mr bean comedy show british actor rowan atkinson mime show Sakal
सप्तरंग

शब्दावाचून हसले सारे..!

दुसऱ्याला हसवण्याची कला फार कठीण असं म्हणतात; पण ब्रिटिश अभिनेता रोवन अटकिन्सन अर्थात मि. बीन नावाचा अवलिया कित्येक वर्षं ती अगदी लीलया साकारतोय.

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com

- प्रवीण टोकेकर

दुसऱ्याला हसवण्याची कला फार कठीण असं म्हणतात; पण ब्रिटिश अभिनेता रोवन अटकिन्सन अर्थात मि. बीन नावाचा अवलिया कित्येक वर्षं ती अगदी लीलया साकारतोय. नि:शब्दाची किमया त्याने चांगलीच साधलीय. तो चेहऱ्यानेच अधिक बोलतो.

मनोरंजनाच्या दुनियेत अजरामर झालेल्या मि. बीनचा आज वाढदिवस. हे लहान मूल आज ६८ वर्षांचं झालंय. बस्टर कीटन, चार्ली चॅप्लिन, लॉरेल-हार्डी इत्यादी दिग्गजांच्या तोडीचा विनोदवीर आपल्या पिढीनंही अनुभवला, हे सांगण्यासाठी बिनतोड पुरावा म्हणून आपल्याला त्याच्याकडे बोट दाखवता येतं.

सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. बहुधा १९०३ साल असावं. लंडनच्या एका सभागृहात बहुरंगी कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाला उशीर होत होता. ब्रिटिश प्रेक्षक होते ते... रसिक असले तरी ब्रिटिशच.

विलंब झालेला खपवून कसा घेणार? चुळबूळ सुरू झाली. ‘आजच्या कार्यक्रमात एक सरप्राईज आयटम आहे, प्रतीक्षा करा’ असं बजावून सूत्रसंचालक मघाशीच पडद्याआड गायब झाला होता. तेवढ्यात सभागृहाच्या एका कोपऱ्यात धडपडणाऱ्या दारुड्याकडे सर्वांचं लक्ष गेलं.

आपली हॅट टांगण्यासाठी त्याची मरणाची कसरत चालली होती. कम्प्लिट टाईट होती स्वारी; पण तरीही नाटकाला येण्याची खाज किती! हॅट सावरताना स्वत:च चार-सहा वेळा पडला. सभ्य स्त्रियांनी नाकं मुरडली. काहींना दारूचा वासही आला.

त्यांनी नाकाला रुमाल लावले. मद्यधुंद अवस्थेतच सभ्यपणा सोडला नव्हता त्यानं. अधूनमधून आसपासच्या प्रेक्षकांची माफीही मागत होता. कशीबशी... मग दोन पायांवर कसाबसा लटपटत तो धुंद माणूस चक्क स्टेजवरच चढला, तेव्हा मात्र पब्लिकचा संयम सुटला. वेळ जात नव्हता, म्हणून एवढा वेळ या दारुड्याला सहन केलं.

आता थेट रंगमंचावर? हा काय मूर्खपणा आहे? एक-दोघांनी निषेधाचे सूर काढले. तेवढ्यात सूत्रसंचालकानं स्टेजवर येऊन सांगितलं, ‘रसिकहो, हाच होता तो सरप्राईज आयटम... मीट मि. चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन!’

एकही शब्द न बोलता कोवळ्या, नवतरुण, अवघ्या १४ वर्षांच्या चार्ली चॅप्लिननं हा धुमाकूळ घातला होता. तितक्याच नि:शब्दपणे मान तुकवून त्यानं रसिकांची दाद स्वीकारली. हा गृहस्थ दारूचा एकही थेंब प्यायलेला नाही, हे कळल्यावर प्रेक्षक थक्क झाले होते... टाळ्यांचा कडकडाट थांबेना...

अशीच नि:शब्दाची किमया पाऊणशे वर्षांनंतर लंडनमध्येच एका तरुणाने करून दाखवली; पण त्याचा अवतार आता आधुनिक झाला होता. त्याचं अवतरणं हे बच्चेकंपनीसाठी तर पर्वणी ठरलं. घरोघरी त्याची नक्कल सुरू झाली.

मि. बीन नावाचा हा अवतार एव्हाना मनोरंजनाच्या दुनियेत अजरामर झालाय... सडसडीत शरीरयष्टी. बोलण्यात चाचरणं. खरं तर तो बोलतच नाही. बोललाच तर एखादा शब्दच, त्याहून अधिक नाही. विशेषत: ‘ब’ म्हणताना त्याची बोंब होते. चेहऱ्यावर जवळजवळ काहीच भाव नाहीत.

अगदीच मठ्ठ; पण अंगात किडे खूप. एकटा जीव. तो आणि त्याची बारकी दिव्य गाडी. समस्या आली, की आपोआप त्याचा ओठ किंचित वाकडा होतो. जीभ हलकेच बाहेर येऊन ओठांच्या कडांना टेकते. डोळ्यात अद्‍भुत चमक येते.

जणू मोठ्या माणसाच्या देहात एक लहान मूल दडलेलं आहे. लहानग्यासारखाच स्वत:च्या विश्वात रमलेला. त्याला दुनियेशी काही देणं-घेणं नाही. त्याच्या आत्मकेंद्री स्वभावाला निरागसतेचा सुगंध आहे. हा आहे मि. बीन.

...मि. बीन हा लहान मुलांना आधी आवडला. मग आपल्या पोराटोरांना आवडतो, म्हणून आपणही आवडून घ्यायचा, असं पालक एकमेकांना सांगू लागले. प्रत्यक्षात आईबापांनाच मि. बीनचं वेड लागलं होतं.

हा मि. बीन वेगवेगळे उपद्‍व्याप करतो आणि ते करताना हसून हसून गडाबडा लोळायला लावतो. नव्वदीचं दशक मि. बीननं गाजवलं. तीच त्या अभिनेत्याची ओळख बनली. तो अभिनेता होता रोवन अटकिन्सन.

अंतर्बाह्य ब्रिटिश. या बावळट्ट चेहऱ्याच्या गृहस्थाकडे बघितलं तर हा इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे आणि डॉक्टोरेट मिळवण्यापर्यंत हात पोहोचवून आलेला बुद्धिमान प्राणी आहे, असं कुणाला वाटणारही नाही.

सुखवस्तू ब्रिटिश घरात जन्मलेला, उत्तम ठिकाणी विद्यार्जन करणाऱ्या रोवन अटकिन्सननं एमएस्सी केलं. डॉक्टोरेटचा प्रबंध लिहायला घेतला आणि तेव्हाच त्याला अभिनयाचा किडा चावला. मग शिक्षण गेलं उडत.

कुठल्याही विनोदी नटाचा प्रवास असतो, तसाच अटकिन्सनचा झाला. स्टॅण्डअप कॉमेडी, मग स्टेज शोज, त्यानंतर टीव्ही मालिका आणि सरतेशेवटी सिनेमे... पण हे सगळं त्यानं चोखंदळ आणि शिस्तीनं केलं. त्यात ब्रिटिश सभ्यतेचा बाज जरादेखील खाली उतरू दिला नाही. सत्तरीच्या दशकात तो केंब्रिजमध्ये एमएस्सी करत होता, तेव्हा त्याच्या मनात मि. बीनचं बीज पडलं.

एका प्रयोगात त्यानं ते केलंही. पब्लिकलाही जाम आवडलं. मग पुढे थेम्स टेलिव्हिजनसाठी त्याने मि. बीनचे लघुपट केले. एका मि. बीनच्या चित्रकथेत तो हॉरर सिनेमा बघायला जातो, असं दृश्य आहे. हातात पॉपकॉर्न आणि डोळ्यात मरणाचं भय! फुल धमाल!! पुढे त्यानं पूर्ण लांबीचे चित्रपटही पेश केले.

मि. बीननंतर त्याने जॉनी इंग्लिश नावाचा एक धमाल वेडपट गुप्तहेर साकारला होता. त्याचेही तीन-चार चित्रपट निघाले. सगळे तुफान गाजले. हा जॉनी इंग्लिश प्रत्यक्षात कमालीचा गाढव आहे; पण नशिबानेच तो प्रत्येक साहसी मोहिमेत यशस्वी होतो.

जेम्स बाँडची इतकी खिल्ली त्याच्या आधी फक्त पीटर सेलर्सच्या ‘पिंक पँथर’नेच उडवली होती. वास्तविक उमेदवारीच्या काळात रोवन अटकिन्सननं वाट्टेल त्या किरकोळ भूमिका केल्या होत्या, त्यात जेम्स बाँडचे सिनेमेही होते. ‘नेव्हर से नेव्हर अगेन’मध्ये तो काही मिनिटांसाठी दिसला आहे.

ज्या काळात चार्ली चॅप्लिन कोवळ्या वयात अभिनयाचे धडे शिकत होता, दारिद्र्याशी झुंजत होता, तेव्हा मूकपटांचा जमाना होता. बस्टर कीटन नावाचं एक गारुड तेव्हा मूकपटातून धमाल करत होतं. बस्टर कीटन ही एक वल्ली होती.

मख्ख चेहरा आणि रबराचं शरीर. कुठूनही पडला तरी लेकाचा मांजरासारखा पायावर उभा! बस्टर कीटनची स्लॅपस्टिक कॉमेडी हा तेव्हा चर्चेचा विषय असे. त्याला ‘द ग्रेट स्टोन फेस’ (थोर दगडी चेहरा) असं बिरुद वर्तमानपत्रांनी बहाल केलं होतं. त्याचे कारनामे भन्नाट असायचे. यू-ट्युबवर त्याचा ‘द जनरल’ नावाचा एक छोटा चित्रपट आहे. पटकन बघून टाका. बस्टर कीटन काय चीज होती, ते कळेल.

बस्टर कीटनचे आईबाप दोघंही नाट्यप्रयोग करायचे. अगदी साताठ महिन्यांचा असताना बस्टर कीटन प्रचंड जिन्यावरून गडगडत खाली आला, तेव्हाही त्याला खरचटलं नव्हतं. मग त्याच्या बापानं त्याला लांबवर फेकून झेलायचा खेळ सुरू केला.

पोरगं कुठूनही फेकलं तरी त्याला अजिबात लागत कसं नाही, म्हणून आईबाप च्याट पडू लागले. हौडिनी नावाच्या जगविख्यात जादूगारानंही या पोराचे कारनामे पाहून त्याला ‘बस्टर कीड’ असं नाव दिलं. तेच कायम पडून गेलं, अशी आख्यायिका आहे.

रंगमंच प्रयोगात लहानग्या बस्टरला त्याचा बाप स्टेजवरून फेकायचा. त्यासाठी त्याच्या पाठीला, शर्टावर सूटकेसला असतं तसं हँडल लावलेलं असायचं. तरीही बस्टर कीटनला कधीही खरचटलंदेखील नाही. असा हा बस्टर कीटन मि. बीनच्या घराण्याचा आद्यपुरुष आहे, असं मानलं जातं.

बस्टर कीटननं पुढे खूप मूकपट केले. ‘लाइमलाइट’ या चॅप्लिनच्या गाजलेल्या चित्रपटातही बस्टर कीटननं काम केलंय. अर्थात रोवन अटकिन्सन मात्र बस्टर कीटनचं नाव न घेता, फ्रेंच अभिनेता जेक्स ताती याचं नाव घेतो. त्याचीही कॉमेडी अशीच होती. मख्ख चेहरा आणि प्रचंड किडेबाजी!

रोवन अटकिन्सननं अमाप लोकप्रियता मिळवली. मुबलक पैकाही मिळवला. इतका की आज एका प्रचंड मोठ्या महालनुमा हवेलीत तो आरामात राहतो. दाराशी पाच-पन्नास मोटारगाड्या आहेत. त्याला रेसकारचा शौक आहे.

रेसरकार चालवताना त्याला अपघातही झाले आहेत. ऐंशीच्या दशकात त्याला मेकपरूममध्ये सुनेत्रा शास्त्री नावाची सावळी युवती भेटली. पुढे त्यानं तिच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. बरीच वर्षं सुखाचा संसार केल्यानंतर रोवननं २०१५ साली तिला सोडचिठ्ठी दिली आणि दुसऱ्याच कुण्या कॉमेडीवाल्या सहअभिनेत्रीसोबत तो राहू लागला. भारताशी त्याचा हा एवढाच संबंध.

रोवन अटकिन्सन ऊर्फ मि. बीन याचा आज शनिवारी (६ जानेवारी) वाढदिवस. हे लहान मूल आज ६८ वर्षांचं झालंय. हल्ली तो मि. बीनची व्यक्तिरेखा साकारत नाही. मि. बीन आता निवृत्त झाला, असं तो स्वत:च सांगतो. रोवन अटकिन्सनचं आता तसं वयही उरलेलं नाही. आपल्याला जुन्या ‘बीनपटां’वरच समाधान मानायला हवं.

बस्टर कीटन, चार्ली चॅप्लिन, लॉरेल-हार्डी, जेक्स ताती, पीटर सेलर्स या दिग्गजांच्या तोडीचा विनोदवीर आपल्या पिढीनंही अनुभवला, हे सांगण्यासाठी बिनतोड पुरावा म्हणून आपल्याला रोवन अटकिन्सनकडे बोट दाखवता येतं.

शब्दावाचून खळखळू हसवणाऱ्या विनोदवीरांची ही वंशावळ केवळ सलाम करावा अशीच. बच्चेकंपनी असो, बच्चेकंपनीचे आईबाप असोत, मि. बीन कोणाला आवडत नाही? रोवन अटकिन्सन अजरामर झाला आहे. बस, भारतीय बायकोला त्यानं असा घटस्फोट द्यायला नको होता यार! त्याचं कौतुक करताना उगाचच कांदेपोह्यात खडा लागल्यागत होतं. चालायचंच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT