matkasur tiger forest tadoba andhari tiger reserve animal care sanjay karkare sakal
सप्तरंग

मटकासुराची वरात!

अवतरण टीम

- संजय करकरे

१९ मार्च २०१९ ची सायंकाळ. मटकासुर वाघ जामनी चौकीजवळ आतील बाजूला जंगलात बसला होता. पावणेपाचच्या सुमारास तो तिथून उठून पांढरपौनीच्या दिशेने चालू लागला. २५-३० जिप्सी त्याची वाट बघत थांबल्या होत्या.

जसा तो झाडीतून बाहेर निघाला तसे जिप्सीचालकाने गाडी पुढे घेतली. वाघ पाणी न पिता जंगलातून थेट रस्त्यावर चालत आला. आम्ही पुढे आणि मटकासुर आमच्या गाडीच्या मागे चालत येत होता... त्याच्या मागे सर्व जिप्सी हळूहळू येत होत्या. ही पंधरा मिनिटांची वरात ताडोब्याच्या जंगलात निघाली होती...

गोष्ट एका वाघाची

8 डिसेंबर २०२१ ची संध्याकाळ. साधारणतः तीन वाजण्याच्या सुमारास ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मदनापूर बफर क्षेत्रातील गेटमधून आमची जिप्सी जंगलात शिरली होती. साडेचार-पावणेपाचपर्यंत जंगलातील सर्व  ठिकाणे बघून झाली होती; पण महाराजांचा काही पत्ता नव्हता. हिवाळ्याचे दिवस होते, त्यामुळे पाण्यावर प्राणी दिसण्याची शक्यता नव्हतीच.

जिप्सीमध्ये गार वारा अंगाला जाणवू लागला होता. झाडांच्या सावल्या लांब लांब होत होत्या. एवढ्यात समोरून येणाऱ्या एका जिप्सीने हातवारे करून ‘तो’ दिसल्याची खूण केली. चालक व गाईडच्या तत्काळ लक्षात आले आणि त्यांनी गाडी फिरवून एका योग्य जागी नेऊन उभी केली.

समोरचा रस्ता वनवे असल्याने आम्ही तेथे न शिरता, रस्त्याच्या बाजूला तिप्पट वर गाडी उभी केली. पाच मिनिटांच्या आतच वनवेतून वाघ चालत आमच्या दिशेने येत होता. त्याच्या साधारणतः ३०-४० फुटांवर मागे दोन-तीन जिप्सी होत्या.

आम्हाला एकदम लक्षात आले की तो मटकासुर वाघ आहे. आकाराने अत्यंत मोठ्या असणाऱ्या या वाघाला नाकाच्या बाजूला मोठी जखम झालेली दिसली. ती भळभळणारी जखम घेऊन चालणाऱ्या या देखण्या वाघाच्या वागण्यात एक त्रस्तपणा जाणवला.

त्याचे पोट काहीसे खपाटीला गेले होते.  कोपऱ्यावर वळताना बाजूच्या बांबूवर आपली हद्द दर्शवून त्याने रस्ता पार केला व तो डाव्या बाजूने जंगलात निघून गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट बांबू असल्याने आणि अंधार पडू लागल्याने मी फोटो काढण्याच्या भानगडीत न पडता केवळ या मटकासुराला बघत राहिलो.

ताडोबाच्या जंगलातील एका महत्त्वपूर्ण भागावरती राजेशाहीने वावरणाऱ्या या जबरदस्त ताकदवान वाघावर आलेली ही वेळ मला कमालीची अस्वस्थ करून गेली. आठवड्यापूर्वीच ताला नावाच्या एका वाघासोबत याची झुंज झाली होती आणि तरुण तालाने आपल्या तीक्ष्ण नख्यांचा प्रसाद मटकासुराच्या नाकावरती दिला होता. मटकासुराला मी काही पहिल्यांदाच बघत नव्हतो. अनेक वेळा त्याला जवळून बघितले होते. त्यामुळे त्याची ही दयनीय अवस्था मनाला टोचणारी होती.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रातील ताडोबा बीट हे वाघांसाठी जन्नत असणारी जागा आहे. भरपूर तृणभक्ष्यी प्राणी, ताडोबा तलावासह पांढरपौनीचे दोन तलाव आणि अनेक पाणवठ्यांनी ही जागा समृद्ध आहे.

२०११-१२ पासून या परिसरावर गब्बर वाघाने वर्चस्व मिळवले होते. २०१५-१६ पर्यंत त्याचे वर्चस्व येथे होते; पण त्यानंतर मटकासुर वाघाने आपल्या ताकदीवर हे क्षेत्र काबिज केले. मटकासुर वाघ कुठून आला, याबद्दल निश्चित माहिती नाही. मडकासुर नावाचा एक पाणवठा कोलारा बफर क्षेत्रात आहे.

या परिसरातून हा वाघ आल्याने त्याला मटकासुर हे नाव मिळाले. भरभक्कम शरीराचा, मोठ्या चेहऱ्याचा आणि बिनधास्तपणे रस्त्यावरून चालणाऱ्या या वाघाने २०२१ च्या मध्यापर्यंत ताडोबातील या क्षेत्रावर एकछत्री अंमल केला. या परिसरात असणाऱ्या अत्यंत देखण्या माया वाघिणीला तसेच छोट्या तारा या दुसऱ्या वाघिणीला सोबत घेऊन अनेक पिल्लांना जन्म दिला. माया वाघिणीवर त्याचे विशेष प्रेम होते.

मटकासुर म्हणजेच ‘टी ५८’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघाने आता पांढरपौनी, ताडोबा तलाव, जामुनबोडी, ९७ पाणवठा व वसंत बंधाऱ्यासह सर्व परिसरात जम बसवला होता. हा वाघ ऐन तारुण्यात असताना एक अनोखी घटना ताडोबाच्या इतिहासात घडली. या घटनेला अनेक पर्यटक साक्षीदार होते.

२८ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळच्या फेरीमध्ये जामुनबोडी पाणवठ्यावर सकाळी या वाघाचे दर्शन झाले होते. साहजिकच दुपारच्या फेरीमध्ये काही निवडक गाड्या या पाणवठ्यावर आल्या. जामुनबोडी हा मोठा नैसर्गिक पाणीसाठा आहे, इथे एक जांभळाचे झाड आहे. त्यामुळे त्याला जामुनबोडी हे नाव मिळाले आहे.

हा तलाव खोलगट भागात असल्याने सर्व पर्यटकांच्या गाड्या उंचावर थांबतात.  पावणेचारच्या सुमारास मटकासुर तेथे पर्यटकांना दिसला. हा तलावाच्या पाण्यात पाणी प्यायला बसला असतानाच त्याला समोरच्या बाजूने जंगलातून अस्वल येताना दिसले. या वाघाने पाण्यातून उठून सरळ अस्वलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

अस्वल झाडीत असतानाच मटकासुर सरळ त्या अस्वलाच्या अंगावर धावून गेला. अस्वलाची मादी व त्याचे पूर्ण वाढ झालेले पिल्लू असे दोघेजण होते. पिल्लाने मागे पळ काढला; तर मादी अस्वलाने सरळ वाघाचे आव्हान स्वीकारले आणि हे दोन्ही प्राणी समोरासमोर भिडले. जंगलात सुरू असलेली ही झटापट दूरवरून सर्व पर्यटकांना दिसत होती.

बलवान मटकासुर आणि त्याच्या निम्म्या आकाराच्या अस्वलाशी सुरू असलेली ही लढाई बघून अस्वलाचा लवकरच शेवट होणार हे सगळ्यांच्या लक्षात आले.  मटकासुराने जे काही डावपेच टाकले ते बघता अस्वलाचा निभाव लागणे कठीण वाटू लागले; मात्र अस्वलाने बचावासाठी आपली मान आणि तोंड पोटात घेतल्याने त्याचा एक चेंडू तयार झाला.

मटकासूरने सुरुवातीला त्याच्या मानेला आणि नंतर त्याच्या पाठीला जोरदार चावून, दोन्ही पायांनी दाबून त्याला गार करण्याचा प्रयत्न केला. अस्वलाच्या केसांमुळे मटकासुराची दाताची पकड सुटत होती. अस्वलही जोरदार त्वेषाने वाघाचे प्रत्येक डावपेच असफल करण्यासाठी प्रयत्न करीत होते.

काही वेळानंतर दोन्ही प्राणी आणि त्यांची ताकद समसमान वाटायला लागली. मटकासुर काहीसा थकल्याची जाणीव होऊ लागली. या क्षणाचाच फायदा अस्वलाच्या मादीने उचलला. ती त्वेषाने तोंड विस्फारत मटकासुरावर धावली. या वेळी मटकासुर अक्षरशः पळत तलावातील पाण्यात शिरला.

काही क्षण पाण्यात बसून तो जंगलात परत जाणाऱ्या अस्वलाच्या मागे पुन्हा गेला. या वेळेस पुन्हा ही अस्वलाची मादी या बलदंड वाघाच्या मागे त्वेषाने धावली. या अनोख्या झुंजीत या अस्वलाच्या मादीचा विजय झाला. ती जंगलात निघून गेली. हा व्हिडीओ यूट्युबवर पडल्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोलारा परिसरातील एका रिसॉर्टमधील नॅचरलीस्टने हा व्हिडीओ काढला होता. आजही पाच-सहा मिनिटांचा हा व्हिडीओ यूट्युबवर बघायला मिळतो.

१९ मार्च २०१९ च्या सायंकाळच्या फेरीत मी मटकासुराच्या रोड शोमध्ये सहभागी झालो होतो. हा वाघ जामनी चौकीजवळ आतील बाजूला जंगलात बसला होता. पावणेपाचच्या सुमारास तो तिथून उठून पांढरपौनीच्या दिशेने चालू लागला.

वाघ बाहेर निघेल या अनुषंगाने २५-३० जिप्सी त्याची वाट बघत थांबल्या होत्या. जसा तो झाडीतून बाहेर निघाला, तसे मी जिप्सीचालकाला गाडी पुढे घेण्यास सांगितले. याचा फायदा असा झाला, की हा वाघ पाणी न पिता जंगलातून थेट रस्त्यावर चालत आला.

परिणामी आम्हाला तो हेडऑन म्हणजेच आम्ही पुढे आणि वाघ आमच्या गाडीच्या मागे चालत अशा स्थितीत बघायला मिळाला. माझ्यासोबत बीएनएचएसचे तत्कालीन अध्यक्ष होते. आम्ही सर्वांनी मग या वाघाची वरात बघितली.

या वाघाच्या मागे सर्व गाड्या हळूहळू चालत येत होत्या. ही वरात पंधरा मिनिटे चालू होती. हा देखणा व रुबाबदार वाघ असा काही ऐटीत चालत होता, की त्याला आजूबाजूची काहीही फिकीर नव्हती. नंतर तो रस्ता सोडून जंगलात निघून गेला.

यानंतरही मी अनेक वेळा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघितले. माया वाघिणीपासून त्याला दोन पिल्ले होती. मीरा आणि सूर्या या नावाने ही पिल्ले ओळखण्यात येऊ लागली. यातील सूर्या हे नर पिल्लू मोठे झाल्यावर तेथून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड अभयारण्यात स्थलांतरित झाले. उमरेडमध्ये नंतर या सूर्याने आपले अस्तित्व आणि साम्राज्य उभे केले. आजही तो उमरेडच्या जंगलाचा बॉस आहे.

२०२१ च्या मध्यानंतर मटकासुराला धक्का देण्यासाठी ताला आणि रुद्रा या दोन तरुण वाघांची या परिसरात एन्ट्री झाली. यासोबतच छोट्या तारा वाघिणीपासून झालेले दोन नर वाघही आपल्या बापाला टक्कर देऊ लागले होते;

पण येथे ताला या वाघाने मटकासुराला जोरदार धक्का दिला. परिणामी मटकासुर कोलारा, मदानापूर बफरच्या दिशेने परागंदा झाला. मी त्याला २१ च्या डिसेंबरमध्ये मदनापूर बफरमध्ये बघितले होते. त्यानंतर तो या परिसरात पाळीव जनावरे मारत असल्याचे समजत होते. या परिसरातील शेतातही फिरत असल्याचे त्याचे फोटो बघितले. २२ च्या पावसाळ्यानंतर मटकासुराचा पत्ता नाही.

साधारणपणे तीन-साडेतीन वर्षे मटकासुर या वाघाने ताडोबात जो काही दरारा निर्माण केला तो अनोखा असाच होता. त्या काळात अनेक पर्यटकांचा तो आवडता वाघ होता. ज्या वेळेस ताडोबातील एका वनमजुराला जंगलात नैसर्गिक विधीसाठी गेला असताना मारण्याची घटना घडली, त्या वेळेस माया आणि मटकासुर यांच्याकडे बोट दाखवले गेले. मात्र या वाघाने त्याच्या आयुष्यात कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही. याउलट पर्यटकांच्या गळ्यातला ताईतच तो बनला होता.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)sanjay.karkare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT