jayant pawar sakal
सप्तरंग

सत्य शोधणारा प्रतिभावंत

नाटक, एकांकिका, कथा, पटकथा, नाट्यसमीक्षा असं विविधांगी लेखन सातत्यानं करणाऱ्या जयंतने महाराष्ट्राच्या हृदयात एक चांगला सहृदय, निगर्वी माणूस म्हणून एक हळवं स्थान निर्माण केलं होतं.

सकाळ वृत्तसेवा

-रवीन्द्र दामोदर लाखे

जयंत पवारच्या लेखनाला पार्श्वभूमी आहे ती मुंबईतील कामगारवस्तींतल्या, चाळसंस्कृतीतल्या माणसांच्या मनोविश्वाची. अशा माणसांना सामान्य न लेखता त्यांचा आनंद, दु:ख, शल्य, जगण्यातला ताण किंवा त्याच्यातलं अहंपणही जयंतने सच्चेपणानं आपल्या लेखनात मांडलं. तो कित्येक हौशी-होतकरू रंगकर्मींचा, नव्या कथा आणि नाट्यलेखकांचा गॉडफादर आहे; पण तो कधी गॉडफादरसारखा वागला नाही. त्याच्या जाण्यानं कित्येकांना आपलं जगणं पोकळ वाटायला लागलं आहे.

जयंत पवार नावाचा माणूस गेला. नाटक, एकांकिका, कथा, पटकथा, नाट्यसमीक्षा असं विविधांगी लेखन सातत्यानं करणाऱ्या जयंतने महाराष्ट्राच्या हृदयात एक चांगला सहृदय, निगर्वी माणूस म्हणून एक हळवं स्थान निर्माण केलं होतं. त्याच्या जाण्यानं मराठी कथा-नाटक वगैरे मराठी साहित्यप्रकारात पोकळी निर्माण झाली असेल, पण त्याहीपेक्षा त्याच्या जाण्यानं कित्येकांना आपलं जगणं पोकळ वाटायला लागलं आहे.

त्याचं ‘अधांतर’ नाटक पाहिलं नि मनात म्हटलं, हे खरं नवं नाटक. त्यात कुठलेही कृतक संवाद नाहीत. फुलारलेली भाषा नाही. सुभाषितवजा डायलॉगबाजी नाही. नाटक जिथं घडतं ते स्थळ भव्य वगैरे नाही. उगाचंच पोषाखीपणा करायला वाव नाही. नाटककाराने आपल्या संवादलेखनातून सांगीतिक लय धुडकावून लावली आहे. आणि आशयाच्या लयीवर भर दिला आहे.

अर्थात हे नाटककाराने जाणूनबुजून केलेलं नाही. तो जगला आहे त्या त्याच्या आयुष्यात ही सांगीतिक लय नसावीच. सांगीतिक लय प्रेक्षकांना गुंगवते, रंगवते, रमवते. अशी नाटकं प्रेक्षक शुद्ध हरपल्यासारखा पाहतो. अशा शुद्ध हरपलेल्या प्रेक्षकांपर्यंत या नाटकाचा आशय पोहोचूच शकला नसता. त्यामुळे एकूण नाटकातल्या संवादांची नैसर्गिक अशी आशयाची लय प्रेक्षकांना जागं राहून नाटक पाहायला लावते. या नाटकातल्या घटना किंवा प्रसंग असे आहेत की उगाचंच ते बाह्यात्कारी सुंदर करता येणार नाहीत. ही खरी नवता. आहे तेच नव्यानं पाहायला लावणारी. ‘अधांतर’ नाटकानं खऱ्या अर्थानं मराठी रंगभूमी जमिनीवर आणली. जयंतची पुढची नाटकंही याच अर्थानं नवीन आणि अवघ्या मराठी रंगभूमीला समृद्ध करणारी आहेत.

जयंत पवार याचं कथाविश्वही असंच. माणूस वास्तवाच्या अवधानाची केंद्रे वाढल्यामुळे तो आपल्या मनाचा किंवा संवेदनेचा एकेक तुकडा एकेका अवधानासाठी देऊ शकतो. संपूर्ण मन आपल्या जीवनजाणीवेसह तो नाही देऊ शकत. जीवनजाणीव ही सजग जगण्यातून येते आणि यातली भयानकता अशी आहे की, हे तुकडे एकाच वेळी अनेक ठिकाणी दिले जातात किंवा द्यावे लागतात. त्याच्या एकूण लेखनातलं वास्तव इतकं प्रखर असतं की ते पाहणाऱ्याचे चर्मचक्षू जळून जातात आणि हे वास्तव पाहण्यासाठी उरतात, ते त्याचे अंत:चक्षू. अंत:चक्षूंना घटनेचे, माणसांचे आकार कधीही दिसत नाहीत. त्यांच्यातलं अवकाश दिसतं. असीम अफाट. ज्यासमोर ती घटना किंवा माणूस एखाद्या कांद्याएवढा मामुली होऊन जातो. हे अंत:चक्षू समोर असलेल्या घटनेतील किंवा माणसातील वास्तवाला कांद्यासारखं सोलतात.

एक एक पापुद्रा काढून वास्तवाच्या गर्भात दडलेलं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतं. तिथं सापडते एक पोकळी. घडलेल्या वास्तव घटना माणूस आणि त्याचं जगणं, त्याच्या समस्या त्या पोकळीत वेगळ्या आशयात किंबहुना निराशय अशा दिसू लागतात. त्या घटनांमधलं एक आदिम गूढ दिसू लागतं. आणि एकूण घटनांच्या अनुभवातली लेखकाची वैयक्तिकता समूळ नष्ट होते. आज जयंत आपल्यात नाही असं आपण म्हणू शकणार नाही, असं भरीव काम त्यानं आपल्या लेखनातून करून ठेवलं आहे. त्याच्या सर्वच प्रकारच्या लेखनाला पार्श्वभूमी आहे ती या मुंबईतल्या, तिथल्या गिरणगावातल्या, कामगारवस्तींतल्या, चाळसंस्कृतीतल्या माणसाच्या मनोविश्वाची. अशा माणसांना सामान्य न लेखता त्या माणसांचा आनंद, दु:ख, शल्य, जगण्यातला ताण किंवा त्याच्यातलं अहंपणही जयंतने सच्चेपणानं आपल्या लेखनात मांडलं आहे.

जयंत लेखक म्हणून कित्येक हौशी होतकरू रंगकर्मींचा, नव्या कथा आणि नाट्यलेखकांचा गॉडफादर आहे; पण तो कधी गॉडफादरसारखा वागला नाहीय. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात असताना त्याची ‘नाटककार : जयंत पवार’ ही मी घेतलेली मुलाखत युगवाणी नागपूरच्या अंकात प्रसिद्ध झाल्यावर, कथाकार जयंत पवार अशी मुलाखत सुरू केली होती. जयंत उत्साहात होता. पाच प्रश्नांची त्यानं उत्तरं दिली. मग तो आणखी उत्साहित होऊन म्हणाला होता की, रवी, या मुलाखतीनंतर आणखी एक मुलाखत करू या आपण. त्यात फक्त आपण जगण्यावर बोलू या. आयुष्यावर बोलू या. त्याच्या अख्ख्या आयुष्याचा रोख माणूस आणि त्याचे सजगपणे जगणे यावर होता. अखेरपर्यंत तो होताहोईस्तोवर लिहिता होता. केवळ त्याच्यातल्या प्रचंड ऊर्जेतून त्यानं त्याही काळात खूप काम केलं. त्याला आदरांजली वाहणं जड जातंय.

प्रयोगशील लेखक

जयंत पवार मराठीतील प्रयोगशील लेखक होते. त्यांनी १९७८ पासून नाटक लिहायला सुरुवात केली. नाटक आणि कथा या दोन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन करून मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केले. नाट्यसमीक्षक म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी सुमारे तीन दशके नाट्यसमीक्षा लेखन केले आहे. ‘वंश’, ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’, ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’, ‘लिअरने जगावं की मरावं?’ इत्यादी नाटकांचे त्यांनी लेखन केले. ‘दरवेशी’, ‘मेला तो देशपांडे’, ‘कार्य सिद्धीस नेण्यास श्री (अ) समर्थ आहे’, ‘उदाहरणार्थ’, ‘दुजा शोक वाहे’, ‘होड्या’, ‘घुशी’, ‘लिअर’, ‘वाळवी’, ‘विठाबाईचा कावळा’, ‘अशांती पर्व’, ‘जळिताचा हंगाम’, ‘अंतिम रेषा आणि द्वंद्व’, ‘अजून एक पक्षी’, ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे’ इत्यादी २३ एकांकिकांचे त्यांनी लेखन केले.

‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’ या त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. माणसांचे मूळ हरवणे, त्यांचे स्थलांतर, विस्थापन, निर्वासित होणे, त्यांना वेढून टाकणारी राजकीय परिस्थिती, त्यातली त्यांची हतबलता व अगतिकता हे या नाटकांचे कळीचे मुद्दे आहेत; पण ही नाटके या प्रश्नांना सर्व अंगांनी भिडून त्याच्याही पुढे जात मानवी अस्तित्वाशी निगडित मूलभूत विचार प्रश्न म्हणून उपस्थित करतात आणि त्यांची तत्त्वचिंतनात्मक पातळीवर मांडणी करतात. जयंत पवार यांच्या लेखनामधून मुंबई अनेक अंगांनी दिसते. तिच्यातले कामगारांचे, वंचितांचे विश्व दिसते या विश्वाकडे ते अत्यंत सहृदयतेने बघतात.

त्यांच्या ‘अधांतर’ या नाटकाला राम गणेश गडकरी महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन ललित साहित्य गौरव, नाट्यदर्पण, जयवंत दळवी स्मृती नाट्यलेखन पुरस्कार आदी १४ विविध लेखन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकालाही अण्णासाहेब किर्लोस्कर महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार व रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘अधांतर’ या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत. जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या पहिल्याच कथासंग्रहाला २०१२ सालच्या ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने गौरवले गेले. जयंत पवार यांनी तेरावे विद्रोही साहित्य संमेलन (२०१५) आणि पंधरावे कोकण मराठी साहित्य संमेलन (२०१५) यांचे अध्यक्षपद भूषविले आहे. १९९१ साली दूरदर्शनसाठी अरविंद गोखले यांच्या कथांवर आधारित ‘कथनी’ या दूरदर्शन मालिकेच्या काही भागांचे पटकथा व संवादलेखन केले. ‘अधांतर’ नाटकावर आधारित ‘लालबाग परळ’ (मराठी) व ‘सिटी ऑफ गोल्ड’ (हिंदी) या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटांचे कथा, पटकथा व संवादलेखन केले. ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर विश्वास पाटील यांनी ‘रज्जो’ हा हिंदी चित्रपट बनविला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT