प्रश्न - माझ्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आम्हाला दोन मुले आहेत. सासरच्या लोकांकडून मला योग्य वागणूक मिळालेली नाही. माझा घरी खूप छळ झाला. पती व्यसनी आणि बाहेरख्याली आहेत. घरातील शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे मी सासरचे घर सोडून माहेरी निघून आले. मागील पाच वर्षांपासून दोन मुलांसह मी माहेरी आहे; परंतु सासरच्या व्यक्तींनी माझी व मुलांची कोणतीही चौकशी केली नाही. मला नांदायला घेऊन जायचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी मला एक पत्र नवऱ्याने पाठवले. त्या पाकिटात घटस्फोटाचे पेपर होते. त्याने औरंगाबाद कोर्टातून घटस्फोट घेतला आहे. मी पुण्याला राहते. मला तेथील कोर्टाची नोटीस मिळाली नव्हती. तिकडे त्यांची शेतजमीन आणि स्वतःचे घर आहे; परंतु मला किंवा मुलांना काहीही आर्थिक मदत केली नाही. माझी संमती न घेता तेथील कोर्टाने त्याचा घटस्फोट कसा मंजूर केला? माझा व मुलांचा हक्क मला मिळू शकेल का? पोटगी मिळू शकेल का?
न्यायालयात एखाद्या व्यक्तीने केस दाखल केल्यानंतर विरुद्ध पक्षकाराला कळवले जाते. समन्स/नोटीस पाठवली जाते. कदाचित ती नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल. अशा वेळेस जाहीर नोटीस वर्तमानपत्रातून दिली जाते; परंतु याबाबतही आपल्या लक्षात आले नसेल. त्यामुळे कोर्टात तुम्ही हजर झाला नाहीत. जेव्हा प्रत्यक्ष नोटीस अथवा जाहीर नोटीस देऊनही विरुद्ध पक्षकार हजर झाला नाही तर एकतर्फी हुकूम न्यायालयात केला जातो. तुमच्या प्रकरणामध्ये असे झाले असण्याची शक्यता आहे. तथापि तुम्हाला बाजू मांडण्याचा अजूनही अधिकार आहे. त्यासाठी तुम्ही चांगल्या कायदेतज्ज्ञाची मदत घ्या. ज्या न्यायालयात घटस्फोटाचा निकाल झालेला आहे, तिथून त्याबाबतची अधिकृत कागदपत्रे काढून घ्या. वरिष्ठ कोर्टात अपील दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करा; तसेच मुलांच्या आणि तुमच्या चरितार्थासाठी पोटगी मागण्याचा, निवासाचा हक्क मागण्याचा तुम्हाला अजूनही अधिकार आहेच, तो संपुष्टात येत नाही. कायद्याची पूर्ण माहिती करून घ्या, जागरूक व्हा आणि तुमचे हक्क तुम्ही मिळवून घ्या.
मला लग्नच करायचे नाही
प्रश्न - माझे वय २७ वर्षे आहे. मी पदवीधर असून स्वतःचा व्यवसाय करते. माझे आई-वडील लग्न ठरवण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु मला अजिबात लग्न करायचे नाही. या जगात विश्वास ठेवण्यासारखे कोणीच नाही, असे मला वाटू लागले आहे. मी बारावीला असताना माझे एका मुलावर प्रेम होते. बरेच दिवस आम्ही एकमेकांच्या सानिध्यात होतो; परंतु सर्व गोष्टी लग्नापूर्वी व्हाव्यात, अशी त्याची इच्छा होती. मी या गोष्टीला नकार दिल्यावर तो मला सोडून गेला. पुन्हा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला असताना अजून एका मुलाशी माझे विचार जुळले. तो माझ्याशी खूप चांगले वागत होता; परंतु कोणत्याही मर्यादा ओलांडायच्या नाहीत, असे म्हटल्यानंतर तो मला टाळू लागला आणि एक दिवस दुसऱ्याच मुलीसोबत तो मला दिसला. ‘तुझ्याकडून जी गोष्ट मला मिळत नाही ती दुसऱ्या मुलीकडून मला मिळत असेल तर मी ती का घेऊ नये?’, असा उलटा सवाल त्याने मला केला. तेव्हापासून त्याच्याशीही मी बोलणे बंद केले. तो मला, ‘काकूबाई, संकुचित विचारांची’ असे म्हणू लागला. या वेदनेतूनही मी सावरले. आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहणारा, पारदर्शी आणि योग्य विचारांचा मुलगा कोणी असू शकेल यावर माझा आता विश्वासच राहिलेला नाही. माझे आई-वडील मला समजून घेत नाहीत. मला लग्नच करायचे नाही हे त्यांच्या पचनी पडत नाही. मी त्यांना कसे समजावून सांगू? माझे काही चुकते आहे का?
वयात आलेल्या मुलीच्या लग्नाबाबत आई-वडिलांनी विचार करणे ही अगदी नैसर्गिक आणि साहजिक आहे. आपल्या मुलीचे वेळेत लग्न व्हावे आणि तिचा संसार मार्गी लावावा हे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. तुझ्या आयुष्यात काही कटू प्रसंगांना तुला सामोरे जावे लागल्यामुळे ‘लग्न नकोच’ या विचारापर्यंत तू आलेली आहेस. ज्यांच्याशी तुला ‘लग्न’ करावे वाटले त्यांना तुझ्याशी लग्न करायचे नव्हतेच. कारण त्यांचे प्रेम हे केवळ आकर्षण होते. तेवढ्या काही गोष्टींपर्यंतच मर्यादित होते; परंतु सर्वांनाच आपण एकाच तराजूत तोलू नये. लग्नाच्या जोडीदारासोबत आपले संपूर्ण आयुष्य घालवणारी, एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणारी जोडपी कमी नाहीत. तुझ्या आई-वडिलांचे, घरातील जवळच्या नातेवाइकांचे उदाहरणही तू घेऊ शकतेस.
चांगले-वाईट प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतातच. लग्नातही घडतात; परंतु यातून तावून सुलाखून निघणारे नाते हे अधिक घट्ट होते. आपल्या आयुष्यात घडलेल्या भूतकाळाला हद्दपार करून वर्तमानकाळासाठी नवीन दार उघडणे महत्त्वाचे आहे. आपल्या आई-वडिलांना आपल्या मुलांसाठी काय योग्य असेल याचा नक्कीच अंदाज असतो. त्यामुळे तू स्वतः याबाबत अतिविचार करण्यापेक्षा या काही गोष्टी तू पालकांवर सोपव. त्यांना जी व्यक्ती योग्य वाटेल ती तुझ्या विचारात बसणारी आहे का? हे तपासून घे. ‘लग्न’ या बाबतीतील विचारांना प्रौढत्व आल्यानंतर एकमेकांना समजावून घेणे शक्य होते. तुझ्या आई-वडिलांना समजावण्यापेक्षा तुझ्या नकारात्मक विचारांना तू समजावून सांग. यातील सकारात्मक बाजूही लक्षात घे.
घटस्फोट घेऊन आईला सांभाळायचेय
प्रश्न - माझ्या पत्नीचे व माझे लव्ह मॅरेज आहे. आमच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाली असून मला एक १० वर्षांचा मुलगा आहे. माझ्या पत्नीचे माझ्या आई-वडिलांसोबत जमत नव्हते, म्हणून लग्न झाल्यानंतर दोन वर्षांतच स्वतंत्र संसार थाटला. तिच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा मी सतत प्रयत्न केला; परंतु तिचे समाधानच नाही. माझ्या आई-वडिलांना मी भेटायला गेल्यानंतर ती भांडणे काढायची. ते माझ्या घरी आलेले तिला आवडायचे नाही. काहीतरी कारण काढून ती माहेरी निघून जायची. माझे वडील आजारी असतानाही मी त्यांना माझ्या घरी आणू शकलो नाही. त्या आजारपणातच माझे वडील गेले. मला याबाबत खूपच दुःख होत आहे. मी मुलगा असून त्यांची काळजी घेऊ शकलो नाही या, विचारांनी मी अस्वस्थ झालो आहे. मी स्वतःला माफ करू शकत नाही. माझी घुसमट होते. याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी लग्नबंधनातूनच मुक्त होऊन, आता आईला तरी व्यवस्थित सांभाळावे, असे मी ठरवले आहे; परंतु बायकोला आणि मुलाला सोडून माझ्याकडे राहायला यायचे नाही, असे आई म्हणते आणि आईला मी माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाही. परिस्थितीतून मला मार्गच काढता येत नाही. मी काय करावे?
प्रत्येक पुरुषाला एक पुत्र, पती आणि पिता या तिन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात. तुमच्या पत्नीच्या स्वभावामुळे या सर्व भूमिकेमध्ये समन्वय साधणे तुम्हाला शक्य झालेले नाही. एक कर्तव्य पार पाडत असताना दुसऱ्या कर्तव्याचा विसर पडून चालणार नाही. तरीही एका वेळेला आपण सर्वांना खूष करू शकत नाही याचा विचार करायला हवा. काही वेळेस मवाळ धोरण सोडून कठोर निर्णय घ्यावा लागतो. पत्नीची इच्छा नसली तरीही माझी आई माझ्या घरी येणार, हा निर्णय तुम्ही घ्यायलाच हवा. आईची योग्य व्यवस्था करणे हे तुमचे कर्तव्य आहे. अगदी सोबत राहू शकला नाहीत तरी रोज एकदा तरी आईला भेटून तिची विचारपूस करणे, काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लग्न बंधनातून सुटका करून घेणे हा पर्याय योग्य होऊ शकणार नाही. आईकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून दोन्हीही कर्तव्य पार पाडून समन्वय साधणे अधिक गरजेचे आहे. झाल्या गोष्टीमध्ये अडकून राहून स्वतःला त्रास करून घेऊ नका. देह नाशवंत आहे. प्रत्येकाला त्यातून जायचे आहे; परंतु त्यासाठी स्वतःला दोषी ठरवू नका. पुढच्या गोष्टी संयमाने आणि हुशारीने करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.