माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी... sakal
सप्तरंग

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी...

घरातलं कामधाम उरकून लगबगीनं स्वत:चं आवरता सावरताना तिला माहेरची सय आली. ‘वाटेनं माहेराच्या धावत मन जातं’ असं म्हणत ती माहेरच्या स्मृतीत रमली आहे.

सकाळ वृत्तसेवा

-डॅा. कैलास कमोद

kailaskamod1@gmail.com

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत विवाहित स्त्री वयानं कितीही मोठी झाली, तरी सासरी नांदत असताना तिला माहेरची ओढ कायमच असते. अधूनमधून तिला माहेरी जावंसं वाटतं किंवा माहेरच्या आठवणी तरी येत असतात. त्यामुळेच मराठी साहित्यात ‘रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा’ अशा प्रकारची गाणी येत असतात. ‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात’ कवी कृ. ब. निकुंभ यांची माहेर ही कविता किंवा तशीच वामनदादा कर्डक यांची ‘नदीच्या पल्याड बाई, झाडी लई दाट, तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट’ ही व अशा अनेक कविता सासुरवाशीण स्त्रियांचं मनोगत व्यक्त करतात.

अशीच एका शेतकरी कुटुंबातली ही सासुरवाशीण. घरातली पुरुषमाणसं शेतावर कामाला बाहेर पडली. घरातलं कामधाम उरकून लगबगीनं स्वत:चं आवरता सावरताना तिला माहेरची सय आली. ‘वाटेनं माहेराच्या धावत मन जातं’ असं म्हणत ती माहेरच्या स्मृतीत रमली आहे. थोरला भाऊ आता मोट हाकून विहिरीतलं पाणी उपसत असेल. त्या पाण्याला बांध घालून वावराला बारी द्यायचं काम वहिनी करीत असेल. असा मनातला विचार ती गात आहे.

दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी

पाजिते रान सारं, मायेची वयनी

हसतं डुलतं, मोत्याचं पीक येतं

गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत

माझा गोजिरवाणा भाचा शिरपा अन् लहानगी भाची हौसा बाहुला-बाहुलीचं लगीन खेळत असतील. भाऊ माझा सावळा अन् वयनी माझी साजरी सुंदर. अशी माहेरच्या वाटेची आस तिला लागली आहे.

लाडकी लेक, राजाचा ल्योक

लगीन माझ्या चिमनीचं

सावळा बंधूराया, साजिरी वयनीबाई

गोजिरी शिरपा-हंसा माहेरी माज्या हाई

वाटंनं म्हयेराच्या धावत मन जातं

गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत

गडनी, सजनी यांचंही स्मरण होऊन जणू त्यांना ती आपलं मनोगत सांगते आहे.

गडनी सजनी गडनी सजनी गडनी ग

राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं

नजर काढू कशी जिवाचं लिंबलोण

मायेला पूर येतो, पारुचं मन गातं

गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत

गीतकार योगेश यांनी महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल गीतरचना करीत शेतकरी कुटुंबातल्या सासुरवाशीण नवोदित विवाहितेचं मनोगत कागदावर आणलं आहे. गुलाब, जाई, जुई, मोगरा अशी फुलांची नावं आणि शिरपा-हौसा अशी त्या काळातली शेतकऱ्यांच्या मुलांची नावं अशा शब्दरचनमुळे गाण्याला मराठी मातीचा सुगंध येतो. वयनी (वहिनी), गडनी (जात्यावर जोडीला बसलेली सखी), लिंबलोण (दृष्ट उतारणे) अशा शब्दांतून बोली मराठी भाषेचा गोडवा जाणवतो. भालजी पेंढारकर स्वत:च योगेश या नावानं गीतरचना करीत असत. त्यांची ही रचना. हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर फुलांचा मळा तरळू लागतो. वाऱ्याबरोबर डोलणारे फुलांचे ताटवे फेर धरतात.

A host of golden daffodils

Beside the lake and beneath the trees

Fluttering and dancing in the breeze

विल्यम वर्डस्वर्थच्या ‘डॅफोडील्स’ या फुलांच्या कवितेचं पण इथे स्मरण होतं. डॅफोडील्सच्या फुलांचे ताटवे डोलताना बघून इंग्लंडमधल्या कवी वर्डस्वर्थला जी आनंदाची भावना निर्माण झाली, अगदी तशीच आनंदाची भावना गुलाब, जाई, जुई, मोगऱ्याचे ताटवे पाहून महाराष्ट्रातल्या एका खेडूत बाईच्या मनात येते. निसर्ग सान्निध्यातील आनंदाची भावना कशी वैश्‍विक असते, त्याचं हे उत्तम उदाहरण. गाण्यांचं संगीत जणू आनंदगान असावे अशी चाल राग दुर्गामध्ये बांधलेली आहे. लोकसंगीताचा ठेका पकडून ढोलक आणि पिपाणीचा मस्त वापर संगीतकाराने केलेला आहे. सिनेमाला प्रथमच संगीत देताना संगीतकार आनंदघन हे आपलं नाव सार्थ ठरवलं लताबाईंनी. त्यांचा ग्रामीण लोकजीवनाचा आणि संगीताचा अभ्यास त्यातून दिसून येतो.

ग्रामीण मराठी शब्दांचे मनावर कोरले जाणारे ठसठशीत उच्चार हे लताबाईंचं वैशिष्ट्य त्यांनी फार छानपणे दाखवलं आहे. दंडावर रुतणारी खणाची चोळी, काष्ट्याचं नऊवारी खडीचं लुगडं, डोईवरून पदर सावरण्याची ढब, कपाळावर ठसठशीत आडव्या कुंकवाची चिरी, गळ्यात दोन मण्यांची काळी पोत, मानेवर केसांचा बुचडा, मनगटावर रुळणारा हिरवा चुडा असा माळ्याच्या संस्कृतीचा थाट ल्यायलेल्या जयश्री गडकर माळीणबाई शोभतात खऱ्या. खिडकीशेजारच्या भिंतीवर मांडणीत भांडीकुंडी, बाजूला शिवाजीची तस्बीर, शेजारीच घडवंचीवर घडी घालून ठेवलेली अथरूणं-पांघरूणं, छताला लटकणारा विजेचा दिवा, विठ्ठलाच्या तस्बिरीम्होरंच्या फळीवर निरांजन अन् घंटी, मोरीच्या भिंतीवर पाण्याचा माठ आणि खिडकीत आरसा ठेवून चाललेला साजशृंगार, असं सगळं नेपथ्य शंभर नंबरी.

भालजी पेंढारकरच असणार ते. बालगोपाळांनी शेतात बाहुलीचं लगीन लावून त्यांची वरात काढल्याचे दृश्य मजेदार. डोईवरचा पटका सावरीत मळ्यात राबणारा भाऊ आणि ‘दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोठं पानी, पाजिते रान सारं मायेची वयनी’ या पंक्तीला एक पाय बांधावर ठेवत, एका हातात फावडं घेऊन दुसऱ्या हातानं केस सावरत मळ्यात पाण्याची बारी देणाऱ्या कष्टाळू सुलोचनाबाईंना पाहून मन प्रसन्न होते. ‘सावळा भाऊराया...’ या पंक्तीला ती सासुरवाशीण माहेरी जाताना आपल्या भावासाठी पिशवीत नारळ टाकते. दिग्दर्शनातले बारकावे असे हेरले आहेत की दाद द्यावीशी वाटते. शेतात डोलणारं पीक पाहून मन भरून येतं. ‌१९९० पर्यंत महाराष्ट्रात दिसणारी, पण आता लोप पावलेली ग्रामीण संस्कृती तपशीलवार पाहायला, ऐकायला मिळते या गाण्यात.

जसा एखाद्या भाषेला ‘अभिजात’ दर्जा दिला जातो, तसाच दर्जा या नितांतसुंदर, श्रवणीय, अगदी मराठी मातीच्या सुवास देणाऱ्या आणि मराठी संस्कृती अतिशय सुंदर, नितळ आणि तंतोतंत दाखवणाऱ्या गाण्याला, त्यातल्या दृश्यमानाकरिता, संगीताकरिता, शब्दांकरिता आणि स्वराकरिता सन्मान देऊन याला महाराष्ट्र गीत म्हणावं इतकं सुंदर गीत आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्तकर्ते दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा हा चित्रपट बलुतेदारीतल्या सामान्य, पण कणखर प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखांवर आधारित होता. त्याचं नावसुद्धा ‘साधी माणसं’ हेच होतं. १९६५ च्या चित्रपटातील या गाण्याने मला नोस्टाल्जिक करून पार मागे भूतकाळात नेऊन सोडलं. आमचा मळा आठवला.

गीत : माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं

गीतकार : योगेश

संगीतकार : आनंदघन

गायिका : लता मंगेशकर

चित्रपट : साधी माणसं (१९६५)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT