मुंबई महापालिकेत लेखापरीक्षा अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. आजवर त्यांच्या कविता महत्त्वाच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या अशाच अनेक कवितांचा संग्रह होण्याआधीच मुंबईतील चाळीत राहत असताना २००५मध्ये आलेल्या महाप्रलयात बुडाल्या. त्यामुळे त्याआधी फक्त आठवणीत राहिलेल्याच काही कविता या संग्रहात आहेत. संग्रहात विषयांचे वैविध्य आहे.

गावाचे जीवन सोडून केलेले स्थलांतर, मुंबईत लादलेले जीवन, त्यातून निरीक्षण, वैयक्तिक व सामाजिक पातळीवरचे अनुभव, स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्त्री-जाणिवा, अराजकता, नित्य घटनांवरचे चिंतन यात समाविष्ट आहे. बहुतांश कविता मुक्तछंदातील असल्या, तरी काही निवडक अभंगशैली लक्षवेधी आहे. काही कविता गझलशैलीला स्पर्श करणाऱ्या आहेत. काही दीर्घ कविता, व्यक्तिचित्रण अशा वैविध्यपूर्णतेत विचारसंपन्नता हे या कवितेचे मुख्य सूत्र आहे. त्यामुळे बुद्ध, येशू ख्रिस्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा प्रज्ञा, शील, करुणा, क्षमाशील विचारधारेची पेरणी करत असताना, काही कवितेत विचारवाही विद्रोह दिसतो; पण त्यातही सम्यकपणा अधोरेखित झाला आहे. माणूस जेव्हा वेगवेगळ्या परिस्थितीत जगत असतो, तेव्हा त्याचे वेगवेगळे भाव-स्वभाव अधोरेखित होत असतात. शांत-सुस्वभावी माणूसही कधीतरी व्यवस्थेविरुद्धचा राग व्यक्त करताना आक्रमक होतो; परंतु सुनील ओवाळ यांनी त्यातही सम्यकमार्ग निवडलेला दिसतो.

‘मस्तवाल श्‍वापदांचा सुळसुळाट!

सारं काही त्यांना क्षम्य आहे...

बापुड्या.. वासरांनी न्याय कुठे मागावा?’

हा सवाल ओवाळ यांनी ‘न्याय’ या कवितेत केला आहे.

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे भारतीय लोकशाही सूत्राचे पाठराखण करणारे विचार ओवाळ यांनी त्यांच्या कवितेत मांडले आहेत.

‘ईर्षा-द्वेष-अहंकार आदि मारांवर मात करायला

जागृत होऊ दे माझ्या मनी

प्रेम, शांती अन्‌ मानवतेची सद्‌भावना

वळू दे माझे अज्ञानी मग पुन्हा सम्यक मार्गावर

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व जोपासण्यासाठी

शील-सदाचारी वागण्यासाठी

समस्त मानव कल्याणासाठी

प्रत्येकाने मेंदूत लखाखू दे प्रज्ञेचा उजेड

मणसा-माणसातील तृष्णा समूळ नष्ट व्हायला

तू प्रत्येकात ठासून भर करुणेचा महासागर!’

अशा काही पंक्ती बुद्धविचाराचे महत्त्व सांगणाऱ्या आहेत.

कवितासंग्रहाचे शीर्षक असणारी ‘ॲन्टीव्हायरस’ ही कविता आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात असणारे संगणक ही प्रतिमा वापरून समाजातील वास्तव सांगणारी आहे. त्यात जागतिकीकरणानंतरचा काळ अधोरेखित झाला आहे.

‘ग्लोबलायझेनच्या युगात मनाच्या संगणकावर होतायेत

द्वेषादी विषाणूंचे हल्ले नि झटपट नष्ट होऊ लागल्यात

मानवतेच्या सॉफ्टवेअर मेमरीत

जतन केलेल्या हळव्या प्रेमाच्या कसदार फाईल्स.

विकारांच्या पेनड्राईव्हवर कॉपी करून पेस्ट केले जातायेत

ईर्षा, अहंकारांचे घातक प्रोग्राम्‌स.

ग्लोबल मार्केटच्या व्यवहारी स्ट्रेटेजीत दुर्लक्षित केली जातेय

तुझ्या शांतीपथ ‘ॲन्टीव्हायरस’ची निकड.

मनाचं संगणक संपूर्णत: करप्ट होण्याआधी

कळू दे, साऱ्या विश्‍वाला

तुझ्या कल्याणकारी तत्त्वज्ञानाच्या ‘ॲन्टीव्हायरस’चं महत्त्व!’

या कवितेत सारे आजचे वास्तवच ओवाळ यांनी मांडले आहे. संगणकाच्या प्रतिमेसह वापरलेल्या इतर शब्दांचे प्रयोजनही आजच्या काळाशी सुसंगत झाले आहे. त्यामुळे ही कविता या संग्रहातली महत्त्वाची कविता आहे. त्यामुळेच या कवितेचे शीर्षक या कवितासंग्रहाला देण्यात आल्याचे दिसते.

कवितासंग्रहात अधोरेखित करण्यासारख्या अनेक कवितांतील काही ओळी चकित करणाऱ्या आहेत.

‘तुझा प्रवास, प्रवाहाविरुद्धचा

थोडासा अहम् बाळगून

पण भौतिकतेपासून अलिप्त राहून

तू थेट चाललास चितेपर्यंत स्वाभिमानाने’

अशा काही कवितांच्या संवादी ओळी विचार करायला भाग पाडणाऱ्या आणि गुंतवून ठेवणाऱ्या आहेत.

कवी सुनील ओवाळ यांच्या कविता वाचताना त्यांची समाजाकडे निरखून बघणारी नजर दिसते. समाजातील सगळ्या घटनांवर ते लक्ष ठेवून आहेत, याची जाणीव होते. याशिवाय त्याचे काय परिणाम होणार आहेत, याचे ते विश्लेषकही आहेत. ते विश्‍लेषण एखादा लेख लिहून करण्यापेक्षा त्यांनी माध्यम कविता निवडले. ही कविता समाजाला जागृत करणारी, आसूड ओढणारी अस्त्रही झाली आहे. कवितेतील शब्दप्रयोजन ही या संग्रहाची खरी ताकद आहे. कवितेसाठी ही शब्दसंपत्ती असणे कवीचा श्रीमंतपणा असतो. तो ओवाळ यांच्याकडे असल्याचे या पहिल्याच संग्रहात दिसते. या शब्दप्रयोजनासह त्यांची कल्पकविचाराची ताकदही कवितेची उंची वाढवणारी आहे.

‘दरड कोसळण्याआधी शर्थीने बांधून घ्यायचीय एक प्रतिबंधात्मक भिंत!’

दु:खदायी आव्हाने पेलण्यासाठी आपल्याकडे ते दु:खाचे निराकरण करणारी उपाययोजना असावी, याची जाणीव करून देणारी ही ‘भिंत’ कविता पुन्हा ‘ॲन्टीव्हायरस’ची आठवण करून देणारी आहे. अशा आचारविचाराने समृद्ध झालेल्या या संग्रहाची प्रा. डॉ. बाळासोहब लबडे यांनी सविस्तर प्रस्तावनेच्या रूपाने पाठराखण केली आहे. ती या कवितेचे महत्त्व विषद करणारी आहे. ब्लर्ब गझलकार भागवत बनसोडे यांचे आहे. डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेला हा संग्रह आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारू शकेल, अशी अपेक्षा आहे.

कवितासंग्रह : ॲन्टीव्हायरस

कवी : सुनील ओवाळ

प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, वसई

पृष्ठसंख्या : १०६

मूल्य : १६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT