Rajaram Pangavhane  esakal
सप्तरंग

दृष्टिकोन : लोकसभा निकालाचा अन्वयार्थ

सकाळ वृत्तसेवा

लेखक : राजाराम पानगव्हाणे

लोकसभेचा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यावर कोण सत्तेवर येणार, याबद्दल अनेक महिन्यांपासून असलेली उत्सुकता अखेर संपली. ‘एनडीए’ला या निवडणुकीत बहुमत मिळाले असले, तरी भारतीय जनता पक्षाचे एकहाती सत्तेचे लक्ष्य हे मात्र मतदारांनी नाकारले आहे.

त्यांना मर्यादित स्वरूपाचे यश मिळाले. त्याचबरोबर काँग्रेसने गतवेळेपेक्षा जोरदार मुसंडी मारत २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीतील जागांपेक्षा जवळपास दुप्पट जागा अधिक मिळविल्या. याद्वारे पुन्हा एकदा पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. (saptarang latest article on Interpretation of Lok Sabha result 2024)

टोकाची धार्मिक भावना निर्माण करून दोन समुदायांमध्ये भेदाभेद करून यश मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. काही ठिकाणी त्यांना मागील निवडणुकीत यश मिळाले होते. मतदारांनी या वेळेस मात्र त्यांना नाकारले आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या निकालावरून हे अधिक स्पष्ट होते.

विशेष म्हणजे राम मंदिराचा इतक्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा करूनही ज्या ठिकाणी राम मंदिर निर्माण केले आहे, तेथील अयोध्येची लोकसभेची जागाही भाजप जिंकू शकली नाही. वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विजयी झाले. मात्र, त्यांच्या विरोधातील उमेदवाराला चार लाखांहून अधिक मते मिळतात, हाही भाजपसाठी चिंतन करणारा निकाल आहे.

फोडाफोडीला जनतेने दिले उत्तर

गेल्या दहा वर्षांतील भाजपप्रणित एकाधिकारशाहीला जनतेने पूर्णपणे मान्यता दिलेली दिसत नाही, हे निकालातून स्पष्ट होते. महाराष्ट्र, राज्यस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने भाजपला त्यांच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी जागा मिळाल्या. त्यामुळे ‘चारसो पार’ची घोषणा ही हवेतच विरून गेली.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून जबरदस्तीने करून घेतलेली पक्षांतरे, जे राजकीय नेते जेव्हा भाजपमध्ये नव्हते, तेव्हा त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. त्यांना नंतर पक्षात घेऊन ‘क्लीन चीट’ देण्यात आली. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात घेऊन काही राज्यांत सरकारे बनविण्यात आली, हेही लोकांना पटलेले नाही, हे या निकालातून स्पष्ट होते. (latest marathi news)

काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी

काँग्रेसला मात्र एक प्रकारची नवसंजीवनी व कार्यकर्त्यांना चैतन्य मिळाल्याचे वातावरण सध्या तरी दिसत आहे. २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला एक जागा मिळाली होती. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत तब्बल १३ जागा काँग्रेसने जिंकल्या. सांगलीची एक जागा जिंकलेल्या अपक्ष विशाल पाटील यांनीही काँग्रेसलाच पाठिंबा दिला आहे, त्यामुळे काँग्रेसच्या एकूण महाराष्ट्रात १४ जागा झाल्या.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या निकालातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. भविष्यात ते निश्चितच जोमाने कामाला लागतील, यात शंका नाही. मात्र, उत्तर भारतात काँग्रेसने संघटन अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. जोपर्यंत उत्तर भारतात काँग्रेसच्या वैयक्तिक जागा वाढत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसला अपेक्षित असलेले यश मिळू शकणार नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानात काही जागा मिळाल्या. मात्र, लढविलेल्या जागांची संख्या कमी असल्याने जिंकण्याचे प्रमाणही कमीच होते, यासाठी राजस्थान मात्र अपवाद आहे.

भाजपच्या दिग्गजांचा पराभव

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना मतदारसंघ राखता आला नाही. एकेकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांनाही आपली जागा कायम राखता आली नाही. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव करण्यात आला. एकेकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांनाही आपली जागा कायम राखता आली नाही.

लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहून अनेकांना धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील अनपेक्षित निकाल पाहून भाजप गोटात खळबळ उडाली. निवडणूक आयोगाकडून आलेल्या निकालानुसार काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ९, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि अपक्ष १ जागा मिळाल्या आहेत. (latest marathi news)

शिंदे, अजित पवारांनाही ठेवले दूर

महाविकास आघाडीने अपक्षासह ३१ जागांवर विजय मिळवून मुसंडी मारली आहे; तर दुसरीकडे महायुती केवळ १७ जागा टिकवू शकली. महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. फोडाफोडीचे राजकारण, ईडी- सीबीआयच्या विरोधकांवर होणाऱ्या कारवाया, बेरोजगारी व महागाई या स्थानिक विषयांना दिलेली बगल यांसारख्या अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात महायुतीला जबरदस्त फटका बसला. राज्याच्या विकासाचं नाव घेत भाजपबरोबर गेलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मतदारांनी नाकारलं असून, ते सपशेल फेल ठरले आहेत.

जनतेला कुणी गृहीत धरू नये

सरकार कोणत्याही पक्षाचे येऊ देत, मात्र सरकार लोकहितार्थ काम करते, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. सरकार चालविणाऱ्यांनीही व सरकार निवडून देणाऱ्यांनीही याबद्दल सजग राहिले पाहिजे. तुमच्या-आमच्या पैशांतून लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात म्हणून जनतेनेही शासनाच्या विविध निर्णयांवर वेळोवेळी लक्ष ठेवून त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

लोकशाहीत जनता जनार्दन श्रेष्ठ असते. त्यांच्या हातातच सगळं काही असतं. आपल्या मतदानाच्या पवित्र हक्कातून ते लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून देतात. त्यामुळे जनतेला कोणीही गृहीत धरू नये. धर्म, राष्ट्रभक्ती याबद्दल सर्वांनाच आदर आहे. मात्र, त्याचा गैरवापर करून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणे, हे लोकशाहीच्या तत्त्वात बसत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT