Naresh Shelke writes cwg 2022 gold medal cwg-athletes Avinash Mukund Sable sakal
सप्तरंग

‘अविनाशी’ कामगिरी!

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारतीय ॲथलिट्सनी नजरेत भरण्यासारखी कामगिरी केली. त्यातील एक हीरो म्हणजे अविनाश मुकुंद साबळे.

नरेश शेळके

परिवर्तन घडवायचं असेल किंवा क्रांती करायची असेल तर एखादी कलाटणी देणारी घटना घडावी लागते. भारतानं १९८३ च्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आणि त्यानंतर भारतातील क्रिकेटचं चित्रच पालटलं. आपण विश्वविजेतेपद मिळवू शकतो, बलाढ्य संघाविरुद्ध विजय मिळवू शकतो ही मानसिकता तयार झाली. केवळ गुणवत्ता असून चालत नाही तर, मानसिकता बदलणं गरजेचं असतं. नीरज चोप्रानं ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर भारतीय ॲथलिट्सची जागतिक पातळीवर पदक जिंकण्याची मानसिकताच बदलून गेली. बहुधा त्याचाच परिणाम म्हणून असेल, ज्युनिअर जागतिक स्पर्धेपाठोपाठ राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारतीय ॲथलिट्सनी नजरेत भरण्यासारखी कामगिरी केली. त्यातील एक हीरो म्हणजे अविनाश मुकुंद साबळे.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील नायब सुभेदार अविनाशनं, ‘राष्ट्रकुल’मध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत केनियन धावपटूंची १९९० पासून असलेली मक्तेदारी मोडून काढत रौप्यपदक जिंकलं. हे केवळ रौप्यपदक नसून याचे सुप्त अर्थ फार वेगळे आहेत. एक तर, आफ्रिकी धावपटूंवर आपण मात करू शकतो हे अविनाशसह युवा धावपटूंना पटलं असेल. दुसरं, ‘दिग्गजांना धक्का देऊन जागतिक स्पर्धेत व ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्यास मी तयार आहे,’ असा आत्मविश्वास अविनाशच्या मनात आता निर्माण झाला असेल...या स्पर्धा त्याला खुणावत असतील. मात्र, यासाठी कठोर व शिस्तबद्ध मेहनतीला पर्याय नाही.

कठोर मेहनतीचं उदाहरण

हाडं गोठवणाऱ्या सियाचिनमध्ये, तसंच प्रचंड उष्णता असलेल्या राजस्थानमध्ये सीमेचं रक्षण करताना कर्तव्य बजावणारा अविनाश हा कठोर मेहनतीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याचे लष्करातील प्रशिक्षक अमरीशकुमार असोत, निकोलाय असोत की सध्याचे स्कॉट सिमन्स असोत, ही बाब सर्वांनीच मान्य केली आहे.

असा आहे अविनाशचा प्रवास

शांत स्वभावाच्या अविनाशच्या जीवनाची सुरुवात मात्र अतिशय खडतर होती. नगरपासून पुढं गेल्यावर मुंबई-बीड राज्यमार्गापासून आठ किलोमीटरवरचं तीन हजार लोकवस्तीचं मांडवा हे अविनाशचं गाव. घरी दोन एकर शेती होती. ही शेतीत उपजाऊ नसल्यामुळे वडील मुकुंद यांना व आई वैशाली यांना वीटभट्टीवर काम करावं लागायचं. लहानगा अविनाश आणि भाऊ योगेश यांनाही कधी कधी आई-वडिलांना मदत करावी लागायची. अविनाशची शाळा गावापासून सहा किलोमीटर दूर होती. येथूनच त्याचा ॲथलिट होण्याचा प्रवास सुरू झाला. चौथीत असताना क्रीडाशिक्षक बाबासाहेब तावरे यांनी त्याला एक किलोमीटर शर्यतीत भाग घेण्यास सांगितलं होतं. यात त्यानं पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तो औरंगाबाद येथे क्रीडाप्रबोधिनीत दाखल झाला. तीन वर्षं प्रबोधिनीत राहिल्यानंतर परत गावाकडे आला. अखेर अठराव्या वर्षी तो लष्करात दाखल झाला. येथेच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. सन २०१६ मध्ये त्यानं सेनादलाच्या आंतर-सर्व्हिस क्रॉसकंट्रीत भाग घेतला.

येथे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अमरीशकुमार यांची नजर अविनाशवर पडली आणि दीड वर्षाच्या कालावधीत अविनाशनं चेन्नईतील राष्ट्रीय स्पर्धेत स्टीपलचेसमधील आपलं पहिलं विजेतेपद मिळवलं. गोपाल सैनी यांचा राष्ट्रीय विक्रम लवकरच मोडीत निघणार हे संकेत त्यानं चेन्नईतच दिले होते आणि २०१८ च्या भुवनेश्वर येथील स्पर्धेत जीवघेणा उकाडा असतानाही त्यानं ३७ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. त्यानंतर आतापर्यंत अविनाशनं आठ वेळा यांत सुधारणा केली.

खरं तर स्टीपलचेस हा क्रीडाप्रकार म्हणजे इन्ड्युरन्स, वेग (स्पीड) आणि ताकद यांचा संगम मानला जातो. अविनाशकडे हे सर्व काही आहे. त्यात फक्त काही बाबतींत आणखी भर टाकायची आहे. विशेषतः शेवटच्या टप्प्यातील किक त्याला तयार करायची आहे. यावर त्याचे अमेरिकी प्रशिक्षक स्कॉट मेहनत घेत आहे. स्टीपलचेस हा इव्हेंट भारतीयांना तसा नवीन नाही. या इव्हेंटला महाराष्ट्राच्या ललित बाबर यानं रिओ ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करून ग्लॅमर मिळवून दिलं. आता अविनाशनं २०१९ च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकून व त्यानंतर दोहातच जागतिक स्पर्धेची व टोकिओ ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठून जवळपास या इव्हेंटला एकप्रकारे ब्रँड बनवलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

नम्रपणा...

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता, ज्युनिअर जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता यांच्यावर मात करून अविनाशनं रौप्यपदक जिंकल्यानं, तो भारताचा महान ॲथलिट होय, अशी चर्चा सुरू झाली आहे. अविनाशला मात्र हा टॅग मान्य नाही.

तो नम्रपणे म्हणतो : ‘‘अंजू जॉर्ज, पी. टी. उषा, मिल्खासिंग किंवा नीरज चोप्रा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकं जिंकून आपला ठसा उमटवला आहे. मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.’’

अविनाशनं राष्ट्रकुलमध्ये ‘सुवर्ण’ जिंकलं नसलं तरी जागतिक पातळीवरील स्पर्धांमधील स्टीपलचेसमध्ये जी गोष्ट अशक्यप्राय मानली जात होती, ती गोष्ट अविनाशनं मिळवली आहे. त्यामुळेच रौप्यपदक असूनही त्याचं सुवर्णपदकविजेत्यासारखे; किंबहुना, त्यापेक्षा जास्त कौतुक होत आहे. ‘राष्ट्रकुल’च्या स्टीपलचेसमधील केनियाच्या वर्चस्वाचा विचार केला तर १९९० ते १९९८ या काळात सुवर्ण व रौप्य आणि १९९८ पासून २०१८ पर्यंत तिन्ही पदकं त्यांच्याच खेळाडूंच्या नावावर होती. त्यामुळेच अविनाशच्या रौप्यपदकाचं महत्त्व अधिक आहे.

स्टीपलचेस शर्यतीत आठ मिनिटांच्या आत धावण्यास विशेष आकर्षण असतं. अविनाशलाही हे आकर्षण आहे. लवकरच हे आकर्षण प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास त्यानं बोलून दाखवला आहे. अविनाशच्या कामगिरीचा तमाम क्रीडाप्रेमींना अभिमान आहे, तसाच त्याच्या आई-वडिलांनाही आहे. आठ मिनिटांच्या शिखराकडे तो झेपावत आहे. त्यासाठी पुढील वर्षीची आशियाई, जागतिक ॲथलेटिक्स, आशियाई क्रीडास्पर्धा आणि २०२४ मध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा हे शिखरावर पोहोचण्याचे व महान खेळाडू होण्याचे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे अविनाश आपल्या कामगिरीबरोबरच नम्र स्वभावामुळे भारतातील एक महान खेळाडू होईल, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT