हास्यनगरीत कुणाला कधी स्टारपद मिळेल आणि कुणाचं कधी निघून जाईल, काही सांगता येत नाही. दिलीप जोशी हे तुलनेनं दुय्यमतिय्यम भूमिका करणारे कलाकार. ‘हम आपके है कौन’सारख्या चित्रपटात अगदी कमी लांबीच्या भूमिकेत आपण त्यांना बघितलं आहे. दिलीप जोशी यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ऑफर झाली. त्यातून त्यांचं भाग्य फळफळलं आणि आज ही मालिका आणि दिलीप यांचा ‘जेठालाल’ हे समीकरण जबरदस्त जुळलं आहेच; पण खुद्द दिलीप जोशी यांची भरभराट झाली. आज ते ‘तारक’चे ‘हायेस्ट पेड अॅक्टर’ आहेतच; पण त्यांच्याकडे कारचं खास कलेक्शन आहे-ज्यात ऑडीचासुद्धा समावेश आहे.
दुसरं विरुद्ध उदाहरण ‘भाभी जी घरपे है’मधल्या शिल्पा शिंदे यांचं. शिल्पा यांनी साकारलेली ‘अंगुरी भाभी’ ही व्यक्तिरेखा इतकी प्रचंड लोकप्रिय झाली, की शिल्पा शिंदे रातोरात स्टार झाल्या. मात्र, नंतर काही तरी वाद झाले आणि शिल्पा शिंदे मालिकेतून बाहेर पडल्या. खूप गडबड, गोंधळ झाला. नंतर ‘बिग बॉस’ मालिकेतलं विजेतेपद सोडलं, तर शिल्पा शिंदे छोट्या पडद्यावर स्थानच मिळालं नाही. शिल्पा शिंदे यांच्यानंतर आलेल्या शुभांगना अत्रे यांच्या ‘अंगुरी भाभी’ला प्रेक्षकांनी उचलून धरलं; पण एके काळी रातोरात स्टार झालेल्या शिल्पा शिंदे यांचं करिअर झाकोळलं ते झाकोळलंच.
नवीन प्रभाकर आठवतोय? ‘पैचान कौन’ ही त्याची पंचलाइन ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये इतकी गाजली, की त्याची तीच ओळख बनली. अजूनही ‘पैचान कौन’ या पंचलाइनचं ग्लॅमर काही कमी झालेलं नाही; पण नवीन प्रभाकरचं करिअर मात्र फार पुढे गेलं नाही. त्यानं नंतर खूप धडपड करूनसुद्धा त्याला ‘पैचान कौन’च्या पुढे उडी नाहीच मारता आली.
नवीन जमान्यातल्या विनोदवीरांच्या भाळी हीच गोष्ट लिहिली आहे. पूर्वी जॉनी वॉकर, मुकरी, केश्टो मुखर्जी, टुनटुन अशा किती तरी विनोदवीरांना दीर्घकालीन खेळण्यासाठी मोठं मैदान होतं. मात्र, हल्लीच्या जमान्यात जसे चटपटीत विनोद लागतात, तसं विनोदवीरांचं करिअरही ‘चटपटीत’ असतं. पॉपकॉर्नसारखं त्या त्या वेळी फुटलं तर फुटलं, नाही तर संपलं. इमेजचा शिक्का त्यांना अनेकदा करिअरची चौकट भेदूच देत नाही. विशेषतः विनोदात वैविध्य नसेल, तर विनोदवीरच्या करिअरचाही पल्ला छोटाच असू शकतो, मात्र समजा त्याला समजा मैदानच दीर्घकालीन मालिकेच्या रूपात मिळालं तर ते त्याचं नशीब!
चित्रपटांत कॉमेडियन हा स्लॉट कमी होत चालला असताना आणि टीव्हीवरच्या विनोदी मालिकांमध्ये व्यक्तिरेखा जास्तीत जास्त चौकटबद्ध होत चालल्या असताना विनोदवीरांच्या करिअरची पुंगी कधी वाजेल आणि कधी मोडून खायला लागेल सांगता येत नाही. जेव्हा एखादा विनोदवीर विशिष्ट व्यक्तिरेखेत किंवा इमेजमध्ये बंदिस्त होतो, तेव्हा त्याच्या करिअरचं डेस्टिनेशन काय असेल हे त्याचं त्यालाही सांगता येत नाही. पूर्वी विनोदवीरांवर इमेजचा शिक्का बसला, की तो शिक्का त्यांच्यासाठी पूरक असायचा. पूर्वीचे अनेक कॉमेडियन त्याच त्याच प्रकारच्या शैलीत विनोदनिर्मिती करायचे. काहींच्या तर विशिष्ट ‘पंचलाइन’ही अनेक चित्रपटांत त्याच असायच्या. मात्र, सध्याच्या जमान्यात हा शिक्का विनोदवीरांच्या दृष्टीनं अडथळा बनतो एवढं मात्र नक्की. हा शिक्का काहींना यशस्वी बनवतो, तर काहींना अयशस्वी.
काही विनोदवीर मात्र या सगळ्यावर मात करतात ती स्वतःच्या अष्टपैलू कामगिरीनं. कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हर ही मंडळी बघा. त्यांना कोणती इमेज, मालिका, चित्रपट प्रकार यांचा काही फरक पडत नाही. आता तर या कलाकारांचं स्वतःचं नाव हाच ब्रँड झाला आहे. त्यामुळे करिअरचा बॉल ते पाहिजे तसा वळवू शकतात.
मराठी रंगभूमीवरही प्रशांत दामले, भरत जाधव अशा रंगकर्मींची उदाहरणं सांगता येतील. त्यांची विनोदावरची हुकुमत आणि एकूणच सर्व स्तरांवरची समज यांमुळे ते रंगमंच भारून टाकतात. चित्रपटांमध्येही रितेश देशमुख, आयुष्मान खुराना अशी मंडळी दीर्घकालीन खेळी करू शकत आहेत. यातून दिसतंय ते असं, की अंगभूत विनोदवृत्ती, उत्स्फूर्तता, विनोदाची समज, टायमिंग या गोष्टी असल्या, तर विनोदवीर लंबी पारी खेळू शकतो, मात्र केवळ लेखकाच्या ओळींचा सहारा घेऊन विनोदवीर बनलेल्यांच्या करिअरची कधी ‘समयसमाप्ती की घोषणा’ होईल सांगता येत नाही. लेखकानं लिहिलेली आणि दिग्दर्शकाच्या सूचनांनुसार साकारलेली विनोदी व्यक्तिरेखा साकारणं आणि खरंच विनोदवीर असणं या गोष्टी पुन्हा वेगळ्याच आहेत. बाकी हास्यनिर्मितीचे खरे स्टार अभिनेते की लेखक ही गोष्टही चर्चेची आहेच; पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.