सप्तरंग

गढवाली सतोपंथ

एव्हरेस्ट शिखराचं आकर्षण सर्वांना आहे. जगातील सर्वांत उंच शिखरावर चढाई करण्यासाठी जगभरातल्या विविध ठिकाणाचे गिर्यारोहक दरवर्षी प्रयत्न करत असतात. मात्र, मनात आलं आणि एव्हरेस्ट शिखर चढाई केली असं होत नाही. त्यासाठी आवश्यक असते सर्वंकष पूर्वतयारी.

सकाळ वृत्तसेवा

- उमेश झिरपे

एव्हरेस्ट शिखराचं आकर्षण सर्वांना आहे. जगातील सर्वांत उंच शिखरावर चढाई करण्यासाठी जगभरातल्या विविध ठिकाणाचे गिर्यारोहक दरवर्षी प्रयत्न करत असतात. मात्र, मनात आलं आणि एव्हरेस्ट शिखर चढाई केली असं होत नाही. त्यासाठी आवश्यक असते सर्वंकष पूर्वतयारी.

यांत शारीरिक व मानसिक तयारी करण्यासोबतच प्रत्यक्ष शिखरांवर चढाईचा पण अनुभव गाठीशी असणं आवश्यक असतं. यातूनच जन्माला आल्या प्री-एव्हरेस्ट मोहिमा. एव्हरेस्टची उंची आहे आठ हजार ८४८ मीटर. एवढ्या उंचीवर चढाई करण्याआधी अनेक गिर्यारोहक ६-७ हजार मीटर उंच शिखरांवर चढाई करून आपली कौशल्यं आजमावून पाहतात.

यासाठी भारतीय हिमालयातील अनेक शिखरं या गिर्यारोहकांना आव्हान देतात, यातीलच एक शिखर म्हणजे सतोपंथ. तब्बल सात हजार ८४ मीटर उंच असलेल्या सतोपंथ शिखराची गिर्यारोहण क्षेत्राशी निगडित असलेली ही आजच्या काळातील ओळख. पण सतोपंथचा इतिहास हा अनादी काळापासूनचा आहे. अगदी महाभारतापासून. सतोपंथ म्हणजे सत्याचा मार्ग. पांडवांनी जो सत्याचा मार्ग स्वीकारून स्वर्ग लोक गाठला त्यावरून नाव पडलं सतोपंथ हिमनदीचं व पुढं या शिखराचं.

१९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच काळात सतोपंथ शिखरावर पहिले मानवी पाऊल पडले. आंद्रे रोश यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या स्विस मोहिमेंतर्गत सतोपंथ शिखराला जगात पहिल्यांदा गवसणी घालण्यात आली. ऑस्ट्रियन गिर्यारोहकांनी या मोहिमेमध्ये संयुक्तपणे सहभाग नोंदविला.

रॉश यांच्यासोबत अलेक्स ग्रावेन व तेनसिंग नोर्गे यांनी शिखराला गवसणी घातली. रंजक बाब म्हणजे पुढं सहा वर्षांनी १९५३ मध्ये एव्हरेस्ट शिखरावर जेव्हा पहिले पाऊल पडले, त्या जोडगळीतील एक म्हणजे शेर्पा तेनसिंग नोर्गे. थोडक्यात सतोपंथ शिखराची प्री-एव्हरेस्ट म्हणून असलेली ओळख ही अगदी पहिल्या मोहिमेला देखील लागू पडते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

या शिखरावर पहिली भारतीय नागरी मोहीम यशस्वी करण्याची कामगिरी आमच्या गिरिप्रेमीच्या संघाने केली आहे, हे विशेष. १९९२ मध्ये ही मोहीम पार पडली. ही मोहीम खरंतर महाराष्ट्रातील काही दिग्गज गिर्यारोहकांना वाहिलेली श्रद्धांजली होती.

१९८६ मध्ये डॉ. मिनू मेहता, भरत मांघरे व गिरिप्रेमीच्या संस्थापकांपैकी एक असलेले नंदू पागे यांनी सतोपंथ शिखरावर मोहीम आखली होती. मात्र, शिखर चढाई करत असताना आलेल्या हिमप्रपातामध्ये या तिघांसह एका सहकारी शेर्पाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गिरिप्रेमी १९९२ मध्ये मोहीम आयोजित केली होती.

सतोपंथ शिखर हे गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरात आहे. भागीरथी व गंगोत्री शिखर समूह, थेलू, मेरू, वासुकी, सुदर्शन व शिवलिंग या अवाढव्य शिखरांच्या सान्निध्यात सतोपंथ डौलाने उभे आहे. सतोपंथ,

भागीरथी गंगोत्री शिखर समूहांपासून पुढे वाढत गेलेले गंगोत्री ग्लेशियर (अर्थात हिमनदी) पुढे जाऊन भारतातील सर्वांत मोठ्या गंगा नदीचे रूप धारण करते, ज्यावर तब्बल २० कोटींहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांमध्ये येथे ठळक बदल दिसून येत आहेत. यात गंगोत्री हिमनदी हळूहळू आकुंचित होत असल्याचे आढळून आले आहे.

सतोपंथ शिखराची भौगोलिक खासियत म्हणजे हिमनद्यांनी वेढलेले तीव्र धार असलेले हिमकडे व त्यावरून दिसणारे डोळे दिपवणारे दृश्य. तसा गढवाल हिमालय हा तुलनेने नव्या पिढीतला आहे असं म्हणतात. म्हणजे हिमालयाची उत्पत्ती भारतीय उपखंड जेव्हा युरेशियन प्लेटला धडकला तेव्हा झाली. यातील टर्शरी म्हणजे शेवटच्या टप्प्यातील धडकेतून जे पर्वत उभे राहिले ते म्हणजे गढवाल हिमालय. त्यामुळे येथील पर्वत हे भव्यदिव्य आहेत सोबत येथे तीव्र कडांनी व्यापलेले आहे. याच्या ठळक खुणा सतोपंथ शिखरावर उठून दिसतात.

सतोपंथ शिखराचा पायथा म्हणजे बेस कॅम्प हा वासुकी ताल येथे आहे. येथे जाण्यासाठी कालिंदी पास हा ट्रेक प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण प्रदेश जैवविविधतेने समृद्ध आहे. याच्या खालच्या भागातील अल्पाइन गवताळ प्रदेश वनस्पती आणि प्राणिजीवनाने परिपूर्ण आहेत. ग्रीष्म ऋतूमध्ये येथे विविध प्रकारची फुलं फुलतात, ज्यामध्ये ब्रह्मकमळ (सौसुरिया ओबव्हॅलाटा) ही दुर्मीळ वनस्पती विशेष महत्त्वाची आहे. ही वनस्पती हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते.

हिमालयातील इतर अनेक शिखरांप्रमाणे सतोपंथ शिखराला देखील हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते. येथील स्थानिक देखील शिखराला देवासमान मानतात. धार्मिक महत्त्व तर या शिखराला आहेच सोबत याचं सौंदर्य मन मोहून टाकणारं आहे. सतोपंथ शिखर आहेच देखणं. जेव्हा जेव्हा मी मोहिमांच्या निमित्तानं या गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरात जातो, तेव्हा इथं दिसणाऱ्या नितांत सुंदर हिमशिखरांनी हरखून जातो. आजपर्यंत मी ३०-४० वेळा या परिसरात नित्यनियमाने गेलो आहे, प्रत्येक वेळी इथं येणारा अनुभव हा शब्दांपलीकडचा आहे.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT