Forest Rights Act Vayam movement awareness  sakal
सप्तरंग

लोकजागराचे प्रयोग

शेतीसाठी वनजमिनीवर हक्क मिळवणं एवढाच वन हक्क कायद्याचा उपयोग आहे, असं २००८-०९च्या काळात सर्वांना वाटत होतं.

मिलिंद थत्ते

शेतीसाठी वनजमिनीवर हक्क मिळवणं एवढाच वन हक्क कायद्याचा उपयोग आहे, असं २००८-०९च्या काळात सर्वांना वाटत होतं.

शेतीसाठी वनजमिनीवर हक्क मिळवणं एवढाच वन हक्क कायद्याचा उपयोग आहे, असं २००८-०९च्या काळात सर्वांना वाटत होतं. त्यामुळे या कायद्याचे महत्त्व स्पष्ट करून, ती गावपाड्यात पोहचवणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी वयम् चळवळीने सतत लोकजागराचे प्रयोग केले. काही फसले, काही तगले, काही फोफावत गेले. यातून आम्हीही शिकलो आहोत, तेही शिकले आहेत. चळवळ नवी असताना ज्या गावांनी साथ दिली, त्या गावांविषयीची ही गोष्ट...

वयम् चळवळीने सतत लोकजागराचे प्रयोग केले. काही फसले, काही तगले, काही फोफावत गेले. चळवळ नवी असताना ज्या गावांनी साथ दिली, आज त्या गावांविषयी सांगतो. शेतीसाठी वनजमिनीवर हक्क मिळवणं एवढाच तेव्हा वन हक्क कायद्याचा उपयोग आहे, असं २००८-०९च्या काळात सर्वांना वाटत होतं.

आम्ही तेव्हाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटायला गेलो, तेव्हा तेही आम्हाला असंच म्हणाले - जंगल सांभाळायचा अधिकार - असा कुठे काय अधिकार असतो का? प्रस्थापित संघटना, राजकीय पुढारी यांचाही कल तेव्हा ‘‘यांना जमिनींचे अधिकार वाटा’’ - असाच असायचा.

तेव्हा आम्ही गावोगावी फिरून जंगल आपले आहे, ते सांभाळले तर पुढच्या पिढ्याही सुखात जगतील- वगैरे सांगायचा प्रयत्न करत होतो. कुऱ्हाडबंदी, चराईबंदी याविषयी बोलत होतो. काही गावातल्या पुढाऱ्यांनी तर आम्हाला गावात येऊच द्यायचे नाही, असाही प्रयत्न केला.

तेव्हा कोकणपाडा आणि डोयापाडा या दोन गावांनी आमच्यावर विश्वास ठेवला. सामूहिक वन हक्कासाठी दावा केला. गावाच्या जंगलातील यच्चयावत झाड-झाडोऱ्याची, पाखरा-जनावरांची, मासे-खेकड्यांची माहिती लिहून काढली.

त्या वेळी माधवराव गाडगीळांचे ‘निसर्ग नियोजन लोकसहभागाने’ हे पुस्तक वाचून आमचा हा अभ्यास होत असे. पुण्याचा एक मित्र रघुनंदन वेलणकर यात मदतीसाठी आला होता. जंगलाबाबत जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर चर्चा करून गावकऱ्यांनी जंगलाचा काही भाग राखण्यासाठी निवडला.

कोकणपाड्यातले गणपतबुवा, काशिनाथ, प्रभाकर, रामू, जाईबाई यांनी याबाबत दारोदारी जाऊन लोकांना पटवण्याचे काम केले. गावाच्या भल्यासाठी आपला वैयक्तिक मानापमान बाजूला ठेवायचा हेच मोठे आव्हान असते.

ते या मंडळींनी पेलले. गावाने २२ हेक्टरचा सामूहिक वन हक्क दोन वर्षांनी मिळवला. त्यापैकी आठ हेक्टरात चराईबंदी केली. तिथून ज्यांची गुरे नेहमी जात असत अशा गावकऱ्यांची समजूत काढून, त्यांच्यासाठी गुरांचा दांड (वाट) वेगळा आखून गावाने हे साध्य केले.

हातावर पोट असलेल्या लोकांना मजुरीचा एक दिवस घालवणे महाग असते. त्या वेळी आमची संस्था छोटी होती, सर्वांना मजुरी देण्याइतकी ऐपत आमचीच नव्हती. मी तेव्हा अंशवेळ बाहेरची काही व्यावसायिक कामे करत असे, त्यातलेच दोन-तीन हजार रुपये कार्यकर्त्यांना मानधनासाठी काढायचो. तेव्हा बायफ संस्था मदतीला आली.

त्या संस्थेला सामूहिक जमिनीवर जैविक पुनर्जननाचा प्रकल्प करायचा होता. त्यांनी आमच्याशी भागीदारी करायची तयारी दर्शवली. आम्ही म्हटले, जंगल गावाचे आहे - भागीदारी त्यांच्याशी व्हायला हवी. मग महाराष्ट्र जनुक कोषातल्या एका प्रायोगिक प्रकल्पासाठी कोकणपाडा ग्रामसभा -बायफ- वयम् असा त्रिपक्षीय करार झाला.

जंगलाच्या कुंपणाचा तर प्रश्न सुटलाच; पण जंगलात अनेक प्रजातींची नऊ हजार झाडे लावली. भरपूर बांबू लावला. सहभागी सर्व ग्रामस्थांच्या परसात २२ प्रकारचे वाल, चार प्रकारची रताळी अशीही लागवड झाली. लोक आनंदले.

बायफच्या शास्त्रज्ञांनी एक वर्षाने त्या जंगलाचा प्राणीशास्त्रीय अभ्यासही केला. अनेक दुर्मिळ पक्षी तिथे असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. आणखी एक-दोन वर्षांनी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाशी संबंधित डॉ. अंकुर पटवर्धन यांचा फोन आला.

ते म्हणाले, जंगल संवर्धन करणाऱ्या व्यक्तींना मंडळ पुरस्कार देणार आहे. तुमच्याकडून नाव सुचवा. आम्ही म्हटले, कोणीच एक व्यक्ती जंगल वाढवू, राखू शकत नाही. असा पुरस्कार गावाला द्यायला हवा. आम्ही कोकणपाडा गावाच्याच नावे नामांकन अर्ज पाठवला. मंडळालाही ही भूमिका पटली आणि कोकणपाडा गावाला राज्याचा जैवविविधता पुरस्कार मिळाला.

डोयापाडा हे असेच पहिल्या काळातले प्रयोगाचे गाव. जवळजवळ सर्व घरे वनजमिनीवरच वसलेली. शेतीही तशीच. एका राजकीय पक्षाच्या मोर्चात जाऊनही घरांचा, शेतीचा हक्क पदरी पडत नाही म्हणून कंटाळलेले लोक. त्यात त्यांना कळले की एका प्रस्तावित धरणात त्यांचा गाव बुडण्याचा धोका आहे.

त्यांना बचत गटाचे काम करणाऱ्या प्रमिलाताईंनी सांगितले की, तुम्ही वयम् वाल्यांकडे जा. ते काहीतरी मार्ग काढतील. डोयापाडा-कासपाडा-अळीवपाडा अशा गावांमधले जुने-जाणते बाबल्याकाका, काकड्याबुवा, धोंडूबुवा, यशवंतदादा असे सर्व जण वयम्‌च्या कार्यालयात भेटायला आले.

तेव्हा आम्ही जव्हारच्या बाहेर पडलो नव्हतो, हे गाव तसे लांब, विक्रमगड तालुक्यातले. जावं की नाही असं वाटे; पण लोकांचा आग्रह मोडवेना, म्हणून प्रकाश आणि मी तिथे गेलो. कायदा समजावून सांगितला.

वैयक्तिक वनहक्कातल्या त्रुटी सोडवल्या आणि सामूहिक हक्कासाठीही लोक तयार झाले. चार पाड्यांनी मिळून १५० हेक्टर जंगलावर दावा केला. अडीच वर्षांनी तो हक्क पदरात पडला.

एवढे मोठे जंगल सांभाळायचे हे सोपे काम नाही. अळीवपाडा, कळमपाडा यांचा उत्साह आटू लागला. कासपाड्यातल्याही जाणत्या मंडळींचे नवीन पिढी ऐकेना. डोयापाडा मात्र खचला नाही. मी जवान होतू, तहां तू भेटतास ना तर फार काय काय केला असता - असं बाबल्याकाका मला म्हणायचा; पण नातवंडांना कडेवर घेऊनही जंगलात फिरायला त्याच्यासारखी ऊर्जा कोणाकडे नव्हती.

बकऱ्या चारता चारता तो जंगलातून येणाऱ्या कुऱ्हाडीच्या आवाजाकडे लक्ष ठेवून असायचा. कुऱ्हाडबंदीच्या क्षेत्रातून आवाज आलाच, तर हा डवर एक सोटा हातात घेऊन निघायचा. गावात हाळी द्यायचा. लोक धावत सोबत यायचे.

एकदा असे झाले की शेजारची गावे यांच्या कुऱ्हाडबंदीवर नाराज झाली. ‘वयम्‌’वाल्यांनाही वाटेतच हाणला पाहिजे, असेही काहींच्या मनात होते. महेश, बाबल्याकाका, काकड्याबुवा हे शेजारच्या सर्व पाड्यात भेटून आले. कुऱ्हाडबंदी आमच्यासाठीसुद्धा आहे, फक्त तुम्हालाच नाही - हेही ते आवर्जून सांगत.

सहा महिन्यांतून एकदाच सुके लाकूड तोडायचे आणि फक्त डोक्यावरून १२ मोळी वाहून न्यायच्या - हे बंधन त्यांनी सर्वांवर घातले होते. आम्ही गावात असताना शेजारच्या ११ पाड्यांचे लोक आले. आम्हाला घेराव झाला. आम्ही सर्वांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तुम्हालाही तुमच्या हिश्श्याचे जंगल आहे, तिथे तुम्हालाही असा अधिकार मिळू शकतो, वगैरे सांगून झाले.

थोडीफार वादावादी होऊन इतर गावचे लोक निघून गेले. हे चालू असताना भोवतालच्या सर्व घरांच्या पडवीत डोयापाड्यातल्या बाया बसून होत्या. लोक गेल्यावर अर्जुनची आई माझ्यासमोर आली, म्हणाली, ‘‘दादा इथे आमच्याही कमरेला विळे आहेत. रान आमचा आहे, आम्ही राखणारच. आम्ही मागं हटणार नाही. तू फक्त साथीला रहा.’’ हा निश्चय असा होता, की पुढे वनविकास महामंडळालाही डोयापाड्याने झाडे तोडू दिली नाहीत.

डोयापाड्यातही पुढच्या काळात थोडे गट-तट वादविवाद झाले. गावाचा सहभाग आटत गेला; पण आधीच्या ठेचांतून शिकल्यामुळे आमच्या पुढच्या फळीने गाव धरून ठेवला. मधल्या काळात पूर्ण शून्यापर्यंत जाऊन डोयापाड्याने पुन्हा उसळी घेतली आहे. आम्हीही शिकलो आहोत, तेही शिकले आहेत.

(लेखक वयम् चळवळीचे विश्वस्त आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT