बाहेर पडण्यास असुरक्षित वाटते
मी १९ वर्षांची तरुणी असून, नुकतीच घडलेली बलात्काराची घटना, पीडितेवरचा अॅसिडहल्ला, मृत्यू, त्यानंतर यावरील उलटसुलट चर्चेमुळे जे वातावरण निर्माण झाले; त्यामुळे मला व माझ्या मैत्रिणींना घराबाहेर, कॉलेज अथवा इतर ठिकाणी जाण्यास प्रचंड असुरक्षित वाटत आहे. बऱ्याचदा बाहेर गेल्यावर रस्त्यावर आसपास टवाळखोर पोरे असतात. आमचे पालकही आमच्या काळजीने चिंतित होतात. स्वत:ला सुरक्षित ठेवायला पोलिस आणि कायदा आपल्याला मदत करू शकतो का, ही शंका मला आणि माझ्या मैत्रिणींना येऊ लागली आहे.
- तुझी, मैत्रिणींची व पालकांची काळजी नक्कीच वाजवी आहे. सध्या लागोपाठ ज्या दुर्दैवी घटना देशात घडल्या आणि त्यानंतर ज्या घडामोडी, संमिश्र प्रतिक्रिया आल्या; त्यामुळे देशभर मुली व महिलांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्याकडे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे, पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणा असल्या, तरीही बऱ्याच त्रुटींमुळे त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही. प्रत्येक वेळी कायदा, पोलिस यंत्रणेवर अवलंबून राहणे याआधी आपणही सुजाण नागरिक म्हणून सुरक्षिततेसाठी स्वत: जागरूकता ठेवणे आवश्यक आहे. सध्या शाळा, कॉलेजांतून स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. परंतु, आपली शारीरिक क्षमता कमी पडणार आहे, हे लक्षात आल्यास अतिआत्मविश्वास न दाखवता स्वत:ला बिकट परिस्थितीत येऊ देऊ नका. प्रतिकार करण्यापेक्षा प्रसंगावधान राखून आधी स्वत:ला सुरक्षित ठिकाणी कसे नेऊ शकता, यासाठी निर्णयक्षमता जागरूक ठेवा. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाइन, सीसीटीव्ही कॅमेरे, भरारी पथके आहेतच. तरी, तुम्हीही असे प्रसंग उद्भवू नये, यासाठी निर्जन ठिकाणी एकटीने न जाणे, जवळच्या लोकांचे फोन नंबर पाठ ठेवणे. तसेच घराबाहेर, ओळखीच्या माणसापासून असुरक्षित वाटल्यास पालकांना अशा घटना मोकळेपणाने सांगितल्यास ते तुम्हाला योग्य वेळी साह्य करू शकतील. कायदा व पोलिस पीडितेची मदत करण्याबरोबरच आपले संरक्षण करण्यासाठीही आहेत. घराबाहेर न पडणे हा असुरक्षित वाटण्यावरचा नक्कीच उपाय नाही. आपण अशा घटनांमुळे घाबरून न जाता वेळीच पोलिस, कायदा यांच्या मदतीने व स्वत: जागरूक राहून स्वत:ला सुरक्षित ठेवले पाहिजे. महिला हेल्पलाइन क्रमांक - १०९१/१००.
मनाविरुद्ध करतेय अरेंज मॅरेज!
मी ३१ वर्षांची युवती असून, माझे दुसऱ्या जातीच्या तरुणावर प्रेम आहे. आम्ही आमच्या लग्नासाठी माझ्या आई-वडिलांनी संमती द्यावी, यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, त्यांनी जातीचे कारण सांगून आमच्या लग्नाला विरोध केला. त्यांनी आत्महत्येची धमकी देऊन माझ्या इच्छेविरुद्ध नुकतेच माझा साखरपुडा स्वजातीच्या मुलाशी करण्यास भाग पाडले. दोन महिन्यांत माझे लग्न त्या मुलाशी होणार आहे. मी आई-वडिलांच्या काळजीने त्यांचे ऐकत आहे. परंतु, मला तो मुलगा आवडत नाही आणि त्याच्याबरोबर असताना मी अस्वस्थ असते. मला खूप असह्य वाटते आहे. मी काय करू?
- नक्कीच तुमच्याबरोबर घडते ते तुम्हाला नैराश्येकडे नेणारे आहे. तुमचे आई-वडीलही तुमच्या इच्छेपेक्षा जाती, धर्म यात अडकून समाज व नातेवाईक काय म्हणतील, याचा जास्त विचार करीत आहेत. तरी एकदा आपले पालक फक्त वेगळ्या जातीमुळे की त्यांना सदर मुलगा स्थिरस्थावर नाही अथवा तुम्हाला पती म्हणून सुयोग्य नाही, या कारणासाठी नकार देत आहेत, याचा विचार करा. अर्थातच, तुमच्या आई-वडिलांनी तुमच्या संमतीशिवाय लग्न ठरविणे आणि लग्न करण्याची घाई करणे अयोग्यच आहे. कदाचित मुलीचे लग्नाचे वय उलटत चालले आहे, हा पारंपरिक विचारही त्यामागे असू शकतो. लग्न ही परस्परविश्वासावर चालणारी संस्था आहे. तुम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचे आहे. अशा प्रकारे बळजबरीने दोन व्यक्तीने एकत्र येणे, हे तुमच्या व तुमच्या होणाऱ्या पतीच्या दृष्टीनेही चांगले नाही. यासंदर्भात तुम्ही तुमच्या व आई-वडिलांच्या विश्वासातल्या मोठ्या व्यक्तींची मदत घ्या व आई-वडिलांबरोबर एकत्र बसून या विषयावर बोला. तुम्हीही आई-वडिलांशी न भांडता मोकळेपणाने व ठामपणे या नात्यात कसे खूष नाही आहात, याबाबत संवाद साधा. सज्ञान असल्याने तुम्ही मित्राशी लग्नाचा निर्णय घेतल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणी निश्चित येणार नाहीत. तुमच्या मित्राची अजूनही समाजाच्या विरोधात जावूऊन तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे का? तो तुम्हाला कायमची साथ देणार आहे का? याचाही एकदा विचार करा. तुम्हीही तुमचे निर्णय योग्य आहेत का? याचे आत्मपरीक्षण करा. या वयात तुमच्यात स्वत:च्या आयुष्याचे योग्य निर्णय घेण्याची प्रगल्भता नक्कीच आहे.
संसार नको, आई-वडिलांसाठी जगायचेय
मी विवाहित असून, साधारण २ वर्षांपासून माझ्या पत्नीचा आणि माझा घटस्फोटाचा दावा कोर्टात प्रलंबित आहे. माझ्या पत्नीचे एका मुलाबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आम्हाला लग्नानंतर उपचारानंतर ९ वर्षांनी झालेला मुलगा आता ६ वर्षांचा असून, कोर्टाने त्याचा तात्पुरता ताबा मुलाच्या इच्छेनुसार माझ्या पत्नीस दिला आहे. दावा दाखल करताना तिने फक्त मुलाचा ताबा मागितला होता. परंतु, माझी पत्नी आता पोटगीची रक्कमसुद्धा मागत आहे. या ताणामुळे माझी नोकरीदेखील गेली आहे. मला फक्त आता माझ्या आई-वडिलांसाठी आयुष्य जगायचे आहे. ही केस लवकर निकाली लागण्यासाठी कायदेशीर पर्याय आहेत का?
- तुमच्या लग्नाला साधारण १५ वर्षे झाली आहेत. तुम्हाला इतक्या वर्षांनी मूल झाले आहे. एवढ्या प्रदीर्घ वैवाहिक जीवनानंतर कुठल्या कारणामुळे तुमची पत्नी तुमच्यापासून दुरावली आहे? तुमच्याकडून नकळतपणे तिच्याकडे दुर्लक्ष झाले आहे का? याचा तुम्ही एकदा विचार करा. तुमच्या मुलासाठी तुमचे पुन्हा एकत्र येणे शक्य आहे का? याचा दोघांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलून पुनर्विचार करा. बऱ्याचदा स्त्री-पुरुषांच्या साध्या मैत्रीलाही आपण विवाहबाह्य संबंधाचे नाव देतो. अर्थातच, त्याबाबत तुमच्याकडे सबळ पुरावे असतील, तर कोर्ट नक्कीच त्या आधारावर तुमचा घटस्फोट मंजूर करू शकते. भारतीय कायद्यानुसार पत्नी व अपत्याच्या पालनपोषणाची जबाबदारी पतीवर असते. तुम्हाला मुलाला पोटगी द्यावीच लागेल. पत्नीची पोटगीची रक्कम पत्नीचे शिक्षण, स्वत:च्या पालनपोषणाची तिची आर्थिक क्षमता आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यावरून कोर्ट ठरवेल. मुलाचा कायमस्वरूपी ताबाही भविष्यात कोणते पालक मुलाची योग्य देखभाल करू शकतील, यावर कोर्ट ठरवेल. मुलाला भेटण्याचे अधिकार कोणत्याही पालकाला कोर्ट शक्यतो नाकारणार नाही. कोर्टात केस दाखल झाल्यावर संपूर्ण न्यायप्रक्रिया होण्यास बराच वेळ जातो.
तुमचे आणि पत्नीचे एकत्र येणे अशक्यच असल्यास तुम्हाला एकमेकांच्या अटी-शर्ती ठरवून परस्परसंमतीने घटस्फोट घेता येईल. तुमचा दावा ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असल्यामुळे मूळ दावा परस्परसंमतीने घटस्फोटाच्या अर्जात रूपांतरित करून कोर्टाकडून तुम्हाला ताबडतोब घटस्फोट मिळेल. त्याबाबत तुमचे वकील तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमच्या ताणासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.