Teli Ka Mandir, picture in 1870 & Teli Ka Mandir, picture today. esakal
सप्तरंग

राजवंश भारती : गुर्जर प्रतिहार राजवंश :

सकाळ वृत्तसेवा

भारतात आठव्या शतकात तीन प्रबळ राजसत्ता होत्या. पूर्व भारतात ‘पाल’ घराणे, पश्चिम भारतात ‘गुर्जर प्रतिहार’ आणि दक्षिण भारतात- दख्खनमध्ये ‘राष्ट्रकूट’. या तिन्ही सत्तांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू होता ‘कान्यकुब्ज’ अर्थात ‘कन्नोज’. ती राजधानी आपल्या ताब्यात असावी, यासाठी तिन्ही सत्ता झगडत होत्या.

त्याला इतिहासात ‘त्रिपक्षीय संघर्ष’ म्हणूनच ओळखले जाते. गुर्जर प्रतिहार, या तिघांमधला एक बलाढ्य पक्ष होता. एकेकाळी सतलजपासून नर्मदेपर्यंत ते बंगालच्या उपसागरापर्यंत साम्राज्यविस्तार असलेल्या गुर्जर प्रतिहारांचा शेवट मात्र विदारक झाला अन तो राजवंशही नामशेष झाला. (saptarang latest article on Gurjar Pratihara Dynasty)

बटेश्वर मंदिर संकुल भग्नावशेष
बटेश्वर मंदिर संकुल... २००५ नंतरचे.

गुर्जर प्रतिहार या नावाबद्दल अनेक दावे आहेत. हे घराणे स्वत:ला लक्ष्मणाचे वंशज मानत होते. लक्ष्मण हा वनवासात रामाचा द्वारपाल- प्रतिहार म्हणून वावरला होता. त्यामुळे त्याच्या या वंशजांनी स्वत:ला ‘प्रतिहार’ म्हटले. गुर्जर हे काहींच्या मते प्रदेशवाचक नाव आहे; तर काहींच्या मते ते मुळात एका टोळीचे नाव होते. या वंशातील राजांनी स्वत:ला नेहमीच केवळ ‘प्रतिहार’ म्हणवून घेतले आहे. गुर्जर असा त्यांचा उल्लेख इतरांनी केलेला दिसून येतो. राजस्थानातील राजोर येथील शिलालेखात गुर्जर-प्रतिहार हा शब्द पहिल्यांदा वापरलेला आहे.

प्रतिहार घराण्याचा मूळ पुरुष सहाव्या शतकात ‘हरिचंद्र’ या नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या मुलांपैकी दोघांनी आपापले राज्य स्थापन केले. पैकी एक जोधपूरजवळ होते; तर दुसरे गुजरातमध्ये. या गुजरातमधील घराण्यात पुढे ‘नागभट’ या नावाचा पराक्रमी पुरुष जन्मला. इ. स. ७३० च्या सुमारास तो शासक बनला.

तो आपला कारभार माळव्यातील उज्जैनमधून पाहत असे. त्या सुमारास अरबांनी सिंधवरती स्वाऱ्या सुरू केल्या होत्या. ‘जुनैद’ या अरब सेनापतीने सिंधपासून पुढे, पूर्वेकडे धडक मारायचा प्रयत्न केला; पण नागभटाने त्याला रोखले आणि पुन्हा मागे रेटले. हा नागभट म्हणजे प्रतिहार राजवंशाचा पहिला राजा. त्याचा चुलत नातू वत्सराज याने प्रतिहारांचे राज्य थेट बंगालपर्यंत वाढविले. त्याचा वंशज होता ‘भोज’. यालाच ‘मिहीर भोज’ असेही नाव आहे. (latest marathi news)

राजा मिहीरभोज

मिहीर भोज हा गुर्जर प्रतिहार वंशातील सर्वांत कर्तबगार आणि प्रसिद्ध राजा होता. इ. स. ८३६ मध्ये तो सत्तेवर आला. त्याची कारकीर्द जवळजवळ ५० वर्षांची आहे. त्याच्या पराक्रमाचा दबदबा त्या काळी सर्वत्र होता. त्याने पाल आणि राष्ट्रकूट या आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी राजांना नमवून प्रतिहारांचे वर्चस्व कायम केले.

आपली राजधानीही त्याने माळव्याहून कन्नोजला हलवली. त्याच्या काळात प्रतिहार साम्राज्य दक्षिणेकडे नर्मदेपर्यंत, पश्चिमेला सतलजपर्यंत आणि पूर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते. त्याने अरबांविरुद्ध मोठी मोहीम उघडून त्यांनाही कच्छच्या बाहेर हाकलून लावले. मिहीर भोज हा स्वत: विष्णुभक्त होता.

त्याने आपल्या विजयानंतर ‘आदि वराह’ ही पदवी धारण केली होती आणि वराह अवतार नोंदलेली स्वत:ची नाणीही पाडली होती. मिहीर भोजाने आपल्या दीर्घ कारकीर्दीत कला आणि विद्येला मोठा राजाश्रय दिला. अनेक अप्रतिम मंदिरांची व शिल्पांची उभारणी त्याच्या काळात झाली.

मंदिरांची केली पुनर्उभारणी

ग्वाल्हेरच्या किल्ल्यात असलेले ‘तेली का मंदिर’ आणि मध्य प्रदेशातील ‘बटेश्वर’ येथील मंदिर समूह हे मिहीर भोजाच्याच कारकीर्दीत उभारलेले आहेत, असे संशोधक मानतात. ती गुर्जर प्रतिहार शैलीतील मंदिरे आहेत, हे तर नक्कीच. बटेश्वर संकुलात भग्नावस्थेत पडलेली सुमारे २०० मंदिरे अनेक वर्षे तशीच पडून होती.

चंबळचा कुप्रसिद्ध डाकू निर्भयसिंह गुज्जर आणि त्याची टोळी या भग्नावशेषांमध्ये आश्रय घेत असे. २००५ मध्ये ‘एएसआय’चे श्री. के. के. मुहम्मद यांनी धोका पत्करून, त्यांच्याशी हिमतीने वाटाघाटी करून ती मंदिरे ‘गुर्जरांचा वारसा’ आहे, हे त्यांना पटवून दिले आणि त्याच माणसांच्या मदतीने ती मंदिरे पुन्हा उभारली! ‘तेली का मंदिर’ही पुनर्निमित आहे. त्याचे १८७० चे भग्नावस्थेचे एक छायाचित्र उपलब्ध आहे. (latest marathi news)

अरबांचे मोठे शत्रू...

मिहीर भोजाचा मुलगा राजा महेंद्रपाल-१ यानेही बराच राज्यविस्तार केला. प्रसिद्ध नाटककार, कवी ‘राजशेखर’ हा त्याच्या दरबारात ‘राजगुरू’ होता. राजशेखराच्या अनेक संस्कृत व प्राकृत रचना आहेत. ‘कर्पूरमंजरी’ हे त्याचे नाटक आणि काव्यमीमांसा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

महेंद्रपालचा मुलगा महीपाल- १ सुद्धा नामवंत ठरला. अरब तवारिखकार ‘अल् मसूदी’ हा त्याचा समकालीन आहे. तो प्रतिहारांचे वर्णन ‘अरबांचे मोठे शत्रू’ या शब्दांमध्येच करतो. महिपालाच्या काळात प्रतिहारांचे ‘सुमारे सात ते नऊ लाख सैनिक सीमेवर शत्रूला थोपविण्यासाठी सज्ज ठेवलेले आहेत’ अशी नोंद अल् मसूदीने केली आहे.

पळपुट्या राजपालची हत्या

दैवगती अशी की महिपालाच्या कारकीर्दीतच प्रतिहारांवर मोठी स्वारी राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने केली. त्यात कन्नौज उद्‍ध्वस्त झाले. महिपाल आपल्या चंदेलवंशीय सरदाराच्या आश्रयाला गेला. इथून प्रतिहारांच्या प्रतिष्ठेला उतरती कळा लागली. नंतरचे राजे यथातथा कुवतीचे होते. इ. स. १०१८ मध्ये गझनीच्या महमूदाने कन्नोज ताब्यात घेतले.

तेव्हाचा राजा ‘राजपाल’ महमूदापुढे अक्षरश: पळून गेला. त्याचा पळपुटेपणा सहन न झाल्याने त्याच्याच चंदेल सरदाराने राजपालची हत्या केली. चंदेलांनीच राजपालच्या मुलाला गादीवर बसविले; पण तो नामधारी होता. त्याच्यानंतर ‘यशपाल’ गादीवर आला. तो प्रतिहार वंशाचा अखेरचा राजा ठरला. तो इ. स. १०३६ मध्ये मरण पावला, आणि कन्नौजचा गुर्जर प्रतिहार वंश त्याच्याबरोबरच संपला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT