लेखक : ॲड. सुशील अत्रे
महाभारताच्या युद्धानंतरचा बराच मोठा काळ हा भारताच्या इतिहासातील ‘अंधारा कालखंड’ म्हणावा असा आहे. कोणतीही मोठी राजसत्ता, लोकोत्तर व्यक्ती या काळात झाली नाही. किमान तसा उल्लेख अगदी काव्य पुराणांमध्येही आढळत नाही. ही मधली कालदरी इतकी मोठी झाली, की त्या आधीच्या घटना काल्पनिक वाटू लागल्या.
हा अंधारा कालखंड जवळजवळ इ. स. पूर्व ६-७ व्या शतकापर्यंत राहिला. या शतकात भारतात मध्यवर्ती राजसत्तेऐवजी अनेक लहान-मोठ्या सत्ता स्थापन झाल्या. प्राचीन संदर्भानुसार मध्यम आकाराच्या वस्तीला ‘जनपद’ असे म्हणत आणि जिथे बरीच मोठी लोकवस्ती होती, त्याला ‘महा-जनपद’ हे नाव मिळाले. एक महाजनपद हे एक प्रकारे राज्यच होते. अशा सोळा महाजनपदांचा ऐतिहासिक उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. (nashik saptarang latest Marathi article rajvansh bharati on Mahajanapadas)
महाजनपदांचे वैशिष्ट्य असे, की त्यापैकी काही राजसत्ता होत्या तर काही लोकसत्ता होत्या; म्हणजे ती ‘गणराज्ये’ होती. या महाजनपदांपैकी काहींचा उल्लेख महाभारतातही आला आहे. नंतर त्यांचा उल्लेख हिंदू, बौद्ध आणि जैन वाङ्मयात आढळतो.
व्याकरणकार पाणिनीची ‘अष्टाध्यायी’, ‘अंगुत्तर निकाय’ हा बौद्ध ग्रंथ, तसेच ‘भगवती सूत्र’ हा जैन ग्रंथ यामध्ये महाजनपदांची यादीच दिली आहे. या वेगवेगळ्या ग्रंथांमधे असलेली महाजनपदांची यादी अगदी तंतोतंत सारखी नसली तरी काही नावे मात्र सामायिक आहेत आणि त्यांची ‘सोळा’ ही संख्यासुद्धा बहुधा सगळ्या ग्रंथांना मान्य आहे.
ही सोळा महाजनपदे अशी आहेत-
१) अंग २) मगध ३) काशी ४) कोसल ५) मल्ल ६) वृज्जी ७) चेदि ८) वत्स ९) कुरू १०) पांचाल ११) मत्स्य १२) शूरसेन १३) अश्मक १४) अवंती १५) गांधार आणि १६) कंबोज.
ही नावे अंगुत्तर निकायात आलेली आहेत. बौद्ध त्रिपिटकापैकी सुत्तपिटकात हे निकाय आहे. निकाय म्हणजे संकलन- संग्रह. पाणिनीच्या अष्टाध्यायीत काही नावे वेगळी आहेत. जसे शुद्रक, मालव, मद्र इत्यादी. भगवती सूत्रातही मलय, पांड्य अशी काही नावे वेगळी आहेत. (latest marathi news)
यापैकी अगदी प्रमुख महाजनपदे म्हणजे काशी, कोसल, गांधार आणि मगध. बौद्ध काळाच्या आधी ‘काशी’ हे सगळ्यात मोठे महाजनपद होते. बौद्ध कथांमध्ये काशीचा उल्लेख आवर्जून सापडतो. ज्यांनी जातक कथा वाचल्या आहेत, त्यांना आठवेल... ‘‘फार फार वर्षांपूर्वी काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता...’’अशी सुरवात बहुधा प्रत्येक जातक कथेची असते.
पुढे हेच काशी जनपद कोसलांनी ताब्यात घेतले. कंबोज व गांधार महाजनपदे ही एकेकाळी ग्रीकांच्या दृष्टीने भारताचे प्रवेशद्वार म्हणावे, अशा जागी होती, ते आजचे अफगाणिस्तान. या प्रत्येक जनपदाची स्वत:ची नाणीसुद्धा चलनात होती. ‘आहत नाणी’ अथवा ‘पंच मार्क्ड’ या स्वरूपात ती होती. अशी कित्येक नाणी संशोधकांना सापडली आहेत. तो या महाजनपदांचा भौतिक रूपातील पुरावा आहे.
या ‘महा’ यादीमधे नसलेली राजकीयदृष्ट्या किरकोळ असलेली दोन जनपदे अशी आहेत, जी अन्य कारणाने महत्त्वाची ठरली. ती म्हणजे वैशालीचे गणराज्य आणि शाक्य गणराज्य! वैशाली गणराज्याच्या कुंडलपूरला राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशलादेवी यांच्यापोटी इ. स. पूर्व ५९९ मध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला आणि शाक्य गणराज्यात राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांच्या पोटी इ. स. पूर्व ५६३ मध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला. (latest marathi news)
एकजण राजपुत्र ‘वर्धमान’ म्हणून, तर दुसरा राजपुत्र ‘सिद्धार्थ’ म्हणून जन्माला आला. या दोन महापुरुषांमुळे त्यांची जनपदे इतिहासात अजरामर झाली. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, तर वर्धमान महावीरांनी २४ वे तीर्थंकर म्हणून जैन धर्माचे पुनरुज्जीवन केले. योगायोग असा, की हे दोघे महामानव समकालीन होते. महावीर हे गौतम बुद्धांपेक्षा सुमारे २५ वर्षांनी मोठे. महाजनपद कालखंडाची इतिहासाला सगळ्यात मोठी देणगी म्हणजे महावीर व गौतम बुद्ध.
महाजनपदांचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व चौथ्या शतकापर्यंत होता. त्यानंतर यातील मगध राज्य प्रबळ झाले. नंद वंशाने मगधाची सत्ता हाती घेतली आणि एक एक जनपद ताब्यात घेऊन नंद राजांनी पुन्हा एकवार प्रबळ केंद्रीय राजसत्ता उभी केली. जनपदे दुर्बळ होत गेली. काही वर्षांनंतर इ. स. पूर्व ३२१ मध्ये ही सगळी जनपदे मौर्य साम्राज्यात पूर्णपणे विलीन झाली.
तसे बघायला गेले, तर महाजनपदे कोणा एखाद्या राजवंशाच्या आधिपत्याखाली कधीही नव्हती. फार मोठा काळ ती टिकलीसुद्धा नाहीत. त्यांचे आपसांतील संबंध फार सौहार्दपूर्ण होते, असेही नाही. अलीकडच्या काळात, देश स्वतंत्र होत असताना जशी अनेक लहान-मोठी संस्थाने भारतात होती, तशीच त्या काळीही जनपदे होती. ती राजवंश म्हणून दुय्यम असतील, पण तरीही त्यांची दखल आपल्याला घ्यावीच लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.