Russia Ukraine War Sakal
सप्तरंग

युद्धाची कंत्राटगिरी!

रशियाने युक्रेनच्या बाखमुटजवळील सोलेदार शहर ताब्यात घेतल्यानंतर रशियाचे संरक्षण मंत्रालय आणि वॅगनर गट यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली.

अवतरण टीम

- मालिनी नायर, nairmalin2013@gmail.com

रशियाने युक्रेनच्या बाखमुटजवळील सोलेदार शहर ताब्यात घेतल्यानंतर रशियाचे संरक्षण मंत्रालय आणि वॅगनर गट यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली. सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाने वॅगनर गट लढाईत सामील असल्याचा उल्लेख टाळला होता. त्यानंतर रशियाने हे कबूल केले की, त्यांच्या भाडोत्री सैनिकांनी धैर्यवान आणि निःस्वार्थी भूमिका बजावली. असे कंत्राटी लष्कर रशियाने या युद्धात वापरले असेल, पण वॅगनरसारख्या कंपन्या हळूहळू अधिक शक्तिशाली होत आहेत. या धंद्याला रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

युक्रेनमध्ये रशियाच्या वतीने कार्यरत असणाऱ्या भाडोत्री लष्कराविषयीची बातमी काही दिवसांपूर्वी जगभरात प्रसिद्ध झाली. ‘वॅगनर’ या कुख्यात गटाचा नेता येवगेनी प्रिगोझिन याने रशियन सैन्य आपल्याला पुरेसा दारूगोळा पुरवत नाही, असा आरोप करत बाखमुट प्रदेशातून माघार घेण्याची धमकी दिली. येवगेनी प्रिगोझिन यांचा रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी संबंध आहे आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर हा गट कार्यरत असल्याचे सांगितले जाते. बाखमुट सर करण्यासाठी रशियाने नऊ महिन्यांपासून मोहीम चालवली आहे. त्यामुळे हे शहर युद्धाचे केंद्र बनले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने तेथे सैन्य पाठवल्यापासून अनेक रक्तरंजित चकमकी घडल्या आहेत. तथापी आपण आपले सैन्य कायम ठेवू, असे सांगत प्रोगोझिनने धमकी मागे घेतली.

रशियाने बाखमुटजवळील सोलेदार शहर ताब्यात घेतल्यानंतर रशियाचे संरक्षण मंत्रालय आणि वॅगनर गट यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली. सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाने वॅगनर गट लढाईत सामील असल्याचा उल्लेख टाळला होता. अर्थात त्यानंतर रशियाने हे कबूल केले की, त्यांच्या भाडोत्री सैनिकांनी धैर्यवान आणि निःस्वार्थी भूमिका बजावली; पण तोपर्यंत जे नुकसान व्हायचे होते ते झाले होते. तेव्हापासून वॅगनर गट रशियन सैन्य अकार्यक्षम असल्याची आणि युद्ध जिंकण्याची क्षमता त्यांच्यात नसल्याची टीका करत आहे.

हे मतभेद इतके उघड झाले आहेत की, त्यामुळे रशिया-युक्रेन संघर्षाचा मार्ग बदलू शकतो. यामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. एक म्हणजे रशिया युक्रेनमध्ये लढण्यासाठी भाडोत्री गटांचा वापर करत आहे. दुसरे म्हणजे असे सैन्य पुरवणारा वॅगनर गट आणि रशियन लष्करी अधिकारी यांच्यात मतभेद आहेत. युद्धात वॅगनर गट रशियाच्या वतीने लढत आहे, यावरून हा संघर्ष कोणत्या मार्गाने जाईल हे दिसते. काही तज्ज्ञ असेही म्हणत आहेत की, जर वॅगनर गटाने माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर रशिया युक्रेनमध्ये पूर्णपणे पराभूत होऊ शकतो.

वॅगनर गट ही एक खासगी लष्करी कंपनी आहे; पण तिच्या कार्याच्या व्याप्तीबद्दल स्पष्टता नाही. अनेक विश्लेषकांच्या मते वॅगनर गट हा संरक्षण प्रशिक्षण, राजकीय आणि लष्करी सल्ला, गुप्त माहिती पुरवतो. तसेच लढाऊ कारवाईही घडवून आणतो. या गटात माजी सैनिक, लष्करी कर्मचारी आणि तुरुंगातून सुटलेल्या दोषींची भरती केली जाते. अमेरिकन नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या मते वॅगनर गटाने युक्रेनमध्ये तैनात केलेल्या सैन्यांपैकी ८० टक्के हे तुरुंगातून सोडवून आणलेले कैदी आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी वॅगनर गटाकडे फक्त पाच हजार लढाऊ सैनिक होते, असे सांगितले जाते. हे गट संघर्ष निर्माण करतात, चुकीची माहिती पसरवतात, अस्थिरता निर्माण करतात आणि अनधिकृत युद्धे करतात. त्यामुळे एकाधिकारशहांना यातील आपला सहभाग नाकारून फायदे मिळवता येतात.

यातील अनेक जण रशियाच्या रेजिमेंट आणि विशेष दलातील अनुभवी माजी सैनिक आहेत. रशियात भाडोत्री सैन्य जमा करणे बेकायदेशीर असले, तरी वॅगनर गटाची २०२२ मध्ये स्थापना करण्यात आली. सेंट पीटर्सबर्गमध्ये नवीन मुख्यालय उघडण्यात आले. रशियन शहरांमध्ये या गटात भरतीच्या मोठमोठ्या जाहिराती करण्यात आल्या. माध्यमांनी याला देशभक्तीपर संस्था म्हटले. रशियाने २०१४ मध्ये क्रिमियावर कब्जा केला आणि रशियन समर्थक फुटीरतावाद्यांनी डोन्बास प्रदेशातील डोनेत्सक आणि लुहान्स्कचा मोठा भाग ताब्यात घेतला तेव्हा वॅगनर हे नाव पहिल्यांदा ऐकण्यात आले. अनेक अहवालात असे सांगण्यात आले आहे की, रशियन भाषिक सैनिकांनी या प्रदेशात प्रवेश केला; पण त्यांनी रशियन लष्कराचा गणवेश घातलेला नव्हता. पण, अशा प्रकारच्या भाडोत्री सैन्याशी रशियाने त्यावेळी आपले संबंध नाकारले.

अनेक वर्षांपासून वॅगनर गटावर संशोधन करणाऱ्या न्यू अमेरिका येथील ‘फ्युचर फ्रंटलाइन्स’च्या तज्ज्ञांच्या मते वॅगनर गट अनेक कारवायांत सामील आहे. न्यू रशिया तयार करू पाहणाऱ्या फुटीरतावाद्यांना लगाम घालणे, त्यांना संपवणे अशा कारवाया हा गट करतो. त्यांच्याकडून सहजच मानवी हक्कांचे उल्लंघन केले जाते. एकाधिकारशहाला फायदा मिळवून देण्यासाठी हा गट कार्यरत असल्याचे सांगितले जाते. अर्थात ही एकाधिकारशाही राजवट म्हणजे कथितरीत्या पुतीन यांचा रशिया. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार युक्रेनवर कारवाई करण्यासाठी ५० हजारांपेक्षा जास्त वॅगनरचे भाडोत्री सैनिक उतरवण्यात आले आहेत. पण, वॅगनरचे नाव येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सीरिया, माली, व्हेनेझुएला, मध्य आफ्रिकन रिपब्लिक या देशातसुद्धा हा गट कार्यरत असल्याचे सांगितले जाते. फक्त युद्धापुरतीच त्यांची मोडस ऑपरेंडी मर्यादित नाही.

यूएसएसआरचे विघटन होत असताना बारा वर्षे तुरुंगवास भोगणारा येवगेनी प्रिगोझिन वॅगनरचा संस्थापक असल्याचा दावा केला जातो. आश्चर्य म्हणजे कारागृहातून सुटल्यानंतर त्याने रेस्टॉरंट सुरू केले. या रेस्टॉरंटमधून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना सेवा दिली जाते. ही संस्था पुतीन यांच्या आदेशानेच चालवली जाते, असाही आरोप केला जातो. प्रिगोझिन यांना पुतीन यांचा शेफ असेही म्हटले जाते. प्रोगोझिन यांच्यानंतर घेतले जाणारे महत्त्वाचे नाव म्हणजे दिमित्री उत्कीन. दिमित्री हे रशियन मिलिट्री इंटेलिजिन्स जीआरयूच्या स्पेशल फोर्सचे माजी कमांडर आहेत; पण कोणीही हे निश्चितपणे सांगत नाही की वॅगनर गटाचा संस्थापक कोण आहे. पुतीन यांची इच्छा नसती, तर हा गट अस्तित्वातच आला नसता, असेही म्हटले जाते.

फेब्रुवारी २०१८ मध्ये पूर्व सीरियाच्या देर अल झोर प्रदेशात कुर्दिश सैन्यासोबत तैनात असणाऱ्या अमेरिकन सैन्यावर पाचशे सरकार समर्थक सैन्याकडून हल्ला झाला होता. या हल्ल्यात रशियन निर्मित लष्करी उपकरणांचा वापर करण्यात आला होता. यात रशियन सैनिकांचा सहभाग नव्हता, असे सांगत रशियाने या प्रकरणात हात वर केले; पण नंतर यात काही रशियन सैनिक ठार झाल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले. हा हल्ला वॅगनर गटाकडून झाल्याचे अमेरिकेचे मत आहे.

हे लक्षात घेतले पाहिजे, की २०१५ मध्ये सीरियाचे नेते बशर अल असद यांच्याकडील सत्ता बंडखोर आणि विरोधकांकडे जात होती, तेव्हा रशियाने बशर यांना पाठिंबा दिला होता. पण, त्यावेळी रशियाने हेही स्पष्ट केले होते, की आम्ही असद यांना कोणतीही लष्करी मदत करणार नाही. पण, लवकरच वॅगनर गटाच्या कारवाया सुरू झाल्या आणि असद यांना हवाई शक्ती, इंटेलिजन्स आणि इतर गोष्टी पुरवण्यात आल्या. तसेच, जोपर्यंत या कारवाईत रशियाच्या अधिकृत सैन्याऐवजी वॅगनर गट कार्यरत आहे, तोपर्यंत रशिया आपले हात स्वच्छ ठेवू शकतो. वॅगनर गटाला त्यांचा मोबदला डीएन गॅस फील्डच्या रूपात मिळतो, ज्याद्वारे ते स्वयंपूर्ण राहू शकतात, असाही आरोप केला जातो.

वॅगनरचा प्रभाव केवळ सीरियापुरताच मर्यादित नाही. तो बाहेर विशेषतः आफ्रिकेपर्यंत पोहोचलेला आहे. रशियाची खासगी लष्करी कंपनी आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेत कार्यरत आहे, असे सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या २०२१ च्या अहवालात म्हटले आहे. लीबिया, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, सुदान आणि माली येथे वॅगनरची प्रभावी भूमिका राहिली आहे, असे सांगितले जाते.

वॅगनर गटाबद्दलची रोचक गोष्ट ही आहे की, हा गट स्वयंनिधीवर अवलंबून असणाऱ्या एका व्यवसायात विकसित होत आहे. गेल्या काही वर्षांत हा गट फक्त रशियन लष्करासाठी काम करणारा या ओळखीपासून दूर जात आहे. आता हा गट जिथे शासनव्यवस्था कमकुवत आहे आणि भरपूर संसाधने आहेत, अशा प्रदेशांना लक्ष्य करत आहे. उदाहरणार्थ जिथे तेल, कोळसा, रत्ने किंवा इतर नैसर्गिक संसाधने आहेत; पण त्यांच्या सुरक्षेची हमी नाही, असे प्रदेश. ते तेथील संसाधनांमध्ये काही टक्केवारी मिळवतात किंवा काही खाणी वा संसाधनावर पूर्ण नियंत्रण मिळवतात.

रशियाला महत्त्वाची संसाधने हवी आहेत. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकातील हिरे आणि सोने किंवा लीबियातील तेल यांसारख्या किफायतशीर व्यवहारांसाठी ते वॅगनरवर अवलंबून आहेत. रशिया या संसाधनांचा वापर करू शकतो. मॉस्को यातून खनिज संपत्ती मिळवतोच; पण राज्ये काबीज करण्यासाठीही याचा उपयोग होतो. या राज्यांचे एकाधिकारशहा रशियाचे ग्राहक बनतात. आपल्या राज्याची संसाधने वापरण्याऐवजी वॅगनरचा वापर करणे हे रशियासाठी अधिक किफायतशीर आहे. खनिज संसाधनांचे व्यवहार केल्याने वॅगनरसारख्या लष्करी कंपन्या स्वयंपूर्ण होण्यात मदत होते.

रशियाकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती नाही. त्यामुळे आपण जगातील एक महान शक्ती आहोत, असा आभास निर्माण करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. त्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. ही पद्धत देशपरत्वे थोडीशी बदलते. पण, शोषणाची पद्धत सर्वत्र समानच असते. दुसरे म्हणजे विविध प्रदेशातील संघर्ष जितका जास्त चिघळत राहील, वॅगनरचा उत्पन्नाचा स्रोत सुरू राहील आणि तेथील खनिज संपत्तीचा ताबाही त्यांना मिळत राहील. त्यामुळे वॅगनर जिथे जिथे जातो, तिथे अस्थिरता कायम राहते.

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे भाडोत्री सैनिक मानवी हक्कांचे उल्लंघन करतात. वॅगनर गटाच्या मानवी हक्क उल्लंघनाचे अनेक अहवाल आणि चित्रफिती आहेत. एका २०१७च्या चित्रफितीत तर रशियन भाषिक वॅगनर सैनिक सीरियन नागरिकाला मारहाण करताना आणि शिरच्छेद करताना दिसत आहेत. लीबियातील बेकायदेशीर भूसुरुंग आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधील वॅगनरच्या छळाच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञांच्या मते माली येथील मौरा प्रदेशातील बंडखोरी मोडून काढण्यासाठी वॅगनर गटाने लोकांना सामूहिक फाशी दिली होती. अनेक तज्ज्ञ असे सांगतात की, हे मारले गेलेले लोक बंडखोर नव्हते, तर सामान्य नागरिक होते.

आता खासगी लष्करी कंपन्या किंवा भाडोत्री सैनिक हे युद्धगुन्हे आणि मानवी हक्काचे उल्लंघन याबाबतीत आंतरराष्ट्रीय कायद्याने बांधील आहेत; परंतु त्यांना जबाबदार ठरवणे अत्यंत कठीण आहे. वॅगनरचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर या गटांचा कारभार पारदर्शी नसतो. ज्या देशात न्याय मागण्यासाठी जायचे ते वॅगनरचे ग्राहक असतात. हे गट कोठून आले हे शोधणे कठीण असते, कारण यांची नोंदणी नसते. (वॅगनरची रशियात नोंद नाही). त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजवटी या एकाधिकारशाही आहेत. त्यामुळे तेथून काहीच माहिती मिळत नाही. विविध अहवालांनुसार वॅगनरने आफ्रिकत वीसपेक्षा जास्त करार केले आहेत. सध्या हा गट पुतीन यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे; पण त्यांचा जगभरातील वाढता प्रभाव पाहता आणि त्यांची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल पाहता ते पूर्णतः स्वतंत्र होऊन जगात आणखी गदारोळ माजवणार नाहीत, असे म्हणता येणार नाही.

युद्ध आणि संघर्ष हा काही नवीन व्यवसाय नाही. भूतकाळात अनेक प्रदेशात संघर्ष पेटवून आणि त्यात हस्तक्षेप करून अमेरिकेलाही मोठा फायदा झाल्याचे सांगितले जाते. संयुक्त राष्ट्राने २००७ मध्ये दोन वर्षांच्या अभ्यासानंतर प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की खासगी कंत्राटदार लष्करी कारवाया पार पाडतात. इराकमधील ब्लॅकवॉटरसारख्या कंत्राटदाराचा वापर करणे ही भाडोत्री कार्यपद्धतीच आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग आहे, असे या अहवालात सांगण्यात आले.

युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडमसह बहुतेक देशांनी भाडोत्री सैनिकांच्या वापरावर बंदी घालणाऱ्या १९८९च्या युनायटेड नेशन्स भाडोत्री करारावर स्वाक्षरी केली नाही. संयुक्त राष्ट्रसंघातील यूएस मिशनच्या प्रवक्त्याने ब्लॅकवॉटर ही भाडोत्री संघटना असल्याचे नाकारले होते. पण, वस्तुस्थिती ही आहे की वॅगनर आणि ब्लॅकवॉटरसारख्या कंपन्या हळूहळू अधिक शक्तिशाली होत आहेत. या धंद्याला रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनीमध्ये भाडोत्री सैनिकांच्या वापराविरुद्ध काही कायदे आहेत; परंतु अशा पद्धतींना रोखण्यासाठी स्पष्टता नाही. त्यामुळे या गटांचा उदय रोखायचा कसा, हा प्रश्न आहे.

युक्रेनमध्ये वॅगनरच्या उपस्थितीने या संघर्षाचे स्वरूप बदलले आहे. बाखमुटमध्ये रशिया जवळजवळ विजयाच्या जवळ होता तिथे त्यांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. वॅगनर गट नसता, तर कदाचित रशियन सैन्याने हा प्रदेश आधीच जिंकला असता. भाडोत्री सैनिकांचा वापर रशियाने त्यांचा विविध प्रदेशांवर प्रभाव पाडण्यासाठी केला आहे. हाच प्रकार पूर्वी अमेरिका आणि ब्लॅकवॉटरने केला होता. पुतीन आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी काय करू शकतात, हे आपल्याला यातून दिसते. पण, त्यांनी एक असा राक्षस उभा केला आहे जो यापुढे त्यांनाही आवरता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT