Conservation of forests sakal
सप्तरंग

विसरल्या जाती, वितळल्या पाती

अन्यायातून मुक्ती, वनांचे संवर्धन, पाण्याचे व्यवस्थापन किंवा ग्रामसभेची घडी लावणं असो... यात वैश्विक मानवी मूल्ये सर्वांची एकच असतात. माणसं माणसं म्हणून एकत्र येतात.

मिलिंद थत्ते

अन्यायातून मुक्ती, वनांचे संवर्धन, पाण्याचे व्यवस्थापन किंवा ग्रामसभेची घडी लावणं असो... यात वैश्विक मानवी मूल्ये सर्वांची एकच असतात. माणसं माणसं म्हणून एकत्र येतात. विश्वस्वधर्मसूर्ये पाहो, अशीच प्रार्थना असते. शब्द कोणतेही असोत, नैवेद्य कोणताही असो, प्रार्थनेचा भाव तोच. एका ध्येयासाठी, एका ध्यासासाठी- अरे दिल क्या जान भी दे देंगे- अशी भावना निर्माण झाली, की त्या समूहात कसलेच भेद राहू शकत नाहीत. जात कळली तरी मैत्री होऊ शकते. चांगली घट्ट जीवाभावाची मैत्री करायला जात मुळीच आड येत नाही.

मेळघाटात म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या दोन तालुक्यांत कोरकू जमातीचे लोक राहतात, ही माहिती तुमच्यापैकी अनेक लोकांना असेल; पण कोरकू शब्दाचा अर्थ माहीत आहे का? कोरकू भाषेत कोरकू या शब्दाचा अर्थ माणसं असा आहे. कोरई म्हणजे माणूस आणि त्याचे अनेक वचन कोरकू. म्हणजे कल्पना करा की, या भागात एखादा इंग्रज अधिकारी किंवा मानववंशशास्त्री १९व्या शतकात पोचला असेल. त्याने लोकांना विचारले असेल, तुम्ही कोण? लोकांनी त्यांच्या भाषेत सांगितले असेल, ‘आम्ही माणसं’ (इञा कोरकू)... आणि गोऱ्या साहेबाने त्याला जमातीचे नाव समजून कोरकू लिहिले. कोया या जमातीचेही असेच आहे, त्यांच्या भाषेत कोयाचा अर्थ माणूस आहे.

जात तुमच्या नाकासारखी. नाक धारदार आहे म्हणून अभिमान बाळगायचा किंवा नाक नकटं आहे म्हणून लाज बाळगायची, हे जसं मूर्खपणाचं आहे, तसंच जातीचा अभिमान आणि लाज दोन्ही मूर्खपणाचं आहे. हे ज्याला कळलं तर दुसऱ्याच्या जातीचा द्वेष न करता मैत्री करता येते. जातीप्रमाणेच कुठल्या कुळात, वंशात जन्म झाला ती ‘पात’. या जाती-पातीने काहीही फरक पडत नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव दोन ठिकाणी घेता येतो. एक मुंबईतले तुफान वेगवान जीवन, दोन आमच्या जव्हार-मोखाड्यातल्या गावांतले शांत जीवन. यातल्या पहिल्या ठिकाणी मी राहत होतो आणि तिथून थेट दुसऱ्या ठिकाणी पोचलो.

१९९९ मध्ये बोरिवलीहून एसटी बसने जव्हार आणि तिथून आणखी एका बसने चालतवड गाव असा माझा पहिला प्रवास होता. त्यानंतर गावागावांमध्ये कधी पायी, कधी एमएटीवर, कधी बसने फिरणे सुरू झाले. ज्या गावांमध्ये रस्ताच नव्हता, तिथे बाहेरचा कोणी माणूस येऊन मुक्कामाला राहिला हेच नवलाईचे होते. हळूहळू भाषा शिकलो, जीवनशैलीही सवयीची झाली. भाजलेला सुका बोंबिल तिखट-मिठाबरोबर कुटायचा आणि त्या चटणीबरोबर मिटक्या मारत भात/भाकरी जे मिळेल ते खायचं, या मेजवानीची सवय झाली. भाषा तर इतकी सवयीची झाली, की एकदा मुंबईतल्या आरे कॉलनीतल्या एका पाड्यात गेलो असताना तिथल्या एका महिलेने माझे बोलणे ऐकून विचारले, तू जव्हारचा का?

आम्ही कार्यालय (म्हणजे लोकांच्या दृष्टीने घर) बांधल्यानंतर प्रकाशचा बाबा, गावचा काठ्या, भगत्या, आणखी एक-दोघे वडील माणसे आली. त्यांनी घराच्या आग्नेय कोपऱ्यात चूल बांधली आणि तिथे एक कोंबडा कापला. शेंदूर वाहिला, तांदळाच्या नऊ राशी करून देवाला आवाहन केले. मग कोंबडा भाजून सर्वांना नैवेद्य वाटला. अशी वास्तुशांत झाली. मला कुठल्याही गावात कधी कोणी जात विचारली नाही. काही वेळा लोक ‘कुळी’ (म्हणजे गोत्र) विचारत.

लग्न लावण्याचे काम करणारी माणसे वेगवेगळ्या पाड्यांमध्ये होती. या माणसांना लोक बाम्हन म्हणत. ते काम करण्याला बाम्हन असे नाव होते, जातीला नाही. सर्वसाधारण माणसे जिथे जातीचा विचार करत नाहीत, अशा समाजात आम्ही इतकी वर्षे काम करत आहोत. स्थानिक लोकांना एकमेकांची जात माहीत नसते, असे मुळीच नाही. सर्वांना माहीत असते; पण त्यामुळे आपोआप काही द्वेष निर्माण होत नाही. आंतरजातीय लग्नांत मुला-मुलीची मान्यता असेल, तर समाजमान्यता सहज मिळते. इथल्या लोकांनी जेव्हा सैराट बघितला, तेव्हा त्यांना ते फारच कपोलकल्पित वाटले.

माझे अनेक मित्र-मैत्रिणी असे आहेत की, ते म्हणतात आडनावावरून जात कळते; मग आडनाव लावायचेच कशाला? माझा अनुभव असं सांगतो की, जात कळली तरी मैत्री होऊ शकते. चांगली घट्ट जीवाभावाची मैत्री करायला जात मुळीच आड येत नाही. एकमेकांच्या डब्यात बिनदिक्कत हात घालून खायचं, एका ताटात सर्रास जेवायचं, एकाच ध्यासासाठी घाम गाळायचा, हे करायला जात आड येत नाही. एकमेकांच्या घरी, लग्नात, सुतकात, वेगवेगळ्या रीती असल्या तरी भावनेने एकात्म होता येते. एका कार्यकर्त्याच्या घरच्या उत्सवात इतरांनी कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे राहिलेले मी अनेकदा पाहिले आहे.

खळ्यावरचा देव एका कुटुंबाचा एक असतो. त्या कुटुंबातले ज्येष्ठ पुरुष सहा महिन्यांचे व्रत घेतात. नव्याने उगवलेले सर्व खाद्य वर्ज्य करतात. त्या व्रताचे उद्यापन करताना मोठे जागरण आणि पूजा होते. त्या वेळी जवळचे कुटुंबीय व्रतधारी व्यक्तींना स्वतः घास भरवतात. बाबल्या तुंबडांच्या घरच्या पूजेला मीही त्यात होतो. ना त्यांना ना मला कुठला भेद वाटला. डोयापाड्यातल्या लोकांनी जंगल वाचवायला घेतल्यावर काही संकटे येत होती. तेव्हा लोक एक नवस बोलले होते - देवाला बोकड द्यायचा. पुढे ती संकटे दूर झाल्यावर फेडायला लोकांनी मला आणि ‘वयम्’च्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावले. बोकड देऊन त्यांनी तो नवस फेडला; पण त्या पूजेत त्यांना आम्ही सारे हवे होतो. आपला नवस आहे म्हणून.

आमच्यासोबत काम करणारा एक गडचिरोलीतून आलेला तरुण इंजिनिअर कार्यकर्ता होता. एकदा त्याची मोटरसायकल भरपावसात उतरत्या रस्त्यावरून घसरली आणि एक शाळकरी मुलगा जखमी झाला. त्या अपघाताचे निमित्त करून काही राजकीय प्रेरित लोकांनी यात जातीवाद आणला. बाहेरच्या जातीतल्या माणसाने आमच्या जातीतल्या मुलाला उडवला. अशी अफवा पसरली. पोलिस स्टेशनला गर्दी झाली, मारहाणीचे प्रयत्न झाले. त्या वेळी आमच्या एका गावातले काही जण वाद घालणाऱ्यांना समजावू लागले, अरे तो बाहेरून आलेला असला, तरी आपल्यातलाच आहे. तुम्ही अशी भाषा का करता? जातीवरून असे वाद घालता-पेटवता येतात, हे आमच्या सामान्य माणसांच्या गावीच नव्हते.

जेव्हा माणसं माणसं म्हणून एकत्र येतात, अन्यायातून मुक्ती असो, वनांचे संवर्धन असो, पाण्याचे व्यवस्थापन असो, ग्रामसभेची घडी लावणं असो... यात वैश्विक मानवी मूल्ये सर्वांची एकच असतात. विश्वस्वधर्मसूर्ये पाहो, अशीच प्रार्थना असते. शब्द कोणतेही असोत, नैवेद्य कोणताही असो,. प्रार्थनेचा भाव तोच. एका ध्येयासाठी, एका ध्यासासाठी -अरे दिल क्या जान भी दे देंगे- अशी भावना निर्माण झाली, की त्या समूहात कसलेच भेद राहू शकत नाहीत.

हे भाषणांमधून, जातीअंताच्या थिअऱ्या मांडून साध्य होत नाही. हे प्रत्यक्ष जगण्यातून घडत आणि मुरत जाते. वयम् चळवळीत आत्तापर्यंत कधी यावर बोललोही नव्हतो, आज पहिल्यांदाच लिहिले. आणि यासाठी लिहावे लागले, की जे अशा जगण्यात सहभागी होऊ शकत नाहीत, त्यांचा माणूसपणावरचा विश्वास ढळू नये. जातच काय, पण कुटुंब आणि व्यक्तीचे अहंभावही सोहंभावापुढे गळून पडतात.

स्वप्नील जाधव, गायत्री ओक, रवींद्र चुनारकर, प्रफुल्ल सुतार, जयश्री कुलकर्णी, हेमेंद्र चौधरी, निवेदिता मोहिते, दीपा कोलवाळकर, हर्षल सोनार, चिन्मय शिधोरे, प्रतीक धानमेर, प्रेमा खिरारी, पूनम अहिरे, तपन रे, हेमा भाटवडेकर, पुष्पा दरेकर, कौंतेय देशपांडे आणि अशा अनेक जणांनी वयम् चळवळीत आपले तन-मन-धन दिले आहे. ज्यांना ही आडनावे वाचून जाती ओळखायची आहे, त्यांनी खुशाल तसे करावे. आमच्यासाठी या सर्वांची जात एकच... आम्ही बिनजातीचे भारतीय..

(लेखक ‘वयम्’ चळवळीचे विश्वस्त आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT