मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी; पण सध्या गर्दीशी तिचं अतूट नातं निर्माण झालंय. इथे श्वास कोंडला तरी जगणं मस्ट... अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मात्र त्याला अपवाद ठरलीय. एका नव्या स्वप्नांच्या दिशेने सुरू झालेला प्रवास, तिच्याच शब्दांत...
कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याआधी कधी कधी मनामध्ये काहीशी शंका असते. आपण करतोय ते बरोबर आहे ना? योग्य दिशेने जातोय ना? पुढे जाऊन सगळं नीट होईल ना? असे अनेक प्रश्न असतात; पण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला पक्की खात्री असते, नक्की काय करायचंय ते माहीत असतं तेव्हा कन्फ्युजन नसतं... गोष्ट सुरू होते अगदी एकटाकी बसून लिहिलेल्या संहितेसारखी. आमच्या बाबतीत बोलायचं, तर महाबळेश्वर ही ‘ती’ संहिता आहे...
मुंबई सोडून अचानक महाबळेश्वरला जाऊन राहण्याचा निर्णय आम्ही घेतला; परंतु अनेकांसाठी तो धक्का होता; मात्र आमच्यासाठी ते अत्यंत सहज होतं; पण सोप्पं निश्चितच नव्हतं... नाहीये. मला खरंच आठवत नाही, की मुंबई सोडायची आणि दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहायचं, याबद्दल मी आणि स्वप्नील कधी एकमेकांशी असं खूप, तासन्तास बोललोय.
जसं आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर, एकमेकांशी काहीही न बोलता आम्हाला कळलं होतं की आम्ही लग्न करणार आहोत... तसंच लग्नानंतर आम्हाला हेही कळलं होतं की आम्ही काही काळातच मुंबई सोडणार आहोत, एकमेकांशी काहीही न बोलता!
त्याला कारणं बरीच आहेत. पहिलं आणि मुख्य कारण होतं, ‘जगणं’... मुंबई-पुण्यातील सर्व्हायव्हलच्या खेळात आम्ही जगणंच विसरून गेलो होतो. ही किती सिनेमे करतेय, ती कुठे कुठे दिसतेय, त्याने किती पैसे मिळवले, याने कुठे घर घेतलं... आणि त्याचबरोबर हा कॅन्सरने गेला, त्याला लहान वयात हार्ट अटॅक आला, ही डिप्रेशनच्या गोळ्या घेत आहे आणि तो घरात एअर प्युरिफायर लावून जगत आहे...! अशी सगळी दुखणी विकतचीच होती.
आमच्याकडे दोन पर्याय होते. एक म्हणजे, या प्रश्नांबरोबर पळत राहायचं आणि रेस जिंकायची, हरायची किंवा सोडून द्यायची! आम्ही सोडून दिली आणि रेस जिंकलो! कारण पैशांची, जिंकण्याची अन् मान-सन्मानाची बेरीज चालू होती; पण तब्येत आणि मानसिक स्वास्थ्य यांची फक्त वजाबाकी होत होती.
हिशेब शून्यच होता... नक्की कशासाठी? कोणासाठी? आणि कुठे थांबायचं हे प्रश्नसुद्धा अनुत्तरित होते; पण कदाचित म्हणूनच पुढचा मार्ग जास्त नीट दिसायला लागला आणि ठरवून टाकलं बाहेर पडायचं... मुद्दा फक्त माझ्या करिअरचा होता... ‘पर्याय’ नसलेल्या मुंबईमधून बाहेर पडायला लागणार होतं. करिअर संपणार नव्हतं याची खात्री होती; पण त्यासाठी तारेवरची कसरत करायला लागणार, हे नक्की होतं.
स्वप्नील मूळचा इंजिनियर... डबल एमबीए. स्वतःच्या तीन कंपन्या; पण तोही त्या आयुष्याला कंटाळला होता. लग्नानंतर वर्षभरातच सगळ्या कंपन्यांचा पसारा आवरून त्याने त्याला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये शून्यातून सुरुवात केली... Permaculture (पर्माकल्चर)... म्हणजे नक्की काय? तर इकॉलॉजी अर्थात पर्यावरणशास्त्र आणि माणसाच्या गरजा याची सांगड घालणारी शेतीमधली एक नवीन शाखा... निसर्गाला कमीत कमी हानी पोचवत जगण्याचा एक नवा पर्याय. स्वप्नील हुशार आणि अभ्यासू आहे.
एखादी गोष्ट करायची ठरली, की मग त्याच्या मुळापर्यंत जाऊन शिकण्याची वृत्ती त्याच्यात आहे. त्याने शिकायला सुरुवात केली आणि दोन वर्षांत एक गोष्ट लक्षात आली, की जे काही शिकतो आहे आणि जे प्रयोग करायचे आहेत ते घरात बसून शक्य नाही. उद्या पुढे जाऊन हे जर आम्हाला लोकांनासुद्धा शिकवायचं असेल तर स्वतःची जागा हवी. स्वतःचं शेत पाहिजे. ही सगळी थिअरी प्रॅक्टिकलमध्ये उतरायला हवी... मग आमच्या लक्षात आलं, की पुढची पायरी चढायची वेळ आली आहे. आम्ही लागलीच जमिनीचा शोध सुरू केला.
मनात मुंबई सोडण्याबद्दल शंका नव्हती; पण स्वतःवर जो विश्वास आहे तो अनाठायी नाही ना, हेही बघणं गरजेचं होतं. आपल्याला वाटतंय, आपण सगळं सोडून राहू शकू; पण हाताखाली दोन माणसांची सवय असणारे आपण सगळंच स्वतःचं स्वतः करू शकू? खरंच जंगलात जाऊन राहू शकू? नक्की घाबरणार नाही ना? थांबणार नाही ना? मग म्हटलं, करून बघू... पण नक्की कसं? कुठून तरी सुरुवात करायची म्हणून आम्ही आमच्या काही मित्रांच्या शेतावर वॉलिंटअरिंग करायला गेलो.
म्हणजे काय? तर सोप्प्या शब्दात सांगायचं झालं तर शेतमजूर बनलो... सकाळी नऊ ते पाच शेतात पडेल ते काम करायचं. त्या बदल्यात दोन वेळचं जेवण ते देणार आणि भरपूर अनुभव आपल्याला मिळणार... आम्ही पाचगणीला आमच्या मित्रांच्या (अर्थात ते नंतर मित्र झाले, अगदी आयुष्यभराचे) शेतात वॉलिंटअरिंग करण्यासाठी महिनाभर राहिलो.
बरोबर आमचा पाळीव, चार पायांचा मुलगा ‘कार्बन’ होताच... तिथे गेल्यानंतर मात्र आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली.. ‘कार्बन’ आणि आम्ही तेव्हापर्यंत एवढे आनंदी कधीच नव्हतो. कारण, पोटात चांगलं खाणं गेलं पाहिजे, फुप्फुसात चांगली हवा जायला हवी... आपलं खाणं कोणतीही भेसळ किंवा फवारणी झालेलं नसावं.
आपल्यालाच आपल्या डोळ्यांसमोर ते उगवता आलं तर किती बरं होईल! हे आम्ही पुणे-मुंबईत फक्त बोलत होतो आणि त्या शेतावर आम्ही तसे जगत होतो. जगात बाकी कशाहीपेक्षा निरोगी राहणं आणि शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्या कोणावर अवलंबून नसणं यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाहीये हे लक्षात आलं आणि आम्ही घेतलेला मार्ग योग्य आहे यावर शिक्कामोर्तब झालं.
तिकडे काम करत असताना रविवारी सुट्टी असायची. त्यामुळे आजूबाजूच्या जमिनी बघण्याचा उद्योग सुरू होताच... आणि एके दिवशी आम्ही इकडे आलो. मालूसर गावात. महाबळेश्वरपासून नऊ किलोमीटर आतमध्ये. चारही बाजूंनी जंगल. डोंगरांची कुशी... बाजूला फक्त एक शेजारी. बाकी माणसं नाहीत. शेतावर दोन विहिरी आणि विजेचं कनेक्शन.
छान पाडलेले टप्पे आणि सुंदर माती... जे काही पेरू ते उगवेल अशी! आणि दूर असूनसुद्धा पोचायला उत्तम रस्ता. अगदी आपल्या शेतातून पुढच्या गावापर्यंत जाणारा... आम्ही जागेच्या प्रेमातच पडलो. टायटल क्लिअर होतं. बजेट मात्र कोलमडलं होतं; पण माणूस प्रेमात पडला की खरंच आंधळा होतो. आजपर्यंत जेवढं साठवलं होतं तेवढं सगळं मोडून आम्ही उडी मारायची ठरवलं आणि जून २०२१ ला जागेचा व्यवहार पूर्ण झाला.
शेतात जाऊन आम्ही पूजा केली आणि स्वप्न बघायला सुरुवात केली; पण... जुलै महिन्यातच, म्हणजे आम्ही जमीन विकत घेतल्याच्या पंधराव्या दिवशी, महाबळेश्वरला ‘न भूतो न भविष्यति’ असा पाऊस कोसळला. सहा ते सात तासांत २४ इंच पाऊस झाला होता. ढगफुटी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. दोन्ही विहिरी पडल्या... वाहून गेल्या. बरोबर जमिनीचा सगळा सुपीक थर गेला. सुरेख टप्पे होते त्याचे तुकडे तुकडे झाले. भेगा पडल्या. दगड-गोटे वर आले.
रस्ते वाहून गेले... पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय असतं ते आम्ही अक्षरशः बघितलं... अनुभवलं. ही बातमी आली तेव्हा आम्ही पुण्यात होतो. ऐकून अक्षरशः सुन्न झालो. बरं, स्वतः जाऊन बघून यावं तर तिथपर्यंत चालत जाता येईल, अशी परिस्थितीही नव्हती. प्रचंड वाताहत झाली होती सगळीकडेच. जे काही घडतंय ते सगळं फक्त ऐकत राहणं एवढंच हातात होतं.
दोन महिने लागले आम्हाला पुन्हा जमिनीवर पाऊल ठेवायला. झालं ते बघवत नव्हतं. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. नुकसान सगळीकडेच होतं. प्रत्येक गावात साधारण अशीच परिस्थिती होती. ज्या ज्या कारणांसाठी ही जमीन विकत घेतली होती ती सगळी कारणं पाऊस बरोबर घेऊन गेला होता. सुरुवातच अशी झाली होती. आता आमच्यासमोर दोन पर्याय होते. एक, रडत बसणं आणि दुसरा, कंबर कसून कामाला लागणं... आम्ही दुसरा पर्याय निवडला!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.