Drawing sakal
सप्तरंग

छायाचित्र कलेचा बहुरंगी आविष्कार

छायाचित्र कलेचा शोध लागला तेव्हा अभ्यासकांना वाटलं, की आता चित्रकलेचा अंत जवळ आला आहे. दुसरीकडे तेव्हा काही दुढ्ढाचार्य तर ‘छायाचित्र ही कलाच नाही’ असं म्हणत होते.

प्रा. अविनाश कोल्हे nashkohl@gmail.com

छायाचित्र कलेचा शोध लागला तेव्हा अभ्यासकांना वाटलं, की आता चित्रकलेचा अंत जवळ आला आहे. दुसरीकडे तेव्हा काही दुढ्ढाचार्य तर ‘छायाचित्र ही कलाच नाही’ असं म्हणत होते. कालपुरुषानेच त्यांचे आक्षेप रद्द ठरवले. बोलपट आले तेव्हा वाटलं, की आता नाटक संपलं.

उलट आज असं दिसतं, की या सर्व कला एकत्र नांदत आहेत, वाढत आहेत... गेली अनेक शतकं अभ्यासकांच्या जगतात ‘परंपरा आणि नवता’ याबद्दल चर्चा सुरू आहे. या चर्चेचा छायाचित्रांच्या रूपातील आविष्कार नुकताच मुंबईत भरलेल्या प्रदर्शनात पाहायला मिळाला.

‘भारताची आर्थिक राजधानी’ ही मुंबईची जुनी आणि माझ्या मते बरीच कालबाह्य ओळख आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीसुद्धा आहे, असं छातीठोकपणे विधान करता येतं. शेअर बाजार, मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालयं असलेल्या मुंबईला ही ओळख मिळवून देण्यात नरिमन पॉईंटमध्ये असलेलं ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट’ (स्थापना - १९६९) आणि जुहूला असलेलं पृथ्वी थिएटर (स्थापना - १९७८) या दोन संस्थांचा सिंहाचा वाटा आहे.

त्यातही ‘एनसीपीए’ नरिमन पॉईंटसारख्या भागात असल्यामुळे आणि तेथे विविध कलांसाठी वेगवेगळी संकुलं असल्यामुळे त्याला भेट देणं, हा नेहमी प्रसन्न अनुभव असतो. या दोन संकुलांनी मुंबईतील बिगर-मराठी रंगभूमीला आणि इतर कलाप्रकारांना हक्काचा अवकाश मिळवून दिला.

‘रंगभूमी’ या कलाप्रकाराबरोबर मुंबईतील ‘छायाचित्रकला’ या कलाप्रकारातील ताजे आविष्कार बघायला मिळण्याच्या दोन हक्कांच्या जागा आहेत. एक म्हणजे, फोर्ट भागातील ‘द फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया’चे कार्यालय-कम-गॅलरी. ही संस्था १९३७ साली (भारत स्वतंत्र होण्याच्या दहा वर्षं आधी) स्थापन झाली आणि आजही कार्यरत आहे.

छायाचित्रांसाठी दुसरी हक्काची जागा म्हणजे ‘एनसीपीए’तील एक महत्त्वाचं संकुल... अर्थात ‘दिलीप पिरामल आर्ट गॅलरी’. या दोन जागा फक्त कलादालनं नसून ‘छायाचित्र’ या कलाप्रकारासाठी अतिशय गंभीरपणे कार्य करत असलेल्या संस्था आहेत. येथे छायाचित्रांच्या प्रदर्शनांबरोबरच ज्येष्ठ छायाचित्रकारांच्या मुलाखती, छायाचित्रांचे प्रशिक्षण देणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यशाळा नेहमी आयोजित केल्या जातात.

अलीकडेच दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत दोन महत्त्वाची प्रदर्शनं भरली होती. ‘सिटी ऑफ जॉय ः कोलकाता ः हेवन फॉर स्ट्रीट फोटोग्राफी’. या प्रदर्शनाबद्दल लिहिण्याअगोदर आधुनिक कोलकात्याचा इतिहास अगदी थोडक्यात समजून घेतला पाहिजे... इंग्रजांनी भारतावर १९० वर्षे राज्य केलं. त्यातील अनेक वर्षे त्यांची राजधानी कोलकाता (जुन्या भाषेत कलकत्ता) होती. १९११ मध्ये इंग्रजांनी राजधानी नवी दिल्लीला हलवली.

तोपर्यंत कलकत्त्यावर पाश्‍चात्त्य संस्कृतीची घट्ट छाप पडली होती, जी आजही दिसते. कोलकात्यातील ‘शेक्सपियर सरानी’सारखे रस्ते, ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल’, ‘डलहौसी चौक’ वगैरे डोळ्यांपुढे आणा म्हणजे वस्तुस्थिती लक्षात येते. अशा कोलकाता शहराला केंद्रस्थानी ठेवून डॉमनिक लॅपिएर या फ्रेंच लेखकाने १९८५ मध्ये ‘सिटी ऑफ जॉय’ ही कादंबरी लिहिली.

या कादंबरीवर १९९२ मध्ये सिनेमा आला होता. अशा कोलकाता शहराला केंद्रस्थानी ठेवून दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत ‘सिटी ऑफ जॉय-कोलकाता’ हे छायाचित्रांचं प्रदर्शनं भरलं होतं. त्यात भारतातील ३६ नामवंत छायाचित्रकारांनी कोलकाता शहराची घेतलेली छायाचित्रं बघायला मिळाली.

छायाचित्रांच्या जगतात आजकाल ‘रस्त्यावरची फोटोग्राफी’ (स्ट्रीट फोटोग्राफी) या प्रकाराला स्वतंत्र महत्त्व प्राप्त झालं आहे. या आधी वाइल्ड लाइफ फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी आणि सर्वात लोकप्रिय म्हणजे वेडिंग फोटोग्राफी वगैरे प्रकार रूढ झालेले होते. आता स्ट्रीट फोटोग्राफी हा प्रकार लोकप्रिय आहे. काही अभ्यासकांच्या मते १८५०च्या दशकात फ्रेंच फोटोग्राफर चार्ल्स नेग्रे याने या प्रकारची छायाचित्रं घेण्यास सुरुवात केली.

त्याने स्टुडिओत अडकलेली ‘छायाचित्र’ ही कला बाहेर आणली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या घोडागाड्या, जात-येत असलेले पादचारी, रस्त्यावर उनाडक्या करणारी मुलं वगैरेंचे फोटो काढायला सुरुवात केली. बघता बघता हा कला प्रकार युरोप-अमेरिकेत लोकप्रिय झाला. आज तर असं म्हटलं जातं, की ‘स्ट्रीट फोटोग्राफी करावी तर न्यूयॉर्कमध्येच’...

भारतात स्ट्रीट फोटोग्राफी सुरू करण्याचा मान रघुवीर सिंग यांना देण्यात येतो. त्यांनी १९६०च्या दशकात कलकत्ता शहराचे काढलेले फोटो फार गाजले. त्यांचे फोटो ‘लाईफ’ या नामवंत मासिकात प्रसिद्ध व्हायला लागले. आता भारतात स्ट्रीट फोटोग्राफी हा प्रकार चांगलाच स्थिरावला आहे. याचा पुरावा म्हणजे दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत भरलेलं हे धमाल प्रदर्शन. या प्रदर्शनात कोलकाता शहराचे असंख्य फोटो पाहायला मिळाले.

वीर संघवी या ज्येष्ठ पत्रकाराच्या मते, ‘if you want a city with soul, come to Calcutta’... या प्रदर्शनात सहभागी झालेल्या छायाचित्रकारांनी कोलकाता शहराचे असंख्य मूडस् पकडले होते. दुर्गा पूजा, हावडा ब्रीज वगैरेंचे फोटो बघताना ‘गतकाळरमणीयता’ ही भावना मनात शिरते. आजचे कोलकाता म्हणजे जुन्या-नव्याचा मनोहारी संगम.

रवींद्रनाथ टागोरांचा कलकत्ता, सत्यजित राय-मृणाल सेन यांचा कलकत्ता, सुनील गंगोपाध्याय यांचा कलकत्ता, नक्षलवादी चळवळीचे एके काळी केंद्र असलेलं कलकत्ता, तब्बल ३३ वर्षे सलग मार्क्सवाद्यांची सत्ता बघितलेलं कलकत्ता आणि फेब्रुवारी १९६८ मध्ये रवींद्र सरोवर परिसरात शरम आणणारी घटना बघितलेलं कलकत्ता शहर... या शहराची किती रूपं आहेत! गेली अनेक शतकं अभ्यासकांच्या जगतात ‘परंपरा आणि नवता’ याबद्दल चर्चा सुरू आहे. या चर्चेचा छायचित्रांच्या रूपातील आविष्कार म्हणजे हे प्रदर्शन.

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ऑक्टोबर १९४५ मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघ’ स्थापन झाला. तसंच विविध ‘प्रादेशिक संघटना’ स्थापन होण्याची सुरुवात झाली. त्यातील पहिली प्रादेशिक संघटना म्हणजे १९५७ मध्ये रोम शहरात स्थापन झालेली ‘युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी’. त्यानंतर ‘सार्क’, ‘आसियान’ वगैरे अनेक प्रादेशिक संघटना स्थापन झाल्या.

त्यातील अनेकदा चर्चेत असलेली आणि २००९ मध्ये ‘ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका’ या देशांनी स्थापन केलेली ‘ब्रिक्स’ ही प्रादेशिक संघटना. या देशांच्या नावातील पहिले अक्षर घेऊन ‘ब्रिक्स’ (BRICS) हे नाव पडलं आहे. या संघटनेतील सभासद देशांतील नामवंत छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत अलीकडेच भरले होते.

त्यात रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि भारत या पाच सभासद देशांतील छायाचित्रकरांनी आपापल्या देशातील महत्त्वाच्या शहरांची घेतलेली रंगीत आणि कृष्णधवल छायाचित्रं बघायला मिळाली. त्यात कोरोना विषाणूमुळे एका प्रकारे जगभर बदनाम झालेल्या चीनमधील वुहान शहराची दोन छायाचित्रं होती.

शिवाय, भारतातील बनारस शहरामधील गंगेच्या घाटाचं विकास बाबूंचं अप्रतिम छायाचित्रही पाहायला मिळालं. जयपूरमधील हवामहलचं वेगळ्या कोनातून जितेंद्रसिंग यांनी घेतलेलं आणि मोनाल गर्ग यांचं मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया अन् त्याच्या शेजारी असलेल्या ताजमहाल हॉटेलच्या परिचित छायाचित्रांमुळे प्रदर्शन वेगळं ठरलं.

छायाचित्र कलेचा शोध लागला तेव्हा अभ्यासकांना वाटलं, की आता चित्रकलेचा अंत जवळ आला आहे. माणसाची, निसर्गाची हुबेहूब प्रतिकृती मिळत असताना आता चित्र कोण आणि कशासाठी काढेल, असं वाटत होतं. दुसरीकडे तेव्हा काही दुढ्ढाचार्य तर ‘छायाचित्रं ही कलाच नाही’ असं म्हणत होते. कालपुरुषानेच त्यांचे आक्षेप रद्द ठरवले.

त्याचप्रमाणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बोलपट सुरू झाले तेव्हाही वाटलं होतं, की आता नाटक संपलं. सिनेमाच्या तुलनेत नाटक टिकणारच नाही. प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. उलट आज असं दिसतं, की या सर्व कला एकत्र नांदत आहेत, वाढत आहेत. या भिन्न भिन्न माध्यमांतून मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण करत आहेत.

(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलासंस्कृतीच्या घडामोडींचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT