Boman Irani and Anupam Kher Sakal
सप्तरंग

लेखक ‘पडद्या’आडच

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिका टीव्हीवर प्रसारित झाल्याला किती तरी वर्षं उलटली, मात्र ती अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिका टीव्हीवर प्रसारित झाल्याला किती तरी वर्षं उलटली, मात्र ती अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘मोनिषा’ म्हणत ‘मिडल क्लास’ सुनेला विविध उदाहरणं देत टोचणारी माया साराभाई, रटाळ कविता म्हणून पकवणारा रोसेश अशा व्यक्तिरेखा, त्यातल्या सिच्युएशन्स, चुरचुरीत संवाद अजूनही आठवले, की हसू येतं. प्रेक्षकांना माया साकारणाऱ्या रत्ना पाठक-शाह आठवतात, इंद्रवदन साकारणारे सतीश शहा आठवतात, सुमित राघवन आठवतो; पण ही मालिका, त्यातल्या व्यक्तिरेखा ज्याच्या सुपीक डोक्यातून निघाल्या तो लेखक मात्र फारसा कुणाला माहीत नाही. हा लेखक होता आतिश कपाडिया. ‘साराभाई’सारख्याच ‘खिचडी’ नावाच्या आणखी एका मॅड कॉमेडीचा लेखक.

पण साराभाईच कशाला, बहुतेक सगळ्या विनोदी मालिकांपासून अगदी आत्ताच्या वेब सिरीजपर्यंतचे लेखक दुर्लक्षितच आहेत. ‘व्हिकी डोनर’सारख्या चित्रपटानं आयुष्मान खुरानाचं करिअरच बदलवून टाकलं; पण त्याची लेखिका जुही चतुर्वेदी कमी प्रसिद्ध आहे. ‘आप चाय लेंगे, कुछ ठंडा, तो आप चूप रहनेका क्या लेंगे’ असे चटपटीत संवाद लिहिणारा ‘खोसला का घोसला’चा लेखक जयदीप साहनीचं नावही चर्चेतलं नाही. ‘भेजा फ्राय’ ‘प्यार का पंचनामा’ नावाच्या चित्रपटांचे लेखक तर माहीत असण्याची शक्यताच नाही.

‘श्रीमानश्रीमती’, ‘ऑल द बेस्ट’सारख्या अनेक मालिकांचे हुकमी संवाद लिहिणारे अशोक पाटोळे कमी प्रसिद्ध आहेत, अनेक कॉमेडी स्किट्स लिहिणारे सचिन मोटे, प्रशांत लोके, आशिष पाथरे, मिलिंद शिंत्रे वगैरे मंडळींची नावं ठरावीक वर्तुळं सोडून कुणाला माहीत नाहीत. ‘भाभीजी घरपे है’मधले अगदी बारीकसारीक भूमिका करणारे कलाकारसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीचे आहेत; पण त्यांचा लेखक मनोज संतोषी याचं नाव तेवढं गाजत नाही.

कॉमेडी शोंमधली स्किट्स बरेचदा त्या कलाकारांनी नव्हे, तर कुणा तरी लेखकानं लिहिलेली असतात, मात्र दाद मिळवून जातात ते सादर करणारे कलाकार. एवढंच नव्हे, तर स्टँडअप कॉमेडियन्ससाठीचं स्क्रिप्टसुद्धा अनेकदा दुसऱ्यानंच लिहिलेलं असतं. नाव त्या त्या कलाकारांचं होतं, दाद त्यांना मिळते. ‘विनोदवीर’ ही उपाधी त्यांना मिळते; पण मूळ लेखणी मात्र फार चर्चेची ठरत नाही. गंमत म्हणजे एखादा लेखक स्वतः अभिनय करणारा असला, तर मात्र त्याला ‘डबल’ ओळख मिळते, त्याचं जास्तच कौतुक होतं; पण इतर लेखकांना ते भाग्य नसतं. म्हणजे ‘फेस’ला ‘व्हॅल्यू’ आहे; पण लेखकाला ‘फेस व्हॅल्यू’ नाही असं हे गौडबंगाल.

‘रंजन-माध्यमां’मधला विनोद केवळ हजरजबाबीपणावर चालत नाही. तिथं विनोदाची फेक कुठपर्यंत पाहिजे, विनोदाची कक्षा किती रुंद पाहिजे, कोणत्या गोष्टींना रोखलं पाहिजे वगैरे गोष्टींचे ठोकताळे असतात. एक गणित असतं, चौकट असते. त्यात तो विनोद बसवावा लागतो. विनोदी पुस्तकांचं माध्यमांतर फार कमी झालं आहे ते कदाचित त्याच्यामुळेच. रंजन-माध्यमांत विनोदनिर्मितीसाठी ‘स्ट्रक्चर्ड’ लेखन करावं लागतं-जे व्यावसायिक लेखकच करू शकतात. केवळ मुद्रित माध्यमांत लिहिणारा लेखक कदाचित नाटकांपर्यंत मुशाफिरी करू शकेल-मात्र विशेषतः टीव्ही, चित्रपट, वेब सिरीज अशा माध्यमांतलं विनोदनिर्मितीचं तंत्र आणि कसब वेगळंच असतं. त्यामुळेच तिथले लेखक अनेकदा वेगळेच असतात; मात्र त्यांना अंधारात राहावं लागतं. एकेका संवादावर एखाद्या कलाकाराचं अक्षरशः करिअर बदलून जातं. तो संवाद लिहिणाऱ्या लेखकाच्या वाट्याला मात्र तितकं सुख नसतं.

प्रेक्षकांना हसवणारे कलाकार लक्षात राहतात, त्यांची चर्चा होते; मात्र त्यांचा ‘बोलविता धनी’ असणारा लेखक वेगळाच असल्याचं अनेकदा लक्षात येत नाही. विनोदी पुस्तकांचा लेखक आणि वाचक यांच्यात मध्ये अडथळा नसतो. मात्र, टीव्ही, चित्रपट, वेब सिरीज, जाहिराती अशा माध्यमांत तसं नसतं. तिथं मध्ये बऱ्याच पायऱ्या असतात. त्यातली कलाकारांचीच पायरी प्रेक्षकांच्या दृष्टीनं अनेकदा सर्वोच्च ठरते. सांगायचा मुद्दा इतकाच, की एखादा कलाकार कोणत्याही स्क्रीनवर तुम्हाला हसवत असतो, तेव्हा त्याच्यामागची विनोदबुद्धी त्याचीच असेल असं नाही. बहुतांश वेळा ती दुसऱ्याची असते. मात्र, तिला तेवढं नाव मिळत नाही.

एक असंही आहे, की पूर्वी मालिका म्हणा, चित्रपट म्हणा- निवडक होते. त्यात लेखक-दिग्दर्शकांच्या ठरलेल्या जोड्या असायच्या. आता मात्र लोकांची ‘मनोरंजनाची भूक’ वाढली आणि मालिका, चित्रपट, वेब सिरीज हे सगळे कारखानेच झाले. त्यामुळे पडद्याआडच्या लोकांची ‘फौज’ही भरपूर असते. मूळ संकल्पना वेगळ्याची, कथा वेगळ्याची, पटकथा-संवाद लिहिणारे सतत बदलणारे यांमुळे लेखक हा ‘ब्रँड’ या माध्यमांत तेवढ्या जोरकसपणे तयारच होत नाही आणि तो तयारही करू दिला जात नाही. टीव्हीवर ठरावीक नावं सोडली, तर श्रेयनामावली छोटीछोटी होत चालली आहे.

कलाकारांची नावं तरी हल्ली कुठं असतात? सुदैवानं ते प्रेक्षकांच्या सतत डोळ्यांसमोर असल्यानं आणि स्वतःच्या शैलीनं त्यांचं नाव प्रेक्षकांच्या मनामध्ये ठळक करतात. लेखकाला मात्र ती संधी मिळत नाही. पूर्वी सलीम-जावेद, कादर खान यांनी कुठले संवाद लिहिले हे सगळ्यांना माहीत असायचं. अशा लेखकांना असलेला मान नवीन जमान्यात कुठल्या कुठं गायब झाला आहे, हे गोष्ट अक्षरशः ‘हसण्यावारी’ नेण्याजोगी नाही. माध्यमांतल्या लेखकांना पूर्वीचं स्थान मिळणं आता जवळपास अशक्य आहे. आपण प्रेक्षक म्हणून करायचं इतकंच, की टीव्ही, चित्रपट, वेब सिरीजमधल्या विनोदांवर हसताना त्या कलाकारांना दाद द्यायचीच... पण विलक्षण विनोद लिहिणाऱ्या त्या प्रतिभावंताला किमान मनातल्या मनात सलाम जरूर ठोकायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT