लेखक : ॲड. सुशील अत्रे
वाकाटक राजा हरिषेणाच्या ज्या स्वाऱ्या कलिंगात झाल्या, त्या वेळच्या अस्थिर परिस्थितीचा परिणाम म्हणून गंग हा नवा वंश उदयाला आला, असे दिसते. इंद्रवर्मा या राजाचा ‘गंग संवत्’ ३९ या वर्षांचा ताम्रपट मिळाला आहे; जे साल इ. स. ५३७ हे येते, म्हणजे गंग राज्य इंद्रवर्माने ४९८ च्या सुमारास स्थापन केले.
त्यामुळे इंद्रवर्मा हाच पूर्व गंग वंशाचा संस्थापक म्हणावा लागेल. गंग वंशीय राजांनी वरचेवर होणाऱ्या इस्लामी आक्रमणांचा सातत्याने जोरदार प्रतिकार केला आणि मुसलमान आक्रमकांना बराच काळ थोपवून धरले हेही त्यांचे आणखी एक मोठे योगदान आहे. (saptarang latest article on Eastern Ganga dynasty)
मगधानंतर कलिंग हा असा एक प्रदेश आहे, जिथे शेकडो वर्षांची राजघराण्याची परंपरा आहे. त्यातील काही आपण या आधी पाहिले. आता गंग वंशाची माहिती घेऊ. गंग वंश भारतात दोन ठिकाणी सत्तेत होता. कलिंग आणि आजूबाजूच्या प्रदेशात होता, तो पूर्व गंग वंश आणि म्हैसूर प्रदेशात, कर्नाटकात होता तो पश्चिम गंग वंश.
यापैकी कालानुक्रमे पश्चिम गंग वंश आधी स्थापन झाला. कलिंगाधिपती पूर्व गंग हे या पश्चिम गंगांचेच वंशज होते वा कसे, यावर भिन्न मतप्रवाह आहेत. एक मत असे, की दोन्ही वंश पूर्णपणे भिन्न व स्वतंत्र आहेत. केवळ नाव सारखे आहे. तर, दुसरे मत असे, की पश्चिम गंगांपैकीच एक, कामार्णव हा आपल्या भावांसह कलिंग प्रदेशात महेंद्र पर्वतापाशी आला.
तिथे त्याने आपले वेगळे राज्य स्थापन केले. ही कथा प्रचलित असली तरी तिला अजून पुरावा मिळालेला नाही. वाकाटक राजा हरिषेणाच्या ज्या स्वाऱ्या कलिंगात झाल्या, त्या वेळच्या अस्थिर परिस्थितीचा परिणाम म्हणून गंग हा नवा वंश उदयाला आला, असे दिसते.
कामार्णवाची नसली तरी इंद्रवर्मा या राजाची माहिती सापडली आहे. त्याचा ‘गंग संवत्’ ३९ या वर्षांचा ताम्रपट मिळाला आहे; जे साल इ. स. ५३७ हे येते. म्हणजे गंग राज्य इंद्रवर्म्याने सन ४९८ च्या सुमारास स्थापन केले. त्यामुळे इंद्रवर्मा हाच पूर्व गंग वंशाचा संस्थापक म्हणावा लागेल. (latest marathi news)
हे गंग स्वत:ला आधी ‘तुंबरू’ (नारदा सोबत ज्याचे नाव येते, तो) या गंधर्वाचे वंशज म्हणवीत. पण पुढे त्यांनी आपला वंश ययातीचा मुलगा तुर्वसू याच्यापासून सुरू झाल्याचे म्हटले आहे. हे सर्व राजे ‘गोकर्णेश्वराचे’- शिवाचे निस्सीम उपासक होते. त्यांची राजधानी कलिंगनगर (आताचे मुखलिंगम) येथे होती. काही काळ दंतपुरम् इथेही होती.
भगवान बुद्धाचा दात ठेवलेला होता, म्हणून त्या नगरीला ‘दंतपुरम्’ असे नाव मिळाले, असे म्हणतात. पुढल्या काळात ही राजधानी कटकला हलविली. इ. स. ४९८ ते १४३४ या काळात गंग वंशात सुमारे ३६ राजे होऊन गेले. त्यांच्यापैकी 'अनंतवर्मन चोडगंग' (१०८७-११५०) हा अत्यंत प्रतापी आणि कर्तृत्वशाली होता.
चोल, कलचुरी, पाल या समकालीन राजांशी तो समर्थपणे लढला. गंग राज्य त्याने गंगा ते दक्षिणगंगा (गोदावरी) एवढे विस्तारले. त्याचे इतिहासातील एक महत्त्वाचे योगदान म्हणजे जगन्नाथ पुरीचे प्रसिद्ध मंदिर! हे मंदिर पुराणकाळात इंद्रद्युम्न राजाने बांधले, अशी कथा आहे. त्यावर कित्येकदा हल्ले झाले.
अनंतवर्मनाने आपल्या कारकीर्दीत त्याची पुनर्बांधणी केली. जगन्नाथाचे भव्य मंदिर, जे आपण आज बघतो, ते अनंतवर्मनाने बांधलेले आहे. याचाच वंशज नरसिंह देव-१ होता (कारकीर्द १२३८-१२६४) याने सर्वप्रथम ‘गजपती’ हे बिरुद धारण केले होते. पुढे ते इतरांनीही वापरले. १४३४ नंतर तर ‘गजपती’ याच नावाने नवा राजवंश गादीवरती आला. या राजाविषयी एक मजेदार कथा आहे.
त्याला ‘लांगूल नरसिंह’ असेही म्हटलेले आहे. ‘लांगूल’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे- शेपूट! आता, प्रश्न हा आहे की राजाला ‘शेपूटवाला’ म्हणायची हिंमत कोणाची? नंतर याचं उत्तर सापडलं. हा राजा नेहमी लांबलचक झगा-रोब-गळ्याभोवती बांधायचा. तो भरभर चालत असताना हा झगा त्याच्यामागे शेपटासारखा फलकारत जायचा. त्यावरून त्याला ‘लांगूल नरसिंह’ असे नाव पडले!
अनंतवर्मनाप्रमाणेच नरसिंह देव-१ यानेही एक अद्वितीय देणगी भारताला दिली आहे. कोणार्कचे सूर्यमंदिर... आता ते युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले आहे. नुकत्याच झालेल्या जी-२० जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते परदेशी पाहुण्यांना आवर्जून दाखवले होते. (latest marathi news)
रथाच्या स्वरूपात असलेल्या या मंदिराला बाहेरून दोन्ही अंगाला प्रत्येकी १२ दगडी चक्रे कोरली आहेत. ही चक्रे वर्षाचे १२ महिने दर्शवतात. प्रत्येक चक्रात आठ मोठे आरे आहेत. ते एकेका प्रहराचे (तीन तास) आहेत. मधे आठ लहान आरे आहेत, ते अर्धप्रहराचे (९० मिनिटे) आहेत. या चक्राच्या आधारे सूर्यकिरणांवरून नेमकी वेळ आजही सांगता येते.
हे मंदिर म्हणजे एक खगोल- स्थापत्यशास्त्रीय चमत्कार मानला जातो. याच मंदिरावर खजुराहोप्रमाणे शेकडो मिथुनशिल्पेही कोरलेली आहेत. आज या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सूर्यप्रतिमा नसली तरी जेव्हा होती, तेव्हा ती अद्वितीय होती आणि चक्क हवेत ‘तरंगती’ होती.
एका प्रचंड चुंबक पाषाणामुळे ती कायम तरंगत राही, असे म्हणतात. भारताचा एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आपल्याला गंग वंशाने दिला आहे. या शिवाय भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिर संकुलासारखी इतरही असंख्य मंदिरे गंग राजांनी एक तर पुनरुज्ज्वीत केली अथवा नवी उभारली आहेत.
या शिवाय आणखीही एक मोठी देणगी गंग वंशाची आहे. त्यांनी सर्वप्रथम नाण्यांवरती वर्षाचे आकडे नोंदताना ‘दशमान’ पद्धती वापरली. शून्याचा स्थानांक ही लेखनपद्धती तोपर्यंत कोणाही राजाने वापरली नव्हती. तोपर्यंत ब्राह्मी पद्धतीने, प्रत्येक अंकाला वेगळे चिन्ह देऊन आकडे लिहिण्याची पद्धत होती. त्यामुळे गंगांची नाणी- फानम, ही भारतीय नाणकशास्त्रात क्रांती करणारी आहेत.
गंग वंशीय राजांनी वरचेवर होणाऱ्या इस्लामी आक्रमणांचा जोरदार प्रतिकार सातत्याने केला आणि मुसलमान आक्रमकांना बराच काळ थोपवून धरले हे ही त्यांचे आणखी एक मोठे योगदान आहे. चौथा भानुदेव याच्या कारकीर्दीत, १४३४ मध्ये त्याचा सेनापती कपिलेन्द्र याने बंड करून गादी बळकावली; आणि सुमारे एक हजार वर्षांची परंपरा असलेला गंग वंश अस्तंगत झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.