meenakshi sheshadri sakal
सप्तरंग

नृत्य शिकवते जगण्याची भाषा!

दरवर्षी २९ एप्रिल जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. नृत्य अनोखं आंतरिक समाधान देतं. नृत्य तुम्हाला जगण्याची भाषा शिकवतं.

अवतरण टीम

- मीनाक्षी शेषाद्री

दरवर्षी २९ एप्रिल जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. नृत्य अनोखं आंतरिक समाधान देतं. नृत्य तुम्हाला जगण्याची भाषा शिकवतं. शरीराबरोबर मनही फिट करतं... नामवंत नृत्यांगना आणि ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी साठीत पदार्पण केलं असलं तरी आजही तरुणाईच्या ऊर्जेने त्या वावरतात. नृत्य दिवसानिमित्त त्यांनी व्यक्त केलेल्या भावना.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खास गोष्ट असते आणि आपल्या मनात तिच्याविषयी फारच महत्त्वाचं स्थान असतं. माझ्या तना-मनात नृत्य वसलं आहे. आज मी जी काही आहे, ती नृत्यामुळेच. नृत्य अशी कला आहे, जी तुम्हाला आंतरिक समाधान देते, शारीरिक-मानसिक ऊर्जा देते, संस्कृतीचा जागर करते, एक प्रेरणा देते, आत्मविश्वास वाढवते, मनोरंजन करते आणि भावना व्यक्त करण्याची अनुभूती देते...

मला लहानपणापासूनच नृत्याचे बाळकडू मिळत गेले. केवळ नृत्यच नव्हे; तर गायन आणि अभिनयही मी माझ्या बालपणापासून बघत आले आहे. त्याच वातावरणात मी वाढले. मी साडेचार वर्षांची असतानाच माझा पहिला नृत्याचा कार्यक्रम केला. माझी आई स्वतः नृत्य शिकवायची. गाणंदेखील शिकवायची. साहजिकच नृत्याची आवड माझ्यात आपसूकच निर्माण झाली.

माझ्या कुटुंबाने माझ्यावर त्याबाबत कुठलीच जबरदस्ती केली नव्हती. माझी आई जेव्हा नृत्य शिकवायची तेव्हा मी अगदी शेवटच्या रांगेत उभी राहून तिच्या विद्यार्थ्यांना बघून त्यांच्या स्टेप्स कॉपी करायचे. माझ्या आईने ते पाहिलं आणि ‘तुला माझ्याकडून नृत्य शिकायला आवडेल का,’ असा प्रश्न विचारला... इथून पुढे माझ्या नृत्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

मी हिंदुस्तानी शास्त्रीय नृत्याच्या चार शैली शिकले आहे. भरतनाट्यम्‌, कुचीपुडी, कथ्थक आणि ओडिसी. माझी सगळ्यात आवडती नृत्यशैली म्हणजे ओडिसी. त्यात एक वेगळीच काल्पनिक सुंदरता आहे. खूप आकर्षक अशी नृत्यशैली आहे. खरं तर मला सगळ्याच प्रकारचं नृत्य आवडतं. मी नृत्याचे अनेक कार्यक्रमही केले आहेत. भरतनाट्यम्‌, कुचीपुडी आणि कथ्थकचं सादरीकरण मी जास्त केलं आहे. मी आजही माझी नृत्याची आवड जोपासते. सोशल मीडियावर माझे डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. चाहत्यांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असतो.

भावना व्यक्त करण्याचं माध्यम!

आपल्याला एखाद्या गोष्टीची किंवा कलेची आवड असेल तर ती आपण नक्कीच जोपासायला हवी, असं मला वाटतं. कारण त्याने आपलं मनही प्रफुल्लित राहतं. नृत्य कोणत्याही प्रकारचं असो, त्याने एक आनंद आपल्याला मिळत असतो. आपण मनोरंजन व आनंद साजरा करण्यासाठी नृत्य करतो; पण ते फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. नृत्याचे अनेक शारीरिक फायदेदेखील आहेत.

मनोरंजनाचा एक भाग म्हणून नृत्याकडे पाहिलं जात असलं तरी त्यासाठी अधिक प्रमाणात शारीरिक क्षमता लागते. मनसोक्त नाचण्याने मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. नृत्य म्हणजे शिस्त, चांगला दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि मनोरंजन... एक चांगला नृत्यप्रेमी अशा सर्व गोष्टी आत्मसात करतो. मला मनापासून वाटतं, की नृत्य प्रत्येक परिस्थितीत दृढ राहून स्वतःला पुढे नेण्यासाठी मदत करत असतं.

नृत्य म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचाच नव्हे; तर संबंधित संस्कृतीचा आत्मा असतो. नृत्यावरून त्या संस्कृतीचा अंदाज लावता येतो. आपल्या शरीराच्या माध्यमातून विविध भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. मलाही नृत्यामुळे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करता आल्या. नृत्यामुळे माझं आयुष्य नेहमीच आनंदी राहिलं. नृत्य आपल्याला दैनंदिन चिंतांपासून दूर राहण्यास मदत करतं.

शरीराबरोबर मनही फिट

सध्या ‘डान्स फॉर फिटनेस’चा मोठा ट्रेण्ड आहे. दररोज जिमला जाऊन तोच तो व्यायाम करण्यापेक्षा नृत्यातून मिळणारा आनंद शरीराबरोबर मनालाही फिट ठेवत असतो. सध्या ‘झुंबा’ डान्स प्रकार खूप ट्रेण्डमध्ये आहे. एक व्यायामाचा भाग म्हणून सगळे जण ‘झुंबा’ करतात. त्यातही अनेक प्रकार असतात. व्यायामासोबत डान्स असेल तर त्याची मजा अधिकच वाढते. अमेरिकेत असताना मीही ‘झुंबा’ क्लासला जायचे. सगळ्यांसोबत एकत्र मिळून डान्स करण्याचा आनंद लुटला.

शास्त्रीय नृत्याची जगाला मोहिनी

आपल्या भारतातील शास्त्रीय नृत्य देशभरातच नव्हे; तर संपूर्ण जगभरात पोहोचलं आहे. आपल्या देशातील अनेक नर्तक शास्त्रीय नृत्यकलेत पारंगत आहेत. इतर देशांत जाऊन ते आपल्या नृत्यकलेचं अप्रतिम सादरीकरण करत आहेत. विशेष म्हणजे, परदेशी व्यक्ती आपल्या देशातील शास्त्रीय नृत्यकलेच्या प्रेमात असून अनेकांना ती शिकण्याबाबत आवड निर्माण झाली आहे. आज कित्येक जण आपल्या देशात येऊन शास्त्रीय नृत्यकला शिकून जातात.

माझ्या लग्नानंतर मीदेखील अमेरिकेत स्थायिक झाले आणि तिथे डान्स ॲकॅडमी सुरू केली. आपणही इतर देशांतील नृत्यकला आत्मसात करत आहोत. मला मनापासून असं वाटतं, की एखाद्या कलेचं आदान-प्रदान होत असेल तर त्याहून चांगली गोष्ट कुठलीच नाही. एखाद्या दुसऱ्या देशाची कला आपण शिकतो. आपली कला इतर देशवासीयांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप होतो आणि ती खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे.

चित्रपटजगताचा अविभाज्य भाग

चित्रपट जगतात नृत्य आणि संगीताला खूप महत्त्व आहे. त्याशिवाय ती अपूर्ण आहे. डान्स आणि म्युझिक तिचा अविभाज्य भाग आहे. माझ्या काही चित्रपटांतील गाणी खूप लोकप्रिय झाली. ‘मेरी जंग’मधील ‘ए मेरे ख्वाबों के शहजादे...’, ‘हिरो’ चित्रपटातील ‘निंदिया से जागी बहार...’ अन् ‘प्यार करनेवाले...’ आणि ‘शहेनशाह’मधील अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं ‘जाने दो मुझे जाना हैं’ गाणं त्या वेळी प्रचंड गाजली.

सर्वच गाण्यांना संगीताबरोबर नृत्याची एक वेगळीच किनार होती. आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत. मला आनंदाने सांगावंसं वाटतं, की माझ्या प्रत्येक गाण्यात वेगवेगळी नृत्यशैली होती. कधी क्लासिकल; तर कधी वेस्टर्न डान्स अशी वेगवेगळी नृत्यशैली मला अनुभवता आली. प्रत्येक वेळी मला खास तयारी करावी लागायची. त्याकरिता मेहनत घ्यावी लागायची; पण त्यातही एक वेगळा आनंद होता.

सध्या वेस्टर्न डान्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. कधी कधी वेस्टर्न आणि क्लासिकला असे प्रकार एकाच वेळी नृत्यात पाहायला मिळतात. मला आजही आठवतं, मी मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत ‘मैं बलवान’मध्ये काम केलं होतं. त्यातील एका गाण्यात आमचा ब्रेक डान्स होता.

माझ्यासाठी ते आव्हान होतं. मी सरोज खान यांच्यासोबत तालीम केली. तो अनुभव माझ्यासाठी खूप नवीन होता; कारण मला ब्रेक डान्सबद्दल काहीच माहिती नव्हतं. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत जे शास्त्रीयसोबत दुसऱ्या नृत्य प्रकारातही पारंगत आहेत. जसं वैजयंतीमाला, माधुरी दीक्षित... अशा अप्रतिम नृत्य करणाऱ्या आणि त्यासोबतच सुंदर अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आपल्याकडे आहेत ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे.

आज मी जे काही आहे ते माझ्या नृत्याच्या आणि अभिनयाच्या कलेमुळे. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी माझ्या नृत्यासाठी संपूर्ण योगदान दिले आहे आणि यापुढेही देत राहीन. नृत्य म्हणजे माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक... नृत्य एका कवितेसारखं आहे आणि त्याची प्रत्येक हालचाल म्हणजे शब्द...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT