Article in Saptraga by Ashwini Deshpande 
सप्तरंग

सरळ-साधं-सुबक-सोपं (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे

‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ ही म्हण मराठी कुटुंबांमध्ये अनेकदा वापरली जाते; विशेषतः कुठं फार दिखाऊपणा किंवा डामडौल जाणवला, अनावश्‍यक फापटपसारा आढळला तर या म्हणीचा वापर अवश्‍य होतो. याउलट डिझाइन या शब्दाचा संबंध ‘सजावट’, ‘सुशोभन’ अशा वरकरणी बाबींशी लावला जातो. डिझाइनच्या उद्देशांबाबतचा आणि परिणामांबाबतचा हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. एखादी वस्तू अथवा सेवा ती वापरणाऱ्या व्यक्तीसाठी जास्तीत जास्त सोपी कशी करता येईल, इतकंच नव्हे तर उत्पादन, वितरण आणि दुरुस्तीही सोपी आणि सरळ कशा प्रकारे होईल हा डिझाइनचा प्राथमिक उद्देश असतो. संदेश, संकेत, खुणा यांबाबतही हेच तत्त्व वापरलं जातं. एखादं चिन्ह किंवा खूण कमीत कमी घटक वापरून तयार केली, तर ते सोपं राहण्याची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अर्थपूर्णपणे पोचण्याची शक्‍यता वाढते. टाचणी, पेपरक्‍लिप किंवा सेफ्टी पिन, फूटपट्टी, पेन्सिल...आपण रोज अशा अनेक साध्या-सोप्या वस्तू वापरत असतो. त्या त्यांचं काम इतकं चोख बजावत असतात, की त्यांच्यात कोणत्याही प्रकारची भर घातली, तर तो निव्वळ देखावा होईल. कोणतीही वस्तू डिझाइन करताना सुरवातीला कित्येक कल्पना पुढं येत असतात. त्या वस्तूला अनेक वैशिष्ट्यं जोडून ती जास्त आकर्षक करता येईल, अशा प्रकारच्या कल्पनाही जोडल्या जातात. एखादं नवीन फीचर, नवीन तंत्रज्ञान, जास्त

उपयुक्तता, अधिक मोहकता...इत्यादी. मात्र, खरी कसोटी असते ती एकेक अनावश्‍यक थर कमी करत मूलभूत वस्तू मुख्य उद्देश समर्थपणे पेलते आहे ना याबाबतची अथवा तो उद्देश समर्थपणे पेलण्यात त्या वस्तूत कुठं कमतरता तर राहत नाही ना याबाबतची.  साधं-सोपं डिझाइन साध्य करणं हे अतिशय अवघड आणि जिकिरीचं काम आहे. याचं कारण साधेपणाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. ‘साधेपणा ही केवळ दृश्‍य स्वरूपाची शैली नव्हे. साधेपणा समजून घेण्यासाठी आधी सगळ्यात जास्त किचकट आणि गुंतागुंतीच्या जंजाळात डुबकी मारावी लागते. खोलवर. वस्तूचा आशय स्पष्टपणे समजला, आत्मसात केला तरच तिचे अनावश्‍यक पापुद्रे काढून टाकता येतात,’ असं ॲपल डिझायनर जोनाथन आईवचं म्हणणं आहे. या विधानाची जिवंत उदाहरणं म्हणजे ॲपलची सगळीच प्रॉडक्‍ट्‌स; जी वरकरणी साधी, वापरायला सोपी आणि सुबक तर असतातच; पण त्यांच्यामागं अत्यंत प्रगत तंत्रज्ञान दडलेलं असतं. ॲपल कंपनी २० वर्षांहून अधिक काळ नवनवीन कल्पना जगापुढं मांडत आहे. मात्र, प्रत्येक नवीन प्रॉडक्‍टमध्ये हा ‘साधे’पणा आणि ‘सुबक’पणा राखण्याचं तत्त्व सहज लक्षात येतं.

हार्ड डिस्क आणि मॉनिटर एकाच युनिटमध्ये बसवलेले कॉम्प्युटर, वनटच कॉम्प्युटर माउस, एका बोटानं चालवता येणारा आय-पॉड, पोस्टाच्या पाकिटात मावेल इतका सडपातळ लॅपटॉप अशी अनेक यशस्वी उदाहरणं त्यांच्या साधेपणामुळं आणि सोपेपणामुळं लक्षात राहणारी ठरतात. ‘सोपं’ किंवा ‘सुबक’ दिसण्यावरच केवळ त्या प्रॉडक्‍ट्‌सची वैशिष्ट्यं थांबत नाहीत, तर ती तेवढ्याच उत्तम प्रकारे चालतात, कार्यक्षम असतात आणि दुरुस्त करायलाही सुकर असतात. असं म्हणतात की एखादी वस्तू तिच्यात जास्तीत जास्त भर घालत राहून परिपूर्ण करता येत नाही; उलट तिच्यातून अनावश्‍यक गोष्टी वजा करत करत ती परिपूर्णतेकडं नेता येते. डिझाइनद्वारे गुंतागुंतीचे संदेश आश्‍चयर्कारकरीत्या सोपे करून दाखवल्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे लंडनच्या भुयारी रेल्वेचा नकाशा. जगातला पहिला भुयारी मार्ग लंडनमध्ये १८६२ मध्ये सुरू झाला. त्या वेळी मोजके मार्ग सुरू केले गेले. मात्र, पुढच्या ५० वर्षांत त्या काळच्या मानानं झपाट्यानं या भुयारी मार्गाचा विस्तार झाला आणि प्रवाशांना सुकर व्हावं यासाठी या मार्गाचे नकाशे बनवण्याच्या एकंदरीत पद्धतीनुसार शहरातले चढ-उतार, वळणं, झाडं, थेम्स नदी, रस्ते, गल्ल्या या सगळ्यांचा समावेश भुयारी रेल्वेमार्गाच्या नकाशात करण्यात आलेला होता. या गोष्टींचा प्रवाशांना प्रत्यक्षात काहीच उपयोग नव्हता; कारण मार्ग तर भुयारी होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचण्यासाठी केवळ रेल्वेस्थानकाचं नाव आणि आवश्‍यकता भासल्यास मार्गबदलाच्या सूचना यांचीच गरज होती. हॅरी बेक नावाच्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आली. प्रवाशांना सुलभपणे प्रवास करता यावा आणि त्यासाठी साधा, अर्थपूर्ण नकाशा त्यांना उपलब्ध व्हावा, यादृष्टीनं बेक यांनी नकाशावर काम सुरू केलं. यात त्यांची क्रांतिकारक कल्पना अशी होती, की शहराच्या पृष्ठभागावरच्या गोष्टींना काट मारून केवळ रेल्वेस्थानकं किंवा मार्ग बदलण्याची जंक्‍शन्स यांच्यावरच लक्ष केंद्रित करायचं. चढ-उतार, वळण या गोष्टी वाहनचालकाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असू शकतात; पण भुयारी रेल्वेत बसलेल्या प्रवाशांसाठी त्यांचा काहीच उद्देश नसतो. 

बेक यांनी विजेच्या सर्किटच्या आराखड्यापासून प्रेरणा घेतली. त्यानुसार त्यांचा नकाशा एकतर सरळ रेषा, काटकोन अथवा ४५ अंशांच्या कोनात बसवलेल्या रेषांपासून तयार झाला. ‘स्टेशन’ अथवा ‘मार्ग बदलण्याचं जंक्‍शन’ अशा दोन प्रकारच्या वर्तुळांनी प्रत्येक स्थानक सुस्पष्ट करण्यात आलं. १९३१ मध्ये हा नकाशा इतका आगळ्या विचारांतून तयार करण्यात आला, की लंडन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तो नावाजणं तर सोडाच; पण प्रकाशित करायलाही निरुत्साह दाखवला. शेवटी दोन वर्षांच्या चालढकलीनंतर १९३३ मध्ये एका छोट्याशा पॅम्प्लेटद्वारे तो प्रसारित करण्यात आला. बेक यांना या कामाच्या आर्टवर्कसाठी केवळ १० गिनिज्‌चं (सुमारे १० पाउंड) मानधन देण्यात आलं. मात्र, हा नकाशा झपाट्यानं लोकप्रिय झाला. कारण, तो कमालीचा सोपा आणि सुलभ होता. पुढची ३० वर्षं बेक यांनी या नकाशात सातत्यानं सुधारणा केल्या.

जवळजवळ ९० वर्षं उलटली तरी हा साधा-सोपा नकाशा डिझाइनचा अत्युत्कृष्ट नमुना म्हणून अभ्यासला जातो. जगभरात सार्वजनिक वाहतुकीचे सगळेच नकाशे याच नकाशाच्या तत्त्वावर डिझाइन केले जातात. सोपं करून दाखवलेलं डिझाइन सुबकच नव्हे, तर अजरामर होऊ शकतं, हेच या लंडन भुयारी रेल्वेच्या नकाशावरून सिद्ध होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT