The magnificent idol of Lord Baahubali at Shravanbelgol. esakal
सप्तरंग

राजवंश भारती : पश्चिम गंग वंश

Western Ganga Dynasty : या 'गंग' नावाचा उगम कशात आहे, हे समजत नाही. कदाचित् गंगेच्या प्रदेशातून स्थलांतरित होऊन आलेले, या अर्थाने हे नाव असावे. चौथ्या शतकात पल्लव राजांनी गंग वंशाला मांडलिक राजे म्हणून मान्यता दिली. हे गंग 'काण्व गोत्राचे' होते.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

कालानुक्रमानुसार पश्चिम गंग वंश हा पूर्व गंगांच्या आधीचा आहे. या 'गंग' नावाचा उगम कशात आहे, हे समजत नाही. कदाचित् गंगेच्या प्रदेशातून स्थलांतरित होऊन आलेले, या अर्थाने हे नाव असावे. चौथ्या शतकात पल्लव राजांनी गंग वंशाला मांडलिक राजे म्हणून मान्यता दिली. हे गंग 'काण्व गोत्राचे' होते.

त्यांचे सुरुवातीचे छोटे राज्य 'गंगवाडी' म्हणून ओळखले गेले. पण पुढे, इ.स. ७२५ नंतर त्याला "गंगवाडी ९६०००" म्हणत. त्या काळी साधारणत: एक हजार छोटी गावे किंवा वस्त्या एवढ्या प्रदेशाला 'विषय' किंवा 'नाडू' म्हणत. त्यामुळे गंगांच्या ताब्यात असे ९६ प्रदेश असावेत, असे दिसते.

या गंग वंशाचा पहिला शासक कोंगुणीवर्मन अथवा माधव-१ हा होता. त्याची कारकीर्द इ.स. ३५० ते ३७० अशी असावी. राजधानी कर्नाटकातील 'कोलार' इथे होती. (सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले..) विजयनगर स्थापनेसाठी जशी विद्यारण्य स्वामींची मदत हरिहराला झाली, तशीच कोंगुणीवर्मनला जैन आचार्य सिंहनंदी यांनी मदत केली होती.

पश्चिम गंग वंशातील जवळ जवळ सगळेच राजे जैनधर्मीय होते. इ.स. ३५० ते १००० या ६५० वर्षांत सुमारे २५ गंग राजे होऊन गेले. कोंगुप्रदेश, म्हणजे म्हैसूर लगतच्या प्रदेशात, हा काळ जैन धर्मासाठी सुवर्ण काळ होता. (saptarang latest article on Western Ganga dynasty)

मूर्तीच्या पायाशी कोरलेला मराठीतील आद्य शिलालेख ..."श्री चामुंडराजे करवियले ..."

या गंग राजांपैकी माधव-२, हरिवर्मन, विष्णुगोप, अविनीत, दुर्विनीत, श्रीपुरुष, राजमल्ल-५ हे विशेष उल्लेखनीय राजे होते. हरिवर्मनाने राजधानी कोलार हून तलकाड इथे नेली. गंग राजांनी पल्लव, पांड्य, कदंब, राष्ट्रकूट आणि चोल अशा सर्व राजवटींसोबत सत्तासंघर्ष केलेला आहे.

बदामीचे चालुक्य बहुदा त्यांचे पाठीराखे होते. मदुराईचे पांड्य गंगांचे प्रतिस्पर्धी होते; पण नंतर गंग राजकुमारीचा विवाह पांड्य राजकुमाराशी झाला आणि या सोयरिकीमुळे त्यांचे वैर संपले. गंगांचे मुख्य शत्रू पल्लव होते. त्यांच्याशी यशस्वी लढा देणारा राजा दुर्विनीत ( सुमारे इ.स. ५४०- ६००) हा पश्चिम गंग घराण्यातील सगळ्यात कीर्तिवंत राजा होता.

तो पराक्रमी तर होताच, पण विद्वान आणि रसिक होता. सुप्रसिद्ध संस्कृत कवी 'भारवि' हा दुर्विनीताचा राजकवी होता. त्याने "किरातार्जुनीयम्" हे अजरामर महाकाव्य रचले आहे. विशेष हे की स्वत: राजा दुर्विनीताने त्यातील एका सर्गावर 'टीका' लिहिली होती. राजाने गुणाढ्याच्या प्राकृत 'बृहत्कथा' या ग्रंथाचे संस्कृत भाषांतरही केले होते.

तसा माधव-२ हा राजाही मोठा विद्वान होता. तो नीतिशास्त्रात प्रवीण होताच, पण त्याने 'दत्तक सूत्र' या प्राचीन ग्रंथावर "वृत्ती", म्हणजे समीक्षाही लिहिली होती. इथे एक मजेशीर माहिती सांगतो - या दत्तक सूत्राचा 'दत्तकविधानाशी' काहीही संबंध नाही. दत्तक हे लिहिणाऱ्याचे नाव आहे;

आणि ग्रंथ आहे 'कामशास्त्रावरचा'! वात्सायनाच्या कामशास्त्रात या दत्तक सूत्राचा उल्लेख आहे. याचाच अर्थ हा ग्रंथ त्याच्या पूर्वीचा आहे. कदाचित तो या विषयावरचा पहिला स्वतंत्र ग्रंथ असावा. गंग राजे स्वत: जैन मतावलंबी असले तरी त्यांनी नेहेमीच हिन्दू धर्म, परंपरा, देवळे यांनाही तेवढेच महत्त्व दिले, आश्रय दिला, भरपूर आर्थिक मदत केली. (latest marathi news)

गंग वंशातला शेवटचा राजा राजमल्ल-५ अथवा रक्कसगंग याच्या स्वत:पेक्षा त्याचा महामंत्री अधिक प्रसिद्ध आहे. हा महामंत्री आधीच्या तीन राजांच्याही काळात होता. तो स्वत: अत्यंत विद्वान होता, शूरही होता. त्याचे नाव "चामुंडराय" किंवा "चावुंडराज". तो जैन आचार्य नेमिचंद्र यांचा शिष्य होता.

त्याने इ.स. ९८१ च्या सुमारास विंध्यगिरी या पर्वतावर एक भली मोठी पाषाणमूर्ती कोरून उभारली. हे ठिकाण आहे 'श्रवणबेळगोळ', आणि मूर्ती आहे बाहुबलीची. आद्य तीर्थंकर श्री ऋषभदेव यांची मुले भरत चक्रवर्ती आणि बाहुबली यांच्यात संघर्ष झाला होता. पण त्यानंतर बाहुबलीने मुनिमार्ग स्वीकारला - घोर तप केले. त्या बाहुबलीची ही ग्रॅनाईट मधील एकशिळा मूर्ती आहे.

ती सुमारे ५७ फूट उंच आहे. ही मूर्ती आज भारताच्या श्रेष्ठ सांस्कृतिक वारशांपैकी एक आहे. याच मूर्तीच्या पायापाशी एक शिलालेख आहे. तो मराठी भाषेतील 'आद्य शिलालेख' मानला जातो. तो असा आहे - " श्री चामुंडराजे करवियले - गंगाजे सुत्ताले करवियले "
ही एक मूर्ती झाली.

अशा अनेक मूर्ती, बांसडी (जैन मंदिरे ) गंग राजांनी निर्माण केल्या. पण, योगायोग असा की ज्याने भगवान बाहुबलीची अद्वितीय मूर्ती उभारली, त्याच्याच काळात, इ.स. १००० च्या सुमारास, राजराजा चोल याने गंगवाडी राज्य ताब्यात घेतले आणि गंग वंशाची सत्ता पूर्ण संपवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT