- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com
सध्या भटकंतीनिमित्त मी उझबेकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे एक प्रकारे ‘लाईव्ह ब्लॉग’ पद्धतीनंच मी हा लेख लिहीत आहे. जगभरातील पर्यटकांसाठी अगदी काही वर्षांपूर्वी हा देश खुला झाला. ‘खुला झाला’ या अर्थानं की, इथं येण्यासाठी थेट विमानसेवा, सोपा ई-व्हिसा इत्यादींच्या सोई झाल्या. देश अतिशय सुंदर असून या देशाची दहा ते बारा दिवस सहज भटकंती करता येते.
भारतातून दिल्लीतून थेट विमानानं उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं पोहोचता येतं. मुंबई-अबूधाबी-ताश्कंद हासुद्धा अतिशय स्वस्त पर्याय आहे. उझबेकिस्तानमध्ये आगमन झाल्या झाल्या सर्वप्रथम डोळ्यांत भरते ती इथली आधुनिक जीवनशैली.
इस्लामबहुल देश असूनसुद्धा सन १८६० ते १९९१ पर्यंत आधी रशियन साम्राज्य आणि नंतर रशियन महासंघाची सत्ता असल्यानं देशाचा चेहरामोहरा साहजिकच रशियन झालेला आहे. याचे अनेक चांगले-वाईट परिणाम देशावर झाले. उदाहरणार्थ : शिक्षण, आरोग्य, दळणवळणसेवा, प्रशासन. हे सगळं अतिशय उत्तम आहे; परंतु या देशाकडे जो प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा होता त्याची दरम्यानच्या काळात हेळसांड झाली.
त्याचा विसर इथल्या नागरिकांना या काळात पडत गेला. सन १९९१ मध्ये सोव्हिएत महासंघाचं विघटन झाल्यावर अनेक देशांनी आपली वेगळी चूल मांडली आणि स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं. त्यातलाच एक म्हणजे उझबेकिस्तान. देशाचे पहिले अध्यक्ष इस्लाम करिमोव्ह यांना इथं राष्ट्रपित्याचं स्थान आहे.
उझबेकिस्तानच्या भटकंतीची सुरुवात राजधानी ताश्कंदपासून करता येते. तिथून पुढं समरकंद, बुखारा, खिवा, नुकुस, अरल असा प्रवास करता येतो. वर उल्लेखिल्यानुसार इथली दळणवळणसेवा अतिशय उत्तम असून तितकीच स्वस्तसुद्धा आहे. बस-रेल्वे-विमानसेवा यांनी इथली प्रमुख शहरं एकमेकांशी जोडलेली आहेत. इथली रेल्वेसेवा अप्रतिम असून मी हायस्पीड अशा बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. ताशी २५०-२८० किलोमीटर वेगानं या हायस्पीड ट्रेन धावतात.
परिणामी, अंतर जास्त असूनसुद्धा अक्षरशः एक-दोन तासांतच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाता येतं. इथं येताना एक काळजी आवर्जून घ्यावी व ती म्हणजे, क्रेडिट कार्डवर किंवा डेबिट कार्डवर अवलंबून न राहता अमेरिकी डॉलर्समध्ये शक्यतो पैसे आणावेत. ते इथं स्थानिक चलनात रूपांतरित करून घेता येतात.
ई-व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर तीन दिवसांत इथला व्हिसा मिळतो. सिंगल एंट्री, डबल एंट्री आणि मल्टिपल एंट्री या प्रकारांत हा व्हिसा मिळवता येतो.
उझबेकिस्तानचे रशियाशी आणि आसपासच्या देशांशी अजूनही व्यापारीसंबंध आणि राजकीय संबंध दृढ असल्यानं अमेरिकेशी किंवा युरोपीय राष्ट्रांशी फारशी देवाणघेवाण नसते; त्यामुळे भाषेची अतिशय मोठी अडचण इथं मला जाणवली.
तुम्ही आशियातील कोणत्याही देशात गेलात तरी सर्वांनाच थोडंफार इंग्लिश येतं; त्यामुळे कसा ना कसा संवाद साधता येतोच; पण इथं मात्र गुगल ट्रान्सलेटवर किंवा हातवाऱ्यांवर सर्व संवाद अवलंबून असतो. अगदी विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनासुद्धा जेमतेमच इंग्लिश येतं.
रस्त्यावरील पाट्या, दिशादर्शक फलक, रेल्वे, मेट्रो इथल्या सूचना...असं सगळं काही रशियन किंवा स्थानिक उझबेक भाषेत आहे. उझबेक भाषा म्हणजे तुर्की, रशियन आणि पर्शियन भाषांचं संमिश्रण आहे. बहुतांश ग्रामीण भागांत उझबेक भाषा बोलली जाते, तर शहरी भागात रशियन भाषेचं प्राबल्य आहे.
राजधानीचं शहर असलेलं ताश्कंद हे सुनियोजितपणे वसवण्यात आलेलं असून ठिकठिकाणी प्रचंड मोठ्या रशियन इमारती बघायला मिळतात. शहरात मेट्रोसेवा असून मेट्रोद्वारे शहराच्या कोणत्याही भागात सहज पोहोचता येतं. कुठूनही कुठं जायचं असल्यास तिकीट फक्त चौदाशे सोम (१० रुपये) इतकं आहे.
इथली अंडरग्राउंड मेट्रोस्थानकं अतिशय सुंदर असून प्रत्येक स्थानक तिथल्या कलाकृतींसाठी आवर्जून बघायलाच हवं असं आहे. ताश्कंदमध्ये काही नावाजलेली मेडिकल कॉलेजेस असून इथं शिक्षण घेणं तुलनेनं स्वस्त असल्यानं हजारो भारतीय विद्यार्थी इथं एमबीबीएससाठी येत असतात.
इतर सोव्हिएत शहरांप्रमाणे या शहरातसुद्धा भव्य कारंजी, विस्तीर्ण उद्यानं, मोठमोठे चौक बघायला मिळतात. इथल्या सेंट्रल पार्कजवळ भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे. ‘ताश्कंद करारा’दरम्यान त्यांचं इथं निधन झालं होतं.
जगातील सर्वात जुन्या मसाल्यांच्या बाजारांपैकी एक असलेला ‘चोर्सू बाजार’ हे या शहराचं मुख्य आकर्षण आहे. सिल्क रूट, म्हणजेच खुश्कीच्या मार्गावर असलेला प्रमुख व्यापारीथांबा म्हणजे चोर्सू बाजार होता. मंगोलांच्या आक्रमणानंतर हा मूळ बाजार जमीनदोस्त झाला आणि नंतरच्या काळात पुन्हा उभारला गेला.
भारतीय इतिहासाचा उझबेकिस्तानच्या इतिहासाशी अतिशय जवळचा संबंध आहे. इथल्या फरगाणा प्रांताचा युवराज बाबर हा पुढं मोगलसाम्राज्याचा संस्थापक झाला. बाबरासह मोगल वंशाचं मूळ उझबेकिस्तानचंच आहे. बाबराचा पूर्वज तैमूरलंग याला उझबेकिस्तानचा राष्ट्रनिर्माता म्हणून या देशाच्या स्थापनेच्या वेळी घोषित केलं गेलं.
पहिले राष्ट्राध्यक्ष इस्लाम करिमोव्ह यांनी देशातील शक्य तितक्या रशियन खाणाखुणा पुसण्याचा प्रयत्न केला. चंगेजखानाचा वंशज आणि तिमुरीद साम्राज्याचा संस्थापक तैमूरलंग याला इथं ‘अमीर तैमूर’ असं म्हटलं जातं. देशातील सर्व शहरांत याच्या नावानं रस्ते आहेत, मोठमोठे पुतळे आहेत.
ताश्कंद शहराचा प्रमुख भाग हा ‘अमीर तैमूर ॲव्हेन्यू’ या नावानंच ओळखला जातो, तसंच प्रमुख चौक हा ‘अमीर तैमूर स्क्वेअर’ म्हणून ओळखला जातो. राष्ट्रनिर्माता आणि राष्ट्रनेता ही तैमूरलंगाची प्रतिमा जनमानसात ठसवण्याचा प्रयत्न असल्याचं वारंवार दिसून येतं.
एक गोष्ट इथं आवर्जून सांगावीशी वाटते की, भारतीयांबद्दल इथल्या लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आणि आदर आहे. भारतीय संस्कृतीबद्दल लोकांना आस्था आहे. भाषा समजत नसली तरी लोकांनी आम्हाला ठिकठिकाणी अडवून, त्यांना भारत किती आवडतो, भारतीय चित्रपट किती आवडतात हे आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी आमच्याबरोबर फोटो काढून घेतले.
इथल्या स्थानिकांशी संवादाचा समान दुवा म्हणजे शाहरुख खान. स्थानिकांना शाहरुख खानबद्दल प्रचंड आकर्षण असून लोक त्याच्या चित्रपटांनी अक्षरशः वेडावून जातात. घरांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी, विमानतळ, रेल्वेस्थानकं इथल्या टीव्हीवर भारतीय चित्रपट लावलेले दिसतात.
खानपानाचे काही प्रकार उझबेकिस्तानात आणि भारतात एकसमान आहेत. त्यांपैकी एक म्हणजे पुलाव आणि दुसरा म्हणजे सामोसा. दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात इथं पुलाव खाल्ला जातो तर सकाळच्या न्याहारीसाठी सामोसा आणि नान असतं.
उझबेकिस्तानच्या संस्कृतीची खरी आणि नेमकी ओळख करून घ्यायची तर समरकंद आणि बुखारा या शहरांना आवर्जून भेट द्यायला हवी. ताश्कंद बघण्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत. राजधानीचं हे शहर पाश्चात्त्य शैलीचं असल्यानं इथं ऐतिहासिक वास्तू मोठ्या प्रमाणावर नाहीत.
समरकंद इथल्या ऐतिहासिक वास्तू, स्मारकं ही इसवीसनाच्या आठव्या ते सतराव्या शतकांदरम्यानची आहेत, तर बुखारा शहरातील काही ऐतिहासिक वास्तू थेट दोन हजार वर्षं जुन्या आहेत.
युरोप आणि आशिया हे खंड एकमेकांशी व्यापारीदृष्ट्या जोडण्यात उझबेकिस्तानमधील समरकंद आणि बुखारा या शहरांचा सिंहाचा वाटा आहे. ताश्कंदची भटकंती पूर्ण करून मी सध्या समरकंद आणि बुखाराच्या सफरीवर आहे. पुढील लेखात या दोन्ही ठिकाणांची आणि इथल्या महत्त्वाच्या स्थळांविषयी लिहीन.
(लेखक जगभर भटकंती करतात. साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.