jerusalem city sakal
सप्तरंग

द होली लँड!

एकेश्वरवादाचं उगमस्थान आणि ‘द होली लँड ऑफ द वर्ल्ड’ या उपाध्यांनी ओळखलं जाणारं शहर म्हणजे जेरुसलेम.

सकाळ वृत्तसेवा

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

एकेश्वरवादाचं उगमस्थान आणि ‘द होली लँड ऑफ द वर्ल्ड’ या उपाध्यांनी ओळखलं जाणारं शहर म्हणजे जेरुसलेम. तब्बल चार हजार वर्षांचा इतिहास लाभलेलं हे शहर म्हणजे, जगातील सर्वांत जुनी राजधानी आहे. भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीमुळे हे शहर कितीही वादग्रस्त असलं, तरीसुद्धा जगातील सर्वांत जास्त पर्यटक भेट देणाऱ्या शहरांपैकी हे एक आहे. पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागांत, तसंच दोन देशांमध्ये विभागलं गेलेलं कदाचित हे जगातील एकमेव शहर असावं.

जेरुसलेमला भेट देण्यासाठी इस्राईलचा व्हिसा आपल्याकडं असणं गरजेचं आहे. व्हिसा मिळण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी सोपी असून, यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाइन भरावा लागतो. हा फॉर्म व प्रवासाच्या तपशीलासह विमानाची तिकिटं, कव्हरिंग लेटर व बँक स्टेटमेंट या गोष्टी इस्राईलच्या कौन्सुलेटकडं (मुंबई, दिल्ली, बंगळूर) सबमिट केल्यानंतर चार ते पाच दिवसांत व्हिसा मिळतो.

भारतातून इस्राईलची आर्थिक राजधानी असणाऱ्या तेल अविवला थेट फ्लाइट्स आहेत. देशात आपल्याला नेमका किती दिवस मुक्काम करता येईल, याचा निर्णय येथील बॉर्डर पोलिस घेतात. शेजारी जॉर्डन आणि इजिप्त हे देश असल्यानं प्रवासाचं नियोजन करताना हे दोन देशसुद्धा विचारात घेतले जाऊ शकतात.

शेकेल हे इथलं चलन असून, १ शेकेल म्हणजे साधारणतः २१ रुपये होतात. जेरुसलेम शहराचे तीन मुख्य भाग आहेत, एक म्हणजे पश्चिम जेरुसलेम ज्यावर इस्राईल देशाचा ताबा आहे; आणि हेच त्या देशाच्या राजधानीचं शहरसुद्धा आहे. तर पूर्व जेरुसलेम हे पॅलेस्टाईनची राजधानी असून, इथं पॅलेस्टिनी लोकांचा ताबा आहे.

या दोन्हीच्या मध्यभागी ओल्ड सिटी हा भाग असून याचं नियंत्रण सध्या इस्राईली बॉर्डर पोलिसांकडे आहे. यहुदी, ख्रिश्चन, अरब, आर्मेनियन असे विविध प्रकारचे लोक या प्राचीन शहरात राहतात. गमतीची गोष्ट म्हणजे, जगातील सर्वांत जुन्या असणाऱ्या या शहरात स्थलांतरित नागरिकांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्रातूनसुद्धा अलिबाग, मुंबई इथून बेने इस्राईली व बगदादी ज्यू या नावानं ओळखले जाणारे ज्यू लोक मागच्या काळात इस्राईलमध्ये जाऊन राहिले. त्यामुळे ज्यूंची मातृभाषा असणारी ‘हिब्रू’ इथल्या कमी लोकांना बोलता येते. स्थलांतरितांच्या भाषा म्हणजेच, काही प्रमाणात अरबी, पोलिश, जर्मन यांसह नगण्य प्रमाणात का होईना; पण मराठीसुद्धा इथं बोलतात. स्थलांतरित मराठी ज्यू लोकांनी स्थापन केलेलं महाराष्ट्र मंडळसुद्धा इथं आहे.

इथल्या खाद्यसंस्कृतीवर विविध देशांच्या खाद्यसंस्कृतीचा हजारो वर्षांचा प्रभाव असल्यानं, स्थानिक इस्राईली आणि पॅलेस्टिनी पदार्थांव्यतिरिक्त तुर्की, अरबी, इराणी, आर्मेनियन पदार्थसुद्धा इथल्या खाद्यसंस्कृतीत आहेत. हम्मस पिटा, कुनाफा, शावर्मा यांसारखे पश्चिम आशियातले पदार्थ तर इथं आहेतच, त्याबरोबरच बुरेका हा ब्रेडपॅटिस सारखा प्रकार, सबीच नावाचं सँडविच हे इस्राईली पदार्थसुद्धा इथं बघायला मिळतात. मुळात ज्यू लोक जगातल्या वेगवेगळ्या भागांतून येऊन इथं स्थायिक झाल्यानं; येताना त्यांनी आपली खाद्यसंस्कृतीसुद्धा इथं आणली.

आधी सांगितलं त्याप्रमाणं, शहराचे दोन भाग आहेत पूर्व आणि पश्चिम; पण या दोन्हींपेक्षा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे, मध्यभागी असलेला ‘ओल्ड सिटी’ परिसर. इथं जगात सर्वांत पवित्र समजलं जाणारं ‘टेम्पल माउंट’ आहे. त्याच्या लगतच मुस्लिम क्वार्टर किंवा अरब क्वार्टर आणि ज्यूइश क्वार्टर आहे.

नावाप्रमाणंच त्या-त्या धर्माचे लोक मोठ्या प्रमाणावर या भागात राहतात. यांच्या मागेच ख्रिश्चन क्वार्टर आणि आर्मेनियन क्वार्टर आहेत. या प्रत्येक क्वार्टरमध्ये शेकडो ऐतिहासिक इमारती आहेत. ज्यांना काही शतकांपासून ते काही हजार वर्षांपर्यंतचा इतिहास आहे.

ज्यू आणि ख्रिश्चनधर्मीयांसाठी जगातलं सर्वांत पवित्रस्थळ; तर मक्का आणि मदिनानंतर मुस्लिमांसाठी सर्वांत पवित्र स्थळ म्हणजे ‘टेम्पल माउंट’ परिसर आहे. या परिसराला ज्यू लोक ‘हर हाबायत’ नावानं; तर मुस्लिम लोक ‘हरम अल शरीफ’ नावानं ओळखतात. इथली सर्वांत जुनी वास्तू म्हणजे, ज्यू धर्माचे प्रेषित अब्राहम आणि त्यांचा मुलगा इसाक यांच्या स्मरणार्थ बांधलेलं मंदिर; जे इसवीसन पूर्व एक हजार वर्षं म्हणजेच, साधारणपणे तीन हजार वर्षं जुनं होतं.

हे मंदिर ‘बायबलोनियन’ लोकांकडून पाचशे वर्षांनी पाडण्यात आलं. त्याचजागी ज्यू लोकांनी आणखी एक मंदिर बांधलं; ज्याला ‘सेकंड टेम्पल’ असं नाव दिलं. हे मंदिर इसवीसन ७० मध्ये रोमन साम्राज्याकडून पाडण्यात आलं. सध्या या ठिकाणी मंदिर अस्तित्वात नसून, मंदिर ज्या एका प्रचंड प्लॅटफॉर्मवर बांधण्यात आलं, त्याची भिंत फक्त अस्तित्वात आहे.

या भिंतीलाच ‘वेस्टर्न वॉल’ असं म्हटलं जातं. ही ज्यू धर्मीयांची सर्वांत पवित्र वास्तू आहे. जगभरातील ज्यू धर्मीय या ‘वेस्टर्न वॉल’ला भेट देतात आणि या भिंतीसमोर उभं राहून अथवा भिंतीवर डोकं ठेऊन प्रार्थना करतात.

ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन जसे असतात, तसंच ऑर्थोडॉक्स ज्यू असतात. त्यांचे साधारणपणे १९ प्रकार आहेत. या राष्ट्राची निर्मिती जरी धर्मावर आधारित झाली असली; तरी बहुतांश लोक स्वतःला राष्ट्रप्रेमी सेक्युलर मानतात. इथले फक्त पंधरा टक्केच लोक धार्मिक आहेत. याच टेम्पल माउंट परिसरात ‘अल अक्सा मशीद’ आणि ‘द डोम ऑफ द रॉक’ या इमारती आहेत. इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबांनी हे शहर ताब्यात घेतल्यावर इथं ही इमारत बांधली.

टेम्पल माउंटपासून काहीशे मीटर अंतरावर ‘चर्च ऑफ होली सेपलकर’ आहे. जिथं येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आलं होतं. येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यासाठी जिथून नेलं, त्या मार्गाला ‘व्हाया डोलारोसा’ असं म्हणतात. हजारो भाविक या मार्गावरून येशूच्या आठवणीत हातात क्रॉस घेऊन ‘चर्च ऑफ होली सेपलकर’पर्यंत चालत जातात. इथंच येशूचं स्मृतिस्थळ असल्याचीही मान्यता आहे.

येशूच्या नंतर ३३५ वर्षांनी बायझेंटाईन सम्राट ‘कॉन्स्टंटिन द ग्रेट’ यानं या चर्चची उभारणी केली. त्यामुळे ख्रिश्चन धर्मातील सर्वांत पवित्र स्थळांपैकी हे ठिकाण आहे. हा संपूर्ण परिसर प्राचीन इमारतींनी वेढला आहे. इथं समोरच्या बाजूला ‘व्हर्जिन मेरी’ हिचं चर्च आणि स्मृतिस्थळ आहे.

ओल्ड सिटीचा सगळा परिसर चालतसुद्धा फिरता येतो. अनेक संस्थांकडून इथं ‘वॉकिंग टूर’चं आयोजन केलं जातं. जाफा गेटमार्गे आर्मेनियन क्वार्टरमध्ये प्रवेश करून इथल्या जुन्या इमारती पाहून पुढं मुस्लिम क्वार्टरमध्ये प्रवेश होतो. इथलं जुनं मार्केट आणि ‘वेस्टर्न वॉल टनेल’ आवर्जून बघण्यासारखं आहे. यानंतर ख्रिश्चन क्वार्टरमध्ये प्रवेश केल्यावर युरोपियन प्रभाव व वास्तुशैली असलेली अनेक स्मारकं इथं आहेत.

त्याबरोबरच तब्बल ४० पेक्षा जास्त चर्च इथं बघायला मिळतात. पुढील टप्प्यात ज्युइश क्वार्टरमध्ये तुलनेनं नवीन इमारती आहेत. इथल्या प्राचीन इमारती आणि सिनेगॉग यांची काहीशी पडझड झाल्यानं त्या पुन्हा नव्यानं बांधण्यात आल्या आहेत. ज्युइश क्वार्टरचा परिसर पाहून झाल्यावर सर्वांत महत्त्वाच्या टेम्पल माउंट परिसरात आपल्याला प्रवेश करता येतो.

जेरुसलेमपासून अवघ्या पाच किलोमीटरवर येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान बेथेलहॅम हे ठिकाण आहे. हे गाव पॅलेस्टाईनमध्ये असल्यानं काही सोपस्कार पार पाडून आपल्याला इथं पोहोचता येतं. येशूचा जन्म झाला ती गुहा आणि त्या गुहेवरचं ‘चर्च ऑफ नेटिव्हिटी’ चौथ्या शतकात बांधण्यात आलं आहे.

सध्याच्या स्थितीत या सगळ्या भागात प्रवास करणं योग्य ठरणार नाही. जोपर्यंत आपल्या भारताकडून सगळी परिस्थिती निवळल्याचं घोषित होत नाही व तशी ‘ट्रॅव्हल ॲडव्हायसरी’ येत नाही; तोपर्यंत तरी इथं प्रवास करणं टाळावं. भविष्यात मात्र प्राचीन स्मारकांचं संग्रहालय म्हणून आणि अनेक धर्मांचं उगमस्थान म्हणून या शहराला आवर्जून भेट द्यावी.

(लेखक जगभर भटकंती करत असतात. साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT