mental health music therapy human body 7 chakra energy Sakal
सप्तरंग

मानसिक आजारावर संगीतोपचार

आपल्यासारख्या सामान्य माणसांना शरीर हे श्वासावर चालतं एवढं नक्कीच माहीत असतं. श्वास थांबला म्हणजे सर्व थांबतं.

सकाळ वृत्तसेवा

- किरण फाटक

आपलं शरीर हे सात ऊर्जाचक्रं, पाच प्राण (प्राण, अपान, व्यान, उदान, समान), तीन नाड्या (चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्नानाडी), हजारो ग्रंथी, ग्रंथीतून झरणारे अनेक स्राव यांच्या शिस्तबद्ध संचलनानं चालत असतं. आपल्यासारख्या सामान्य माणसांना शरीर हे श्वासावर चालतं एवढं नक्कीच माहीत असतं. श्वास थांबला म्हणजे सर्व थांबतं.

संगीतोपचार अर्थात म्युझिक थेरपी हा शब्द आज-काल बऱ्याच जणांना सुपरिचित असा झाला आहे. संपूर्ण जगभरात ही थेरपी वापरण्यात येते.

परंतु भारतात या थेरपीचा म्हणावा तितका प्रसार आणि प्रचार झालेला असावा, असे मला वाटत नाही. संगीतोपचार म्हणजे विविध प्रकारच्या संगीताने केलेले उपचार. हे उपचार माणसाच्या मानसिक आणि शारीरिक दुर्बलतेला भरून काढतात.

माणूस हे वैश्विक शक्तीनं बनविलेलं एक अद्वितीय, अनाकलनीय असं यंत्र आहे असे म्हणावे लागेल.

अजूनही शरीरातील बऱ्याचशा भागातील घडामोडी या शास्त्रज्ञांच्या बुद्धिपलिकडच्या आहेत. त्यातून माणसाच्या मेंदूची जडणघडण आणि एकंदरीत मेंदूचे चलनवलन कसे असते, याचा सविस्तर आढावा अजून कोणीही घेतलेला नाही.

बहिणाबाई म्हणतात, "जन्म मरण, एका श्वासाचे अंतर". श्वास थांबला की माणसाचं अस्तित्व संपतं. आपण हा श्वास नाकाच्या दोन नाकपुड्यांनी घेत असतो. या श्वास घेण्याच्या क्रियेस नाडी असं म्हटलं जातं.

डाव्या नाकपुडीने जो श्वास घेतो, त्यास चंद्रनाडी आणि उजव्या नाकपुडीनं जो श्वास घेतो त्यास सूर्यनाडी असं संबोधलं जातं. आणि याव्यतिरिक्त एक काल्पनिक अशी नाडी म्हणजे सुषुम्नानाडी. या तीन नाड्या आपल्या पूर्ण शरीरावर ताबा ठेवून असतात.

या तीनही नाड्या जिथं जिथं एकमेकांना ओलांडून जातात, तिथं तिथं एक ऊर्जा चक्र तयार होतं. पुढं जाण्याअगोदर आपण ऊर्जा म्हणजे काय ते समजावून घेऊ या. माणूस बरेच काम केल्यावर दमून जातो. म्हणजे नक्की काय होतं ?

तर त्याचं शरीर चालवणारी ऊर्जा तो दिवसभर काम करून खर्च करतो. ऊर्जा म्हणजे शरीर चालण्यासाठी लागणारे इंधन. ऊर्जा ही कधी आपल्याला दिसत नाही. उदा. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज तारांतून जात असताना आपण पाहू शकत नाही.

तीच वीज तारांतून घरामध्ये आली आणि त्या विजेच्या सामर्थ्याने लाइट पेटून उजेड झाला, पंखे फिरू लागले, वॉशिंग मशीन चालू झाले, मिक्सर आपले काम करू लागला, की आपल्याला तिथे ऊर्जा असल्याचे कळते.

आपण फक्त म्हणतो, की हा माणूस उत्साही आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये ऊर्जा ही पुरेपूर भरलेली असते. मग ती ऊर्जा त्याला कुठून बरे मिळते ? तर ती ऊर्जा त्याला अन्नातून मिळते. परंतु अन्नातून मिळणारी ऊर्जा ही पुरेशी नसते.

ऊर्जा ही अनेक गोष्टींतून माणसाला मिळत असते. त्यामध्ये सूर्याचा प्रकाश आहे, चंद्र चांदणे आहे, फुलाचा सुगंध आहे, वाऱ्याची मंद झुळूक आहे, कोणाचा तरी कौतुकाचा शब्द आहे, सुरेल आणि शांती देणारे संगीत ऐकणे आहे, आपण काहीतरी चांगले केल्याचे समाधान आहे.

आज ही ऊर्जा आपल्याला मिळते का ? सकस अन्न आपण खातो का ? सूर्यप्रकाशात जातो का ? चंद्र चांदणे बघतो का ? वाऱ्याची मंद झुळूक अनुभवतो का ? वेगवेगळे फुलांचे सुगंध अनुभवतो का ? चांगले संगीत शांतपणे, संयम ठेवून ऐकतो का ? या सर्व प्रश्नांचे उत्तर बऱ्याचशा माणसांच्या बाबतीत नकारार्थीच येईल असे मला वाटते.

आजची जीवनशैली ही अतिशय वेगवान झालेली असल्यामुळे आणि बऱ्याच माणसांचा वेळ हा ऑफिसमध्ये असलेल्या एयर कंडिशन रूम मध्ये जात असल्यामुळे त्यांना सूर्यदर्शन होत नाही. टॉवर संस्कृतीमुळे निसर्गाबरोबरचा संवाद हरवत चालला आहे.

काँक्रिटचे जंगल असे या मोठमोठ्या उंच उंच बिल्डिंगना आपण म्हणतो. खऱ्या खुऱ्या जंगलाचा आणि पर्यावरणाचा आपण ऱ्हास करत असतो. पर्यावरणाचा आणि निसर्गाचा गेलेला तोल ही आजची सगळ्यात मोठी समस्या बनून राहिली आहे.

आज-कालच्या संगीताबद्दल म्हणायचं झालं, तर बरेचसे संगीताचे प्रकार हे ध्वनी प्रदूषण करीत असतात. मोठ्या आवाजात लावलेली थिल्लर गाणी आणि डीजेचा आवाज आज-काल लोकांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम करीत असतात.

चांगले संगीत ऐकायला आज-काल लोकांना वेळ नाही आणि संयमही नाही. त्यामुळे संगीतातूनही ऊर्जा माणसास मिळत नाही. ऊर्जा कमी पडली, की रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी कमी होत जाते आणि माणूस अनेक रोगांना बळी पडत जातो.

आता आपण पुन्हा ऊर्जाचक्रांकडे वळू या. ऊर्जाचक्र म्हणजे, जिथे ऊर्जेचा स्रोत जिवंत असतो असे ठिकाण. या ठिकाणी ऊर्जा शोषली जाते आणि बाहेर फेकली सुद्धा जाते. अशी एकूण सात ऊर्जाचक्रे आपल्या शरीरात असतात असे प्राचीन ग्रंथ सांगतात. ऊर्जाचक्रे ही दिसत नाहीत परंतु जाणवतात.

ही ऊर्जाचक्रे सात असतात.

१) मूलाधार : हे आपल्या शरीरात बैठकीच्या ठिकाणी असते. (स्वर सा)

२) स्वाधिष्ठान: हे आपल्या लिंगाच्या थोडे वर असते. (स्वर रे)

३) मणिपूर : हे आपल्या बेंबीच्या थोडे वर असते. (स्वर ग)

४) अनाहत : हृदयामध्ये. (स्वर म)

५) विशुद्ध : आपल्या गळ्याजवळ असते. (स्वर प)

६) आज्ञा : दोन भुवयांमध्ये असते. (स्वर ध)

७) सहस्रार: आपल्या मेंदूच्या वरच्या भागात असते. (स्वर नी).

ज्या ज्या चक्रांना पुरेशी ऊर्जा मिळत नाही, त्या त्या चक्रांच्या आजूबाजूच्या अवयवांमध्ये एखादा रोग निर्माण होण्याची शक्यता असते. भारतीय शास्त्रीय संगीतात, रागसंगीत हे संगीतोपचारासाठी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त मानले गेलेले आहे.

राग संगीत हे संगीतोपचारासाठी योग्य आणि उचित आहे, असे सर्व जगाने मान्य केले आहे. रागसंगीतातील स्वरांच्या अभिसरणाने सौरऊर्जा ही पूर्ण शरीरातून, सप्तचक्रांमधून फिरते. त्यामुळे सप्तचक्रांमध्ये ही ऊर्जा शोषली जाते आणि ती चक्रे भक्कम आणि संतुलित होत जातात.

शास्त्रीय संगीतातही एकूण मुख्य असे सात स्वर असतात. त्यांची नावे १) सा, २) रे, ३) ग, ४) म, ५) प, ६) ध, ७) नी. आणखी पाच विकृत स्वर असतात. (कोमल रे , कोमल ग, तीव्र म, कोमल ध, कोमल नी) असे सर्व मिळून बारा स्वर असतात. जे मुख्य बारा स्वर असतात, त्याच्या पैकी एक एक स्वर हा प्रत्येक चक्रासाठी उपयुक्त ठरणारा असतो. असे प्रयोगांती सिद्ध झालेले आहे.

राग संगीतात प्रत्येक रागात दोन मुख्य स्वर असतात. या स्वरांचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे सविस्तर दाखविण्यासाठी राग निर्माण झालेला असतो. हे दोन मुख्य स्वर एकमेकांशी संवाद करणारे असतात. या दोन स्वरांना संगीतातील परिभाषेत वादी आणि संवादी असे म्हणतात. रागातील इतर स्वर हे या दोन स्वरांचे व्यक्तिमत्त्व आणि महत्त्व कसे आहे, हे विशद करतात.

ज्याप्रमाणे रासक्रीडेमध्ये नाचणाऱ्या अनेक गोपगोपिकांमध्ये कृष्ण हा मध्यभागी उभा राहून बासरी वाजवीत असतो. त्याचप्रमाणे इतर स्वरांच्या वलयामध्ये वादी आणि संवादी हे दोन स्वर उभे असतात. हे दोन स्वर त्या त्या ऊर्जाचक्राला स्वरऊर्जा देत असतात.

जेव्हा गायन आणि वादन हे सादर केले जाते, त्या वेळी तो गायक किंवा वादक एखादा राग सादर करतो. त्या रागाच्या वादी आणि संवादीभोवती रागातील इतर स्वरांची गुंफण करत जातो. याला मी स्वरांचे अभिसरण असे म्हणतो. हे स्वरांचे अभिसरण त्या त्या चक्राला ऊर्जा प्रदान करतात.

पहिला स्वर "सा" हा मूलाधार चक्राला, दुसरा स्वर्ग "रे" हा स्वाधिष्ठान चक्राला, तिसरा स्वर "ग" हा मणिपूर चक्राला, चौथा स्वर "म" हा अनाहत चक्राला, पाचवा स्वर "प" हा विशुद्ध चक्राला, सहावा स्वर "ध" हा आज्ञा चक्राला आणि सातवा "नी" हा स्वर सहस्राचक्राला स्वरऊर्जा देत असतो.

ताल वाद्यांवरचे (तबला, पखवाज, मृदंग इत्यादी) सर्व ताल आणि या वाद्यांचा नियमित आणि श्रवणीय नाद मूलाधार चक्राला संतुलित करतो. शरीरातील हजारो ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावावरच्या असंतुलनामुळे शरीरात हजारो रोग उत्पन्न होऊ शकतात. शरीरातील हजारो ग्रंथींतून स्रवणाऱ्या स्रावाचे संतुलन करण्यासाठी विविध रागसंगीत उपयोगी ठरते, असे संगीतोपचार अभ्यासकांचे मत आहे.

राग "बागेश्री" आणि "भीमपलासी" हे थकलेल्या मनाला पुनर्जीवित करतात, उत्साह देतात आणि दमणूक विसरायला लावतात. हा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. "दरबारी कानडा", " बिहाग" हे राग चलबिचल झालेल्या आणि तणावग्रस्त मनाला शांती प्रदान करतात, हा सुद्धा अनुभव घेतलेला आहे. "यमन" हा राग निराशा दूर करून मनात नवचैतन्य भरतो.

माणसाचे मानसिक आजार हे माणसाला शारीरिक आजारांकडे घेऊन जातात. मानसिक आजार हे चिंता, विवंचना, भीती, काळजी, दडपण, अति विचार यामुळे होतात. भारतीय शास्त्रीय संगीत हे मनाशी निगडित असल्यामुळे मानसिक रोगांवर उपयुक्त ठरते. आज पूर्ण जग भारतीय शास्त्रीय संगीताकडे "संगीतोपचार" म्हणून मोठ्या आशेने पाहत आहे.

यात संगीतोपचार करणाऱ्या व्यक्तीला संगीतावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास हवा आणि त्याचप्रमाणे संगीतोपचार घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा या उपचाराबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास वाटायला हवा.

असे झाले तरच संगीत उपचार घेणाऱ्या व्यक्तीला याचा फायदा होऊ शकतो. यासाठी शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार होणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व संगीत प्रेमी, संगीत शिक्षक आणि संगीत रसिक यांनी यात सहभाग घेऊन, जर शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यात हातभार लावला, तर नक्कीच शास्त्रीय संगीत हे घराघरापर्यंत पोहोचेल आणि त्याचा उपयोग हा रोग निवारणासाठी होऊ शकेल. असे मला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

SCROLL FOR NEXT