लेखक : ॲड. सुशील अत्रे
‘इतिहास’ या विषयावरती रचलेला भारतातील पहिला ग्रंथ म्हणजे ‘राजतरंगिणी’. काश्मीरमधील बाराव्या शतकातील एक विद्वान व कवी 'कल्हण' याने हा ग्रंथ लिहिला आहे. राजतरंगिणी याचा अर्थच मुळी ‘राजांची नदी’ असा आहे. कल्हण पंडित हा बाराव्या शतकातील काश्मीरनरेश हर्ष ते राजा जयसिंह यांच्या दरम्यानच्या काळात होऊन गेला.
त्याने (बहुदा राजाज्ञेवरून) काश्मीर प्रांताचा अगदी प्राचीन काळापासूनचा राजकीय इतिहास नोंदला आहे. त्यासाठी त्याने त्याच्याआधी होऊन गेलेल्या अकरा इतिहासकारांचा आधार घेऊन त्यांचा ऋणनिर्देशही ग्रंथात केला आहे. याशिवाय अनेक प्राचीन (तेव्हा प्राचीन!) दानपत्रे, नाणी, ताम्रपट इत्यादिंचाही आपण अभ्यास केल्याचे कल्हण लिहितो. (Nashik saptarang latest article by adv sushil atre marathi news)
राजतरंगिणी मध्ये एकूण आठ 'तरंग' अथवा प्रकरणे आणि जवळजवळ ८००० श्लोक आहेत. त्यांमध्ये महाभारत काळापासूनच्या विविध राजांची व राजवंशांची माहिती दिलेली आहे. काश्मीरला आधी कश्यपमेरू (कश्यपमीर) असे नाव होते, हेदेखील कल्हण लिहितो.
तेव्हापासून प्रचलित असलेला मौखिक इतिहास कल्हणाने सुरवातीच्या २/३ तरंगांमध्ये दिला आहे. पुढे ७ व्या- ८ व्या तरंगातील राजवंश तर त्याने स्वत: पाहिले आहेत. राजतरंगिणीतील वंशावळी व कालक्रम याबद्दल आधुनिक अभ्यासकांमधे एकमत नाही. पण, या ग्रंथाचे ऐतिहासिक योगदान वादातीत आहे.
यात कल्हणाने इ.स. पूर्व ३१५० (महाभारत युद्ध) ते इ.स. ११५० (ग्रंथलेखन समाप्ती ) एवढा विस्तीर्ण कालपट उलगडला आहे. कालगणनेसाठी कल्हणाने ‘कलिवर्ष’ आणि 'लौकिकवर्ष' ही परिमाणे वापरली आहेत.'राजतरंगिणी' च्या आधारे काश्मिरी राजवंशांचा संक्षिप्त आढावा असा घेता येईल.. (Latest Marathi News)
१ ला तरंग - यात 'गोनन्द' वंशातील राजे आहेत. या वंशाचा आद्य राजा गोनन्द-पहिला हा ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराचा समकालीन आहे. या वंशातील सुमारे ७५ राजांची यादी कल्हणाने दिली आहे. त्यात अखेरचा राजा म्हणजे 'अंध युधिष्ठिर'.
२ रा तरंग - यात प्रतापादित्य वंशातील ६ राजांचा उल्लेख आहे. त्यांनी एकूण १९२ वर्षे राज्य केले. यांच्यापैकी जलौक हा राजा काश्मिरी दंतकथांचा नायक आहे. या वंशातील 'संधिमती' हा राजा सत्तेवर असताना इसवी सन सुरु झाले.
३ रा तरंग - उत्तर गोनन्दीय वंशाची राजवट. मेघवाहनापासून ते बालादित्यापर्यंत १० राजे या वंशात होऊन गेले. त्यांची कारकीर्द एकूण सुमारे ५४० वर्षांची होती. या राजवटीतील काही प्राचीन नाणी उत्खननात आढळून आली आहेत.
४ था तरंग - नागवंशाची एक शाखा असलेला कर्कोट वंश काश्मीरमध्ये ७ व्या शतकात सत्तेवर आला. दुर्लभवर्धन हा कर्कोट नागवंशीय इसम गोनन्द राजा बालादित्याचा जावई, म्हणजे त्याची मुलगी अनंगलेखा हिचा पती होता. त्याने इ.स. ६२५ च्या आसपास आपल्या वंशाची राजवट सुरू केली. या वंशातील १७ राजांचा उल्लेख राजतरंगिणीत आहे.
काश्मीरचा सगळ्यात प्रसिद्ध राजा 'ललितादित्य मुक्तापीड' हा याच वंशातील राजा होता. तो इ.स. ७२५ ते ७६० या काळात गादीवर होता. याच्या कारकीर्दीत काश्मीरचे राज्य सामर्थ्याच्या शिखरावर होते. आज उद्ध्वस्त अवस्थेत असलेले अनंतनागचे प्रसिद्ध 'मार्तंड सूर्यमंदिर' ललितादित्यानेच बांधले आहे.
महंमद बिन कासीमच्या सिंध मोहिमेनंतर झालेल्या अरबी आक्रमणाला थोपवून अरबांना धूळ चारणारा ललितादित्यच होता. कनौज सम्राट यशोवर्मन या बलाढ्य राजाशी ललितादित्याने युद्ध करून त्याला पराभूत केले होते. कर्कोट वंशातील अखेरचा राजा 'उत्पलपीड' होता. (Latest Marathi News)
५ व ६ वा तरंग - इ.स. ८५५ पासून उत्पल राजवंशाला सुरवात झाली. तिची स्थापना स्वत: उत्पलपीडाने नव्हे, तर त्याचा नातू अवंतीवर्मन याने केली. त्याच्यापासून ते काश्मीरच्या इतिहासात प्रसिद्ध आणि 'मोठी बहीण' या अर्थी नाव असलेली राणी 'दिद्दा' हिच्यापर्यंत- इ.स. १००३ पावेतो, होऊन गेलेल्या राजांची यादी या दोन तरंगांमधे उत्पल -१ व उत्पल -२ अशी आहे. हा राजवंश जेमतेम दीडशे वर्षे सत्तेवर होता.
७ व ८ वा तरंग - दिद्दा राणीचा भाचा संग्रामराज याला दिद्दा नंतर राजगादी मिळाली. त्याच्यापासून 'लोहारा' वंश सुरू झाला. या वंशात 'हर्ष' नावाचा राजा होता. कल्हणाचे वडील चंपक हे या हर्ष राजाचे महामंत्री होते. ७ वा तरंग हर्षापाशी संपतो. नंतर लोहारा वंशाचाच उच्छल याच्यापासून द्वितीय लोहारा वंश सुरू होतो. त्यातील राजा जयसिंह हा कल्हणाचा आश्रयदाता होता. त्याची कारकीर्द सुरु असतानाच इ.स. ११४८-४९ मध्ये कल्हणाने आपला ग्रंथ पूर्ण केला. इथे मूळ राजतरंगिणी संपते.
जयसिंहाची इ.स. ११५४ मध्ये हत्या झाली. त्याच्यानंतर सुद्धा सुमारे १५ राजे काश्मीरच्या राजगादीवर आले आणि गेले. यातली अखेरची शासक पुन्हा एक राणी होती. तिचे नाव 'कोटा राणी'. इ.स. १३३९ मधे शाह मीर याने तिची हत्या केली आणि काश्मीरचे हिंदू साम्राज्य संपवले. सुलतान शम्सुद्दिन' या नावाने तो गादीवर बसला. अशा प्रकारे, इ.स. पूर्व ३१५० पासून इ.स. १३३९ पर्यंत गोनन्द, कर्कोट, उत्पल आणि लोहारा या चार प्रमुख वंशांनी काश्मीरवरती राज्य केले.
‘राजतरंगिणी’ मुळे हे सर्व राजे, त्यांची वंशावळ, त्यांचा कारभार याची माहिती आपल्याला आयती मिळाली. हा मूळ ग्रंथ प्राचीन शारदा लिपीत लिहिला होता. त्याची प्रत एका काश्मिरी कुटुंबाने जपून ठेवली होती. ती मिळाल्यावर त्याची देवनागरी प्रत तयार केली. तिचे इंग्रजीत भाषांतर १९ व्या शतकात एम् ए. स्टाईन याने केले.
मराठी भाषांतर १९२९ मधे वामनशास्त्री लेले यांनी, तर अलिकडे २०१७ मधे प्रख्यात विदुषी अरुणा ढेरे व श्री.तळणीकर यांनी केले आहे. १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांना विचारलेल्या ‘रालीव, गलीव या सलीव..’ या तीनशब्दी विषारी प्रश्नाला ११५० च्या दशकातील आठ हजार श्लोकांचे उत्तर आहे ‘राजतरंगिणी’!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.