Makrand Anaspure Sakal
सप्तरंग

गोष्ट छोटी डोंगराएवढी!

‘धनी, लग्नाआधी तुम्हीबी असेच चिकने दिसायचे,’’ असं ‘गाढवाचं लग्न’मधली गंगी सावळाला म्हणते, तेव्हा तो अचानक चेहऱ्यावरचे भाव बदलतो.

मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

‘धनी, लग्नाआधी तुम्हीबी असेच चिकने दिसायचे,’’ असं ‘गाढवाचं लग्न’मधली गंगी सावळाला म्हणते, तेव्हा तो अचानक चेहऱ्यावरचे भाव बदलतो. बेरकीपणा, तत्त्वचिंतन, डँबिसपणा असं सगळं चेहऱ्यावर पसरतं आणि तो म्हणतो, ‘असंच असतं गंगे. लग्नाआधी प्रत्येक माणूस चिकनाच असतो. लग्नानंतर त्याचा चेहरा काळवांडतो, तो चकना होतो...’’ विशिष्ट चेहरा करत, विशिष्ट पॉझ घेत तो हा संवाद उच्चारतो, तेव्हा चित्रपटगृहात हास्याचा धबधबा कोसळला नसता तरच नवल.

ही व्यक्तिरेखा साकारणारा वल्ली म्हणजे अर्थातच मकरंद अनासपुरे. मराठीतल्या गेल्या काही वर्षांतल्या विनोदी चित्रपटाचा हुकमाचा एक्का.

‘एंहेहेहे’ करत हसण्याची खास शैली, कुठल्याही प्रदेशातल्या, भागातल्या प्रेक्षकाला आपलं वाटेल असं व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावर क्षणात येणारा बिलंदरपणाचा भाव, आवाजाची वरची पट्टी लावून आणि एका विशिष्ट लयीत बोलण्याची पद्धत आणि संवादफेकीची युनिक पद्धत यामुळे किती तरी विनोदपटांचा तो बादशहा ठरलेला आहे. मराठीत रुढार्थानं नायकाचं व्यक्तिमत्त्व नसलेल्या अनेकांना विनोदाच्या बळावर नायकपणा मिळाला. मकरंद त्याच लीगमधला. त्याची विनोदावरची हुकमत त्याला कारणीभूत आहे, तितकंच मराठी माणसाचं विनोदावरचं प्रेम ही गोष्टही.

मराठवाड्यातून येऊन अभिनयाद्वारे- विशेषतः विनोदी चित्रपटांमध्ये स्वतःचं विशेष स्थान निर्माण करणं त्याला साधलं. कोणत्याही चॅनेलवर मकरंद अनासपुरेचा चित्रपट लावा आणि दोन-अडीच तास मस्तपैकी मनोरंजन करून घ्या असा अनेकांचा फंडा बनलाय.

विनोदी अभिनेते म्हणून खूप प्रसिद्ध होणाऱ्या अनेक लोकांमधलं निर्मळ मनसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण त्या व्यक्तीच्या निरागसपणावर विश्वास बसला, की मग त्या व्यक्तिरेखेच्या डँबिसपणात गंमत वाटायला लागते. ज्या व्यक्तीच्या विनोदावर आपण खदाखदा हसतो, ती मुळात आपली, आपल्यातली आणि जिव्हाळ्याची वाटायला पाहिजे. मकरंदच्या व्यक्तिमत्त्वातली हीच गोष्ट त्याला नक्की उपयोगी पडते. एकीकडे त्याची सामाजिक कणव आहे, प्रचंड वाचन आहे आणि माणसांची कमाल निरीक्षणं आहेत. त्याचा विनोद घसरत नाही, तो निर्मळ आहे, निरागस आहे. दुसरीकडे त्याची स्वतःची विनोदबुद्धी, त्याच्यातला प्रगल्भ वाचक आणि कदाचित फार बाहेर न पडलेला लेखक या गोष्टींमुळेही त्यांचा विनोद इतरांपेक्षा वेगळा आहे. या विनोदाला मास अपील आहे ते त्यांच्या बोलीतल्या खास प्रादेशिक लहेजामुळे हे जितकं खरं, तितकंच तो प्रादेशिक लहेज्याशिवायही हसवू शकतो हेही खरं. कोणतीही व्यक्तिरेखा द्या आणि या अभिनेत्याला खेळायला द्या. तो सिक्सरच मारणार यात काही वादच नाही.

सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ‘सरकारनामा’ चित्रपटात तुलनेनं छोटी व्यक्तिरेखा साकारणारा मकरंद आज केवळ स्वतःच्या जीवावर संपूर्ण चित्रपट ओढू शकणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे. त्याला व्यापक ओळख मिळाली ती ‘कायद्याचं बोला’मधल्या ‘केशव कुंथलगिरीकर’ या जबरदस्त व्यक्तिरेखेनं. तिथं त्याचे सडेतोड युक्तिवाद तमाम महाराष्ट्राला आवडले. ‘पायजमा नव्हे, पँट घाला’ असं न्यायमूर्तींनी म्हटल्यावर ‘कुणाला’ असं निरागसपणे विचारणारा आणि ‘तुम्हाला स्वतःला’ या उत्तरावर आधीचं बेअरिंग अजिबात न सोडणारा वकील कमाल होता. ‘गाढवाचं लग्न’पासून तो जास्त खुलला आणि स्वतःचं कसब नेमकं कसं वापरायचं याचं नियंत्रण त्याच्यात आलं. पुढं ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’ अशा एकेक चित्रपटातून ते धमाल करत राहिला. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट म्हणजे तर अर्कचित्रासारख्या व्यक्तिरेखांची धमाल आहे. त्यातला ‘‘नारू म्हणू नका ना, नारू म्हणजे रोगाचं नाव वाटतं’’ असं विशिष्ट पद्धतीनं म्हणणारा आणि निवडणुकीत डिपॉझिट म्हणून सुट्ट्या पैशांचा ढीग देणारा आणि निवडणूक अधिकाऱ्यांना घाम फोडणारा नारायण वाघ मराठी चित्रपटसृष्टीतल्या खास व्यक्तिरेखांपैकी एक.

संवादफेकीची आणि हसण्याची विशिष्ट स्टाइल ही मकरंदची ओळख आहे आणि त्याची अतिशय खास अशी देहबोलीही आहे. तिचा आणि मुद्राभिनयाचा तो विशिष्ट प्रसंगांमध्ये धमाल वापर करून घेतो. ‘गाढवाचं लग्न’सारख्या चित्रपटांत त्यानं संवादफेकीबरोबर याच गोष्टींचा मस्त उपयोग करून घेतलाय. त्यामुळे अनेक प्रसंग बघून हसूनहसून पुरेवाट होते. त्याचं नाव उच्चारल्यावर केवळ एखादा चित्रपट किंवा व्यक्तिरेखा समोर उभी राहत नाही, तर किती तरी व्यक्तिरेखा, संवाद आठवतात यातच त्याचं यश आहे. आणि हो, किती तरी चित्रपटांत गंभीर भूमिकाही साकारून त्यानं अष्टपैलुत्वही सिद्ध केलं आहे.

मकरंद अनासपुरे या अभिनेत्याला एक विलक्षण सूर सापडला आहे. हा सूर त्याला नाम फाऊंडेशनसारख्या कामातून सापडला आहे आणि दुसरीकडे त्याच्यावर सर्व स्तरांतल्या प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमामुळे, त्याच्या आगमनाबरोबर हास्यानं दणाणून जाणाऱ्या थिएटर्समुळेमुळेही आहे. अशोक सराफ यांच्याप्रमाणंच पडद्यावरचा आणि प्रत्यक्षातला मकरंद यांच्यात विलक्षण फरक आहे. प्रत्यक्षातला मकरंद हा खूप वाचन असलेला, आवाजाची वेगळी पट्टी असलेला, सामाजिक जाणिवा प्रखर असलेला; पण बोलघेवडा आहे. मात्र, हाच मकरंद कॅमेरा सुरू झाल्यावर बदलतो. त्याच्या डोक्यावर एक टोपी येते, आवाजाची वरची पट्टी लागते, ‘एंहेहेहे’ हास्य येतं, देहबोली बदलते; ‘नारू’, ‘सावळा’, ‘डुकरे गुरुजी’ किंवा इतर कुठली तरी अतरंगी व्यक्तिरेखा संचारते आणि हास्याची ‘कुंथलगिरी एक्स्प्रेस’ सुसाट धावायला लागते. खरं तर त्याच्या करिअरची ही ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ ठरू शकली असती...पण नीट बघाल तर ही ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ आहे, बरोबर ना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT