कर्ज घेताना किंवा इतर वेळीसुद्धा आपण "सिबिल क्रेडिट स्कोअर' हा शब्द ऐकून असतो. हा "स्कोअर' म्हणजे नेमकं असतं काय, "सिबिल' म्हणजे काय, हा स्कोअर कसा काढतात, तो चांगला राखणं गरजेचं का असतं आदी गोष्टींवर नजर...
अनेकदा आपण कर्ज घेताना किंवा इतरवेळीसुद्धा "सिबिल क्रेडिट स्कोअर'बद्दल ऐकत असतो. सिबिल स्कोअर तपासल्याशिवाय बॅंक कर्ज देत नाही, तो चांगला नसेल तर कर्ज घेताना काही अडचणी येऊ शकतात आदी गोष्टी आपण ऐकतो; पण खोलात जाऊन आपल्याला अधिक माहिती नसते. "सिबिल'संदर्भात सर्वसामान्य लोकांना काय अडचणी अथवा शंका आहेत, त्या आपण बघू या.
क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेडचं लघुरूप म्हणजे "सिबिल.' ही संस्था कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची माहिती आपल्याकडे ठेवते, ज्यामुळं कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था अथवा बॅंकेला त्या व्यक्तीसंदर्भातला पूर्ण "क्रेडिट इतिहास' समजतो. उदाहरणार्थ, ती व्यक्ती वेळोवेळी कर्ज बरोबर फेडते की नाही, अथवा क्रेडिट कार्डसंदर्भात क्रेडिट मर्यादा ओलांडते आहे का, किंवा व्यक्तीनं घेतलेल्या कर्जांमध्ये असुरक्षित कर्जाचं प्रमाण अधिक आहे का आदी सर्व माहिती समजू शकते. "सिबिल' ही बॅंक आणि वित्तसंस्था यांना ग्राहकाची क्रेडिट माहिती पुरवणारी भारतातली अग्रगण्य संस्था आहे. चोवीसशेहून अधिक बॅंका, बॅंकेतर संस्था आणि वित्तसंस्था कंपनीच्या सभासद आहेत आणि 55 कोटींहून अधिक लोकांचा आणि व्यवसाय धंद्यांचा क्रेडिट इतिहास कंपनीकडे आहे. थोडक्यात काय, तर सिबिल हा कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा यांच्यातला व्यवहार सुरक्षित करणारा दुवा आहे. सिबिलकडून हिरवा सिग्नल आल्यानंतरच बॅंका ग्राहकाला कर्ज देतात. हा हिरवा सिग्नल म्हणजेच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर होय.
"सिबिल क्रेडिट स्कोअर' म्हणजे काय?
"क्रेडिट स्कोअर' हा 300-900 दरम्यानचा तीन आकडी अंक असतो. बॅंका आणि वित्तसंस्था यांच्याकडून सिबिल वेळोवेळी ग्राहकांच्या क्रेडिटसंदर्भातली माहिती गोळा करत असते. त्याला क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्ट (सीआयआर) असं म्हणतात. त्यावरून कर्ज घेणाऱ्याकडून कर्ज फेडण्याबाबतीत किती धोका असू शकेल हे समजतं. त्यावरूनच ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर ठरवला जातो. जितका अधिक स्कोअर असेल तितकी कर्ज मिळवण्याची शक्यता वाढते. 700 हा पुरेसा, 750 पेक्षा अधिक हा चांगला व 800 पेक्षा अधिक हा उत्तम स्कोअर मानला जातो. 750 पेक्षा अधिक स्कोअर असेल, तर कर्जवाटपाचं प्रमाण नव्वद टक्क्यांहून अधिक असतं. कर्जवाटपाबाबतीत बॅंकांकडून व्यक्तीचं उत्पन्न, आत्ता चालू असलेले ईएमआय आणि क्रेडिट स्कोअर तपासला जातो आणि नंतरच कर्जवाटपाला मान्यता दिली जाते.
"क्रेडिट स्कोअर' काढायचा कसा?
https://www.cibil.com ही सिबिलची वेबसाइट आहे. तिथं जाऊन आपल्याला आपला स्कोअर काढता येऊ शकतो. एक वर्षातून एकदा असा स्कोअर मिळू शकतो. त्याहून अधिक वेळा हवा असल्यास काही पैसे भरून तो काढता येऊ शकतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनं तो काढता येतो. व्यक्तीचं नाव, जन्म तारीख, पत्ता, पॅन नंबर, ओळखपत्र (उदाहरणार्थ आधार कार्ड) या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो.
ऑफलाइन पद्धतीमध्ये क्रेडिट इन्फर्मेशन कंपनीच्या (सीआयसी) साइटवरून विनंती अर्ज डाउनलोड करून, भरून या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीज काढून डिमांड ड्राफ्टसहित क्रेडिट इन्फर्मेशन कंपनीकडे पाठवून दिल्या, की क्रेडिट रिपोर्ट पाठवून दिला जातो. ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन पद्धती अधिक सुलभ आहे; परंतु प्रत्येकालाच ऑनलाईन पद्धतीनं करणं शक्य नाही.
"क्रेडिट रिपोर्ट' कसा वाचावा ?
"क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्ट'वरून "सिबिल क्रेडिट रिपोर्ट' तयार केला जातो. सहा भागांमध्ये तो असतो. प्रत्यक्ष सिबिल स्कोअर, वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, नोकरी व्यवसायासंदर्भातली माहिती- उदाहरणार्थ, वार्षिक अथवा मासिक उत्पन्न, स्थूल आणि निव्वळ उत्पन्न इत्यादी; त्याबरोबरच अकाउंटसंदर्भातली माहिती म्हणजे कर्जदाराला कोणी कोणी कर्जे दिली आहेत, कोणत्या प्रकारची म्हणजे वैयक्तिक, क्रेडिट कार्ड, गृहकर्ज इत्यादी कर्जं आहेत, कर्जाची रक्कम काय आहे आदी माहिती त्यात असते. सगळ्यात शेवटचा विभाग बॅंका अथवा वित्तसंस्था यांनी ग्राहकासंदर्भात सिबिलकडे केलेल्या चौकशीचा असतो. एकावेळी अनेक बॅंकांनी एकाच ग्राहकासंदर्भात विचारणा केली, तर सिबिल साशंकतेनं माहितीची छाननी करते. कारण एकावेळी इतकी कर्जं ग्राहक का घेत आहे आणि ते फेडण्याची त्याची क्षमता आहे का, हे तपासणं गरजेचं असतं.
बॅंकांनी जर सिबिल स्कोअरवरून कर्ज देणं नाकारलं, तर ग्राहक सिबिलकडे जाऊन या बाबतीत अधिक माहिती घेऊ शकतो. कोणत्या कारणामुळं आपला स्कोअर कमी आहे, हे जाणून घेऊन त्या त्रुटी भरून काढू शकतो. प्रामुख्यानं कर्जाचा हफ्ता चुकणं, क्रेडिट कार्डच्या मर्यादांचा अतिवापर, असुरक्षित कर्जांचं अधिक प्रमाण, अनेक बॅंकाकडून अनेक कर्ज घेणं यांमुळं सिबिल स्कोअरवर वाईट परिणाम होतो.
महत्त्वाच्या संज्ञा :
"क्रेडिट रिपोर्ट' वाचत असताना काही शब्दांवर सर्वसामान्य माणूस अडखळू शकतो. या शब्दांची माहिती आपण बघूः
NA/ NH : जर व्यक्तीनं कधी क्रेडिट कार्ड अथवा कर्ज घेतलं नसेल, तर या टर्म्स रिपोर्टमध्ये दिसतात. थोडक्यात रिपोर्ट तयार करण्याच्या दृष्टीनं कमी माहिती आहे; पण यामुळं कर्जवाटप नाकारलं जाईल, असं मात्र नक्की नाही.
STD: जिथं कर्जाचे हप्ते वेळेवर भरले गेले आहेत, तिथं ही संज्ञा येते.
SMA: जिथं कर्जाचे हफ्ते वेळेवर भरले गेले नाहीत तिथं ही संज्ञा येते.
DBT : जेव्हा मागील बारा महिने कर्जाबाबतीत कोणतीही क्रिया झाली नसेल, तर डाउटफुल सिच्युएशन म्हणून DBT असा उल्लेख येतो.
LSS : कर्जपुरवठादार संस्थेनं एखाद्या कर्जदाराला डिफॉल्टर घोषित केलं असेल, तर LSS असा उल्लेख येतो.
DPD : डेज पास्ट ड्यू म्हणजे जिथं कर्जदार कर्ज फेडू शकत नाहीये; पण एका नव्या योजनेनुसार तो कर्ज फेडण्याचा प्रस्ताव कर्जपुरवठादार संस्थेला करत असेल, तर हा उल्लेख येतो.
व्यवसाय अथवा धंद्यासाठी क्रेडिट रिपोर्टचं महत्त्व :
वैयक्तिक क्रेडिट रिपोर्ट तयार केला जातो; तसंच व्यवसायासाठीदेखील तो तयार करतात. पुरवठादार अथवा सरकारी खात्यांकडून काही कंत्राटं मिळवायची असतील, तर या रिपोर्टचा खूप उपयोग होतो. अगदी साध्या सेवा- उदाहरणार्थ इंटरनेट, वीजपुरवठा, फोन यांसाठीदेखील क्रेडिट रिपोर्ट दाखवावा लागतो. व्यवसायासंदर्भातले जे क्रेडिट रिपोर्ट असतात, त्यामध्ये जागेबाबतीतली माहिती, मालक अथवा संचालकांची नावं, नफा-तोटा, न्यायालयांत चालू असलेल्या दाव्यांची माहिती अशा बारीकसारीक माहितीचा उल्लेख करावा लागतो. व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांना ही माहिती खूपच मोलाची ठरते.
अशा प्रकारे एकूणच आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत, आगामी आर्थिक धोक्यांची सूचना आधी कळावी, या दृष्टीनं सिबिल स्कोअरचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
"सिबिल स्कोअर' असा सुधारा
आपला "सिबिल स्कोअर' सुधारायचा असेल, तर कर्जदारानं पुढील काळजी घेणं गरजेचं आहे ः
- घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी चुकवा.
- सुरक्षित आणि असुरक्षित कर्जाचं प्रमाण संतुलित ठेवा.
- फार जास्त कर्ज घेऊ नका.
- कर्ज संयुक्तरित्या घेतलं असेल, तर दुसऱ्या कर्जदारावरसुद्धा लक्ष ठेवा.
- आपल्या "सिबिल स्कोअर'चं नियमितपणे अवलोकन करून तो खाली जात नाही ना याची काळजी घ्या.
चांगल्या "स्कोअर'मुळं होणारा फायदा
एका व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर त्याला कर्जाच्या बाबतीत कसा अधिक फायदा होऊ शकतो, हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होऊ शकेल.
एका व्यक्तीला गाडीसाठी दहा लाख रुपये कर्ज हवं होतं, म्हणून एका बॅंकेत त्यांनी चौकशी केली असता 11.7 टक्क्यांनी कर्ज मिळेल, असं सांगण्यात आलं. त्याच वेळी दुसऱ्या बॅंकेतदेखील त्यानं कर्जाबद्दल विचारलं असता, बॅंकेनं त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर आणि इतर बाबी तपासल्या, तेव्हा स्कोअर उत्तम असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं दुसऱ्या बॅंकेनं 11.30 टक्के व्याजदराची ऑफर दिली. आता या व्यक्तीनं आधीच्या बॅंकेत नकार कळवला, तेव्हा त्या बॅंकेनं पुन्हा सुधारित ऑफर 11.25 टक्के व्याजदराची दिली. पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी व्याजामध्ये 0.45 टक्के हा फरक खूप मोठा ठरला आणि त्या व्यक्तीचा चांगला आर्थिक फायदा होऊ शकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.