water issue sakal
सप्तरंग

घेतला हुंडा तरी डोईवर हंडा आहेच...!

संदीप काळे saptrang@esakal.com

मी मराठवाड्यात परभणीहून नांदेडला जात होतो. प्रचंड ऊन होते. रस्त्यानं जागोजागी महिला अनवाणी पायानं डोक्यावर पाणी घेऊन ये-जा करताना मी पाहत होतो. राज्यातल्या अनेक शहरात नळाला येणारे पाणी दहा दहा दिवसाला येते. हे सर्वांना माहिती आहे. मात्र, ग्रामीण भागातल्या पाणीप्रश्नावर कुणी बोलायलासुद्धा तयार नाही.

रस्त्यावरच्या एका बाजूला महिला विहिरीतून पाणी काढत होत्या, ते विदारक चित्र पाहून मी जागेवर गाडी थांबवली. एक आजी आणि तिच्यासोबत पाच-सहा महिला होत्या. रस्त्याच्या एका कडेला असलेल्या विहिरीतून ‘त्या’ पाणी बाहेर काढत होत्या. हंडा भरला की नाला ओलांडून रस्त्यावर असणाऱ्या झाडाखाली तो हंडा ठेवला जायचा. नाल्याच्या वर असणाऱ्या इतर महिला तिथे आल्या. त्यांनी रिकामे हंडे ठेवून भरलेले हंडे तिथे ठेवले. मी गाडीच्या खाली उतरलो. तो नाला ओलांडून ज्या ठिकाणी त्या महिला पाणी भरत होत्या तिथे गेलो.

मी विहिरीत डोकावले तर विहिरीत फार कमी पाणी होते. एक माणूस तळाशी होता. तो आतून पाणी भरून हंडा दोरीने बांधून वर देत होता. मी तिथे जाऊन थांबलो. मी बाजूला असलेल्या महिलेला आता काहीतरी बोलावं या हेतूने म्हणालो, ‘मला पाणी प्यायला मिळेल का? खूप तहान लागली आहे.’

त्या बाईनं त्या झोपडीमध्ये बसलेल्या एका म्हाताऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवत तिकडे जा, असं सांगितलं. त्या म्हाताऱ्या माणसानं हंडा वर केला आणि माझ्या ओंजळीमध्ये पाणी टाकायला सुरुवात केली. तो म्हातारा माणूस दिवसभर त्या झोपडीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूला पाणी पाजण्याचं काम करतो, असे त्यांनीच मला सांगितले.

मी आजोबांना म्हणालो, ‘तुमच्याकडे पाण्याची खूप मोठी समस्या दिसते.’ ते म्हणाले, ‘ते आमच्या पाचवीला पिढ्यानपिढ्या पूजले आहे. कधी पाणी पडलं तर आभाळ फाटतंय, नाही पडलं तर दुष्काळानं माणसही मरतात.’ विहिरीतून पाणी काढणाऱ्या त्या माणसाचा आवाज आला. तो म्हणाला, ‘आता थोडा वेळ थांबा, आतमधले पाणी संपलेलं आहे.’ पाणी भरणाऱ्या आजीसोबत दोन सुना आणि तीन नात होत्या.

नाल्यावरून पाणी घेऊन गावाकडे जाणाऱ्या त्यासुद्धा आजीच्या नाती होत्या. आजीला दोन मुलं. त्या दोन मुलांना सात मुली. दोन मुलं नापास होऊन गावांमध्ये फिरतात. मुलींना बिचाऱ्यांना फार शिकू दिले नाही. या सहाही मुली आजीसोबत पाणी भरायचं काम करतात. आजीने माझ्याविषयी सगळी माहिती विचारली. पुढं त्या म्हणाल्या, माझ्या सगळ्या नातींचं लग्न करायचं आहे बाबा. आमचं पाहणंही सुरू आहे.

काही ठिकाणची स्थळ येत आहेत; पण हुंड्यासाठी ‘आ’ करून तोंड उघडत आहेत. हुंड्यासाठी निर्लज्ज असणाऱ्या लोकांकडे मुलगी द्यायची कशी, हा प्रश्न आहे. डोक्यावर हंड्याने पाणी न्यावे लागते.’ या विषयावरून आम्ही थेट हुंडा या विषयाकडं वळलो. बघता बघता आजींनी हुंड्याबाबत पंचक्रोशीत असणाऱ्या परिस्थितीवरही माझं लक्ष वेधलं. मी ऐकून हैराण झालो.

राज्यातल्या अनेक जिल्ह्यात आजींचे पाहुणे, तिथली हुंडा या विषयाला घेऊन करुण कहाणी मला त्या सांगत होत्या. पाणी वाटणारे आजोबा म्हणत होते, ‘ही परिस्थिती गावोगावी आहे. तुम्ही कुठेही जा. हुंडा पद्धती आजही त्या मुलीला आणि बापाला जगू देत नाही. बरं हुंडा कमी घेतला तर नेमकी अडचण कोणती आहे, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा समाज फार अवघड आहे.’

आजी म्हणाल्या, ‘या हुंड्यानं आमच्याकडं पिढ्यांच्या पिढ्या बरबाद केल्यात. मुलगी झाली की घरामध्ये सुतक असल्यासारखं वातावरण असतं. त्या मुलींचं शिक्षण, सामाजिक जबाबदाऱ्या, लग्न, लग्नानंतर तिला मुलं-बाळ होईपर्यंत ती कशी नांदेल, असे कितीतरी प्रश्न त्या बापाच्या भोवती असतात.

आजी पुढं म्हणाल्या, ‘मागच्या महिन्यामध्ये आमच्या गावात आणि बाजूच्या गावात चार मुलींनी आत्महत्या केल्या.’ मी म्हणालो, ‘का?’ आजी म्हणाल्या, ‘काय सांगावं बाबा, जो कोणी मुलगा मुलीला पसंत करून जायचा, जेव्हा सोयरीक व्हायची, तेव्हा हुंड्यासाठी खूप मोठी रक्कम सांगितली जायची. काही ठिकाणी हुंडा आम्हाला नको. सोनं करा, गाडी द्या, घर घेऊन द्या, अशा मागण्या व्हायच्या. शेतामध्ये काबाडकष्ट करून चार पैसे कमावणाऱ्या माणसांनी एवढं द्यायचं कुठून? मागच्या पंधरा वर्षांपासून तालेवंत असणारा शेतकरीसुद्धा अडचणीमध्ये आहे.’ आजी त्यांचा अनुभव सांगत होत्या.

आजीला मी पुन्हा त्या आत्महत्या केलेल्या मुलीच्या विषयावर नेत होतो; पण आजी काय खुलून बोलत नव्हत्या. त्या ते प्रसंग सांगायला गेल्या, की रडायच्या आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या महिला, मुलीही रडायच्या. आजी बोलता बोलता एकदम शांत झाल्या. तेव्हा पाणी देणारे आजोबा म्हणाले, ‘एका ठिकाणी मुलींनी आई-बाबाचा रात्री झोपतानाचा संवाद ऐकला.

त्या संवादानंतर त्या मुलींच्या लक्षात आलं, आपल्या लग्नामुळे आई-बाबा आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर आपणच का नाही आत्महत्या करायची. दुसऱ्या दिवशी मुलीने शेतामध्ये गळफास लावून घेतला.’ आमच्या गप्पा काही केल्या थांबत नव्हत्या.

तो विहिरीतून पाणी काढणारा माणूस विहिरीत डोकावत म्हणाला, ‘आता पाणी काढणं शक्य नाही. सूर्य डोक्यावर आला आहे. आपण संध्याकाळी पाणी काढू या.’ डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन आजी आणि त्यांच्या नाती जाण्यासाठी रस्त्याने निघाल्या. मीही त्यांच्याबरोबर गप्पा मारत जात होतो.

मी म्हणालो, ‘आजी जर या मुलींना हुंडा देऊन लग्न केलं, तर त्यांच्या डोक्यावरचा हंडा घ्यायचं थांबतं का?’ आजी म्हणाल्या, ‘छे छे, असे काही नाही. बाईच्या जातीला काम पाचवीला पुजलेले असते. हुंडा आणि हंडा हे दोन्ही विषय ग्रामीण भागातल्या बाईचा पिच्छा कधीच सोडत नाहीत.’

हुंड्यापायी गावात मोडणाऱ्या सोयरीक, आसपासच्या गावांत हुंड्यामुळं निर्माण झालेला खूप मोठा सामाजिक तणाव, यावर त्या सगळ्याच महिला आणि ते पुरुष माझ्याशी खूप आत्मीयतेने बोलत होते. मोठी नात वैशाली म्हणाली, ‘‘उच्च शिकलेली मुलं हुंड्याचा विषय आला की लपतात. मी एका मुलाला फोनवर विचारलं, ‘अहो, तुम्ही तर दोन डिग्री घेतलेले आहात. तुम्हाला असा हुंडा मागणे शोभते का?’’ त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘‘मी माझ्या दोन बहिणींना हुंडा दिला आहे ना.’ वैशालीचे बोलणे एकूण मी एकदम शांत बसलो होतो.

मी आजीला म्हणालो, ‘आजी, मी आता निघतो.’ तेव्हा आजी म्हणाल्या, ‘आमचे गाव जवळच आहे. चहा घ्यायला चला.’ मी नाही म्हणत सुन्न मनानं गाडीमध्ये बसलो. आपण म्हणतो, हुंडा पद्धती बंद झाली. काही भागात तर हुंडा घेतला जातच नाही; पण जबरदस्ती लग्न करून देण्याच्या नावाखाली, लग्नामध्ये सोनं नाणं देण्याच्या नावाखाली, थेट लाखोंच्या घरात मागणी करण्यात येणारा हुंडा हे सगळं काही आपल्याकडे राजरोसपणे सुरू आहे. आता हुंडा बंद झाला आहे, असं म्हणणाऱ्यांनी एकदा मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये डोकावून पाहायला पाहिजे. त्यांना हुंड्याच्या नागोबांनी किती फणा काढलेला आहे हे नक्की दिसेल ! बरोबर ना..?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT