Markandeya Puran sakal
सप्तरंग

मार्कंडेय पुराण आणि वपु

सकाळ वृत्तसेवा

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

या लेखात मी मार्कंडेय पुराणाबद्दल सांगणार आहे. याचा संबंध मार्कंडेयांशी आहे, हे नावातूनच स्पष्ट होते. महातपस्वी मार्कंडेय ऋषी हे तपश्‍चर्या आणि अभ्यासात मग्न होते. वेदव्यासांचे शिष्य जैमिनी यांनी मार्कंडेयांना प्रश्‍न विचारला.

‘महात्मा व्यासांनी महाभारताची रचना केली. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्यांचा परस्पर संबंध आणि परिणाम यांचे स्वतंत्रपणे वर्णन त्यात केले आहे. धर्मातील पवित्र ग्रंथांमध्ये तो सर्वोत्कृष्ट आणि अर्थातील पवित्र ग्रंथांमध्ये तो सर्वोच्च आहे. कामाशी संबंधित पवित्र ग्रंथांमध्ये तो सर्वांत महत्त्वाचा आहे, तर मोक्षाशी संबंधित ग्रंथांमध्ये तो उत्कृष्ट आहे.

अनेक प्रकारचे अर्थ आणि सखोल ज्ञानाने परिपूर्ण असलेला हा ‘भारत’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे, सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने मी तुमच्याकडे आलो आहे. निर्गुण असलेल्या जनार्दनाने मानवीरूप का धारण केले ? द्रुपद राजाची कन्या पांडूच्या पाच पुत्रांची पत्नी का झाली ? द्रौपदीच्या महान पुत्रांचे संरक्षक म्हणून पांडूचे पाच पुत्र होते. तरीही, ते अविवाहित असतानाच जणू काही त्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणीही नाही, अशा स्थितीत त्यांची हत्या कशी झाली?’

मार्कंडेय म्हणाले, ‘हे ऋषिश्रेष्ठा! आमचे नित्यकर्म करण्याची वेळ जवळ आली आहे. सविस्तर बोलता येण्यासारखी ही वेळ नाही. हे जैमिनी! तरीही तुमच्याशी जे बोलू शकतील आणि तुमच्या शंका दूर करू शकतील, अशांची नावे मी सुचवितो. पिंगाक्ष, विबोध, सुपत्र आणि सुमुख अशी त्या पक्ष्यांची नावे आहेत. हे सर्व द्रोणपुत्र आहेत. विंध्य पर्वताच्या मध्यभागी असलेल्या एका गुहेत ते राहतात. तिथे जा आणि आपल्या शंकांचे निरसन करून घ्या.’’

जैमिनींनी विचारले, ‘पक्षीही मनुष्याप्रमाणे बोलू शकतात आणि या पक्ष्यांनी प्राप्त करण्यास अत्यंत कठीण असलेले ज्ञानही मिळविले आहे, ही कौतुकाची बाब आहे. कनिष्ठ प्रजातींमध्ये जन्माला आलेले असूनही या पक्ष्यांनी हे ज्ञान कसे प्राप्त केले ? या पक्ष्यांना द्रोणांचे पुत्र असे का म्हणतात? या महान आत्म्यांना धर्माचे ज्ञान आहे आणि त्यांच्याकडे गुणही आहेत. त्यांना हे सर्व कसे मिळाले?’

मार्कंडेय ऋषींनी सांगितलं, ‘फार पूर्वी नंदनवनात (इंद्राची बाग) काय झालं होतं, ते लक्ष देऊन ऐका. इंद्र, अप्सरा आणि नारद या बागेत एकत्र भेटले. या नंदनवनात नारदांना असं दिसलं, की देवांचा राजा असलेला इंद्र अप्सरांच्या घोळक्यात आहे आणि त्याची नजर अप्सरांकडेच खिळलेली आहे. श्रेष्ठ नारदांना पाहताच इंद्र जागेवरून उठला आणि त्यानं अत्यंत आदरानं त्यांना आपलं आसन देऊ केलं. सर्व स्वर्गीय अप्सराही देवर्षींसमोर नतमस्तक झाल्या. ते सर्व जण नम्रपणे उभे होते. नारदांनी इंद्राचा गौरव केला आणि दोघेही बसून संवाद साधू लागले.

हा संवाद संपला, तेव्हा अप्सरांकडे हात करत इंद्र नारदांना म्हणाला, ‘यापैकी कोणालाही नृत्य करण्याचा आदेश द्या, तुम्हाला जी आवडेल ती निवडा- रंभा, कर्कशा, उर्वशी, तिलोत्तमा, घ्रिताची किंवा मेनका.’ इंद्राचं हे आवाहन ऐकून नारदांनी समोर अत्यंत नम्रपणे उभ्या असलेल्या अप्सरांकडं पाहिलं.

‘तुमच्यापैकी जी स्वत:ला सौंदर्य, गुण आणि औदार्य यांच्यात सर्वोत्तम समजते, तिने माझ्यासमोर नृत्य करावे.’ त्यांनी असे म्हणताच, सर्व जणी एकाच वेळी बोलू लागल्या. त्या एकमेकींना म्हणून लागल्या, ‘मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तू नाही किंवा तू पण नाही.’ इंद्राने त्यांचा वाद पाहिला आणि म्हणाला, ‘तुमच्यामध्ये श्रेष्ठ कोण याचा निवाडा नारदांनाच करू द्या.’

नारद उत्तरले, ‘ऋषींमध्ये श्रेष्ठ असलेले दुर्वास हे तपश्‍चर्या करत आहेत. त्यांची तपश्‍चर्या भंग करण्याची क्षमता जिच्यात असेल, तिला मी तुमच्यातील श्रेष्ठ समजेन.’ त्यांच्या या म्हणण्यावर सर्व अप्सरांनी नकारदर्शक मान हलविली. ‘‘तुम्ही जे सांगत आहात, ते करण्यास आम्ही असमर्थ आहोत.’ मात्र, वपु नावाची एक अप्सरा होती. आपण ऋषींचेही मन विचलित करू शकतो, असा तिला अभिमान वाटत होता.

ती म्हणाली, ‘‘दुर्वास ऋषींचे वास्तव्य जिथे आहे, तिथे मी जाईन. एखाद्या रथावर नियंत्रण मिळवावे, तसे त्यांनी आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवले आहे आणि अश्‍वांचे वेग आवरावे, तसे आपल्या संवेदनांना कह्यात ठेवले आहे. मात्र, प्रेमाच्या अस्त्रांनी आज त्यांचे हे नियंत्रण सैल होईल आणि ते एक शरीररथाचे अकुशल सारथी ठरतील. ब्रह्मा, जनार्दन आणि नीललोहित जरी आले, तरी मी मदनबाणाने त्यांच्या हृदयाचा वेध घेईन.’

असे म्हटल्यानंतर, वपुनं प्रलय पर्वत गाठला. ऋषींच्या तपश्‍चर्येच्या सामर्थ्यामुळे त्यांच्या आश्रमात येणारे हिंस्र पशूही पाळीव प्राण्यासारखे वागत. वपु अप्सरा ऋषी दुर्वासांपासून एक कोस अंतरावरच थांबली. कोकीळ पक्ष्याच्या आवाजात ती मधुर गायन करू लागली. ऋषींनी हा आवाज ऐकला आणि त्यांचे मन आश्‍चर्यात बुडून गेले. अप्सरा जिथे होती, तिथे ते गेले. ती आपला तपोभंग करण्यास आली आहे, हे समजताच ते संतापले.

अत्यंत तापसी असलेले ते महर्षी म्हणाले, ‘हे पापिनी ! तू इथे मला दु:खात टाकण्यासाठी आली आहेत. माझ्या तपश्‍चर्येत अडथळा आणण्याच्या इच्छेमुळे तू स्वत:वर आपत्ती ओढवून घेतली आहेस. तुला माझ्या क्रोधाचा परिणाम भोगावा लागेल. तू १६ वर्षांसाठी पक्षी योनीत जन्म घेशील. तू दुष्टबुद्धीने वागलीस. तुला तुझे स्वरूप सोडून द्यावे लागेल आणि पक्ष्याचे रूप धारण करावे लागेल. तू सर्व अप्सरांमध्ये भयंकर आहेस.

तुला चार पुत्र होतील. मात्र, तुझा एका शस्त्राने मृत्यू होऊन तू स्वर्गात जाशील आणि पुत्रांपासून तुला काहीच सुख मिळणार नाही.’ दुर्वास ऋषींचा संताप अनावर होता आणि त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. आपल्या थरथर कापणाऱ्या हातातील बांगड्यांच्या आवाजात, त्या गर्विष्ठ स्त्रीने हा शाप ऐकला. पुढं काय झालं ते आपण पुढील लेखात पाहू या.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

(लेखक हे पंतप्रधांनाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असून पुराणं आणि वेद तसेच त्यांचा भारतीय संस्कृतीचा अभ्यास आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना पटोलेंचं उत्तर; म्हणाले, महायुती...

Assembly Elections: महायुतीत जागावाटपाचा पेच वाढणार? देवेंद्र फडणविसांना पत्र, रामदास आठवलेंकडून 'इतक्या' जागांची मागणी

Nikki Tamboli : "ते सगळं फेक.." निक्की बनली अरबाजचं नातं तुटण्याचं कारण ? निक्कीकडूनच खुलासा

Ajit Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'ती' कृती अन् विधान;अजित पवारांना मान खाली घालून हसू आवरेना

"अभिनेत्रींनी चेहऱ्यावर बोटॉक्सचा भडीमार करणं चुकीचं" ; मर्डर फेम मल्लिका शेरावतने व्यक्त केली चिंता , कास्टिंग काऊचबद्दल म्हणाली

SCROLL FOR NEXT