राज्यकर्ते म्हणून अभीर उदयाला आले, ते तिसऱ्या शतकाच्या मध्यावर... सातवाहनांच्या नंतर अभीरांनी हळूहळू जम बसवला. भारताच्या एकूण बृहद् राजकीय पटलावर अभीर फार लक्षणीय नसले, तरी आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहेत. कारण त्यांचे राज्य मुख्यत्वे दख्खन प्रदेशात खानदेश, विदर्भ, पश्चिम प्रांत, अपरान्त या भागात होते. अभीरांची राजधानी अंजनेरी (नाशिक), थाळनेर, प्रकाशे आणि असीरगड या ठिकाणांवर होती. (saptarang latest article on Abhir dynasty)
अभीर अथवा आभीर ही मुळात प्राचीन काळातील एखादी लढवय्या जमात असावी. महाभारतातील ‘मौसल पर्वात’ अभीरांचा उल्लेख रानटी, लुटारू असा आला आहे. द्वारका समुद्रात बुडाल्यानंतर शिल्लक वृष्णीवीरांसह अर्जुन, यादव कुलस्त्रियांना सुरक्षित जागी घेऊन जात असताना वाटेत अभीरांच्या एका टोळीने त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना पळवून नेले आणि प्रत्यक्ष महाबाहू अर्जुनाला त्यांचा साधा प्रतिकारही करता आला नाही, अशी कथा ‘मौसल पर्वात’ आहे.
अभीरांचा उल्लेख पतंजलींच्या महाभाष्यातही आहे. पुराणांनुसार अभीर मुळात सरस्वती नदीकाठी, सोमनाथ जवळच्या प्रदेशातील होते. त्यांच्या ‘दुष्टपणा’मुळे सरस्वतीनंतर लुप्त झाली, असे महाभारत सांगते. एकूणच अभीर जमातीचे तत्कालीन आर्यांशी सख्य नव्हते!
राज्यकर्ते म्हणून अभीर उदयाला आले, ते तिसऱ्या शतकाच्या मध्यावर... सातवाहनांनंतर अभीरांनी आपला जम हळूहळू बसवला. भारताच्या एकूण बृहद् राजकीय पटलावर अभीर फार लक्षणीय नसले, तरी आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहेत. कारण त्यांचे राज्य मुख्यत्वे दख्खन प्रदेशात खानदेश, विदर्भ, पश्चिम प्रांत, अपरान्त या भागात होते.
अभीरांची राजधानी अंजनेरी (नाशिक), थाळनेर, प्रकाशे आणि असीरगड या ठिकाणांवर होती. ‘अभीर’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘अहिर’ या नावानेही ते ओळखले जातात. खानदेशातील एक बोलीभाषा ‘अहिराणी’ ही ‘अहिर’ बोलीच आहे. याशिवाय ‘गोप’, ‘गोपाल’, ‘गवळी’ अशी नावेही याच वंशाची आहेत. ते स्वत:ला यादवांच्या हैहय शाखेचे वंशज म्हणवतात. (latest marathi news)
शक क्षत्रपांच्या राजवटीत अभीर शूर व लढाऊ वृत्तीचे म्हणून त्यांच्या सैन्यात अधिकारी होते. शक क्षत्रप ‘रुद्रसिंह’ याच्या पदरी सेनापती म्हणून अभीर ‘रुद्रभूती’ होता, असा उल्लेख ‘गुंड’ येथील इ. स. १८१ च्या शिलालेखात आहे. पण, स्वतंत्र राजा अथवा राज्यकर्ता म्हणून पहिला संदर्भ मिळतो, तो ‘ईश्वरसेन’ याचा... तो ‘शिवदत्त’ याचा मुलगा होय. त्याने इ. स. २४९ मध्ये अभीर सत्ता स्थापन केली.
तो सगळ्यात नामवंत अभीर राजा होता. या वंशाचे एकूण दहा राजे होऊन गेले. वसिष्ठीपुत्र वसुसेन हा शेवटचा राजा. या राजांपैकी एक- ‘अस-अभीर’याने खानदेशात एक दुर्ग बांधला. त्याच्या नावावरून गडाला नाव मिळाले- ‘असीरगड.’ हा गड आज बऱ्हाणपूरजवळ आहे आणि ‘चिरंजीव’ अश्वत्थामा या गडावर नेहमी येतो, अशी आख्यायिका आहे.
जळगावजवळ मनूदेवीच्या डोंगरावर एक किल्ला आहे; तोही ईश्वरसेन याच नावाच्या एका अभीर वंशाच्या (गवळी) राजाने, पण पुढे १२ व्या शतकात बांधला आहे. त्याच प्रकारे विदर्भात चिखलदऱ्याला गवळीगड किंवा गाविलगड हा किल्लाही अभीर राजानेच बांधला आहे. (latest marathi news)
त्रैकुटक शाखा
अभीर वंशाचीच एक शाखा ‘त्रैकुटक’ नावाने ओळखली जाते. ‘त्रिकुट..’ तीन शिखरांची पर्वतरांग, यावरून हे नाव रूढ झाले असावे. काही संशोधकांच्या मते ते अभीरांचे अगदी समकालीन होते, तर काहींच्या मते ते अभीरांच्या नंतरही एक ते दीड शतक सत्तेवर होते. वा. वि. मिराशींच्या मते त्रैकुटक हे अभीरांचे आधी सामंत होते, नंतर स्वतंत्र राजे झाले.
इंद्रदत्त, दऱ्हसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन आणि विक्रमसेन अशा पाच त्रैकुटक राजांची माहिती ताम्रपट व नाणी यांच्या आधारे मिळते. त्रिकुट ही त्यांची राजधानी. हे ठिकाण म्हणजे एकतर आजचे जुन्नर अथवा उत्तर कोकण (अपरान्त) असावे. या राजांपैकी सगळ्यात जास्त नाणी दऱ्हसेनाची सापडली आहेत. त्याच्या एका नाण्यावर ‘तीन थरांची टेकडी’ हे चिन्ह कोरलेले आहे.
इंद्रदत्ताची स्वतंत्र नाणी मिळालेली नाहीत; पण कोकण प्रांतात तो लोकसाहित्यात फार आवडता आहे. त्र्यं. शं. शेजवलकरांच्या मते कोकणी लोकगीतात ‘आंबा पिकतो रस गळतो; कोकणचा राजा झिम्मा खेळतो...’ या ओळी परंपरागत आहेत, त्या राजा इंद्रदत्ताला उद्देशूनच आहेत. तो अनेकदा लोकांमध्ये मिसळून नृत्य-गायनात सहभागी होत असे. राजा दऱ्हसेनाने अश्वमेध यज्ञ केला होता, असा उल्लेख पार्डी (सुरत) येथील ताम्रपटावर आढळतो.
अभीर वंशाची राजवट साधारणपणे इ. स. २०५ ते इ. स. ३७० या कालखंडात खानदेश व नाशिक भागात प्रबळ होती. त्रैकूकुटक साधारण त्याच काळात, पण उत्तर कोकणात प्रबळ होते. नंतर वाकाटक नरेश हरिषेणाने मध्यमसेनावर स्वारी केली होती. इ. स. ५५० च्या सुमारास विक्रमसेनाच्या मृत्यूबरोबरच त्रैकुटक वंश संपला.
अभीर वंश मात्र खानदेशात पुढे, जवळजवळ १२ व्या शतकापर्यंत अस्तित्वात होता. त्या वेळी ते ‘गवळी’ या नावाने ओळखले गेले. पण वसुसेनानंतर वाकाटक, कदंब या राजवटींशी संघर्ष झाला, तेव्हापासून अभीरांची रया जाऊन ते दुर्बळ झाले होते. नंतर या प्रदेशावर कलचुरींनी आधिपत्य मिळवले, तेव्हा तर अभीर वंश अगदीच नगण्य झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.