पाश्चिमात्य सिनेमात मॅकगफिन नावाचं एक आयुध लेखक वापरतात. ज्यात एक गोष्ट असते जी महत्त्वाची नसते; पण त्या गोष्टीमुळे पात्रांचं खरं रूप आपल्यासमोर येतं.
सुदर्शन चव्हाण
मल्याळम सिनेमातील ‘लिजो जोस पेल्लीसारी’ हे नाव गेल्या दशकात देशभर खूपच गाजलं. ‘अंगमली डायरीज’, ‘इ मा याऊ’ आणि ‘चुरुली’ असे त्याचे सिनेमे त्यांच्या लक्षवेधी तांत्रिक चमत्कारांनी आणि विषयांच्या निवडीने लक्ष वेधून घेतात. याच माळेतील एक अत्यंत महत्त्वाची फिल्म म्हणजे ‘जल्लीकट्टं’. ती (Jallikattu Movie) राजकीय भाष्य करणारं एक प्रहसन नसून ‘उधळलेल्या रेड्याचा ऑपेरा’ आहे.
गेल्या काही वर्षांत ‘जल्लीकट्टं’ हा विषय चांगलाच चर्चेत आला होता. ही एक तमिळ प्रथा आहे. ज्यात एका उधळलेल्या बैलाच्या पाठीवरचा उंचवटा (वशिंड) पकडून दाखवायचा असतो. काही ठिकाणी पळत्या बैलाच्या शिंगाला लाल कपडा बांधला जातो. त्याला मोकळ्या मैदानात पळायला सोडलं जातं आणि त्याच्यामागे लोक पळत त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. अशा अनेक उप-प्रथाही यात आहेत. कोर्टाने पशुहिंसेचं कारण देत या प्रथेवर बंदी आणली आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं.
पशुहिंसा बंद व्हावी, असं दावा करणाऱ्यांचं मत होतं; पण पुढे त्या वादाला आमची तमिळ संस्कृती, हिंदू धर्माविरुद्धचा कोर्टाचा कट, असा रंग दिला गेला. सरकारने कोर्टावरच ताशेरे ओढत ‘हा कसला Judicial Activism?’ असा थेट प्रश्न विचारला. साधारण याच काळात ‘एस. हरीश’ या मल्याळम लेखकाने आपल्या ‘आदम’ या कथासंग्रहात ‘माओइस्ट’ नावाची एक कथा लिहिली. या कथेत अशा सर्व वृत्तीचं त्याने फार सुंदर अंगाने रूपक मांडलं आणि त्यावर अनेक भाष्यंही केली.
ही साधारण कथा अशी होती... एका गावात कापण्यासाठी आणलेला एक रेडा अचानक सुटतो आणि गावभर पळत सुटतो. त्याला आणखी एक रेडा येऊन सामील होतो आणि दोघे सगळ्या गावात धुमाकूळ घालतात. हे पुढे पळणारे दोन रेडे आणि त्या मागे पळणारा सगळा गाव. यातून कथेने जल्लीकट्टं या प्रथेलाच रूपक म्हणून पुढे आणलं (जरी इथे तो सण किंवा प्रथा नसून तो एक अपघात असला तरी) आणि त्यातूनच दोनच विचारधारा आणि त्यामागे धावणारा सगळा समाज याची गोष्ट सांगितली.
एस. हरीशने या छोट्या कथेतून राजकीय मुद्द्याला हात घातला. (अर्थात त्याच्या पुढच्याच कादंबरीवर केरळमधील धर्मवादी शक्तींनी जोरात आक्षेप घ्यायला सुरुवातही केली.) माणसातलं पशुत्व अजूनही कसं बाकी आहे, झुंडशाही वेगळ्या विचारांना कशी थारा देत नाही, अशा अनेक विषयांना ही कथा रूपकात्मक पद्धतीने आपल्यासमोर मांडते. सिनेमाने मात्र नावापासूनच त्यात बदल करत कथेतला रूपकात्मक भाग आपल्यासमोर थेट मांडला. दोनऐवजी एकच रेडा घेत कथेला एक सरळ सूत्र देण्याचा प्रयत्न केला.
‘अंगमली डायरीज’ आणि ‘ई मा याऊ’ या दोन सिनेमांनंतर लिजो जोस हा नव्या प्रकारच्या आर्ट सिनेमातला एक महत्त्वाचा दिग्दर्शक झाला होता. कथेचा आणि संकलनाचा प्रचंड वेग, विषयाचं नावीन्य, पार्श्वसंगीतातलं वेगळेपण आणि दिग्दर्शनातले कलात्मक प्रयोग अशा सर्वच पातळ्यांवर त्याचे सिनेमे कमालीचे यशस्वी ठरले आहेत. अशा प्रकारे या सिनेमात एक गाजलेला राजकीय मुद्दा आणि प्रचंड नावाजलेला दिग्दर्शक या दोन गोष्टी एकत्र आल्या आहेत.
सुरुवात होते तेव्हा सगळ्या गावात एक शांत, निवांतपणा, आळस भरलेला आहे. पहाटेच्या झुंजुरक्या प्रकाशात रेडा कापायला नेत आहेत. झोपाळलेल्या कसायाचा अचानक नेम चुकतो आणि दोरी तुटून रेडा उधळतो. इथून पुढे जो सिनेमा वेग घेतो तो शेवटपर्यंत थांबत नाही. घड्याळाच्या काट्यावर होणारं संकलन आणि प्रत्येक गोष्टीतली गडबड दिसून येईल इतकी स्पष्ट आहे. अगदी संपूर्ण कथानकातील घटनाक्रमही केवळ २४ तासांत संपून जातो.
कथेतील मुख्य पात्र आहे अँटनी. त्याला एक मुलगी आवडते; पण ते प्रेम खूप क्लिष्ट आहे. त्याची प्रेमकहाणीही या रेडा पकडण्याभोवती फिरत राहते. अँटनीसाठी रेडा पकडणं ही आधी प्रतिष्ठेची बाब असते. पुढे कुठेतरी ती प्रेम मिळवण्याची गोष्ट होऊन जाते आणि शेवटी ती एक सुडाची कृती ठरते. अशा सगळ्या स्थित्यंतरातून मुख्य पात्र केवळ एका दिवसात जातं. गावातली इतर वेगवेगळी पात्रं. त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध आणि या आणीबाणीच्या वेळेत त्यात होणारे बदल, अशी अनेक निरीक्षणं ‘जल्लीकट्टं’मध्ये दिसतात. इथे लेखकाची आणि दिग्दर्शकाची सरसकट ग्रामीण पात्रं दाखवण्याची तयारी नाही. ते प्रत्येक पात्रात अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात. काही सेकंदांसाठी दिसणारी पात्रंही लेखकाचं बारीक निरीक्षण दाखवतात. यात बायकोला सहज मारणारा नवरा दिसतो.
दुसरीकडे मुलीला अंघोळ करताना वाकून बघणारं एक पात्र आहे. गावभर मान असणाऱ्या नवऱ्याला नालायक समजणारी बायको आहे. एका कंजूष माणसाच्या घरी मुलीच्या एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे. त्याच्या मुलीच्या डोक्यात दुसरंच काहीतरी पिकतंय. गावातले मूळ रहिवासी कोण आणि बाहेरून आलेले कोण? हा वाद आहे. नक्की किती पिढ्या आधी आलेले म्हणजे मूळ रहिवासी समजायचे? हा प्रश्न आहे... आणि हे सर्व दाखवलं जातं तेही खूप मनोरंजक आणि तांत्रिकदृष्ट्या उच्च पद्धतीने. शिवाय त्याला राजकीय अंग तर आहेच. जसं की रेडा जेव्हा भर चौकात येतो, तेव्हा एकीकडे भाजपचा झेंडा आहे; तर दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टीचा. मग रेडा बरोबर कसा कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा पाडतो. त्यानंतर तो नेमका बँकेत घुसतो. हे एकीकडं येतं; तर दुसरीकडे रेड्याने चर्चला दान दिलेल्या जागेतच नेमकी नासधूस केली यावर चर्चा होते.
पाश्चिमात्य सिनेमात मॅकगफिन नावाचं एक आयुध लेखक वापरतात. ज्यात एक गोष्ट असते जी महत्त्वाची नसते; पण त्या गोष्टीमुळे पात्रांचं खरं रूप आपल्यासमोर येतं. ‘जल्लीकट्टं’मधील रेडा ही असंच एक मॅकगफिन आहे. ज्याने गावातील प्रत्येक व्यक्तीचे खरे रंग समोर येतात. कंजूष व्यक्तीच्या घरी ठरलेला लग्नाचा कार्यक्रम, नाकर्ता पोलिस अशा पात्रातून ते समोर येतात. या सिनेमाच्या निमित्ताने अजून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे, सामाजिक ऑपेरा हा प्रकार आपल्याकडे सहसा कोणी करत नाही. जे ‘जल्लीकट्टं’ करतो. ऑपेराचं कथानक अत्यंत सोपं आणि छोटं असतं. तांत्रिक गोष्टींकडे मात्र फार बारकाईने लक्ष दिलेलं असतं. (त्यामुळे युद्ध, प्रेमकथा, ऐतिहासिक पट असेच ऑपेरा जास्त पाहायला मिळतात.) पुढे काय होईल याच्या उत्सुकतेपेक्षा, ‘आता समोर जे घडतंय, ते साध्य कसं केलं’ हा ‘आश्चर्य फॅक्टर’ इथं जास्त महत्त्वाचा असतो. जो सामाजिक चित्रपट, प्रहसनं यात येत नाही. ‘जल्लीकट्टं’मध्ये मात्र हे सगळं एकत्र साध्य होतं.
एखादी गोष्ट किती इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवता येईल यावर दिग्दर्शक विशेष भर देतो. जसं की सिनेमातील एका प्रसंगात पोलिसांच्या नाकर्तेपणाला कंटाळून गावकरी जीप जाळून टाकतात. हा प्रसंग मोठा तर आहेच; पण त्याला सामाजिक भाष्याचे कंगोरेही आहेत. मात्र, त्याचसोबत तो तांत्रिकरीत्याही इतका नेत्रदीपक होऊन जातो की त्याचंही कौतुक करण्याची इच्छा होते. तेच रेड्याच्या शिंगांना बांधलेला कॅमेरा बघून होतं. जंगलात लोक रात्रीचे मशाली घेऊन रेडा शोधायला निघतात ते दृश्य तर डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. तेच विहिरीतून प्राणी बाहेर काढण्याच्या दृश्यात होतं. असं दृश्य, आवाज यातील तांत्रिक प्रयोगांचं सुख दिग्दर्शक आपल्याला दर सेकंदाला देत राहतो.
सिनेमा एक दिवस आणि एक रात्र एवढ्याच काळात घडतो. मग त्या गावातला नेहमीचा एक दिवस कसा असतो हे दाखवण्यासाठी दिग्दर्शक घड्याळ, श्वास अशा नेहमीच्या क्रियांमधून पार्श्वसंगीत बनवून रोज घडणारी गोष्ट वेगळ्या पद्धतीने दाखवतो. त्याने सिनेमाची तत्परता कळून येते. अशीच तत्परता अधोरेखित करतो सतत हलणारा आणि कायम गडबडीत असणारा त्याचा कॅमेरा. थोडक्यात रूपकं, राजकीय भाष्य हे तर आहेच; पण सिनेमाच्या दिसण्यालाही इथं तेवढंच महत्त्व आहे. कथेच्या बारकाव्यांसोबत वेगालाही महत्त्व आहे आणि रेडा केवळ मॅकगफिन नाही तर तो स्टेजच्या केंद्रस्थानी थांबलेला मोठा सेट पीस आहे. म्हणूनच हा सिनेमा नावात ‘जल्लीकट्टं’ असला, तरी ते राजकीय भाष्य करणारं प्रहसन नसून ‘उधळलेल्या रेड्याचा ऑपेरा’ आहे जो आपल्याकडे बघून विचारतो, उधळलंय कोण? मी रेडा की..
तुम्ही माणसं...? (लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.