Prostitution Business Sakal
सप्तरंग

वेश्या व्यवसायाला हवी समाजमान्यता

नलिनी जमिला या नामवंत लेखिका असून, त्यांची पुस्तके बंगाली, गुजराती, तमिळसह इंग्रजी, फ्रेंचमध्येही भाषांतरित झाली आहेत.

अवतरण टीम

नलिनी जमिला या नामवंत लेखिका असून, त्यांची पुस्तके बंगाली, गुजराती, तमिळसह इंग्रजी, फ्रेंचमध्येही भाषांतरित झाली आहेत.

- नलिनी जमिला

नलिनी जमिला या नामवंत लेखिका असून, त्यांची पुस्तके बंगाली, गुजराती, तमिळसह इंग्रजी, फ्रेंचमध्येही भाषांतरित झाली आहेत. स्वतः या दाहक अनुभवातून गेल्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना मिळणाऱ्या वागणुकीने त्या व्यथित झाल्या आणि त्यांनी या महिलांच्या हक्कांसाठी अनेक आंदोलने केली. सध्या त्या केरळ, तसेच देशपातळीवरील अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. देहविक्रयाकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे आणि तो व्यवसाय करणाऱ्या महिलांना समाजात समान वागणूक दिली पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मांडले आहे, त्या निमित्त नलिनी जमिला यांचे मनोगत...

वेश्या व्यवसाय म्हणजे समाजाला एक मोठा कलंक आहे, अशी भावना असलेल्या या देशात गरिबीने अनेकींना त्यात ढकलले, हे वास्तव आहे. कोण स्वतःहून देह व्यापार करीत नाही. २४ व्या वर्षी मला वैधव्य आले तेव्हा पदरात दोन मुले होती. मुलांच्या उदरनिर्वाहासाठी यात ढकलले गेले. काही उपायच नव्हता त्या परिस्थितीत. पोट भरण्यासाठी एका महिलेने हे करण्यास सुचवले आणि एक ग्राहकही पाठवला. तो निघाला पोलिस अधिकारी... त्यानेच सकाळी मला पोलिस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केली. काय स्थिती असते अशा महिलेची... कोण ऐकणार तिची कहाणी. पण पैसे मिळतात म्हणून ते काम करावे लागले. मी स्वतः अनेकदा परत मागे येण्याचा प्रयत्न केला, पण ती संधीच मिळत नाही. कोण स्वीकारणार अशा कलंकित महिलेला... हळूहळू या महिलांची स्थिती, त्यांची पिळवणूक, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक समस्या स्वतः अनुभवल्यावर त्यावर काहीतरी केले पाहिजे, असे वाटू लागले. हळूहळू त्यासाठी पुढाकार घेतला. काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी आंदोलने केली, रस्त्यावर उतरले, पण समाजाने जो शिक्का आमच्या डोक्यावर मारला आहे, त्यातून काही सुटका होऊ शकली नाही. मग हेच वास्तव स्वीकारून आपण जगायला शिकले पाहिजे, असा निर्धार केला. मी एक वेश्या आहे, हे मला सांगायला लाज वाटत नाही. त्यामुळेच मी आत्मचरित्र लिहिले. देह व्यापार हा माझा व्यवसाय आहे, हे मी स्वीकारले आणि ते लोकांना या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेही.

समाजातून अनेक प्रतिक्रिया आल्या, नीतिमत्तेच्या रक्षकांनी टीका केली, पण त्याकडे दुर्लक्ष केले, किंबहुना करावे लागले. या आत्मचरित्राच्या शंभर दिवसांत सहा आवृत्त्या निघाल्या आणि इंग्रजी, फ्रेंचमध्ये हे पुस्तक भाषांतरितही झाले. त्यामुळे एक ओळख मिळाली आणि त्यातून आणखी बळ मिळाले.

त्रिस्सूरमधल्या बस थांब्यावर इंदू वेश्या व्यवसाय करायची... ३० वर्षांच्या इंदूला यातून बाहेर पडायचे होते. आम्हाला माहीत होते की तिच्या हाताला चव आहे. तिला काय काम द्यावे असा प्रश्न होता. यापूर्वी काही महिलांना आम्ही नारळ पाणी विकण्याचे स्टाॅल उभारून दिले होते. पण सगळ्यांनाच असे व्यवसाय जमत नाहीत. घरकाम करायला इंदू ची तयारी हाेती; पण मग तिला घरात कोण ठेवून घेणार, असा प्रश्न उभा होता. पण एक सज्जन व्यक्ती तयारी झाली. सध्या ती एका घरात स्वयंपाकाचे काम करते. तिचे सध्या आयुष्य उत्तम सुरू आहे, ती आनंदी आहे.

पूर्वी देहविक्रय करणाऱ्या महिलांची स्थिती अधिक दयनीय होती. त्या काळात त्यांना पोलिस अमानुषपणे मारहाण करायचे, हिरव्या मिरच्या खायला द्यायचे, अतिगरम पाणी प्यायला द्यायचे... अशी अनेक प्रकारे छळवणूक केली जायची. आणखी कडी म्हणजे फुकट उपभोगही. पण आता स्थिती बदलली आहे. या छळाविरोधात अनेक संघर्ष, लढे दिले. अनेक सामाजिक संस्थांचे पाठबळ मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या मतांचे स्वागतच आहे. त्यानिमित्ताने वेश्या महिलांना किमान समान वागणूक तरी मिळावी, हीच समाजाकडून अपेक्षा आहे. त्यांना सामान्य नागरिकांसारखे अधिकार द्या, त्यांच्या मुलांना समाजात योग्य ते स्थान द्या, त्यांनाही पुढे येऊ दे, या काही मागण्या आहेत.

देशभरातील या महिलांच्या स्थितीबाबत काम करताना अनेक मुद्दे पुढे येतात. देहविक्रय हा एक स्वतंत्र व्यवसाय मानला गेला पाहिजे. याची अंमलबजावणी करण्यासाठी काही कठोर कायद्यांचीही गरज आहे. एखाद्या महिलेला समाजात सामान्य नागरिकाप्रमाणे वागण्याची मुभा मिळत नसेल तर त्यावर कारवाई व्हायला हवी. तिच्या नागरिक म्हणून अधिकारांची जपणूक केली पाहिजे. केवळ वेश्या हा कलंक म्हणून तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. पण न्यायालयाने वेश्यागृहे बेकायदा ठरवू नयेत. कारण या महिलांना दुसरा आधारच नाही. त्या कुठे जाणार व्यवसायासाठी? एखाद्या परिसरात त्यांना विशिष्ट जागा असेल तर ते त्यांच्या, तसेच ग्राहकांच्याही सोयीचे असते. नाही तर त्या महिला पुन्हा रस्त्यावर उभ्या राहतील.

मग अनेक सामाजिक प्रश्न उभे राहतात. वेश्यागृहांमधली पिळवणूक मात्र थांबली पाहिजे. तिथे दलाल त्रास देतात. ते असता कामा नयेत. एखाद्या महिलेने स्वीकारलेला पेशा आहे, त्यामुळे त्याबाबतचे सर्व निर्णय तिनेच घेणे अपेक्षित आहे. ती त्या वेश्यागृहात नोकरी करीत नाही. दलाल किंवा मॅडम मधे आले की वाद आणि आर्थिक, शारीरिक शोषणाला सुरुवात होते. सध्याची स्थिती विदारक आहे, त्यामुळे त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी व्यवस्थित जागाही मिळाली पाहिजे, तेथील सुविधांसाठी वेश्यांनी मोबदलाही दिला पाहिजे. कामाठीपुरासारख्या अरुंद जागेत अनेक त्रास या महिलांना भोगावे लागतात. तीही माणसेच आहेत, त्यामुळे त्यांचा त्या दृष्टीने विचार केला गेला पाहिजे. एखाद्या लॉजमध्ये या महिलांना सामान्य लोकांप्रमाणे प्रवेश दिला जात नाही.

वेश्यागृहातील मुलांचे प्रश्न आहेत. १९९८ पासून या मुलांच्या प्रश्नावर मी काम करते आहे. विशेषतः एचआयव्ही जागृतीवर जास्त भर दिला. तेव्हा या महिलांना माध्यमांशी बोलायला बंदी केली जात असे. मग आमचे प्रश्न समाजासमोर येणार कसे? अशा स्त्रियांनी त्यांचे प्रश्नच मांडायचे नाहीत, अशी ही भूमिका होती. पण आता सर्वोच्च न्यायालयामुळे वेश्यांचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील. अनेकांना असे वाटते की, वेश्यागृहात सर्वांना जबरदस्तीने आणून ठेवले जाते. मात्र माझे स्पष्ट मत आहे की, हा स्वीकारलेला पेशा आहे. त्यामुळे एखाद्या महिलेला कोणी बळजबरीने आणले असेल तर तिला समाजात परत जाण्याचा अधिकार आहे, तिला तिचे भविष्य घडवायचा अधिकार आहे. सरकारनेही त्यांना समाजात मानाने जगण्याच्या दृष्टीने मदत केली पाहिजे. सरकारने सर्वेक्षण करून माहिती घ्यावी आणि ज्या महिलांना हा पेशा सोडून अन्य काही काम करायचे असेल तर त्यांना त्याचे प्रशिक्षण द्यावे, त्यांच्या पुनर्वसनासाठी महिलागृहे तयार करावीत, अशी माझी सूचना आहे. ‘वेश्या’ या कलंकातून त्यांची सुटका करण्यासाठी सरकार आणि समाजाने एक सेतू बांधला पाहिजे.

(शब्दांकन : जयवंत चव्हाण, निखिल रवी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT