सप्तरंग

समुद्रसंपन्न फिलिपिन्स!

समुद्राशेजारी वसलेली छोटी टुमदार गावं आणि अफाट सुंदर समुद्रकिनारे तुम्हाला भुरळ घालत असतील; तर फिलिपिन्स हा देश निश्चितच तुमच्यासाठी आहे.

सकाळ वृत्तसेवा

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

समुद्राशेजारी वसलेली छोटी टुमदार गावं आणि अफाट सुंदर समुद्रकिनारे तुम्हाला भुरळ घालत असतील; तर फिलिपिन्स हा देश निश्चितच तुमच्यासाठी आहे. थायलंड, बाली या नेहमीच्या ठिकाणांपेक्षा किंचित आडबाजूला असल्यानं भारतीय पर्यटकांच्या काहीसा नजरेआड झालेला हा देश; पण काही अफलातून गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला फक्त फिलिपिन्समध्येच अनुभवता येतील.

तब्बल ७००० हूनही अधिक बेटांच्या द्वीपसमूहानं बनलेला हा देश आहे. विकसनशील देशांच्या यादीत असल्यानं प्रगती उत्तम आहे. राजधानीचं मनिला शहर जगातील सगळ्यांत गजबजलेल्या शहरांपैकी एक समजलं जातं. सर्वांत कष्टाळू म्हणून इथल्या लोकांची ओळख आहे. आधुनिक देशांत सर्वाधिक कष्टाची कामं करणाऱ्या आणि प्रामाणिक लोकांत फिलिपिनी लोकांचा समावेश होतो.

भारतीयांसाठी सर्वसाधारण ‘ई-व्हिसा’ अथवा ‘ऑन अरायव्हल व्हिसा’ची सोय अद्याप उपलब्ध नसल्यानं व्हिसा मिळवायला पुरेशी कागदपत्रं गोळा करून द्यावी लागतात. मात्र, यालासुद्धा एक सोपा पर्याय आहे; तो म्हणजे, भारतातून फिलिपिन्सला जाणाऱ्या शक्यतो सगळ्या फ्लाइट सिंगापूरमार्गे जातात. भारतीय नागरिकाकडे सिंगापूरचा व्हिसा असल्यास, त्याला फिलिपिन्सला ‘ऑन अरायव्हल व्हिसा’ मिळू शकतो.

त्यामुळे फिलिपिन्सची भटकंती सिंगापूरला जोडून करावी. ज्यामुळे कागदपत्रांचे अनेक सोपस्कार वाचतील. सिंगापूरचा व्हिसा मिळायला सोपा आहे; तसंच तो दोन वर्षांसाठी मिळतो. या काळात अनेकदा ये-जा करायला मुभा असते.

फिलिपिन्समध्ये पर्यटकांसाठी महत्त्वाची शहरं म्हणजे, राजधानी मनिला, दवाओ आणि सिबू शहर. या देशावर ३०० वर्षं स्पॅनिश लोकांचं राज्य होतं आणि नंतर काही दशकं अमेरिकन लोकांचं. त्यामुळे इथं लोकांना स्पॅनिश आणि इंग्रजी चांगली बोलता येते. पर्यटकांना येणारा भाषेचा मुख्य अडथळा यामुळे पार होतो. दहा दिवसांपासून ते चांगला एका महिन्यापर्यंतचा प्लॅन करून हा देश बघता येतो, इतकी विविधता इथं आहे.

मनिला, कोरोन, एल निडो, प्युअर्ते प्रिन्सेसा, सिबू, बोहोल, बोराके हे इथले मुख्य भाग आहेत. मनिला या राजधानीच्या शहरात दीड कोटी लोकं राहतात; त्यामुळे प्रचंड गजबजाट असलेलं हे शहर आहे. अनेक मध्ययुगीन स्पॅनिश कोलोनियल वास्तू, जसं की किल्ले, चर्च, पॅलेस इथं बघायला मिळतात.

तुम्ही सांतीआगो किल्ला, ऑगस्टिन चर्च, राष्ट्रीय संग्रहालय या वास्तू आवर्जून बघू शकता. इथलं शहरी जीवन बघण्यात फारसा रस नसल्यास सिंगापूरहून मनिलाला न जाता म्हणजे, एकदम उत्तरेला न जाता थेट जवळ असलेल्या सिबू द्वीपसमूहावर उतरून तिथून भटकंतीला सुरुवात करू शकता. फिलिपिन्सच्या ‘सिबू पॅसिफिक’ या एअरलाइनची उत्तम कनेक्टिव्हिटी इथं आहे.

सिबू विमानतळावर इथलं स्थानिक सिमकार्ड तुम्ही खरेदी करू शकता. शेजारील इंडोनेशियाप्रमाणंच फिलिपिन्सही बऱ्यापैकी स्वस्त देश आहे. ‘फिलिपिनी पेसो’ हे इथलं चलन असून, भारतीय दीड रुपया म्हणजे १ पेसो असा सरळ हिशेब आहे.

लांबवरच्या बेटांवर जाण्यासाठी स्थानिक एअरलाइन वाजवी दरात उपलब्ध आहेत; तर जवळच्या अंतरासाठी बोटी आहेत. सिबू, पालावानसारख्या मोठ्या बेटांवर फिरण्यासाठी अंतर्गत भागांत ‘जीपनी’ नावाची लांबकी मिनीबस इथं आहे; ज्यात ‘शेअरिंग’नं प्रवास करता येतो. शहरांतर्गत प्रवासासाठी आपल्या रिक्षासारख्या ट्रायसिकल इथं आहेत. गरज भासल्यास बाइकसुद्धा भाड्यानं घेऊ शकता; पण त्यासाठी आयडीपी (आंतरराष्ट्रीय चालक परवाना) असणं गरजेचं आहे.

बाडियान, ओस्लोब आणि मोअलबोल ही तीन ठिकाणं सिबूमधली पर्यटन केंद्रं आहेत. बाडियान इथं कॅनरिंग हा एक वेगळा प्रकार अनुभवता येतो. कॅनरिंग म्हणजे, पाण्याचे प्रवाह आणि जंगल पार करत मोठ्या धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास. यामध्ये अरुंद घळीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बांबूच्या तराफ्यावरून हा टप्पा पार करावा लागतो. थरारक अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांनी आवर्जून करायला हवा, असा हा प्रकार आहे.

मोअलबोल भागात अनेक स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रं आहेत; ज्यात तुम्ही तीन दिवसांत बेसिक कोर्स करू शकता. इथली ‘कोरल रीफ’ जगातली सगळ्यांत सुंदर म्हणून ओळखली जाते. लाखो सार्डिन माशांच्या झुंडीबरोबर डायव्हिंग करण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो.

इथून थोडे दक्षिणेकडे असलेल्या ओस्लोबमध्ये तर एकदम अफाट अशी गोष्ट करता येते; ती म्हणजे, जगातल्या सगळ्यांत मोठ्या जलचरांपैकी एक असणाऱ्या व्हेल शार्कबरोबर पोहता येतं. सुमारे ३२ फुटांपर्यंत लांब आणि २०० टन वजनी हा अजस्त्र मासा अगदी १०-१५ फुटांवरून पाहता येतो. या भागात १८० च्या आसपास व्हेल शार्क आहेत. व्हेल शार्क बघण्यासाठी इथल्या प्रशासकीय कार्यालयात जाऊन आगाऊ नावनोंदणी करणं आवश्यक आहे.

नोंदणी क्रमांक, दिवस आणि वेळ मिळाल्यानंतरच समुद्रात प्रवेश करता येतो. इथून बोटीनं तासभर अंतरावर बोहोल आहे. जगातल्या सगळ्यांत लहान प्रायमेट म्हणजे, सस्तन प्राणी टार्सियरचं हे घर आहे. जगभरातून पर्यटक या लहान मुलाप्रमाणं दिसणाऱ्या आणि प्रचंड लाजाळू असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्याला बघण्यासाठी येतात.

सिबूनंतर पुढं पालावान बेटावरील प्युअर्ते प्रिन्सेसा, एल निडो आणि पुढं कोरोन यांना भेट देता येते. पालावान बेटावरील प्युअर्ते प्रिन्सेसा हे सगळ्यांत मोठं शहर आहे; त्यामुळे इथं मुक्काम करून जवळची पर्यटनस्थळं बघता येतात. जवळच असलेल्या सबांग इथं एक नैसर्गिक आश्चर्य आहे; ते म्हणजे, जमिनीखालून वाहणारी नदी! या नदीबरोबर जवळपास आठ किलोमीटर लांबीचा प्रवास आपल्याला जमिनीखालून करता येतो. एखाद्या अतिविशाल, लांबलचक गुहेतून जाण्याचा हा अनुभव आहे. ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट’मध्येही याचा समावेश करण्यात आला आहे.

प्युअर्ते प्रिन्सेसापासून उत्तरेला असलेल्या ‘एल निडो’ला पुढचा मुक्काम हलवता येतो. हे परदेशी पर्यटकांनी कायम गजबजलेलं असं एकदम टुरिस्टिक ठिकाण आहे. इथल्या ‘आयलंड हॉपिंग टुर्स’ प्रसिद्ध आहेत. इथून आजूबाजूची लहान १०-१२ बेटं फिरता येतात. पालावानच्या पुढं बोटीनं दोन तासांवर कोरोन आहे. अप्रतिम वॉटर लगून, नितळ स्वच्छ पाणी हे इथलं वैशिष्ट्यं.

या सगळ्या भागांत समुद्र अतिशय उथळ असल्यानं इथल्या सुंदर ‘कोरल’चा समूह तयार होऊन, त्याचं समुद्रातलं ‘कोरल गार्डन’ तयार झालं आहे. इथं राहणारे बहुतांश पर्यटक हे किमान महिनाभरासाठी तरी येऊन फक्त इथंच राहतात. ‘एल निडो’बरोबरच कोरोनचीही ‘नाइटलाइफ’ अतिशय प्रसिद्ध आहे.

फिलिपिन्स गेल्या काही वर्षांपासून पर्यटनाकडे कटाक्षानं लक्ष देत असल्यानं, काही प्रयोग इथं केले जात आहेत. त्यातला एक म्हणजे, आपल्या परिवार किंवा मित्रांबरोबर वेळ घालवता यावा, या हेतूनं सगळं बेटच सध्या इथं भाड्यानं मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. इथलं पर्यटन मंत्रालय अथवा खासगी बेटांच्या मालकांशी संपर्क साधून याचं बुकिंग करता येतं. फिलिपिन्स फिरण्यासाठी आवर्जून बराच वेळ काढायला हवा; कारण, एखाद्या आठवड्यात इथली भटकंती नक्कीच पूर्ण होणार नाही. इथलं प्रत्येक ठिकाण वेगळा अनुभव देणारं आहे!

(लेखक जगभर भटकंती करत असतात. साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT