Mount Everest sakal
सप्तरंग

रूप नवं ‘एव्हरेस्ट’चं!

पर्वतांचा हिमालय’ या सदरामधून आपण विविध हिमशिखरं, त्यांच्या सान्निध्यात वाढणाऱ्या हिमनद्या आणि इतर बरंच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

उमेश झिरपे

‘पर्वतांचा हिमालय’ या सदरामधून आपण विविध हिमशिखरं, त्यांच्या सान्निध्यात वाढणाऱ्या हिमनद्या आणि इतर बरंच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हिमालयाची रूपं अनेक आहेत, त्याची ओळख ही अशाच वेगवेगळ्या रूपांमधून केली जाते.

त्यातील सर्वांत ठळक ओळख म्हणजे माउंट एव्हरेस्ट. हिमालयातीलच नव्हे तर जगातील सर्वोच्च शिखर. ज्या शिखरानं अवघ्या जगाला भुरळ घातली आहे, असा एव्हरेस्ट. ‘पर्वतांचा हिमालय’ जाणून घेताना एव्हरेस्ट विषयी तर बोलायलाच हवं. त्यासाठी कारण देखील खास आहे. ते म्हणजे ‘जागतिक एव्हरेस्ट दिवस!’

सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी ७१ वर्षांपूर्वी, १९५३ मध्ये २९ मे रोजी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर पहिलं मानवी पाऊल ठेवलं व इतिहास घडवला. तेव्हापासून आजपर्यंत नऊ हजारपेक्षा जास्त वेळा एव्हरेस्टवर मानवी पाऊल पडलं आहे. दोनच आठवड्यांपूर्वी कामी रिता शेर्पा यांनी विश्वविक्रमी २९ व्या वेळा शिखर चढाई केली आहे.

सात दशकांमध्ये गिर्यारोहणाची परिमाणं बदलली, आधुनिक विज्ञानानं गिर्यारोहकांची आव्हानं काहीशी सुकर केली, तरी एव्हरेस्ट हे एव्हरेस्टच आहे. आठ हजार ८४८ मीटर उंच, हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण १-२ टक्के इतकं विरळ, हाडं गोठवणारी थंडी, सोसाट्याचा वादळी वारा देखील फिका वाटावा इतक्या जोरात वाहणारे जेट स्ट्रीम्स यांमुळे एव्हरेस्ट चढाई ही कठीण आहेच.

सात दशकांपूर्वी अशा अज्ञात प्रदेशात, सर्व आव्हानांवर मात करत, चित्त एकाग्र ठेवत एव्हरेस्टवरील पहिली यशस्वी चढाई झाली, या चढाईचे महत्त्व हे त्यामुळंच अधिकच अधोरेखित होतं. या चढाईचं ‘सेलिब्रेशन’ करण्यासाठी २९ मे हा दिवस जगभरातील गिर्यारोहक व डोंगरप्रेमी ‘जागतिक एव्हरेस्ट दिवस’ म्हणून साजरा करतात.

संयुक्त राष्ट्रसंघानं देखील या दिवसाला मान्यता दिली आहे. या दिवसानिमित्त विविध उपक्रम एव्हरेस्ट बेस कॅम्प पासून जगातील कानाकोपऱ्यापर्यंत जल्लोषात साजरे केले जातात. एव्हरेस्ट बेस कॅम्प नजीक तर चक्क मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. या दिवसाचं अन् एव्हरेस्टचं महत्त्व वलयांकित आहे. आम्ही म्हणजेच गिरिप्रेमी संस्थेनं देखील एव्हरेस्ट शिखरावर चढाई केली आहे, संस्थेत एक-दोन नव्हे तर १३ पेक्षा जास्त एव्हरेस्ट शिखरवीर आहेत.

२०१२ मध्ये पहिल्यांदा आठ गिर्यारोहकांनी चढाई करून एव्हरेस्ट शिखरावरील यशस्वी झालेल्या मोहिमांमध्ये भारतातील सर्वांत मोठ्या नागरी मोहीम बनण्याचा मान मिळविला. एव्हरेस्ट हा एक असा विषय आहे, की ज्यावर अनेक खंड लिहिले तरी तो संपणार नाही. मी देखील आजवर एव्हरेस्ट शिखरावरील चढाई,

तेथील इतिहास, शिखराच्या नामकरणाची रंजक कहाणी, तेथील कचरा, पर्यावरणीय परिणाम अशा नानाविध विषयांवर लेख लिहिले आहेत. रेडिओ, टीव्ही माध्यमांवर मुलाखती अन् विशेष कार्यक्रमांच्या निमित्तानं एव्हरेस्टची विविध रूपं उलगडली आहेत.

आमच्या एव्हरेस्ट मोहिमेचा सर्व प्रवास देखील आम्ही पुस्तक रूपांतून शब्दबद्ध केला आहे. हे सगळं लिहीत, बोलत, चर्चिले जात असताना एव्हरेस्टची चढाई, येथील आव्हानं अशा विषयांवर बोललं जातं मात्र हिमालयाचं आणि समुद्राचं नातं हे फार क्वचितच चर्चिलं जातं किंवा अधोरेखित होतं.

आश्चर्य वाटेल पण एव्हरेस्ट शिखराचा माथा हा एके काळी समुद्राचा भाग होता. हा इतिहास आहे तब्बल पाच करोड वर्षांपूर्वीचा! आजचे भारतीय उपखंड तेव्हा आफ्रिकेला लागून होते. लाखो वर्ष चालणाऱ्या हालचालींमुळे भारतीय खंड युरोशियन खंडाकडे सरकत गेला व जेव्हा या दोहो खंडांची टक्कर झाली, तेव्हा त्यातून उंचच उंच पर्वतरांग तयार झाली.

ही पर्वतरांग म्हणजे हिमालय. त्याआधी या दोन खंडांमध्ये महाकाय समुद्र होता. दोन खंडाच्या धडकेमुळे समुद्र तर लोप पावला मात्र त्याचे अस्तित्व आजही हिमालयात टिकून आहे, अगदी एव्हरेस्ट जवळ देखील. ८ हजार ८४८ मीटर उंच असलेल्या एव्हरेस्ट शिखराच्या नेपाळ देशाच्या बाजूने जी शिखर चढाई होते, त्या शिखर चढाई मार्गावर चार कॅम्प लावले जातात.

यातील तिसऱ्या व चौथ्या कॅम्पच्या दरम्यान तब्बल ७ हजार २०० ते ७ हजार ४०० मीटर उंचीच्या पट्ट्यात एक पिवळ्या रंगाचा, अगदी टणक असा दगडांचा पट्टा आहे. इतरत्र सर्वत्र शुभ्र हिमाने नटलेल्या पर्वतावर हा पिवळा पट्टा उठून दिसतो.

पहिल्यांदा कोणताही गिर्यारोहक जेव्हा इथे जातो, तेव्हा हा नजारा पाहून हरखून जातो. चुनखडीच्या कुटुंबातील दगड येथे असल्याने हा पट्टा पिवळा दिसतो, म्हणूनच याचे नामकरण देखील ‘येलो बँड’ असे केलेले आहे. खरंतर चुनखडीचा मूळ प्रदेश हा समुद्र.

८ हजारपेक्षा अधिक उंचीवर चुनखडी तयार होण्यासाठी पोषक वातावरण देखील नाही तर एव्हरेस्टच्या कवेत चुनखडी दिसते कारण लाखो वर्षांपूर्वी हिमालयाच्या निर्मितीच्या वेळी लोप पावलेला समुद्र व त्यातील घटक हे विविध रूपात हिमालयात दडलेले आहेत. इतकंच काय तर शास्त्रज्ञांनी समुद्रातील दगड व एव्हरेस्ट शिखरमाथ्यावरील दगड यांचा शास्त्रीय तुलनात्मक अभ्यास केला व काही प्रमाणात त्यात साधर्म्य आढळून आलं.

त्यामुळं आज जगातील सर्वोच्च शिखर म्हणून बिरुद मिरवणारं एव्हरेस्ट एके काळी समुद्राच्या तळाचा भाग होतं. जेव्हा गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखरमाथ्यावरून चुनखडी दगड घेऊन आले, तेव्हा त्याचं साधर्म्य हे समुद्र तळातील दगडाशी जुळून आलं. या दगडाचं नामकरण ‘चोमोलुंग्मा लाइमस्टोन’ असे करण्यात आले.

चोमोलुंग्मा म्हणजे स्थानिक नेपाळी भाषेत जगन्माता अर्थात एव्हरेस्ट! या दगडाचे जेव्हा पृथक्करण करण्यात आले, तेव्हा ट्रिलॉबाइट्स, ब्राचिऑपॉड्स, ऑस्ट्रॅकोडस व क्रिनॉइड्स नावाचे जीवाश्म आढळून आले जे समुद्रतळाशी आढळून येतात. समुद्रात आढळणारे शंख-शिंपले व त्याच्याशी साधर्म्य साधणारे जीवाश्म मी अनेकदा हिमालयाच्या अनेक कोपऱ्यांमध्ये पाहिले आहेत. थोडक्यात, लाखो वर्षांपूर्वी झालेल्या भौगोलिक बदलांचे परिणाम आजही दिसून येतात.

समुद्र सपाटीपासून तब्बल ८ हजार ८४८ मीटर म्हणजे जवळजवळ नऊ किलोमीटर उभे उंच असलेल्या ठिकाणी समुद्राचे अवशेष आढळून येणं, ही खरंच निसर्गाची किमया आहे. ही किमया एव्हरेस्टपासून छोट्यात छोट्या हिमालयातील टेकडीवर आढळून येते. गिर्यारोहण-ट्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही हा अनुभव घेतच असतो. एव्हरेस्टचे हे समुद्राशी असलेल्या नात्याचं प्रतीक म्हणून शिखरमाथ्यावरचा एक छोटा दगड आम्ही घेऊन आलो होतो, जो आजही गिरिप्रेमीच्या कार्यालयात खास फ्रेम करून ठेवला आहे.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT